रविवार १२ एप्रिल २०२६


जिल्ह्यातील सुतगिरण्यांना आवश्यक ते सहकार्य : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुतगिरण्याना अडचणीच्या काळात सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य राहील. या गिरण्या चांगल्या कशा चालतील व फायद्यात कशा येतील यासाठीही प्रयत्न केले जातील. असे प्रतिपादन वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील अण्णा भाऊ आजरा तालुका सूतगिरणीवर २५ हजार चात्यांचे प्रकल्प पूर्ण झाला असून यातील मशिनरीचे पूजन व उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारदे प्रमुख उपस्थित होते.
सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सुतगिरणीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, संस्थापक काशिनाथ चराटी, माधवराव देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कठीण परिस्थितीत सूतगिरणीचा प्रकल्प उभारला. त्यांचे वारस अशोक चराटी, डॉ. अनिल देशपांडे हा प्रकल्प उतम चालवीत आहेत. या सूतगिरणीने चांगला परिपाठ घालून दिला आहे. सूतगिरण्या तोट्यात का येतात याचा अभ्यास करीत आहे. जिथे कापूस पिकतो तेथे सूतगिरण्या चालत नाहीत हे स्पष्ट आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात बाहेरून कापूस आणून सूतगिरण्या चालवल्या जातात. जेव्हा कापसाचे दर उतरतील त्यावेळी जास्तीत कापूस खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सूतगिरण्यांनी द्यावा. जिल्हा बँक मदत करेल. अशोक स्वामी म्हणाले, आजरा सूतगिरणीने विस्तारीकरण करावे. आणखीन पंचवीस हजार चात्या प्रकल्प उभा करावा. त्याला शासनाच्या माध्यमातून मदत देण्यासाठी पुढाकार घेईन. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई यांची भाषणे झाली.
विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरुणकर, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, संजय चव्हाण, अनिकेत चराटी, युवराज पोवार, नारायण मुरुकटे, अविनाश सोनटक्के, जी. एम. पाटील, शशिकांत सावंत, हसन शेख, राजू पोतनीस, डॉ. संदिप देशपांडे, मनिषा कुरुणकर, मालुताई शेवाळे, जोत्स्ना चराटी, युवराज पोवार, साौरभ नाईक, दत्तात्रय दोरुगडे, श्रीकांत कुलकर्णी, राजेंद्र धुमाळ, रामचंद्र पाटील, शामली वाघ, तानाजी पाटील उपस्थित होते.
सचिन सटाले यांनी सूत्रसंचालन केले. जनरल मॅनेजर अमोघ वाघ यांनी आभार मानले.
आजी – माजी आमदारांच्यात ईर्षा
अशोक स्वामी म्हणाले, वस्त्रोद्यागासाठी अडचणीचा असताना देखील आबिटकर बंधूनी भुदरगड तालुक्यात सूतगिरणी उभा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांची सूतगिरणी चांगली चालवली आहे. आता मंत्री आबिटकर हे सूतगिरणी कशी चालवतात हे पहावे लागेल. हाच धागा पकडून मंत्री मुश्रीफ म्हणाले, भुदरगड तालुक्यातील आजी माजी आमदारात स्वामी यांनी ईर्षा निर्माण केली आहे. दोघांच्याही सूतगिरणी व्यवस्थित चालतील.

गवसे येथे आग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे तालुका आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या भूगोलकर यांच्या शेतातील वृक्षांसह वन विभागाच्या जंगलाला आग लागली. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास या आगीने रौद्र रूप धारण केले. बाजूलाच कारखाना कर्मचारी कॉलनी व कारखान्याचा प्रेसमड डेपो असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ अग्निशामक दलाची गाडी मागविण्यात आली. अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत कारखान्याकडील कर्मचाऱ्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते.
दीड-दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजीराव सावंत, कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई, एच आर मॅनेजर सुभाष भादवणकर, सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई, सॅनिटरी ऑफिसर रघुनाथ देसाई, सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर यांच्यासह कारखान्याकडील कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. सर्वांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत सभासद व टनेज साखर वाटप
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने नुकताच निर्णय घेवून कारखान्याकडे रु.१५०००/- शेअर्स रक्कम पुर्ण असणा-या अ व ब वर्ग सभासदांना प्रत्येकी ५० किलो साखर, शेअर्स पोटी रु.१००००/- जमा असलेल्या सभासदांना प्रत्येकी २५ किलो तर शेअर्स रक्कम रु.७०००/- जमा असणा-या सभासदांना प्रत्येकी १५ किलो साखर त्याचप्रमाणे कारखान्याच्या सन २०२५-२६ गळीत हंगामात गळीतासाठी ऊस पुरवठा केलेल्या ऊस पुरवठादारांना प्रतिटन अर्धा किलो साखर प्रति किलो रु.२५/- प्रमाणे सवलतीच्या दरात दि.१६/४/२६ ते दि.१५/५/२६ या कालावधीत वाटप केली जाणार आहे.
पात्र सभासदांनी साखर कार्ड घेणेसाठी व ऊस पुरवठादारांनी टनेज साखर उचल करतांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स त्यावर सही करून देणे अत्यावश्यक आहे.
यामधील सभासद साखर व कार्यक्षेत्रातील टनेज साखर आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या तालुक्यातील संबंधीत शाखा मधुन वाटप केली जाईल तर गेटकेनची गडहिंग्लज, चंदगड, कर्नाटक, आंबोली, गारगोटी मधुन आलेल्या ऊसाची टनेज साखर कारखाना कार्यस्थळावरून वाटप केली जाणार आहे.
आजरा साखर कारखान्याकडे अपुरी शेअर्स रक्कम असलेल्या मंजुर सभासदांनी साखर वाटप कालावधीत अपुर्ण शेअर्स रक्कम भरून घेणेची व्यवस्था कारखान्याच्या संबंधित शेती सेंटर ऑफिसमध्ये केलेली आहे. कृपया आपली शेअर्स रक्कम रू.१५०००/-, रु.१००००/- किंवा कमीत कमी रू.७०००/- पुर्ण करून कारखान्याचे धोरणाप्रमाणे साखर वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री.मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. अनिल फडके यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.

आजरा हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूल येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर व उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस. कामत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. तोडकर यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांचे जीवनकार्य, समाज सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली.

निधन वार्ता
वसंत कांबळे

पेरणोली ता. आजरा येथील वसंत तुकाराम कांबळे ( वय ७२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अमित कांबळे यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन आज रविवारी सकाळी पेरणोली येथे आहे.
सुनितादेवी सरदेसाई
लाटगाव ता. आजरा येथील सुनितादेवी राजकुमार सरदेसाई (वय ७२ वर्षे सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज रविवारी सकाळी कोल्हापूर येथे आहे.
वसंत कांबळे

सुळेरान ता. आजरा येथील वसंत विष्णू कांबळे ( वय ६१ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हरहुन्नरी व मनमिळावू स्वभावाच्या कांबळे यांची दशावतारी नाटकांमधील उत्कृष्ट कलाकार अशी ओळख होती.
जानबा गुरव

दाभिल ता. आजरा येथील जानबा सिताराम गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली,एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज रविवारी सकाळी आहे.

आज हिंदू संमेलन
शिवतीर्थ आजरा येथे आज रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनामध्ये योगी संतोष उर्फ बाळ महाराज (इचलकरंजी) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ह.भ.प.भगवान गिरी महाराज, मठाधिपती रामनाथगिरी मठ,नूल ता. गडहिंग्लज व श्री महांत सिद्धेश्वर स्वामीजी बेलबाग आश्रम, गडहिंग्लज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ४.३० वाजता शोभायात्रा तर ६.३० वाजता प्रमुख कार्यक्रम होणार आहे.

आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक…
वीस भाषांमध्ये शेकडो गाणी गाणाऱ्या ९२ वर्षीय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

आजचे पंचांग
दिनांक : १२ एप्रिल २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी (१३ एप्रिल रात्री ०१.१६ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (दुपारी ०३.१३ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : साध्य योग (सायंकाळी ०६.१५ पर्यंत) त्यानंतर शुभ योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०१.०२ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मकर राशी (१३ एप्रिल पहाटे ०३.४४ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.२० ते सायंकाळी ०६.५४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.२५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यात चेन्नईने दिल्लीवर २३ धावांनी मात केली. नाबाद ११५ धावा काढणारा संजू सॅमसन सामनावीर ठरला.
पंजाब विरुद्ध हैदराबाद सामन्यात पंजाबने सहा गड्यांनी हैदराबादचा पराभव केला. श्रेयस अय्यर सामनावीर ठरला.
आजचे सामने
लखनौ विरुद्ध गुजरात
स्थळ : लखनऊ
वेळ : दुपारी ३.३० पासून
मुंबई विरुद्ध बंगलोर
स्थळ : मुंबई
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


