सोमवार दि.२३ फेब्रुवारी २०२६

आजऱ्यात बंजारा समाजाच्या तांड्यांवर हिंद दी चादर रथयात्रा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे बंजारा समाजाच्या तांड्यांवर श्री तेग बहादूर सिंह यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त हिंद दी चादर या महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक समाज विकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
औरंगजेबाच्या कैदेत असताना श्री तेग बहादुर व त्यांच्या पाच भावांनां अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले. तडपश्चात लखीशाह बंजारा यांनी शीख गुरूंचे बलिदान, विशेषतः गुरु तेग बहादूरजींचे पार्थिव सांभाळण्यात (दाहसंस्कार) महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे शीख इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
येत्या ०१ मार्च रोजी श्री तेग बहादुर सिंह यांचां ३५० वा शहीदी दिवस आहे. मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने मोठा कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. त्यानिमत्ताने हा रथ आजरा येथील बंजारा समाजाच्या तांड्यावर आला होता.
तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते या रथाचे पुजन झाले. तसेच तांड्यावरील महिलांनी रथाचे औक्षण केले.बंजारा समाजाचे शिख समाजाशी असणारे महत्वपूर्ण नाते याची माहितीपर चित्रफीत या रथात असणाऱ्या स्क्रीनद्वारे चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली.तसेच मुंबई येथे होणाऱ्या समागम साठी बंजारा समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले.
यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, ग्राम महसुल अधिकारीसमीर जाधव, तांड्याचे प्रमुख गोविंद राठोड, विजय पवार तसेच मोठ्या बंजारा समाजातील महिला व पुरुष बांधव उपस्थीत होते.

पाऊस आला रे sss…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल रविवारी दिवसभराच्या उकाड्यानंतर गडगडाटासह आजरि शहरासह परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
काल दिवसभर तालुक्यात ठीक ठिकाणी विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. फेब्रुवारी महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने यावर्षी पावसाचे लवकर आगमन होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पावसानंतर मात्र हवेत गारवा निर्माण झाला होता.

संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘ स्वच्छ जल,स्वच्छ मन ‘ उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘ प्रोजेक्ट अमृत ‘ अंतर्गत भादवण येथे ‘ स्वच्छ जल स्वच्छ मन ‘ उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारण व स्वच्छतेचे महत्व अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचे उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. नद्या, तलाव, सरोवर, विहिरी, नैसर्गिक झरे अशा मूलभूत पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण करून ते जतन करावे हा या मागचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत येथील पिण्याच्या पाण्याचे तळे स्वच्छ केले गेले, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसर स्वच्छ करून निरंकारी सेवा दल व साध संगत या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.
उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री गाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच सौ. माधुरी गाडे,उपसरपंच संजय पाटील यांच्यासह संत निरंकारी मंडळ शाखा आजाराचे मुखी भिकाजी पाटील, संजय शेणवी, तुळशीराम चव्हाण, वर्षा भडांगे,सौ. सविता सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप फगरे यांनी केले.

निधन वार्ता
शांताबाई परीट

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा
समर्थ कॉलनी, आजरा येथील शांताबाई शिवाजी परीट ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. नितीन/परसू परीट यांच्या त्या आई होत.
रक्षा विसर्जन उद्या मंगळवार दिनांक २४ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.
इंदुबाई चौगुले

हात्तीवडे ता. आजरा येथील इंदुबाई मारुती चौगुले ( वय ६७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्या प्राथमिक शिक्षक संजय शिवणे व वसंत रामचंद्र पाटील यांच्या सासू होत.रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी आहे.

सब गोलमाल है…
कमलकुंज गृहप्रकल्प पूर्णत्वाचा दाखला रद्द करा : अन्यथा ९ मार्चला धडक मोर्चाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील नगरपंचायत हद्दीत साळगाव रोडलगत उभारण्यात आलेल्या कमलकुंज बी विंग या गृहप्रकल्पात आवश्यक भौतिक सुविधा पूर्ण नसतानाही नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिल्याचा आरोप करत तो तत्काळ रद्द करण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली आहे. अन्यथा ९ मार्च रोजी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, संबंधित इमारतीस नगरपंचायतीकडून अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू नाही. तसेच, विकासकाने पर्यायी पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. सांडपाणी व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने न करता थेट वन विभागाच्या हद्दीत सोडले जात असल्याचा आरोप आहे. इमारतीत अग्निसुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही. तसेच, १०० टक्के रेन वॉटर हार्वेस्टिंगही करण्यात आलेले नाही. याशिवाय लिफ्ट वापरण्यास योग्य असल्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र उपलब्ध नसून, लिफ्टसाठी बॅकअप व्यवस्थाही नाही. बहुतांश फ्लॅटमधील अंतर्गत सुविधा अपूर्ण असून, सहायक निबंधकांकडून हौसिंग सोसायटी गठीत करण्यात आलेली नाही. या सर्व बाबी अपूर्ण असतानाही संबंधित बी विंगची प्रत्यक्ष पाहणी न करता विकासकाला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचा आरोप सदनिकाधारकांनी केला आहे. त्यामुळे आवश्यक कामे पूर्ण करण्यास विकासक टाळाटाळ करत असून, नगरपंचायतीकडून दिलेला पूर्णत्वाचा दाखला रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर नारायण पाटील, संदीप गुरव, डॉ. भगवान पाटील, मनीषा सावंत, विशाल दुंडगेकर, संजीवनी कांबळे, अनिता ढोणुक्षे, सरिता सावंत आदींच्या सह्या आहेत.

रेशन धान्य दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकस मारहाण…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोळगाव (ता. आजरा) येथील रेशन धान्य दुकानदार गुणाजी लक्ष्मण साबळे यांना पांडुरंग लक्ष्मण कोरगावकर या ग्रामस्थांनी रेशन धान्य पावती प्रमाणे का दिले नाही म्हणून विचारणा केली असता साबळे यांनी कोरगावकर यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी न्याय न मिळाल्यास कोरगावकर यांनी आजरा तहसील कार्यालय समोर २७ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मीरा पांडुरंग कोरगावकर यांच्या नावे असलेल्या शिधापत्रिकेवरील रेशन धान्य घेण्यासाठी कोरगावकर हे पोळगाव येथील रवळनाथ स्वस्त धान्य दुकान येथे गेले होते. यावेळी रेशन धान्य दुकानदार गुणाजी साबळे यांनी कोरगावकर यांना बारा किलो तांदळाची पावती दिली. मात्र प्रत्यक्षात तांदूळ देताना दहा किलो दिले. याबाबत कोरगावकर यांनी साबळे यांना विचारले असता, साबळे यांनी शिवीगाळ करत कोरगावकर यांच्या कानशिलात लगावली. प्रकरणाची चौकशी होऊन न्याय मिळावा असे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर, प्रांताधिकारी आजरा भुदरगड, तहसीलदार आजरा यांना दिले आहे. तसेच याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास २७ फेब्रुवारी पासून आजरा तहसील कार्यालय आवारात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी चित्रा नगर येथे कबड्डी स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नागनाथ सप्ताह सोहळ्यानिमित्त अष्टप्रधान प्रतिष्ठान, चित्रा नगर यांच्या वतीने बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता चित्रा नगर येथे ५२ किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ७००१/-, ५००१/-, ३००१/-, २००१/- रुपयांचे रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी नयन मिसाळ/७८७५१०९९५८ किशोर लाड/८४२१८९७७३६, विजय मिसाळ/९६८९७१४३१२ व अजय मिसाळ/७२४९८४४६१३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छायावृत्त

अत्याळ या.गडहिंग्लज येथे झालेल्या खुल्या रस्सिखेच स्पर्धेमध्ये सुलगाव संघाने तृतीय क्रमांक पटकावला.


