मंगळवार दि.१० फेब्रुवारी २०२६

राष्ट्रवादी पुन्हा…
जि. प. च्या दोन्ही जागांसह पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महायुतीच्या घटक पक्षातच अत्यंत चुरशीने झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला राजकीय मुत्सद्दीपणा आजरा साखर कारखान्यानंतर पुन्हा एकदा स्पष्ट करत तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेत दोन्ही उमेदवार निवडून तर आणलेच परंतु त्याचबरोबर पंचायत समिती वरील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध करून सत्ता आणण्यात यश मिळवले आहे. उत्तूर मध्ये ताराराणी आघाडीचा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी सोयीच्या भूमिका घेऊन विविध पक्षाच्या दारात जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेतलेल्या सर्वच उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून घडलेल्या घडामोडी, महायुतीच्या घटक पक्षात वाढलेले अंतर पाहता भविष्यात याचे दूरगामी परिणाम तालुक्याच्या राजकारणावर अनेक शक्यता वर्तवली जात आहे.


उत्तुर जिल्हा परिषद
शिरीष देसाई/राष्ट्रवादी-१२८०१ (विजयी)
उमेश आपटे/ताराराणी आघाडी -१०२०२
विठ्ठल उत्तूरकर/शिवसेना शिंदे गट -९४४३
उत्तुर पंचायत समिती :
विकास चोथे/राष्ट्रवादी-७२८१ (विजयी)
महेश करंबळी- ४८०९/ताराराणी आघाडी
संभाजी कुराडे/शिवसेना शिंदे गट-४६६९
अभिजीत आरेकर/राष्ट्रीय काँग्रेस-४५५
सागर वाघरे/अपक्ष-२८५

भादवण पंचायत समिती :
जयश्री गाडे/राष्ट्रवादी-६१५३ (विजयी)
भारती डेळेकर/शिवसेना शिंदे गट-४९०४
साधना केसरकर/ताराराणी आघाडी-३७८८
पेरणोली जिल्हा परिषद :-
सुधीर देसाई/राष्ट्रवादी-१२०४२ (विजयी)
जयवंत सुतार/भाजपा-१०६१३
विष्णू केसरकर/शिवसेना शिंदे गट-६३६८
सुधीर सुपल/अपक्ष-२९४
सुरेश शिंगटे/अपक्ष-११७
पेरणोली पंचायत समिती :-
यशोदा पोवार/शिवसेना उबाठा- ६५४२ (विजयी)
श्वेता सरदेसाई/शिवसेना शिंदे गट- ४१२६
स्मिता देसाई/भाजपा-३७३७
वाटंगी पंचायत समिती :
समीर पारदे/भाजपा -६२२६ (विजयी)
राजू होलम/राष्ट्रवादी -५२६३
सतीश फडके/शिवसेना शिंदे गट – २५७२
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला.
उबाठा सेनेचा चंचुप्रवेश…
पंचायत समितीमध्ये प्रथमच शिवसेना उबाठा गटाचा प्रवेश झाला आहे.सौ. यशोदा युवराज पोवार या सदस्यपदी विराजमान झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. भाजपाला मात्र समीर पारदे यांच्या पंचायत समितीच्या एका विजयावर समाधान मानावे लागले आहे.
आपटेंचा निर्णय अंगलट…
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक उमेश आपटे यांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकला असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यांना धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे .
सौ.जयश्री गाडे सभापतीपदी…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. जयश्री गाडे यांना पं.स. सभापती पदाची संधी मिळणार असून उपसभापतीपदी पहिल्या टप्प्यात शिवसेना उबाठाच्या सौ. यशोदा युवराज पोवार यांना संधी मिळणार असल्याचे समजते.
वाटंगी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची पडझड…
जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई हे विजयी झाले असले तरी वाटंगी पंचायत समिती मतदार संघात मोठी पडझड झाल्याचे मतमोजणी नंतर स्पष्ट झाले आहे. या पंचायत समिती मतदार संघात डागडुजी करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे.
आ.शिवाजीभाऊंचे वर्चस्व…
वाटंगी पंचायत समितीमध्ये शिवाजीभाऊ पाटील यांचेच वर्चस्व असल्याचे पारदे यांचा झालेला विजय व जयवंत सुतार यांना मिळालेले मताधिक्य यामुळे स्पष्ट झाले आहे.
ऐनवेळेच्या उमेदवाऱ्या शिंदे सेनेला महागात पडल्या
ऐनवेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय व त्यासाठी दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता पक्षात इनकमिंग करवून घेऊन जाहीर केलेल्या उमेदवाऱ्या शिंदे गटाला चांगल्याच महागात पडल्या असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

उत्तूर : आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यामध्ये उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शिरीष हिंदुराव देसाई यांनी निर्णायक विजय मिळवला आहे.
उत्तूर जिल्हा परिषद गटात झालेल्या तिरंगी लढतीत शिरीष देसाई यांनी एकूण १२,८०१ मते मिळवत बाजी मारली. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल महादेव उत्तूरकर यांना ९,४४३ मते, तर ताराराणी आघाडीचे उमेश मुकुंदराव आपटे यांना १०,२०२ मते मिळाली.
या निवडणुकीत शिरीष देसाई यांनी विजय प्राप्त करून स्पष्ट व भक्कम आघाडी घेतली. नोटाला १९१ मते मिळाली.या विजयामुळे उत्तूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून, कार्यकर्ते व समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, पंचायत समिती उत्तूर मतदारसंघातूनही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विकास वसंत चोथे (बहिरेवाडी) यांनी विजय संपादन केला. विकास चोथे यांना ७,२८१ मते मिळाली. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे संभाजी राजाराम कुराडे यांना ४,६६९ मते, ताराराणी आघाडीचे महेश काशिनाथ करंबळी यांना ४,८०९ मते, काँग्रेसचे अभिजीत अमृत आरेकर यांना ४५५ मते, तर शिवसेना ठाकरे गटाचे सागर शशिकांत वाघरे यांना २८५ मते मिळाली. नोटाला १६५ मते मिळाली.
उत्तूर जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे आजरा तालुक्यातील राजकारणात पक्षाची पकड अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बारावी बोर्ड परीक्षा आजरा केंद्राची तयारी पूर्ण…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इयत्ता बारावी बोर्ड लेखी परीक्षा आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. आजरा तालुक्याच्या ठिकाणी एकमेव आजरा महाविद्यालय आजरा ( 0531 ) हे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षेसाठी आजरा ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, पंडित दीनदयाळ ज्युनिअर कॉलेज,ओम पॅरामेडिकल कॉलेज व डॉ. झाकीर हुसेन उर्दू कॉलेज, आजरा इत्यादी कॉलेजचे एकूण ७४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी मोठी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन त्यांची बैठक व्यवस्था आजरा महाविद्यालय व आजरा हायस्कूल येथे करण्यात आली आहे. एच एस सी बोर्डाच्या भयमुक्त व कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत आणि विद्यार्थ्यांची अन्य कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता केंद्र संचालक, अधीक्षक, उपप्राचार्य व प्राचार्य यांनी घेतली आहे. बोर्डाकडून वेळोवेळी होणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोररित्या पालन करण्यात आले आहे. तसेच या शैक्षणिक वर्षातील संपूर्ण परीक्षा ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होणार आहे.
दररोजची बैठक व्यवस्था बदलती असणार आहे.बैठक व्यवस्था आदल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.परीक्षेसाठी सुपरवायझर, कर्मचारी, वर्गांची व्यवस्था करून संबंधितांना पर्यवेक्षणासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षार्थीनी आपापल्या विषयाच्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेस वेळेत हजर राहून परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केंद्रप्रमुख श्री. मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.



