सोमवार दि.९ फेब्रुवारी २०२६

तांदूळ शॉपी फोडली…
तीन लाख वीस हजार रुपयांच्या तांदळासह काजूगर लांपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर हॉटेल मिनर्वा समोर असणाऱ्या अब्दुल गफार बाबालाल नेसरीकर यांच्या मालकीची तांदूळ शॉपी फोडून त्यातून ३ लाख २३ हजार ८०० रुपयांच्या तांदळासह काजूगर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल रविवारी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी …
नेसरीकर यांच्या मालकीची सदर शॉपी शनिवारी रात्री बंद करून ते घरी गेले होते. दरम्यान रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकटून आत मध्ये प्रवेश केला व २ लाख २० हजार रुपयांचे काजूगर आणि १ लाख १३ हजार ८०० रुपयांच्या घनसाळसह अन्य तांदळाच्या बॅग्स लंपास केल्या.
याबाबतची फिर्याद नेसरीकर यांनी पोलिसांत दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस तपास करीत आहेत.

कोण वरचढ…?
आज फैसला…
दुपारी २ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सोमवार (ता. ९) १६ टेबलवर ११ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. यासाठी ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ११. ३० नंतर निकालाचा कल स्पष्ट होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील. असे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समीर माने यांनी सांगीतले.
आजऱ्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी निवडणुक विभागाने केली आहे. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मतमोजणी होईल.
पहिल्या ३ फेरीत उतूर गटासह उत्तूर गणाची मत मोजणी होईल. तर चार ते सहा फेऱ्यामध्ये उत्तूर गटासह भादवण गणाची मतमोजणी होईल.
सात ते नऊ कमांकाच्या फेऱ्यामध्ये पेरणोली गट व गणाची मतमोजणी होईल. तर दहा व अकरा फेऱ्यामध्ये पेरणोली गटासह वाटंगी गणाची मतमोजणी होणार आहे.
१६ टेबलावर ही मतमोजणी पार पडेल. यामध्ये ईव्हीएम मशीनसाठी १४ टेबलावर तर २ टेबलावर पोस्टल मतदान मोजले जाईल. यासठी ७० कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. पहिल्या उतूर गट व गणाचे कल अकरा वाजेपर्यंत हाती येतील. दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल जाहीर होतील.
धडधड वाढली…
आजऱ्यात जिल्हा परिषदेसाठी २ गट व पंचायत समितीसाठी ४ गण आहेत. जिल्हा परिषदेसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार या घटक पक्षात अत्यंत चुशीने झालेली आहे. त्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता नेते, कार्यकर्ते व जनतेत आहे. अवघ्या कांही तासावर निकाल आल्याने उमेदवारांसह समर्थकांची धडधड वाढली आहे.

इतिहास घडवणारी पायवाट – मंगळसूत्राआधी मतदान

मंदार हळवणकर/उत्तूर
समाज बदलण्यासाठी मोठी भाषणं किंवा घोषणा लागतातच असे नाही; कधी कधी एक साधी, पण ठाम कृती इतिहास घडवते. मुम्मेवाडी (ता. आजरा) येथील एका नववधूने अशाच कृतीतून संपूर्ण समाजाला लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणारा नवा संदेश दिला आहे.
लग्नासारख्या आयुष्यातील अत्यंत पवित्र क्षणातही तिने स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या कर्तव्याला प्राधान्य देत मंगळसूत्राआधी मतदानाचा अधिकार बजावला आणि लोकशाहीप्रती निष्ठेचा नवा आदर्श निर्माण केला.मुम्मेवाडी येथील साक्षी पंढरीनाथ पाटील हिचा विवाह पाळ्याचा हुडा (ता. भुदरगड) येथील विजय भूतल यांच्याशी दुपारी १२.५० वाजता होणार होता. घरात लग्नाची लगबग, नातलगांची वर्दळ, मंगल सूर सुरू असतानाच सकाळी पावणे आठ वाजता साक्षी मतदान केंद्रात पोहोचली. नवरीच्या वेषात उभी असलेली साक्षी म्हणजे लोकशाहीची चालतीबोलती परिवर्तक ठरली.
आज समाजात मतदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. मतदान म्हणजे केवळ बोटाला शाई लावणे नव्हे, तर आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि देशाच्या भवितव्याचे निर्णय आपल्या हातात घेणे होय. अनेकजण मतदान टाळतात, तर काही जण उदासीन राहतात. अशा वेळी साक्षीने दिलेला संदेश समाजासाठी लाख मोलाचा आहे.
साक्षीच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिक, निवडणूक कर्मचारी, महिला मतदार आणि तरुण वर्ग भारावून गेला. “आधी मतदान, मग वैयक्तिक सोहळा” हा विचार केवळ एक वाक्य न राहता सामाजिक संदेशाची चळवळ बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आजच्या तरुण पिढीसमोर आदर्शांची कमतरता असल्याचे बोलले जाते. मात्र मुम्मेवाडीच्या या लेकीने दाखवून दिले की, जबाबदार नागरिक घडण्यासाठी पद, पैसा किंवा प्रसिद्धीची गरज नसते फक्त जाणीव असली की पुरेसे असते.
ही घटना केवळ एका नववधूची नाही, तर संपूर्ण समाजाच्या आत्मपरीक्षणाची वेळ आहे.
लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर साक्षीसारख्या मुलींच्या विधायक कृतींचे अनुकरण होणे आवश्यक आहे..

निधन वार्ता
विजय आजगेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खोराटवाडी ता. आजरा येथील विजय आनंदराव आजगेकर (वय ४९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
पत्नी, मुलगा, मुलगी, आई – वडील असा परिवार आहे. दशराज आजगेकर यांचे ते पुतणे होत.
फोटो क्लिक
जाये तो जाये कहॉंसे…?

आजरा शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्याने खुदाईच खुदाई झाली आहे. अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराच्या गल्ल्यांमधून जाताना मुख्य रस्ते खोदलेले व पर्यायी रस्त्यांचा पत्ता नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. शहरात नव्यानेच येणाऱ्यांची यामुळे चांगलीच अडचण होताना दिसते.


