शनिवार ११ एप्रिल २०२६


दिशाभूल करण्याचे उद्योग विरोधकाने थांबवावेत : नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचे पत्रकार परिषदेत आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमच्यामध्ये काहीतरी करण्याची ताकद आहे म्हणून आम्हाला घसघशीत मतदान करून शहरवासीयांनी सत्ता दिली आहे. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा अथवा बडेजाव न करता आम्ही विकास कामे करीत आहोत. अशावेळी नगरपंचायतीमधील विरोधी नगरसेवक पेपरबाजी करून विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. नसते उद्योग करण्यापेक्षा त्यांनी विकास कामाला हातभार लावावा असे आवाहन नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेद्वारे विरोधकांना केले आहे.
एखादे काम सुरू होण्याच्या अगोदर आंदोलनाचा इशारा देऊन आपल्या पाठपुराव्यामुळे कामे सुरू होत असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. या सर्व प्रकारात शहराची बदनामी होत आहे. कोणतेही काम किंवा प्रश्न एका दिवसात मार्गी लागत नसून त्यासाठी सत्ताधारी आघाडीतील नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अनेक दिवसापासूनचे प्रयत्न कारणीभूत ठरतात. त्यामुळे आजरा नगरपंचायतीतील विरोधी नगरसेवक केवळ प्रसिद्धीचे ढोंग करून आजरा शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत.
नगराध्यक्ष चराटी पुढे म्हणाले, विरोधी मंडळी आपणच काम करून आणले असा पेपरबाजी करून दिखावा करत आहेत. त्यांच्याकडून नगरपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप वाढत चालला आहे. अधिकाऱ्यांच्यावर अरेरावी सुरू आहे. यापूर्वी शहरात अधिकारी नव्हते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला अधिकारी मिळाले आहेत. विरोधकांच्या अरेरावीमुळे अधिकारी जर गेले, तर पुन्हा अधिकारी मिळणे कठीण होऊन बसेल. शहरात सध्या सुरू असलेली विकास कामे मागील सभागृहाची आहेत.मंत्री आबिटकर यांना पत्रे देऊन फोटो काढून विरोधक प्रसिद्धीचे ढोंग करत आहेत. पाणी, रस्ते व कचरा या प्रश्नांची बऱ्यापैकी सोडवणूक केली आहे. निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्षांना वगळून विकास कामांचे नारळ फोडायचे हे योग्य आहे का? अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्नाची सोडवणूक होऊ शकते.
यावेळी उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेवक परेश पोतदार, अनिकेत चराटी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, निशाद चाँद, आसावरी खेडेकर, पूनम लिचम, बाळ केसरकर, संजय चव्हाण, समीर चाँद, आरिफ खेडेकर, महेश खेडेकर उपस्थित होते.

शक्तीपीठ महामार्गाला तालुक्याचा विरोधच
आजरा येथे पत्रकार बैठकीत मान्यवरांची भूमिका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शक्तिपीठ महामार्ग असे गोंडस नाव देऊन निसर्गरम्य आजारा तालुका बकाल करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. एकही शक्तीपीठाशी संबंधित स्थळ नसताना हा महामार्ग आजरा तालुक्यातून पुढे नेला जात आहे. तालुक्यातील पर्यावरण, जैवविविधता, संस्कृती यावर घाला घालण्याचा हा प्रयत्न असून हा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडणार असा निर्धार आजरा येथे झालेल्या शक्तीपीठ संघर्ष समितीच्या पत्रकार बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तिपीठमुळे तालुका उध्वस्त होणार आहे. मुळातच या मार्गाची कोणीही मागणी केली नसताना हा मार्ग होत आहे. केवळ आदानी आणि अंबानींचे हित डोळ्यासमोर ठेवून तयार होणाऱ्या या मार्गाला आपला विरोधच राहणार आहे. जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी आता बैठका व सभा घेतल्या जात असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, देवांच्या आणि भक्तांच्या नावावर धार्मिक दृष्ट्या वातावरण तयार करून शक्तिपीठ महामार्ग तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सद्यस्थितीत तालुक्याला शेती शिवाय पर्याय नाही. अशावेळी बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे महामार्गाची एकंदर उभारणी पाहता या मार्गाच्या आजूबाजूच्या लोकांना काडीचाही फायदा नाही. रेडी रेकनरच्या दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे. हि नुकसान भरपाईही अत्यल्प राहणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, संजयभाऊ सावंत यांनीही भूमिका स्पष्ट केली.
बैठकीस कॉ. संजय तर्डेकर, युवराज पोवार, डॉ. धनाजी राणे, प्रकाश मोरुसकर, रवींद्र भाटले, संजयभाऊ सावंत, दिनेश कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याला मान्यवर उपस्थित राहणार
१५ एप्रिल रोजी होणाऱ्या शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आजऱ्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ९ अर्ज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पेरणोली, हरपवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणुक लागली आहे. तर हरपवडे, मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे येथे सदस्यपदासाठी पोट निवडणूक लागली आहे. काल अर्ज भरणीच्या चौथ्या दिवशी ९ अर्ज दाखल झालेले आहेत.
सरपंचपदासाठी ६ तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३ अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी पेरणोली येथून राजश्री पवार,संध्या कालेकर, संजीवनी नावलकर, राजश्री देसाई असे ४ तर कोरीवडे सरपंच पदाकरिता संदीप आनंदा रायकर, विवेक दिगंबर पाटील असे २ अर्ज दाखल झाले आहेत.
सदस्यपदासाठी धामणे २ तर हरपवडे १ अर्ज दाखल झाला आहे. देऊळवाडी, मडिलगे व बहिरेवाडी येथे एकही अर्ज दाखल झालेला नाही.

गांधीनगर, नेवरेकर कॉलनीमध्ये स्वच्छतेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील नेवरेकर कॉलनी, गांधीनगर येथे गटर्स व रस्त्यांचा अभाव असल्यामुळे सांडपाणी निचरा करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या ठिकाणी गटर्स आहेत त्या गटर्सच्या स्वच्छतेचाही अभाव आहे.
नगरपंचायतीने तातडीने यामध्ये लक्ष घालून गटर्स व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गांधीनगर वासीयांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
या निवेदनावर सौ. मीनाक्षी पुजारी, शुभदा पुजारी, मनीषा कारेकर, सुरेखा कारेकर, रंजना तीऊरवाडकर, निर्मला देसाई, विरोनिका करवालो, गीता नेवरेकर,विजयमाला देसाई, उर्मिला परब, सारिका गाडीवड्ड आदींच्या सह्या आहेत.

आंबेडकर जयंतीनिमित्त उत्तूरमध्ये नेत्र तपासणी शिबिर,
ग्रामस्थांना सवलतीत उपचाराची संधी.
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मिलिंदनगर स्पोर्ट्स, असोसिएशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी अंकुर हॉस्पिटल,डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर कन्या व कुमार विद्यामंदिर, उत्तूर येथे सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह उत्तूरमधील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अनिल हुले, उपाध्यक्ष संतोष हेगडे, खजिनदार विजय हेगडे, सचिव समीर हेगडे आणि कार्याध्यक्ष अमोल ऐवाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये तपासणीनंतर ज्यांना चष्म्याची गरज भासेल त्यांना ५० टक्के सवलतीत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच डोळ्यांच्या इतर विकारांसाठी मंडळामार्फत कुपन देऊन संबंधित रुग्णांना ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमार्फत १० टक्के सवलत दिली जाणार आहे.
या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मिलिंदनगर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

निधन वार्ता
निवृत्ती पाटील

भादवण ता.आजरा येथील निवृत्ती शंकर पाटील (वय ६२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. जनता जनार्दन सेवा मंडळ, मुंबई चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांचे ते बंधू होत.
रक्षाविसर्जन उद्या रविवारी सकाळी भादवण येथे आहे.
लता केसरकर

सोहाळे ता.आजरा येथील सौ . लता शिवाजी केसरकर (वय ६३ वर्षे सध्या रा.मुंबई) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ११ एप्रिल २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी (१२ एप्रिल रात्री १२.३७ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (दुपारी ०१.३९ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : सिद्ध योग (सायंकाळी ०६.३८ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : तैतुला करणतीन (दुपारी १२.०१ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३३ते सकाळी ११.०६पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.२६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
राजस्थानने बंगळुरूला सहा गड्यांनी नमवत एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानच्या वैभव सूर्यवंशी ने १५ चेंडूत अर्धशतक व २६ चेंडूत ७८ धावा झळकावत सामनावीरचा मान पटकावला.
आजचे सामने
पंजाब विरुद्ध हैदराबाद
स्थळ : न्यू चंदिगड वेळ : दुपारी ३.३० पासून
चेन्नई विरुद्ध दिल्ली
स्थळ : चेन्नई
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


