mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार २६ एप्रिल २०२६

डिजिटल अरेस्ट प्रकरणाने काजू प्रक्रिया उद्योजक धास्तावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये आजरा तालुक्यातील साळगाव येथील काजू प्रक्रिया उद्योजक दयानंद देवलकर यांना गोवा पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विशेषतः काजू प्रक्रिया उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणांमध्ये देवलकर यांचा खरोखर सहभाग आहे की त्यांना अडकवले जात आहे याची माहिती काल दिवसभर घेतली जात होती. दरम्यान देवलकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काजू प्रक्रिया उद्योजकांचे आर्थिक संस्थांमध्ये मोठे व वारंवार आर्थिक व्यवहार होत असतात. याचा फायदा उठवत या प्रकरणामध्ये देवलकर यांना स्कॅमर मंडळींकडून अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. देवलकर यांचे आर्थिक व्यवहार व मित्रपरिवार मोठा असल्याने मित्र परिवाराला या प्रकरणामुळे चांगलाच धक्का बसला आहे.

लवकरच या प्रकरणावरील पडदा उठून वास्तव समोर येण्याची गरज आहे.

तरुणाईच्या मारामारीत वृद्धा जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

पोवारवाडी हाळोली येथील ओमकार किरण पोवार याने गेल्या वर्षापासून स्वतंत्र गवंडी काम सुरू केल्याचा राग मनात धरून सुनील पांडुरंग पोवार हा ओंकार व त्याचा मित्र ऋग्वेद बोलत बसले असताना शिवीगाळ करून अंगावर धावून येत असताना भांडण मिटवण्यासाठी आलेल्या आजी आनंदी वसंत पोवार यांना जोराने सुनील याने ढकलल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्या जखमी झाल्या आहेत.

याबाबतची फिर्याद ओमकार किरण पवार पवार यांनी आजरा पोलिसात दिली असून याप्रकरणी पोलिसांनी सुनील पांडुरंग पोवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हवालदार मकानदार पुढील तपास करीत आहेत.

प्रवचने ही काळाची गरज : प्रा. शिवाजी भुकेले

शेळप आजरा येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात!


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आज समाजात मुखवट्यांचे प्राबल्य वाढले आहे. साधू, संत, बुवा, स्वयंघोषित जगद्गुरु यांचे नको तेवढे तण वाढू लागले आहे. या तणाला जो मनापासून उखडून टाकण्याचे खरे काम वारकरी करू शकतो. काम, क्रोध, लोभ ,मत्सर, आदि विकारावर विजय मिळविते ते खरे किर्तन होय. वारकरी हा वैश्विक पातळीवरचा मातृभाव निर्माण करतो. पाखंड खंडनाचे काम फक्त वारकरीच करू शकतो. तेव्हा समाजातील अपप्रवृत्ती दूर करण्यासाठी किर्तन आणि प्रवचनाची खरी आवश्यकता आहे ती काळाची गरज बनली आहे.असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा शिवाजी भुकेले यांनी शेळप (ता आजरा) येथे वारकरी कीर्तन संमेलनात केले.
शेळप – आजरा येथे सारथी चारिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज व समस्त आजरा तालुका वारकरी सांप्रदाय आयोजित पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात प्रवचनकार प्रा. भुकेले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर होत्या.

स्वागताध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वारकरी कीर्तन संमेलनात गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील वारकऱ्यांनी सहभाग घेतला. या निमित्य हरिपाठ, वारकरी सन्मान सोहळा यासह हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचे कीर्तन झाले.

आजरा तालुक्यातील रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक संस्था यांच्या वतीने हरिपाठ सादर करण्यात आले. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
प्रास्तविक आजरा तालुका शिवसेनाप्रमुख युवराज पोवार यांनी केले.

अंजनाताई रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनास शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, महिला जिल्हा संघटिका विमल पाटील अविनाश शिंदे, सरपंच अर्जुन बागडी,गौरव सुतार .सोमगोंडा देसाई, पार्थ शिंत्रे, पृथ्वी शिंत्रे, मुख्याध्यापक संजय बापट, कृष्ण डाकरे, बचाराम गुरव , शिवाजी आढाव दिनेश कांबळे यांच्यासह शेळप ग्रामस्थ , आजरा तालुका वारकरी सांप्रदायाचे मान्यवर उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. सुनील देसाई यांनी मानले. सूत्रसंचलन दिनकर खवरे यांनी केले.

गर्जना संघटनेचा दणका :निकृष्ट कामावर २४ तासांतच कारवाई.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चिमणे–बेलवाडी हु ll रस्त्याच्या सुधारणा कामातील निकृष्ट दर्जा उघडकीस आल्यानंतर गर्जना संघटनेने उभारलेल्या तीव्र आंदोलनाचा प्रभाव तात्काळ दिसून आला. स्थानिक ग्रामस्थ आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत काम थांबविल्यानंतर अवघ्या २४ तासांत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कनिष्ठ अभियंता (JE) आणि संबंधित ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले.

स्थळ पाहणीदरम्यान कामातील गंभीर त्रुटी मान्य करत ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा करून घेण्याची कबुली दिली. तसेच उर्वरित काम तांत्रिक निकषांचे पालन करून उच्च दर्जात पूर्ण केले जाईल, अशी स्पष्ट हमीही देण्यात आली.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ₹ ४३९.४४ लाखांचा निधी मंजूर असलेल्या ५.१२५ कि.मी. लांबीच्या या रस्त्याच्या कामावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र, गर्जना संघटना आणि ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला.
ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे निकृष्ट कामाला माघार घ्यावी लागली असून, काम दर्जेदारच झाले पाहिजे हा ठाम संदेश संबंधित ठेकेदारांना देण्यात आला आहे.

पेरणोली गावातील विकास कामांसाठी बांधील : सौ. वनश्री देसाई

……ज्योतिप्रसाद सावंत

पेरणोली गाव हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटेखानी गाव असले तरीही येथे विकास कामे करण्यास संधी आहे. विकास कामाचे ध्येय समोर ठेवून ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी आपण उभ्या आहोत. मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून सदर पदावर काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन श्री देव रवळनाथ विकास आघाडीच्या उमेदवार सौ. वनश्री रवींद्र देसाई यांनी केले आहे.

यावेळी बोलताना सौ. देसाई म्हणाल्या, सरपंच पदाचे मानधन मराठी शाळेतील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी देण्याबरोबरच गावातील पाणंद रस्त्यांचे नूतनीकरण करणे, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, गावामध्ये वाचनालयासह कृषी केंद्राची स्थापना करणे यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

याचबरोबर ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे. श्री रवळनाथ मंदिराचे सुशोभीकरण व तटबंदीची गरज आहे त्यासाठी वरिष्ठ लोकप्रतिनिधी विषयी संपर्क साधून निधी आणण्यास प्रयत्नशील राहीन. गावातील मराठी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करणे, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करून प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणे, ग्रामपंचायतीसाठी नवीन सुसज्ज अशी इमारत उभी करणे व कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गावांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम आपण प्राधान्याने निवडून आल्यानंतर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेला ४३ लाख २४ हजार इतका ढोबळ नफा-चेअरमन शिवाजीराव देसाई यांची माहिती.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली येथील श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेला सन् २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ४३ लाख, २४ हजार इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव देसाई यांनी दिली.

संस्थेच्या आजरा व अडकुर या ठिकाणी शाखा कार्यरत असुन, संस्थचे भागभांडवल १कोटी १९ लाख ३० हजार इतके असुन, ठेवी १४ कोटी २९ लाख ६८ हजार इतक्या आहेत. तर १२ कोटी २८ लाख ८५ हजार इतके कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेचे खेळते भांडवल १९ कोटी ६३ लाख ४९ हजार आहे संस्थेची एकुण गुंतवणुक ४ कोटी ८७ लाख ४७ हजार इतकी आहे. संस्थेने एकुण व्यवसाय ५६ कोटी १९ लाख ३१ हजार इतका केलेला असुन, संस्थेकडे एकुण फंडस १कोटी ५९ लाख ९६ हजार इतके आहेत. संस्था स्थापनेपासुन ऑडीट वर्ग अ असलेची माहिती श्री देसाई यांनी दिली.

संस्थेच्या या यशामध्ये संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद कर्जदार, ठेवीदार हितचिंतक संस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापक , सर्व कर्मचारी यांनी चांगले योगदान दिले असल्याचे चेअरमन देसाई यांनी सांगितले,

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहपूर्ण व जनजागृतीपर वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावोगावी जनजागृती रॅली, स्वच्छता अभियान, प्रबोधन सभा तसेच हिवताप प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

ताप, थंडी वाजणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच हिवताप प्रतिबंधासाठी गावपातळीवर कंटेनर तपासणी मोहीम राबविण्यात आली. घरांच्या परिसरातील टाक्या, ड्रम, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाणी व इतर पाणी साचणाऱ्या वस्तूंची तपासणी करून डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही ठिकाणी डासांच्या अळीनियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख,आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, दर्शन भालेराव, दीपक हरणे, लक्ष्मण घोरपडे, शिवम तरोळे, प्रमोद कांबळे व रोहित शेंडे यांनी प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन जनतेमध्ये हिवतापाबाबत जागरूकता निर्माण केली.

 आजचे पंचांग 

आयपीएल न्यूज

ता

 

संबंधित पोस्ट

अपघातात एक ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews
error: Content is protected !!