mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार  १३

जून २०२६

पालकमंत्र्यांनी टोल मुक्तीसाठी प्रयत्न करावेत 

टोलविरोधी संघर्ष समितीची पत्रकार बैठकीत मागणी 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा, ता. १२ : संकेश्वर – बांदा महामार्गावरील टोल बाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. यातून येथील टोल नाका हलवण्याचा निर्णय झाला असून यासाठी पालकमंत्र्यानी घेतली भूमिका स्वागतार्ह आहे. पण हा महामार्ग कायमचा टोलमुक्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. अशी भूमिका संकेश्वर -बांदा टोलमुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

कॉ. संपत देसाई व परशराम बामणे म्हणाले, संघर्ष समितीने टोल विरोधी भूमिका लावून धरली. यासाठी आंदोलने केली. दरम्यान जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी टोल हलविण्याबाबत चर्चा केली असून याला गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत. पालकमंत्री आबिटकर यांनी टोल विरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. आजऱ्याजवळील टोल हटवून तालुक्यातील जनतेला टोलमधून मुक्ती द्यावी अशी त्यांची भावना आहे. त्यांची भावना स्वच्छ आहे. पण टोल हलविला तर तो कोठे करणार ? तालुक्याबाहेर म्हणजेच सिंधुदूर्ग जिल्हयाच्या हद्दीत टोल नेल्यास त्यातून आजरा तालुकावासीयांना मुक्ती मिळणार काय ? याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी जी. पी. एस. प्रणाली सुरू करण्याचे सूतोवाच केले असून तो प्रयोग या महामार्गावर राबविला जाणार का? याची स्पष्टता होणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्र्यानी पुढाकार घेवून रस्ते विकास महामंडळ, टोल वसुली कंपनी व टोल विरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक घडवावी. अन्यथा हा रस्ता कायमचा टोलमुक्त करावा.

कॉ. संजय तर्डेकर, संजय घाटगे, विष्णू जाधव, आनंदा कुंभार, प्रकाश मोरुस्कर, मारुती पाटील, काशिनाथ मोरे, प्रभाकर कोरवी यांच्यासह टोल विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वीजवितरण समोर शंखध्वनी : स्मार्ट मीटर सक्ती न करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांना सक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली. नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कार्यवाही करू. कोणावरही सक्ती करणार नाही. अशी ग्वाही दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

उबाठाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन झाले. तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, स्मार्ट मीटर बसवण्याबबात कोणीही सक्ती करू नये. ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव आणल्यास जनता गप्प बसणार नाही. तशी वेळ आल्यास कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका. देश पातळीवरून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सुचना आल्या तरी तामिळनाडूमधे मुख्यमंत्र्यांनीच याला विरोध केला आहे. या राज्यानेही तो निर्णय घ्यावा. या वेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्मचाऱ्यांनी उध्दट भाषा ग्राहकांना करू नये. तालुक्यातील गंजलेले विद्युत खांब बदलावे यांच्यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

यावेळी उपतालुका प्रमुख संजय येसादे, शहर प्रमुख समीर चांद, सागर नाईक, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिनेश कांबळे, महेश पाटील, सुयश पाटील, अमित गुरव, रवी सावंत, राजू बंडगर, दयानंद भोपळे, इम्तियाज माणगांवकर, बिलाल लतिफ, सलीम लतिफ, हणमंत पाटील, प्रभाकर कोरवी, रोहन गिरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

थकबाकीदारांची नावे फलकावर लागणार ; उत्तूर ग्रामसभेत कडक पाऊल.
ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा; थकबाकीदारांना २ महिन्यांची मुदत

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ग्रामपंचायतच्या विविध थकबाकीदारांची नावे फलकावर लावण्याचे पाऊल उत्तूर ग्रामसभेत उचलण्यात आले आहे. ‘थकीत घरफाळा भरणार नाही’ अशा मानसिकतेत असलेल्यांना सरपंच किरण आमणगी यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभेने थेट इशाराच दिला आहे.

​सदस्य महेश करंबळी यांच्या प्रास्ताविकाने आणि ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या विषय वाचनाने सुरू झालेली ही तहकूब सभा पार पडली ‌

देवस्थानच्या जमिनीवरून घमासान; स्वतंत्र बैठक ठरणार निर्णायक…

​गावातील देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांनी मानानुसार मंदिराची कामे केलीच पाहिजेत, हा सूर या सभेत अधिक गडद झाला. ‘देवस्थानचे मानकरी असताना ग्रामपंचायतीने खर्च का करावा?’ असा रोखठोक सवाल संतोष रावण यांनी उपस्थित केला. हा तिढा सोडवण्यासाठी आता महसूल विभाग, मानकरी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांची एक स्वतंत्र बैठक’ बोलावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

बसस्थानकाचे काम ग्रामपंचायतीमुळे थांबलेले नाही ;  चेंडू एसटी महामंडळाच्या कोर्टात!

​उत्तूर बसस्थानकाच्या अर्धवट बांधकामाबाबत ग्रामस्थांमध्ये असलेली संभ्रमावस्था सरपंच किरण आमणगी यांनी अत्यंत स्पष्टपणे दूर केली. बसस्थानकाच्या जागेबाबत कायदेशीर पत्रव्यवहार करणे आवश्यक होते, ते सर्व सोपस्कार आणि कागदपत्रे ग्रामपंचायतीने वेळेत पूर्ण केली आहेत. ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही फाईल प्रलंबित नाही. या प्रकल्पाचे संपूर्ण अधिकार आता ‘एसटी महामंडळाकडे’ सुपूर्द करण्यात आले असून, महामंडळाने काम सुरू केल्यास भविष्यातही ग्रामपंचायत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास सदैव तयार आहे, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

थकीत घरफाळ्याबाबत कडक पाऊल…

गावात घरफाळा आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यावर सखोल चर्चा करून थकबाकीदारांना २ महिन्यांची मुदत देण्याचे ठरले. या मुदतीत घरफाळा न भरल्यास त्यांची नावे जाहीर फलकावर लिहिली जातील. दरम्यान, पहिल्या सहामाहीत घरफाळा भरणाऱ्यांना ५% सूट, तर मुदतीनंतर उशिरा भरणाऱ्यांना ५% दंड आकारण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

खेळाडूंचे स्वप्न साकारणार? पण घाई नको, तांत्रिक पूर्तता महत्त्वाची !

​धामणे रोडवरील क्रीडांगणाच्या जागेबाबत काही दिवसांतच जादू होणार नसली, तरी ग्रामपंचायतीचे प्रयत्न अत्यंत योग्य दिशेने सुरू आहेत. क्रीडांगणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या शासकीय आणि प्रशासकीय मान्यता लागतात, त्या मिळवण्यासाठी सरपंच व सर्व सदस्य स्वतः वैयक्तिक रित्या पाठपुरावा करत आहेत. सर्व कायदेशीर व तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या एक-दीड वर्षात क्रीडांगणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या गावातील खेळाडूंना हक्काचे मैदान मिळावे यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन आग्रही असून लवकरच या कष्टाला यश येईल, असा ठाम विश्वास ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला.

रावजी जाधवनगरचा संताप…

गावाचा मुख्य रस्ता पावसाळ्यानंतर सुरू होणार असला, तरी रावजी जाधवनगरमधील पाणी, सांडपाणी, रस्ते आणि गटर्सच्या दुरावस्थेबाबत डॉ. राजश्री देसाई, कैतान बार्देस्कर व ज्योत्स्ना माळवेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

हिशोबावर शंका…

ऑडिट रिपोर्टमधील काही तांत्रिक अनियमिततेवर महेंद्र मिसाळ यांनी शंका उपस्थित करताच, प्रशासनानेही त्यांना मुद्देसूद उत्तरे देऊन समाधान केले.संतोष रावण यांनी महिला कल्याण निधी शिल्लक न ठेवता तो थेट महिलांच्या सोयी-सुविधांसाठीच खर्च करण्याची आग्रही मागणी केली, ज्याला सभागृहाने दाद दिली.

पुन्हा इंदिरानगर प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न चर्चेत…

उत्तूर इंदिरानगरमधील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा गेली कित्येक वर्षे रखडलेला प्रश्न यंदाच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनातर्फे सध्या येथील प्रत्येक घराचे मूल्यांकन आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम वेगाने सुरू असून, हा विषय तहसीलदार पातळीवरून आता प्रांत अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने प्रत्यक्ष प्रॉपर्टी कार्ड कधी मिळणार, हा प्रश्न आजही अनुत्तरितच राहिला असून नागरिकांचे डोळे आता प्रांतांच्या निर्णयाकडे लागले आहेत.

सैनिक भवन आणि घरकुल…

देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या सन्मानासाठी गावात ‘सैनिक भवन’ उभारण्यास जागा देण्याचे निश्चित झाले. तसेच, घरकुल योजनेच्या यादीत चुकीने राहिलेल्या गरिबांची नावे पुन्हा मंजुरीसाठी पाठवण्याचा संवेदनशील निर्णय घेण्यात आला.
​जीवन प्राधिकरणाच्या शिल्लक निधीतून दोन महत्त्वाच्या गल्ल्यांचे डांबरीकरण करण्याचा ठरावही या सभेत मंजूर झाला.

चर्चेत संतोष रावण, बाळासो सावंत, मंदार हळवणकर, स्वप्निल मांडे यांच्यासह इतर सदस्यांनी विविध प्रश्न मांडले. सचिन फाळके यांनी आभार मानले

छाया वृत्त

जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी व्हाइस चेअरमन अशोक बाचुळकर
डॉ. तानाजी कावळे, डॉ. संजीवनी पाटील, प्रा. क्रांती शिवणे, प्रा. नेहा पेडणेकर, दिनकर पोटे, कृष्णा डेळेकर, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता
रामा पाटील

मुरुडे ता. आजरा येथील रामा हरी पाटील ( वय ७४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त इंजिनियर कृष्णा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू होत.

रविवार दिनांक १४ रोजी रक्षा विसर्जन आहे.

थोडक्यात जिल्हा …

♦ अंबाबाई मंदिर सुवर्ण कळस: श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरावर गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सहकार्यातून दीड किलो वजनाचा सोन्याचा कळस व बसविण्यात आला असून मंदिर परिसर या ऐतिहासिक सोहळ्याने झळाळून उठला आहे.

♦ शहीद विक्रम चव्हाण: जम्मू-काश्मीरमधील उरी येथे देशासाठी प्राणांची आहुती देणारे कोल्हापूरचे वीर जवान विक्रम चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

♦ अवघ्या ७ हजार रुपयांच्या कर्जासाठी एका महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजी/ कोल्हापूरमध्ये समोर आला आहे.

♦ अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत कोल्हापूरमध्ये अस्वच्छ व बासी पनीरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

♦ धरणातील पाणीपातळी खालावल्यामुळे कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना काही काळासाठी बंद पडली आहे. शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

♦ जिल्ह्यात १.५ लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये ‘स्मार्ट मीटर’ कनेक्शन बसवण्याचे काम वेगात सुरू आहे.

 फोटो क्लिक 

आजरा – उत्तुर मार्गावर हालेवाडी तिठ्ठा येथे छायाचित्रकार रमेश पारळे/सृष्टी फोटो यांनी टिपलेले छायाचित्र…

इशारा…

शहराजवळच जखमी गव्याचा वावर

आजरा – साळगाव मार्गावर दोन गव्यांचा कमल कुंज अपार्टमेंट नजीक वावर असल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी व पादचाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. यापैकी एक गवा जखमी आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १३ जून २०२६
वार : शनिवार

माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी (सायंकाळी ०४.०७ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (१४ जून रात्री ०१.१६ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : सुकर्मा योग (सायंकाळी ०५.२७ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०४.०७ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मेष राशी (सकाळी ०९.२४ पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२० ते सकाळी १०.५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

आजऱ्याच्या प्रारुप आराखड्यावरील ७३ तक्रारीवर सुनावणी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!