mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.३ एप्रिल २०२६

तिघांना पोलीस कोठडी…
महम्मदकैफवर अंत्यसंस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बुधवारी रात्री झालेल्या महम्मदकैफ साजिद खतिब या २४ वर्षीय युवकाच्या संगनमताने केलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अरकम महम्मद लमतुरे यांच्यासह त्याचा भाऊ अबू महम्मद लमतुरे व साकीब हसनल्ली खेडेकर ( सर्व रा. नाईक गल्ली, आजरा ) या तिघांना अटक करून पोलिसांनी आजरा येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मंगळवार दिनांक ७ एप्रिल अखेर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील जखमी समी अब्दुल गफार तकिलदार व अतिक इस्माईलद हिंगलजकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मृत कैफ याच्यावर नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

एका वाढदिवस कार्यक्रमात झालेल्या थट्टामस्करीचा राग मनात धरून महम्मद कैफ याचा खून करण्यात आला असे पोलीस तपासात पुढे येत आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. सरवदे करीत आहेत.

आजऱ्यात हनुमान जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली


रामतीर्थ, आजरा येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली .

शिवतीर्थ, आजरा या ठिकाणी नित्य अभिषेक व गदा पूजन करून मारुतीरायांची शक्ती ग्रहण करण्यासाठी प्रार्थना घेण्यात आली. पेढे साखर वाटप करण्यात आली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ,आजरा विभागाचे आजरा तालुकाप्रमुख संदीप पारळे, शशिकांत वाजंत्री, विक्रांत कोरवी, रवी होकेरी, संजय कोरवी साक्षी मोहिते, अशिष कोरवी,सिद्धी मोहिते, महादेव कोरवी, व इतर धर्मबंधू उपस्थित होते.


श्री हनुमान जयंती व राष्ट्रसंत कैकाडी महाराज जयंती कैकाडी / कोरवी समाजामार्फत साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व बंधू-भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने दूध व अल्पोहार वाटपाचा कार्यक्रम झाला. आजरा तालुका कैकाडी समाज आजरा तालुका प्रमुख संजय कोरवी , सुधीर कुंभार, इंद्रजीत देसाई, संदीप पारळे, किरण निचम , आकाश पाटील, रमेश चंदनवाले, राहुल नेवरेकर, सुजित कुंभार, सुरज पाटील, निलेश परपोलकर, विक्रांत कोरवी,प्रभाकर कोरवी ,महादेव कोरवी, अभिजीत कोरवी, अंकुश कोरवी, दशरथ कोरवी, निलेश कोरवी, शशिकांत वाजंत्री, आकाश कोरवी,दुंडाप्पा वाजंत्री, महादेव करवी, सदाशिव कोरवी,दीपक कोरवी, विनायक वाजंत्री, कैकाडी (कोरवी) समाजबांधव उपस्थित होते.

कडगावच्या जवानाचा दिल्लीत अपघाती मृत्यू; गावावर शोककळा


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील जवान अक्षय विलास चौगुले (वय ३१) यांचे दिल्ली येथे अपघाती निधन झाले. ते मेरठ येथील युनिटमध्ये कार्यरत होते. घरातून युनिटकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

अक्षय चौगुले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कडगाव येथील केदारलिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले होते. २०१५ साली, वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी भारतीय सैन्यात भरती झाले. ते ५२२ एएससी बटालियनमध्ये नाईक पदावर कार्यरत होते.

ते पत्नी स्नेहा यांच्यासह दिल्ली येथे वास्तव्यास होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील (वडील सेवानिवृत्त एसटी चालक), दोन विवाहित बहिणी व इतर नातेवाईक असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव शनिवारी दुपारपर्यंत गावी येण्याची अपेक्षा असून त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. महालक्ष्मी पटांगण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत, ग्रामस्थ, तरुण मंडळे व आजी-माजी सैनिक यांच्या वतीने अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.

जनता गृहतारण संस्थेची ३५९ कोटींची उलाढाल…
६४ लाख ५५ हजारांचा नफा


आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सर्वसामान्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने आर्थिक वर्षात ३५९ कोटींचा व्यवसाय केला असल्याची माहिती चेअरमन श्री. मारुती मोरे यांनी दिली. संस्थेला गत आर्थिक वर्षात ६४ लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे १२२ कोटी ८६ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच ७३ कोटी ७६ लाख रुपयांची कर्ज वाटप केली आहेत. संस्थेची ५१ कोटी १३ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेचे खेळते भांडवल १५२ कोटीचे असुन संस्थेला ६४ लाख ५५ हजार रु. इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती श्री. मारुती मोरे यांनी दिली.

गडहिंग्लज व कोल्हापूर या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्यालये आहेत, “महाराष्ट्र राज्य “कार्यक्षेत्र मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था आहे व ISO9001: 2015 मानांकन प्राप्त संस्था आहे. संस्थेला सहकार भारती कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. कार्यक्षम व घरपोच सेवा देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या या संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) येथे शाखा आहेत. संस्था गृहकर्जासाठी १ कोटी ५० लाख व प्लॉट खरेदीसाठी रु.१ कोटी कर्ज देते व सोनेतारण कर्ज या सारख्या विविध गोष्टीसाठी संस्था कर्ज पुरवठा करत आहे. संस्थेकडे SMS सुविधा, लाईट बील भरणा, RTGS / NEFT या सुविधा चालू आहेत. या कामी मुख्य कार्यालय व्हा. चेअरमन डॉ. अशोक बाचूळकर, संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे, श्री. दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. रवींद्र आजगेकर, श्री. कृष्णा डेळेकर, श्री. युवराज शेटके, प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील, प्रा. सौ. क्रांती शिवणे तसेच सर्व शाखांचे चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर श्री. मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी श्री. मारुती कुंभार, अरविंद कुंभार शाखाधिकारी व कर्मचारी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असल्याचे अध्यक्ष श्री. मारुती मोरे यांनी सांगितले.

बायोगॅसला शंभर टक्के सबसिडी द्या : उमेश आपटे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सध्या अमेरिका इराण युद्धामुळे ग्रामीण भागातही इंधनाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. सुरुवातीला रॉकेल बंद करण्यात आले त्यानंतर शासनाने उज्वला योजनेतून ग्रामीण भागात गॅस कनेक्शन दिली. परंतु वाढत्या गॅस सिलेंडर दरामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना ही सिलेंडर परवडेनाशी झाली आहेत. सध्या तर तब्बल ४५ दिवस सिलेंडरसाठी वाट पाहावी लागत आहे. शासनाने वृक्षतोडीवर बंदी आणली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जगणे अडचणीचे होत आहे.

यावर उपाय म्हणून सरकारने बायोगॅस / गोबर गॅसला १००% सबसिडी द्यावी. त्याचबरोबर जास्तीत जास्त सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे उपयोगात आणण्यासाठी घसघशीत अनुदान देऊन अशी उपकरणे वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांनी केली आहे.

निवड…

उत्तूर येथील आतिषकुमार देसाई यांची आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देसाई यांनी यापूर्वी राज्यस्तरीय शिखर संस्थेमध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. तसेच यावर्षी त्यांची केंद्र शासनाच्या बीएसएनएल मध्ये तांत्रिक सल्लागार सदस्य म्हणूनही निवड झाली आहे.

आजरा’ची हंगामा अखेरची संपूर्ण ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामातील गाळप उसाची सर्व विले त्याचबरोबर तोडणी वाहतूक बिलाची संपूर्ण रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.

कारखाना संचालक मंडळाने येत्या २०२६-२७ च्या वेळी हंगामाच्या दृष्टीने सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा भरण्यासाठी करार करण्याचे काम सुरू केले आहे. पुढील हंगामासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, आंबोली या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस नोंदी व कराराचे कामही सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप उसाचे करार केलेले नाही त्यांनी संबंधित शेती ऑफिसशी संपर्क साधून आपले करार करावेत त्याचबरोबर कारखान्याकडे काम करू इच्छिणाऱ्या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपल्या वाहन व मजुरांचे तोडणे वाहतुकीचे करार मुदतीत करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल फडके यांच्यासह सर्व संचालक व कार्यकारी संचालक एस.के. सावंत उपस्थित होते.

गोष्टी विज्ञानाच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील चैतन्य सृजन सेवा संस्था, आजरा संचालित ऋग्वेद रिलिफ फंडाच्या वतीने लेखिका प्रा. डॉ मंदा हरम लिखित – ‘गोष्टी विज्ञानाच्या ‘गा पुस्तकाचा प्रकाशनचा कार्यक्रम प्रा.रमेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न आला.

स्वागत व प्रस्ताविकामध्ये “​डिजिटल युगात मुलांच्या हरवत चाललेल्या एकाग्रता आणि सर्जनशीलतेबद्दल चिंता व्यक्त केली. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी त्यांनी ‘वाचन’ हाच सर्वोत्तम उपाय सुचवला आहे. मुलांनी केवळ स्क्रीनकडे न पाहता शब्दांच्या दुनियेत रमावे, त्यांच्यावर प्रेम करावे. आणि याच उद्देशानं आम्ही ‘अल्पमूल्य पुस्तक योजना’ गेल्या अनेक वर्षांपासून व्रत म्हणून सुरू ठेवलं आहे. मुलांनी शब्दांशी मैत्री करून वाचनसंस्कृतीचा जागर करावा आणि येणारी पिढी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावी. समाजात पुन्हा एकदा समृद्ध वाचन चळवळ रुजावी, हाच त्यांचा उदात्त हेतू ठेवून आम्ही कार्य करत आहोत.” असे प्रतिपादन संस्थापक संपादक सुभाष विभुते यांनी केले.

श्री. बळवंत शिंत्रे यांनी बालक व विज्ञान यामधील संवादाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रा शेखर शिऊडकर, डॉ. प्रा. सलमा अत्तार यांनी भाषा, शब्द यांचे जीवनातील महत्व पटवून दिले. अध्यक्ष प्रा.डॉ शिवशंकर उपासे यांनी शब्दांची गोडी, त्यातून निर्माण होणारी साहीत्य संपदा, साहीत्य संपदेतून मानवी जीवनाचा विकास यावर प्रकाश टाकला.यावेळी उपाध्यक्ष सुनील सुतार, रवींद्र देसाई, पुष्पलता घोळसे, डॉ. अंजनी देशपांडे, प्रा. मिना शिरगुप्पे, तसेच मानद सचिव संतोष जाधव, विलास पोवार, कर्मचारी विवेकानंद निर्मळे, पूजा नेवरेकर आदि उपस्थित होते.

संजय गांधी निराधारसह श्रावण बाळ अनुदान योजनेचे नवीन १७१ लाभार्थी मंजूर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ५० तर श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेतील १२१ असे एकूण १७१ लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे.
शासकीय निकषानुसार २ श्रावण बाळ योजनेतील १ संजय गांधी योजनेतील लाभार्थी अपात्र करण्यात आले.

बैठकीस समिती सदस्य शशिकांत सावंत, संतोष चौगुले, दशरथ अमृते, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाऊ देसाई, संजय गांधी नायब तहसीलदार विकास कोलते, सहाय्यक महसूल अधिकारी संतोष सांगडे, जावेद बागवान उपस्थित होते.

निधन वार्ता

पांडुरंग गायकवाड

धामणे ता. आजरा येथील पांडुरंग जिवबा गायकवाड यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ३ एप्रिल २०२६
वार : शुक्रवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम तिथी (सकाळी ०८.४२ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (सायंकाळी ०७.२४ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : व्याघात योग (दुपारी ०२.०७ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
करण : कौलव करण (सकाळी ०८.४२ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : तुळ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०९ ते दुपारी १२.४२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.३२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.६२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

शहाजी देसाई यांचे निधन… पंधराव्या वित्त आयोगाची बिले तातडीने अदा करा…. पंचायत समिती सभेत सूचना… किटवडे येथे ३ टीएमसी चा पाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

mrityunjay mahanews

Breaking News

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!