mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६

आज मतदान
प्रशासनाकडून जय्यत तयारी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान होत असून मतदानाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान यंत्रांसह साहित्य वाटप तहसील पातळीवर काल शुक्रवारी करण्यात आले असून सोमवारी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

दोन गट आणि चार जणांसाठी आजरा तालुक्यात हे मतदान होत आहे प्रशासनाने १२७ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था केली आहे

मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या निवडणुकीमध्ये महायुतीतच मोठा सत्ता संघर्ष पहावयास मिळत आहे. तालुक्यातील भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. भाजपा,शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीने आपले अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

त्यांच्या पाठीशी अनुक्रमे आमदार शिवाजीराव पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे असून केवळ उमेदवारांचे भवितव्यच नाही तर प्रमुख पक्षांचे राजकीय वर्चस्व या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सद्यस्थितीच्या निवडणुकांबाबत रोखठोक मुलाखत आपण खालील लिंक वर पाहू शकता

शिरसंगीच्या वटवृक्षाला अभिनेते सयाजी शिंदेंची भेट

ग्रामस्थांशी साधला संवाद: जतन, संवर्धनसाठी मदतीची ग्वाही

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी (ता. आजरा) येथील महाकाय वटवृक्षाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली. ग्रामस्थांशी संवाद साधत जतन, संवर्धनासाठी सह्याद्री देवराई या संस्थेच्यावतीने मदतीची ग्वाही दिली. ग्रामस्थांनी वटवृक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांबाबत कौतुक केले. वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत हिंगलीकर (पुणे) हे त्यांच्यासोबत होते.

शिरसंगी येथे दीड एकरावर महाकाय वटवृक्ष पसरला आहे. या वटवृक्षाला दरवर्षी शेकडो पर्यटक भेट देत असतात. या वृक्षाची जागतिक प्रातन वृक्षात नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशा पार्श्वभूमीवर आज अभिनेते शिंदेची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. अभिनेते शिंदे व हिंगलीकर यांनी वटवृक्षाच्या परिसराची पहाणी केली. ग्रामस्थांकडून वृक्षाबद्दल माहीती घेतली. आवश्यक सूचना केल्या. वटवृक्षाच्या संवर्धन व जतनासाठी ग्रामस्थांनी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नाबाबत कौतुक केले. या वेळी सरपंच संदिप चौगुले, सी. आर. देसाई, संतोष चौगुले, वृषाल हक्केरी, श्रावण होडगे, सर्जेराव कांबळे, सागर कुंभार, नंदू दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष संवर्धनाबाबत व्यक्त केलेली मते आपण खालील लिंक वर थेट पाहू शकता…

शाळा बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाला तीव्र विरोध करणार…
शाळा बचाव आंदोलनाचा निर्धार


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सुधारित संचमान्यतेमुळे हजारो शिक्षकांची पदे रिक्त होणार असून त्यामुळे खेड्यापाड्यातील हजारो शाळा बंद पडणार आहेत. या विरोधात जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा शाळा बचाव आंदोलनाचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी दिला.

तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने वीस पटाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आजरा तालुक्यातील शिक्षक, पालकांनी व शाळा व्यवस्थापन समित्यांनी एकत्र येत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरापर्यंत आजरा ते सावंतवाडी असा लॉंग मार्च काढला. शिक्षण हक्क यात्रा काढली. याची दखल घेत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय तात्पुरता स्थगित केला. पण गेल्या वर्षी पुन्हा १५ मार्च २०२४ रोजी संच मान्यतेचा अन्याय शासन निर्णय करून आता ती संच मान्यता अंतिम करण्याचा विचार सरकार करत आहे. यातून हजारो शाळा बंद पडणार आहेत.सध्या सेवेत असलेले अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत म्हणूनच या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

आजरा येथे मागच्याच महिन्यात झालेल्या बैठकीत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या २० तारखेला हरकती नोंदणीबद्दल राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. २५ फेब्रुवारी अखेर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. यामुळे खेड्यापाड्यातील, छोट्या गावातील शाळा, हायस्कूल बंद पडणार आहेत. त्यामुळे आम्ही या विरोधात पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि आणि सजग नागरिक एकत्र येत शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत. जिल्हा परिषद निवडणूक संपली की तातडीने याची जिल्हाव्यापी बैठक बोलून आंदोलन पुढील दिशा जाहीर करण्यात येणार आहे. असे पत्रक देखील शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने काढण्यात आले आहे.

पत्रकावर कॉ. संपत देसाई, कृष्णा भारती, प्रकाश मोरुसकर कॉ. सम्राट मोरे, संजय तरडेकर, युवराज पोवार, शिवाजी गुरव, दशरथ घुरे, सुभाष निकम, डी के बोडके, नजीर चौगुले, जगन्नाथ कुडतुडकर इत्यादींच्या सह्या आहेत.

 अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये लांबवले


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत सोहाळे तालुका आजरा येथील शिवाजी रामा कांबळे या वृद्धाची वीस हजार रुपये रोख रकमेसह बँकेची कागदपत्रे असणारी पिशवी अज्ञात-चोरट्याने लंपास केली.

याबाबतची फिर्याद कांबळे यांनी आजरा पोलिसात दिली आहे. हवालदार शिकलगार पुढील तपास करीत आहेत.

वाटंगी येथे कॅन्सर तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ग्रामीण भागात कॅन्सरचे लवकर निदान व्हावे व नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला मिळावा या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.या शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरामध्ये एकूण ४१( प्रा.आ.केंद्र.वाटंगी २५, मालिग्रे ८, उत्तूर ७, भादवण १)संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.

तपासणीनंतर संबंधित रुग्णांना आवश्यक उपचार, पुढील तपासणीसाठी संदर्भ सेवा तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.तज्ज्ञ डॉक्टरांकडून थेट तपासणीची सुविधा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. स्मिता पाटील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 प्रस्तावना श्री. अतुल पाथरवट यांनी केली, तर आभार श्री. साबखान यांनी मानले.

 

संबंधित पोस्ट

प्रकाशदादा गेले…. ‘अर्बन ‘ परिवारात शोककळा..

mrityunjay mahanews

आज-यात बैलगाडी शर्यती वेळी राडा.. बैलांसह तिघे झाले जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

माझी भूमिका

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!