शनिवार
४ जुलै २०२६


मानव अधिकाराचा दणका…
डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे आल्याचीवाडी येथील बाळंतिणीला मृत्यू ; १८ लाखांची भरपाई देण्याचा आदेश

विशेष प्रतिनिधी…
प्रसूतीनंतर डॉक्टरांनी केलेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे आल्याचीवाडी ता. आजरा महिलेचा मृत्यू झाला. राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य संजय कुमार (निवृत्त पोलीस महासंचालक) यांनी १८ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
२३ वर्षीय प्रियंका जोतिबा नवार यांनी गर्भधारणेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केली होती. त्यांच्या सर्व प्रसूतीपूर्व तपासण्या सामान्य होत्या. प्रसूतीची संभाव्य तारीख २१ नोव्हेंबर २०१८ ला होती. पण २२ रोजी त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना पुन्हा वाटंगी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे प्रसूती झाली व प्रसूतीनंतर गर्भाशय उलटण्याची गंभीर गुंतागुंत निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. यानंतर रात्री ११.३० वा. डॉक्टर आले. प्रियंकाची तब्येत बिघडत गेली.
यानंतर सरकारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन खासगी डॉक्टर, गडहिंग्लज रुग्णालय, असा प्रवास करत अखेरीस प्रियंका पहाटे १.४५ वा. कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात पोहोचली व सकाळी ७.४५ वा. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रियंकाचे पती जोतिबा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुणीही निष्काळजीपणा केला नसल्याचा अहवाल दिला. आयोगाने हा अहवाल फेटाळून डॉक्टरांनी उपचारात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा निष्कर्ष काढला.
संपूर्ण रात्र गंभीर अवस्थेतील पत्नीला घेऊन पती एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत राहिला. प्रत्येक स्तरावर डॉक्टरांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले.
हा मृत्यू नैसर्गिक गुंतागुंतीमुळे नव्हे, तर उपेक्षा, चुकीचे उपचार आणि वैद्यकीय गैरव्यवस्थापनामुळे झाला असा ठपका ठेवण्यात आला आहे.
प्रियंकाचे पती जोतिबा यांनी न्यायासाठी केलेल्या धडपडीमुळे व अथक प्रयत्नामुळे अखेर त्यांना यश आले. निश्चितच त्यांचे कौतुक आहे.
कुटुंबीयांना शासकीय नोकरीत घ्यावे…
नवार यांच्यावर झालेल्या प्रकारामुळे त्यांना नाहक मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यांच्या पतीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.


चांदेवाडीत बिबट्या की तरस..?
काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेताकडे जातांना दक्षता घ्या. सावधानता बाळगा असे आवाहन आजरा वनविभागाच्यावतीने करण्यात आले. चांदेवाडी परिसरात बिबट्यासदृश्य वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या पथकाने या परिसराची पाहाणी केली व ग्रामस्थाशी चर्चा करून माहीती घेतली.
चांदेवाडी, सुलगाव परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर असून त्यांनी गुंजकर यांच्या शेतात रखवालीला असलेले कुत्रेही पळवल्याचे ग्रामस्थांनी वनपाल कृष्णा डेळेकर यांना कळवीले. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांच्य मार्गदर्शनाखाली वनपाल डेळेकर यांनी वनरक्षक प्रियांका पाटील व त्यांच्यासोबत अक्षय पाटील, सौरभ कोंडूस्कर, प्रवीण कांबळे, रुपेश गवळी, साहिल डेळेकर यांची टीम घटनास्थळी पाठवली. त्यांनी बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर ग्रामस्थांशी चर्चा करून माहीती घेतली. श्रीमती पाटील यांनी ग्रामसंस्कार वाहीन्यावर सूचना केल्या. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. चाकट-
बिबट्या किंवा तरस असण्याची शक्यता...
सदरचा प्राणी बिबट्या किंवा तरस असण्याची शक्यता आहे. पावसामुळे वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे मिळालेले नाही. या परिसरात कॅमेरे लावून वन्यप्राणी कोणता आहे याची खात्री केली जाईल. या परिसरात पोल्ट्री असल्याने तो आला असावा असे वनपाल कृष्णा डेळेकर यांनी सांगीतले.


आजरा तहसील कार्यालयात बैठक, रस्त्याच्या कामकाजाबाबत उद्धव सेनेसह नागरिक आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हलकर्णी-महागाव हत्तीवडे मार्गे चंदगड रस्त्याचे सुरू असलेले रस्त्याचे काम व संकेश्वर-बांदा महामार्गावर पडलेल्या भेगा यावरून दोन्ही रस्त्याच्या अधिका-यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकासह तालुक्यातील नागरिकांनीही आक्रमक भूमिका घेत आजरा तहसील कार्यालयातील बैठकीत धारेवर धरले. अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते.
यावेळी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे
म्हणाले, संकेश्वर बांदा रस्त्या बाबत आम्ही तक्रार केली होती. परंतु अधिका-यांनी दुर्लक्ष केले. मागच्या वर्षी झालेल्या रस्त्याला भेगा पडत आहेत.रोज अपघात घडत आहेत.तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले महागाव -चंदगड रस्त्या बाबत कंपनीने काळजी घेतलेली नाही. मातब्बर राजकारण्यांच्या या कंपन्या असल्याचा आरोप केला.
उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील म्हणाले, सातत्याने अपघात होत आहेत. माणसे मरायची वाट बघत आहात काय? भक्कास कामे सुरू असून डुप्लिकेट काम सुरू असल्याची टीका केली.
एम एम आय डी सी चे कार्यकारी अभियंता श्री. नाईकवडे यांनी कंपनीच्या सर्व प्रकल्प प्रमुखांना दर्जा व सुरक्षितता याबाबतीत कोणतीही तडजोड करू नये अशा सूचना केल्या.
यावेळी झालेल्या चर्चेत शिवसैनिकांनी भाग घेतला.


हत्तींचा बंदोबस्त होणार तरी कधी…?
शिवसेना आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेली वीस वर्ष सातत्याने आजरा तालुक्यात जंगली हत्तीचा धुमाकुळ सुरु आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याव्यतिरिक्त ठोस उपाय योजना करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाचे नेमके चालले आहे तरी काय ? तालुक्यातील जंगली हत्तीचा बंदोबस्त करणार तरी कधी ? यासह विविध प्रश्नांची सरबती करत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शिवसेनेच्यावतीने हत्ती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यावर येथील वनविभागाच्या कार्यालयात बैठक झाली. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, पिकांची हानी होत आहेच परंतु आता जीवीतहानी होण्याची वनविभाग वाट पहात आहे का ? पालकमंत्री आमदार असतांना वारंवार बैठका होत होत्या. अलिकडे मात्र या प्रश्नावर त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील म्हणाले, तालुक्यातील जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरीक अडचणीत येत आहेत. आता वनविभागाने ठोस भूमिका घेवून कारवाई करावी. जिल्हा अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे म्हणाले, एकीकडे तालुकयाचा पश्चिम भाग पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील जाहीर झाला असतांना शक्तीपीठ सारखा महामार्ग जर या पट्ट्यातून जात असेल तर भविष्यात वन्यप्राण्याचा मोठा उपद्रव होण्याची शक्यता आहे. राजू होलम म्हणाले, केवळ हत्तीच नाही तर गवे, माकडे, रानडुकरे यांचाही उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे. शेती कसणे अडचणीचे झाले आहे. अशा वेळी शासनाने शेतकऱ्यांची जमिन भाडेपट्यावर घेवून शेतकऱ्यांना खंड स्वरुपात वार्षिक मोबदला द्यावा.
परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत म्हणाले, हत्ती संगोपन केंद्रासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गतवर्षात नुकसान भरपाई पोटी तीन कोटींच्यावर रक्कम अदा केली आहे. काही धोरणात्मक निर्णय आहेत. ते शासकीय पातळीवर मार्गी लागणे गरजेचे आहे. हत्ती हाकारा पथकांसह सॅटेलाईटच्या माध्यमातून सध्यस्थितीत हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. आता हँगींग फेन्सींग केले जाणार असून प्रयोगीक तत्वार सिरसंगी येथे हा प्रयोग केला जाईल. या वेळी झालेल्या चर्चत डा. धनाजी राणे, सुनिल डोंगरे, दिनेश कांबळे, डॉ. उल्हास त्रिरत्ने आदीनी भाग घेतला. संजय येसादे,अमित गुरव, महेश पाटील, प्रथमेश खोत, रोहन गिरी, चंद्रकांत व्हरकटे, शिवाजी आढाव, भाऊ कदम यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.


नारायण मुरुकटे यांचे निधन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभेवाडी (ता.आजरा ) येथील नारायण गणू मुरुकटे ( वय ७३ ) यांचे निधन झाले. नायर हॉस्पिटल मुंबई येथून ३३ वर्षांच्या नोकरीतून ते सेवानिवृत्त झाले होते. ते आजरा अर्बन बँकेचे माजी संचालक, गडहिंग्लज शाखेचे सल्लागार व आजरा सूतगिरणीचे विद्यमान संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
अर्बन बँकेचे कोपरखैरण शाखा व्यवस्थापक वैभव मुरुकटे यांचे वडील तर इंजिनिअर विनोद मुरुकटे यांचे चुलते होत. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ९ वा. दाभेवाडी येथे होणार आहेत.
अनिल आमणगी यांचे निधन

उत्तुर ता. आजरा येथील अनिल संभाजी आमणगी ( वय ७३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सून जावई असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी आहे.


संभाजीनगर मध्ये रस्त्यांची डागडुजी
रहिवाशांमधून समाधान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संभाजीनगर येथे नगरसेविका आसावरी खेडेकर यांच्या सहकार्याने रस्त्यावर व ठिकठिकाणी पडलेले खड्डे मुरूम टाकून जेसीबीच्या साह्याने बुजवण्यात आले. याचबरोबर भंगीबोळातील गटर्स पाणी जाण्यासाठी मोकळ्या करून देण्यात आल्या. रायगड कॉलनी, गांधीनगर च्या आतील बाजूस असलेला पाणंद रस्ता गटर काढून स्वच्छ करण्यात आला. दरवाजकर कॉलनी, गांधीनगर येथील रस्त्या शेजारील वाढलेली झाडे- झुडपेही काढण्यात आली.
या सर्व कामामुळे स्थानिक रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.


सोहाळे-बाची मार्गावर पहाटे व दुपारच्या एस.टी. फेऱ्या सुरू करण्याची ग्रामपंचायतीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा–सोहाळे-बाची मार्गावर सध्या सकाळी १०.३० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता अशा दोनच एस.टी. फेऱ्या सुरू आहेत. मात्र या वेळा विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेशा नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
यापूर्वी साळगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या काळात एस.टी. बस आजरा–सोहाळे–बाची–पेरणोली–गारगोटी–आजरा या मार्गाने धावत होती. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बस फेऱ्या पुन्हा साळगाव मार्गे वळविण्यात आल्याने या मार्गावरील बससेवा मर्यादित झाली आहे.
त्यामुळे आजरा–सोहाळे-बाची मार्गावर पेरणोली मार्गे येणारी पहाटेची व दुपारची अतिरिक्त एस.टी. फेरी तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. भारती डेळेकर व उपसरपंच श्री. वसंत कोंडूस्कर व ग्रामपंचायत सदस्य यांनी आजरा आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी, नोकरदारांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय, आरोग्य व इतर अत्यावश्यक कामांसाठी पहाटे व दुपारच्या बस फेऱ्यांची अत्यंत गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर पेरणोली मार्गे गारगोटी जाणाऱ्या अतिरिक्त फेऱ्या सुरू कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.


केंद्रशाळा व कन्याशाळा उत्तूरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील केंद्रशाळा उत्तूर व कन्याशाळा उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामध्ये विश्वजित विजय पाटील याने २७४ गुण मिळवत राज्यात १३ वा क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत केंद्रशाळा व कन्याशाळेचे एकूण नऊ विद्यार्थी स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यामध्ये प्रथमेश रमेश कुराडे (२५८), धनश्री रविंद्र कदम (२५६), प्रिया संदीप खोराटे (२५६), आरुष घनश्याम सुतार (२५४), विराज किरण जाधव (२५४), शिवराज विजय दोणुक्षे (२५२), अनुप संभाजी लटके (२५०), आर्य अजित उत्तूरकर (२५०) आणि अभिमन्यू अवधूत जाधव (२४८) यांचा समावेश आहे. तसेच अमृता प्रशांत पाटील (२४८) हिनेही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्तेजनार्थ शिष्यवृत्तीधारक तसेच संभाव्य राजर्षी शाहू गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष गुरव तसेच शिक्षक विलास वाईंगडे आणि बाळगोंडा कोकितकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन होत आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ४ जुलै २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (दुपारी १२.३९ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (दुपारी ०१.४३ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : प्रीति योग (सायंकाळी ०५.०० पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : बलवा करण (दुपारी १२.३९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२५ ते सकाळी ११.०४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.०७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



