मंगळवार २१ एप्रिल २०२६


दुर्घटना…
जुन्या घराची भिंत अंगावर कोसळलीशिक्षिकेसह शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू… एक गंभीर जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील लिंगायत गल्ली ते महाजन गल्ली जोडणाऱ्या रस्त्यावर बोगदा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणची डॉ . अनिल देशपांडे यांच्या जुन्या घराची भिंत या मार्गावरून जाणाऱ्या प्रा.ज्योती नितीन कुंभार (वय ४३, मुळ गाव पारेवाडी, ता.आजरा,सध्या रा.एकता काॅलनी, आजरा) व वैष्णवी तुकाराम उर्फ उत्तम भोसले (वय १२, नाईक गल्ली/एकता काॅलनी,आजरा) यांच्या अंगावर कोसळल्याने दगड मातीच्या तिघाऱ्याखाली अडकून त्यांचा मृत्यू झाला तर मुलीची आई सौ. ललिता भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सदर दुर्घटना घडली.

याबाबत पोलीस, मृतांचे कुटुंबीय व प्रत्यक्ष दर्शनी दिलेली माहिती अशी…
शाळा/ महाविद्यालय सुटल्यानंतर लिंगायत गल्लीतील दूरदुंडेश्वर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या सेलमध्ये खरेदीसाठी प्रा. ज्योती, सौ. ललिता व त्यांची कन्या वैष्णवी या बोगदा मार्गावरुन जात होत्या जात होत्या. येथे देशपांडे यांच्या घराचे निर्लेखन सुरू होते.
त्या घराशेजारील भिंती जवळून जात असताना अचानक भिंत कोसळली व मातीच्या ठिगाऱ्याखाली तिघीही गाडल्या गेल्या. यामध्ये शिक्षिका कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी यांचा जागीच मृत्यू झाला तर वैष्णवीची आई गंभीररीत्या जखमी झाली आहे.
मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून आजऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घराचे काॅंट्रॅक्टर अभिजित हुक्केरी यांना दिले होते.त्यांनी हे काम सब काॅंट्रॅक्टर विनोद मोहिते यांना दिले होते.रस्त्याशेजारी घर पाडत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी न घेता पाडत असताना घटना घडली याला जबाबदार धरत पोलिसांनी हुक्केरी, मोहिते व जेसीबी चालक मिथून चव्हाण (विजापूर, कर्नाटक) यांच्या विरोधात सुनील पांडुरंग कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
विनोद मोहिते व मिथुन चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिवसभर शहरांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा तर सुरू होतीच परंतु त्याचबरोबर प्रा. ज्योती व कुमारी वैष्णवी हिच्या मृत्यूबद्दल हाळहळ व्यक्त होताना दिसत होती. घटनास्थळी नगराध्यक्ष अशोक चराटी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, मुख्याधिकारी सुरज सुर्वे, प्रवीण बैले, जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, परशुराम बामणे, विलास नाईक आदिंनी भेट देऊन माहिती घेतली.

पाच भावंडांमध्ये एकमेव मुलगी…
भोसले कुटुंबीयांमध्ये असणाऱ्या तीन भावांच्या सहा मुलांपैकी वैष्णवी ही एकमेव मुलगी होती. पाच भावंडांमध्ये ती एकुलती एक असल्याने सर्वांची लाडकी होती. येथील आजरा स्कूल मध्ये ती सहावी मध्ये शिकत होती.
सेलचा मोह महागात पडला…
लिंगायत गल्ली येथील दुरुददुंडेश्वर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या सेलला भेट देण्यासाठी प्रा. ज्योती या सौ.ललिता व त्यांची मुलगी वैष्णवी यांना घेऊन चालल्या होत्या दरम्यान सदर दुर्दैवी घटना घडली.
गर्दीच गर्दी….ट्राफिक जाम
सदर घटना घडल्याचे वृत्त शहरांमध्ये वाऱ्यासारखे पसरले. अनेकांनी थेट घटनास्थळी धाव घेतल्याने बराच वेळ आजरा महागाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर आजरा ग्रामीण रुग्णालयातही प्रचंड गर्दी झाली होती.
गौरवचे कौतुक…
घटना घडल्या बरोबर एक दोन मिनिटातच घटनास्थळी पोहचून येथील सामाजिक कार्यकर्ता गौरव देशपांडे याने आपले सहकारी सतीश पवार, जावेद पटेल, समीर तकीलदार, प्रथमेश काणेकर व गवंडी कामाकरीता निघालेले बांधव यांच्या मदतीने ढिगारा उपासून मृतदेह बाहेर काढण्यात मोठे कष्ट घेतले.
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर…
शहरातील भर वस्त्यांमध्ये अनेक इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. नगरपंचायतीने वारंवार सूचना करूनही त्या इमारती उतरून घेण्यात आलेल्या नाहीत. सोमवारच्या घटनेनंतर या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : ना.हसन मुश्रीफ यांचा विश्वास

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार- योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूर ता. आजरा या गावाचे नाव देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर निरंतर राहील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
उत्तूर ता. आजरा येथे इमारतीचे काम सुरू असलेल्या शासकीय योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यस्थळाला मंत्री मुश्रीफ यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा बैठक घेतली.
श्री. मुश्रीफ म्हणाले, निसर्गरम्य १८ एकरांवर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी सध्या रू. २५० कोटी निधी मंजूर आहे. सर्व अनुषंगिक सेवा सुविधांसह रु. १,००० कोटींच्या घरात तो जाऊ शकेल इतका व्यापक आहे. ही जागा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांशी संलग्न आहे. केरळप्रमाणे येथेही “मेडिकल हब” निर्माण होऊन “ईंटरनॅशनल मेडिकल टुरिझम” वाढणार आहे. स्थानिक अर्थकारणावर फार मोठा परिणाम होणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी विविध कामे जोता लेवलपर्यंत आल्याचे स्पष्ट केले. संरक्षण भिंत व अंतर्गत रस्त्यांचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. परिसर सुशोभीकरणाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले. तसेच; आंबेओहोळ प्रकल्पावरून सहा किलोमीटरच्या पाईपलाईनमधून स्वतंत्र पाणी योजनेचेही काम प्रगतीपथावर आहे.
अधिष्ठाता श्रीमती भाग्यश्री खोत यांनी सद्यस्थितीत सुरू असणारे वर्ग प्रवेश परिस्थिती याची माहिती दिली.ही सर्व कामे ऑक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संजीवनी कट्टी, आजरा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अ. सं. कचरे, नवनाथ बनसोडे व निं. बा. पगारे, शाखा अभियंता विक्रम कदम व राहुल पाटील, आदी उपस्थित होते.

भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात शव शीतगृह सुविधा द्यावी
शिवसेनेचे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला भागवत व परिसरातील एकूण वीस गावे जोडलेली आहेत. यास परिसरातील बहुतांशी नागरिक हे नोकरी व व्यवसाय निमित्य पुणे मुंबई येथे रहातात. गावातील व इतर परिसरातील कोणी नागरिक मृत्यू पावल्यास नोकरी निमित्त बाहेरगावी असणारे नातेवाईक अंत्यसंस्काराला येईपर्यंत बारा ते चौदा तास घरी मृतदेह ठेवावा लागतो, त्यामुळे मृतदेह शवतगृहात ठेवण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.
ही सुविधा आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या जागेत तयार करण्यात यावी. याचा आजूबाजूच्या ३५ गावांना लाभ होणार आहे असे स्पष्ट करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शव गृहाची मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले असून निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय पाटील, श्रीकांत देवरकर, राहुल देसाई आदींच्या सह्या आहेत.

उत्तुर येथे पाणंद रस्त्याचा शुभारंभ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत उत्तूर येथील नवकृष्णा व्हॅली स्कूल ते योग व निसर्ग उपचार विद्यालय या पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. उत्तूर विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यांची कामे गतीने राबवण्याच्या सूचनेनुसार आजरा तहसीलदार समीर माने, जि. प. सदस्य शिरीष देसाई, पं. स. सदस्य विकास चोथे व पाणंद कमिटी सदस्य गणपत सांगले यांच्या हस्ते या कामाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांना रस्त्याच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास उपसरपंच सुनिता हत्तीरगे, ग्रामपंचायत सदस्य समिक्षा देसाई, सुनिता केसरकर, लता गुरव, अनिता घोडके, ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ मिसाळ, सर्कल गीता कुंभार, कोतवाल स्नेहल कुंभोजकर, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे संजय येजरे, गंगाधर हराळे, सुधीर सावंत, विजय सावेकर, विजय गुरव, तुषार घोरपडे, नवकृष्णा व्हॅली स्कूलचे कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमीचा इफेक्ट

आजरा महागाव मार्गावरील वाटंगी फाट्यावर नवीन रस्त्याचे काम करत असताना जुना रस्ता व नवीन रस्ता यामध्ये उंचीतील फरकामुळे येथे अपघात होत असल्याचे वृत्त मृत्युंजय महान्यूज मधून प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आली आहे.
निधन वार्ता
नितीन दळवी

त्याच्या पश्चात आई, वडील,लहान बहिण,लहान भाऊ आहेत.
बाळासो कृष्णा दळवी यांचे ते चिरंजीव होत.

आजचे पंचांग
दिनांक : २२ एप्रिल २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी (२२ एप्रिल रात्री ०१.१९ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (रात्री ११.५८ पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : शोभन योग (दुपारी १२.३० पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : भाव करण (दुपारी ०२.४४ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृषभ राशी (दुपारी १२.५९ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते सायंकाळी ०५.२२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.१८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
गुजरातला मुंबई कडून नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने ठेवलेले २०० धावांचे उद्दिष्ट गाठताना गुजरातला सर्व बाद १०० धावांमध्ये मुंबईने गुंडाळले. या सत्रातील मुंबईचा हा दुसरा विजय आहे.
आजचा सामना
हैदराबाद विरुद्ध दिल्ली
स्थळ : हैदराबाद
वेळ : सायंकाळी ७:३० पासून


