mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  ३ मे  २०२६

देशात लोकशाही पद्धतीने क्रांती झाली पाहिजे : डॉ. भालचंद्र कांगो 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खऱ्या प्रश्नावरून नाही तर धर्म, जाती पाहून मतदान होते. ही खरी लोकशाही नव्हे. मतदारांवर प्रभाव न टाकता मतदान झाले तरच खरी लोकशाही अवतरेल. देशात लोकशाही पध्दतीने क्रांती झाली पाहीजेत. वर्ग संघर्ष, जाती संघर्षाला बरोबर घेवून भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असलेला मजबूत समाज व देश घडवायला हवा. असे प्रतिपादन भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे केंद्रीय नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.

येथील ‘ मृत्यूंजय ‘ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनात लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार शाहीर संभाजी भगत यांना डॉ. कांगो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार समीतीचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष मोहनराव देसाई प्रमुख उपस्थित होते.

कार्याध्यक्ष कॉं. संपत देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, लोकशाही गव्हाणकर यांनी जातीच्या बाहेर जावून काम केले. भारतीय समाजव्यवस्थेमधे जातीच्या बाहेर जावून काम करणाऱ्यांची उपेक्षाच होत असते. त्यांचे कार्य व विचार नव्या पिढीसमोर जावे यासाठी लोकशाहीर गव्हाणकर स्मृती पुरस्काराचे दरवर्षी आयोजन केले जाते. कॉ . कांगो म्हणाले, आजचे वर्तमान चांगले नाही. समाजात वर्चस्ववादी विचार, अतिरिक्त राष्ट्रवाद फोफावत आहे. याला रोखायला हवे. शाहीर भगत म्हणाले, राजसत्ता हातात आली तर देशात बदल घडेल. हे स्वप्न फोल ठरले आहे. दरम्यान सर्वांचे सांस्कृतीक राजकारणाकडे दुर्लक्ष झालेले आहे. बहुजनानी सांस्कृतिक राजकारणावर भर दिला पाहीजेत. मुकुंदराव देसाई यांचे भाषण झाले. या वेळी डॉ. राजन गवस, प्रा. डॉ. आनंद मेणसे, प्रा. सुनिल शिंत्रे, उदयराज पवार, रणजित देसाई, राजू होलम, प्रा. मीना मंगरुळकर, पुष्पलता घोळसे, नितीन पाटील, गीता पोतदार, संभाजी पाटील, शिवाजी गुरव, संजय तर्डेकर, अरविंद बार्देस्कर, साताप्पा कांबळे, रवि भाटले, वंदन जाधव, रावसाहेब देसाई, संभाजी बापट, मनोहर गव्हाणकर सुरेश दास,, मायकेल फर्नांडीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन तर संजय घाटगे यांनी आभार मानले.

आजरा तालुक्याचा बारावीचा निकाल ९०.५८ टक्के

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्याचा बारावीचा निकाल ९०.५८ टक्के इतका लागला आहे. तालुक्यात बारावी परीक्षेसाठी ७५९ विद्यार्थांनी नोंद केली होती. यापैकी ७५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. ६८३ वि‌द्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शुक्रवारपासून विद्यार्थी व पालकांना निकालाबाबतची उत्सुकता लागून राहीली होत्ती. काव दुपार पासून निकाल पहाण्यासाठी विद्यार्थांनी कॉलेज व संगणक सेंटरवर गर्दी केली होती. दुपार नंतर निकाल ऑनलाईन पहावयास मिळाला.

प्रमुख निकाल पुढीलप्रमाणे (टक्के) :-

आजरा महाविद्यालय ज्यूनिअर कालेज ८९. ०८ आजरा महाविद्यालय व्यावसायिक शिक्षण विभाग १००, व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कालेज ९६.१७, डॉ. झाकीर हुसेन ॲग्लो ऊर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कालेज -८९.८१, उत्तूर ज्यूनिअर कॉलेज उत्तूर -६३.६३, नवकृष्णा व्हॅली ज्यूनिअर कॉलेज उत्तूर १००, आम पॅरामेडिकल कालेज आजरा- ८३.३३, पंडित दीनदयाळ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आजरा १००, बापूसाहेब सरदेसाई कॉलेज निंगुडगे – ७७.७७.

महाराष्ट्र दिनानिमित्त मलिग्रेत आरोग्य शिबीर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे येथे महाराष्ट्र दिनानिमित्ताने संयुक्त वाघाची तालीम मंडळ आयोजित व संत गजानन महाराज रुलर हाँस्पिटल महागाव याच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य शिबीरामध्ये सर्व आजारांची तपासणी मल्लिकार्जुन मंदिर मलिग्रे संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परीषद सदस्य सुधीर देसाई यानी आरोग्य शिबिराला भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. आरोग्य शिबिरासाठी डॉ.मनिषा सुतार, डॉ. पुजा मळेकर, डॉ. समृध्दी पवार, नुतन पाटील, रविना आजवेकर, कौसर नदाफ, प्रियांका गावित, शिबीर व्यवस्थापक पंकज खानापूरे मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव, सरपंच शारदा गुरव, अशोक शिंदे, आनंदा बुगडे, आप्पाजी नेसरीकर याच्यासह लाभार्थी ग्रामस्थ उपस्थीत होते.

ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  श्री. जयवंतरावजी शिंपी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

व्यंकटराव शिक्षण संकुलात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला शुभेच्छा देण्यासाठी आजरा व आजरा तालुक्यातील मित्रमंडळी, कार्यकर्ते मंडळी यांनी पुष्पगुच्छ, हार- तुरे न देता विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारे शैक्षणिक साहित्य, वह्या यांच्या रूपाने भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत शिंपी यांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येईल असे यावेळी अभिषेक शिंपी यांनी सांगितले.

रेड्याच्या बळीची प्रथा बंद करा…
संविधान संवर्धन चळवळीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोळींद्रे तालुका आजरा येथील महालक्ष्मी यात्रेमध्ये रेड्याच्या बळी देणे अनुसूचित जाती समाजातील व्यक्तीला बळ डोक्यावरून घेऊन गावात फिरवण्याच्या जातीय प्रथेला संविधानिक व कायदेशीर मार्गाने विरोध करून त्याला प्रतिबंध करावा अशी मागणी संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोळींद्रे गावात २२ वर्षानंतर ५ व ६ मे रोजी श्री महालक्ष्मी यात्रा भरत असून या यात्रेत रेड्याच्या बळी देण्याची प्रथा चालवली जाणार असून त्यानंतर अनुसूचित जाती समाजातील एका व्यक्तीला बळ डोक्यावर घेऊन गावात फिरवण्याची जातीय प्रथा चालवली जाणार आहे. ही प्रथा अत्यंत अमानवी व जातीय भेदभावपूर्ण व अस्पृश्यता दर्शवणारी आहे . त्यामुळे ही प्रथा तातडीने बंद करावी व जर कोणीही प्रथा जबरदस्तीने चालवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कारवाई करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर संविधान संवर्धन समितीचे कॉ. संग्राम सावंत व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

छायावृत्त

सुळे येथील सोनाबाई रावु कटाळे यांच्या गवताच्या गंजींना आग लागून मोठे नुकसान झाले आहे..गडहिंग्लज अग्निशमन दल यांचे वाहन आणून आग आटोक्यात आणण्यात आली. 

काँक्रिटचा वेग, पण रस्त्याची लाटांवरची’ वाटचाल.उत्तूर–कडगाव रस्त्याचा बोजवारा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ते कडगाव या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असले तरी प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम अखेर गतीने सुरू झाले असले, तरी रस्त्याच्या सपाटीकरणाकडे ठेकेदार व संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
सध्या सुरू असलेल्या कामामध्ये मशीनद्वारे काँक्रिट टाकून रस्ता तयार केला जात असताना रस्त्याची पातळी समतल ठेवण्यात मोठी त्रुटी राहिल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर लाटांसारख्या उंच-सखल रेषा निर्माण झाल्या असून, या नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः ‘बेडूक उड्या’ मारत असल्याचा अनुभव येत आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, अशा प्रकारचा असमतोल रस्ता भविष्यात अपघातांना आमंत्रण देऊ शकतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संदर्भात अनेक वेळा वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी व बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. कामाची गती वाढवताना दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत असून, कोणतीही प्रभावी तपासणी किंवा देखरेख होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निकृष्ट कामामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य अपघातांना जबाबदार कोण? असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
एकीकडे रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे गुणवत्तेची पायमल्ली होत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या कामाची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ३ मे २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (४ मे पहाटे ०३.०१ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (सकाळी ०७.०९ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : वरीयान योग (रात्री ०९.४४ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : तैतुला करण (दुपारी ०१.५४ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.२४ ते सायंकाळी ०७.०० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.११
सूर्यास्त : सायंकाळी ०७.००
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

मुंबई परतीच्या मार्गावर…?

काल शनिवारी चेन्नई विरुद्ध मुंबई या सामन्यांमध्ये चेन्नईने मुंबईवर आठ गडी राखून विजय मिळवला नऊ पैकी तब्बल सात सामन्यांमध्ये पराभव पत्करलेल्या मुंबईचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.२० षटकात ७ गडी बाद १५९ धावांवर रोखल्यानंतर चेन्नईने १८.१ षटकात ही धावसंख्या गाठली.

ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला.

गुणतक्त्यात पहिले चार संघ
पंजाब – १३
बंगळुरू – १२
हैदराबाद – १२
राजस्थान – १२

नऊ सामन्यात ४३३ धावांसह लोकेश राहुल/ दिल्ली ऑरेंज कॅपचा तर नऊ सामन्यात १७ बळी मिळवणारा भुवनेश्वर कुमार/ बंगळूर पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे.

आजचे सामने

हैदराबाद विरुद्ध कोलकता
दुपारी ३.३० पासून

गुजरात विरुद्ध पंजाब.                         सायंकाळी ७.३० पासून

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!