mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार दि.२२ फेब्रुवारी २०२६

हाळोली गावच्या विकासासाठी कटिबद्ध : सुधीर देसाई


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

स्व. राजारामबापूंपासून हाळोली गाव हे आपल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत. या गावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. या गावाने जि.प. निवडणुकीत दिलेले मतदान हे  कदापिही विसरणार नाही. या गावासाठी शक्य होईल तेवढी विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करणार, असे प्रतिपादन नूतन जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केले. हऴोली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते संजय गुरव यांनी केले. यावेळी सुधीर देसाई व पंचायत समिती सदस्या सौ. यशोदा पोवार यांचा गणपती अमृते व लक्ष्मी कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आजरा तालुका संघाचे उपाध्यक्ष डी.ए. पाटील , सेवा संस्थेचे संस्थापक संचालक चेअरमन भिकाजीराव गुरव, देवदास बोलके, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक गणपती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती गुरव, स्वप्नाली कांबळे, सर्व महिला बचत गट व सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, श्रीकृष्ण महिला दूध, श्री शंकर लिंग संस्थेचे पदाधिकारी, चाळोबा ग्रुप चे सर्व कार्यकर्ते व जय भीम तरुण मंडळ, विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक वारकरीचे सर्व वारकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ मोरे यांनी केले. आभार सेवा संस्था सचिव महादेव गुरव यांनी मानले.

पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

तपास सुरूच…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मंगळवारी वझरे (ता. आजरा)  येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात चिमणे या.आजरा येथील दत्तात्रय तुकाराम चव्हाण हा देखील यापूर्वीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी त्यालाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी यापूर्वी सुनावण्यात आली आहे. तर सुरुवातीलाच ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका काजू प्रक्रिया उद्योगातील चोरीसह अन्य दोन गुन्हयांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोघांची पोलीस कोठडी काल संपली त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

याप्रकरणी विविध गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत पोलिसांनी दत्तात्रय मांडरे ( रा. कर्पेवाडी ता. आजरा ). प्रेम अनिल कांबळे ( रा. वझरे ता. आजरा ) व अभिजीत अमृत आरेकर ( रा. उत्तुर ता. आजरा ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आता सरपंचच होणार प्रशासक : सरपंच परिषदेच्या मागणीला यश

उपसरपंच व स़दस्यांची प्रशासकीय समिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती करणार आहे. याशिवाय उपसरपंच व स़दस्यांची प्रशासकीय समिती नेमली जाणार आहे. या निर्णयामुळे सरपंच परिषदेच्या प्रलंबित मागणीला यश आले असल्याचे सांगितले जाते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमी संख्या व ग्रामपंचायती जास्त असल्याने एका अधिकाऱ्याकडे तीन चार ग्रामपंचायती आल्या असत्या.  ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत संपत आहे, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे कामात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

नव्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावर असतील, त्यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात येईल. त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल.प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तेवढा राहणार आहे. हा तात्पुरता उपाय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नियमित निवडून आलेले पदाधिकारी कारभार स्वीकारतील.

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू राहणार आहे. या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतील.

रमजान काकतीकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील पैलवान रमजान काकतीकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. राज पान स्टॉलचे मालक मुबारक काकतीकर यांचे वडील व फळ व्यावसायिक अबूल काकतीकर यांचे बंधू होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


आजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची पूजेने सांगता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता संचालक श्री. काशिनाथ तेली व सौ. स्मिता तेली यांचे हस्ते सत्यनारायण महापूजा करून करण्यात आली. चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाचे उपस्थितीत साखर पोत्यांच्या पुजनाचा कार्यक्रम पार पडला.

सन २०२५ च्या पावसाळयात आजरा तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस होवून त्याचा परिणाम तालुक्यातील ऊस पिकावर झाला. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात ऊसाचे पिक अत्यंत निकृष्ठ प्रतिचे निघाले. संपुर्ण तालुक्यातच ऊस उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली, तर साखर उता-यावरही त्याचा परिणाम झालेचे दिसून आले. यावर्षी परजिल्हयातील तोडणी मजूरांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली तर जी यंत्रणा हजर झाली त्यामध्ये मजूरांची संख्या अत्यल्प असलेंने दैनंदिन ऊस पुरवठ्यावरही त्याचा गंभीर परिणाम झाला. या सर्व अडचणीच्या परिस्थितीवर मात करीत कारखाना व्यवस्थापनाने उपलब्ध परिस्थितीतही काटेकोर नियोजन करून कारखान्याच्या गाळपात सातत्य ठेवून तीन लाख ऊस गाळपाचा टप्पा पार केला.

याबाबत कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी झालेल्या गळीत हंगामात कारखान्याचे ठरविलेले गळीताचे उ‌द्दिष्ठ जरी पुर्ण झाले नसले तरी प्रतिकुल परिस्थितीत कारखान्याचे संचालक मंडळांने योग्य निर्णय घेतले तसेच सर्वच विभागांनी समाधान कारक कामगिरी केली. त्यामुळे तालुक्यातील ऊस पिकाची परिस्थिती चांगली नसतांना व पुरेशी तोडणी वाहतुक यंत्रणा उपलब्ध नसतांनाही तीन लाखावर ऊस गाळप केले आहे पुढील गळीत हंगामासाठी यापेक्षाही नेटके नियोजन करून समाधानकारक ऊस गाळप केले जाईल असे स्पष्ट केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक , कार्यकारी संचालक श्री.एस.के. सावंत, अधिकारी व कामगार उपस्थित होते.

 

विज्ञान प्रदर्शनात ‘व्यंकटराव’ची आस्था गुरव सर्वप्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शेळपवाडी येथील शिवतेज तरुण मंडळ यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात व्यंकटराव हायस्कूलच्या आस्था सचिन गुरवने “पिझो इलेक्ट्रिसिटी मानवी दाबातून वीजनिर्मिती या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला.

या विद्यार्थीनीच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. ए.एस.गुरव यांचेसह आस्था गुरव हिला शिल्ड प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम दऊन गौरविण्यात आले.

या गुणवंत विद्यार्थीनीला संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य एम.एम. नागर्डेकर , पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

 

मडीलगे येथे हरिनाम सप्ताह सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडीलगे ता. आजरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास काल शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी पर्यंत सदर कार्यक्रम चालणार आहे.

सप्ताह कालावधीत दररोज सकाळी चार ते सहा वाजता काकडा आरती, सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ, रात्री ११-३० ते ३-३० हरीजागर, सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होणार आहे.

नगर प्रदक्षिणा व दीपोत्सव शुक्रवार दिनांक २७ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. सप्ताह कालावधीत ह.भ.प. तानाजी पाटील महाराज, ह. भ.प.डॉ. विश्वनाथ पाटील महाराज, ह.भ. प. डॉ. एस.डी. पन्हाळकर महाराज, पूर्णानंद काजवे महाराज, ह.भ.प. एकल महाराज, ह.भ. प. श्री. पोतदार महाराज, ह.भ.प श.राहुल कदम महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर काल्याचे किर्तन व महाप्रसाद शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ह.भ.प.श्री.दत्तात्रय नेऊंगरे व ह.भ.प.श्री. संजय पाटील यांच्या अधिपत्याखाली सदर कार्यक्रम होणार आहे असे संयोजकांनी सांगितले.

फोटो क्लिक

गवेच गवे चहूकडे…


स्थळ : आजरा – आंबोली रोड वेळवट्टी गट नंबर १७५ श्री. पृथ्वीराज महाराज महागावकर यांच्या राहत्या घराजवळ वेळ : शनिवारी दु. ४.३० वा.


पुन्हा एकदा गळत्या… पुन्हा खुदाई…


पाणीपुरवठा योजना नवीन झाली.या योजनेसह रस्त्यांच्या कामाला विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने घिसाड घाईने रस्त्यांची कामे उरकण्यात येत आहेत. पण नवीन पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या गळत्या तशाच राहिल्याने पुन्हा एक वेळ नवीन रस्ते खोदण्याची वेळ आली आहे.


कचरेवाले गायब…


गेले पंधरा दिवस शहरांमध्ये कचऱ्यासंदर्भात तक्रारी सुरू आहेत. घरगुती कचरा उचलण्याच्या नावाने शिमगा सुरू आहेच परंतु आठवडा बाजारात झालेला भाजी मंडईतील कचरा उचलणार कोण ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची धाव सव्वा तीन लाख मे. टनापर्यंतच

mrityunjay mahanews

अपघातात तरुण ठार

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखाना अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई …

mrityunjay mahanews
error: Content is protected !!