रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५

सत्तारुढांकडून स्वीकृत नगरसेवक पदाचे अनेकांना प्रलोभन : कारभारावर जोरदार टीका करत आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जाहीर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विकासाच्या नावाखाली सांस्कृतिक, साहित्यिक वारसा असणाऱ्या आजरा शहराचे विद्रूपीकरण करण्याचे काम गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ता मंडळींनी केले आहे. ना रस्ते, ना गटर्स,ना पाणी, ना महिला वर्गासाठी स्वच्छतागृहे अशी शहराची अवस्था आहे. नगरसेवकांवर आपला वचक राहावा म्हणून आपल्या संस्थांमधील कर्मचारी व त्यांच्याशी संबंधित मंडळींना सत्तारूढ नेत्यांनी उमेदवाऱ्या दिल्या आहेत. एकाच वेळी अनेकांना स्वीकृत संचालक पदाचे प्रलोभन दाखवून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुंदर आजरा…समृद्ध आजरा असे धोरण घेऊन आजरा परिवर्तन विकास आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. या आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आघाडीच्या प्रमुख मंडळींनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले. बैठकीस आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव अभिषेक शिंपी, कॉ. संपत देसाई, माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, अमानुल्ला आगलावे, शिवसेना उ.बा.ठा.चे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, किरण कांबळे, नौशाद बुड्डेखान, उत्तम देसाई, रवींद्र भाटले, अमित खेडेकर, इब्राहिम इंचनाळकर, दत्ता पाटील यांच्यासह घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी संजयभाऊ संभाजी सावंत या आघाडीचे उमेदवार असून नगरसेवक पदासाठीचे उमेदवार…
प्रभाग १- सौ.भैरवी राजेंद्र सावंत
प्रभाग २- संभाजी दत्तात्रय पाटील
प्रभाग ३- सुमैय्या अमित खेडेकर
प्रभाग ४- मुसासरफराज ( आसिफ) इस्माईल पटेल
प्रभाग ५- जस्मिन मो. इरफान सय्यद
प्रभाग ६- सौ.साधना अमोल मुरुकटे-
प्रभाग ७- श्रीमती कलाबाई शंकर कांबळे
प्रभाग ८- असिफ मुनाफ सोनेखान
प्रभाग ९- रेश्मा नौशाद बुडेडखान
प्रभाग १०- निसार सबदारअली लाडजी
प्रभाग ११- सौ.आरती दिपक हरणे
प्रभाग १२- समीर विश्वनाथ गुंजाटी
प्रभाग १४- अभिषेक जयवंत शिंपी
प्रभाग १६- सौ. मिनाक्षी संतोष पुजारी
प्रभाग १७- सौ. सरिता अमोल गावडे
यावेळी गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः नगरपंचायतीमध्ये धुमाकूळ घालत भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. करोडो रुपयांचा निधी आला असे सांगत आहेत परंतु हा निधी नेमका गेला कुठे ? हा संशोधनाचा विषय आहे. शहराची अवस्था बघितली तर शहरात काही भागाला पाणी नाही, रस्ते व गटर्सची झालेली दुर्दशा, सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य यामुळे नेमका विकास कोणाचा झाला असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. नगरपंचायत ही नगरसेवकांची न राहता कांही ठेकेदारांच्या ताब्यात गेली. करोडो रुपये खर्चून पाणी योजना आणली असे सांगितले जाते. ही योजना पूर्ण करण्याचा कालावधी संपून दोन ते अडीच वर्षे पूर्ण होत आली तरीही अद्याप या योजनेचा ठेकेदार कोण ? हे काम का रेंगाळले आहे ? हे काम कधी पूर्णत्वास जाणार ? हे प्रश्न अनुत्तरीतच आहे. यामध्ये कोणी कोणी ढपला पाडला आहे हे सर्वश्रुत आहे.
डीपी प्लॅन असो अथवा ओपन स्पेस असो प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालून मनमानी केली आहे. नुसता शहराचा विकास करतो अशा वल्गना करून स्वतःचा व आपल्या बगलबच्चांचा विकास करण्यापलीकडे काहीही केलेले नाही.
यामुळे सुशिक्षित मंडळी आता गडहिंग्लज सारख्या शहराकडे स्थायिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागली आहेत. सोईस्कर प्रभाग रचना व बोगस मतदार घुसडुन पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचे सुरू असलेले प्रयत्न शहरवासीयच हाणून पाडतील.
उखडलेले रस्ते, रेंगाळलेली पाणीपुरवठा योजना, बेकायदेशीर बांधकामे, शहरवासीयांचे पाण्यासाठी सुरू असणारे हाल हाच तुमचा विकास काय ? असा संवालही उपस्थित करण्यात आला
सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही शहराच्या शुशोभीकरणात भर घालणारे रस्ते, गटर्स, कचरा व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देणार आहोत. शहरापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शासकीय रुग्णालयातून अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जात आहेत परंतु केवळ वाहतुकीच्या सोयीमुळे सर्वसामान्यांना या रुग्णालयात जाणे अडचणीचे होते यासाठी शहरातून ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णांची ने आण करण्याकरीता नगरपंचायतीच्या माध्यमातून मोफत वाहन व्यवस्था करण्याचा आपला संकल्प आहे असे अभिषेक शिंपी, संजयभाऊ सावंत, आलम नाईकवाडे, कॉ.संपत देसाई, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी आदींनी स्पष्ट केले.

आजरा – भावेवाडी एसटी प्रश्नी प्रवासी संघटना आक्रमक
आगार व्यवस्थापकांसह अधिकाऱ्यांना धरले धारेवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथून भावेवाडी मार्गावर जाणारी दुपारी सव्वाचार वाजताची गाडी पाच वाजले तरी फलाटावर न लागल्याने विद्यार्थी वर्गासह या भागातील नागरिकांचे झालेले हाल लक्षात घेऊन प्रवासी संघटनेचे सचिन इंदुलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील व त्यांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही काळ बस स्थानक परिसरात वातावरण तापले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सव्वा पाच वाजता बस फेरी सोडण्यात आली त्यानंतर हा वाद निवळला.
आजरा येथून सव्वा चार वाजता भावेवाडीच्या दिशेने बस फेरी चालू असते. परंतु गेले काही दिवस या बस फेरीबाबत तक्रार सुरू आहे काल शनिवारी दुपारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने गावी परतण्यासाठी बस स्थानकावर आले होते. परंतु बस फेरी न सोडण्यात आल्याने अखेर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बस स्थानकात धाव घेतली व व स्थानकाचे दोन्ही गेट अडवले एकही बस बाहेर सोडली जाणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर आगारप्रमुखांचं इतर अधिकारी मंडळी बस स्थानकावर हजर झाली. यावेळी बस फेऱ्यांचे कोलमडलेले वेळापत्रक व त्यामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे होणारे हाल यावर बोट ठेवत एसटी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. ऐनवेळी बस फेऱ्या रद्द होणे मनमानी पद्धतीने वेळेचे भान न ठेवता त्या सुरू ठेवणे असे प्रकार वारंवार होत असून पुन्हा असे प्रकार खपवून घेणे जाणार नाही असा इशारा देण्यात आला.
वातावरण तापलेले पाहून अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सुमारे सव्वा पाच वाजता या मार्गावर बस फेरी सोडण्यात आली त्यानंतर वातावरण निवळले.

संजय दिवेकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण या.आजरा येथील केबल नेटवर्क चे मालक संजय उर्फ माणिक रामचंद्र दिवेकर ( वय – ५३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी , भाऊ असा परिवार आहे. प्राध्यापक भूपाल दिवेकर यांचे ते भाऊ होत
रक्षाविसर्जन सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता भादवण येथे आहे.

उत्तूर ग्रामपंचायतीतर्फे गुणवंतांचा गौरव

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता. आजरा) ग्रामपंचायती तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते.
बीएसएनएलच्या तांत्रिक सल्लागार समितीवर आतिषकुमार देसाई यांची निवड, महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकारी पदावर मयूर पोवार यांची यशस्वी निवड तसेच महसूल सहाय्यक मंत्रालय लिपिक पदी महेश हत्तरकी यांनी मिळवलेले यश याबद्दल तिघांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि शुभेच्छांद्वारे मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रामसेवक प्रकाश पाटील, सदस्य महेश करंबळी, संजय उत्तूरकर, भैरू कुंभार, संभाजी कुराडे, मिलिंद कोळेकर, सरिता कुरुणकर, अनिता घोडके, सविता सावंत, लता गुरव, वर्षा हत्तरकी, आशा पाटील आणि ॲड.संजय पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक सचिन फाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात…
सौ. शाहीन तकीलदार
प्रभाग क्रमांक ६ (अपक्ष)
” मी मुळची कोल्हापूर येथील सुशिक्षित कुटुंबातील. हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या काठावर वसलेले स्वच्छ सुंदर व निसर्गरम्य आजरा असे मी व माझे कुटुंबीय ऐकून होते. अकरा वर्षांपूर्वी विवाहा नंतर मी आजरा येथे आल्यानंतर मात्र प्रत्यक्षात या शहरांमध्ये अनेक विचित्र अनुभव येऊ लागले.
ज्या ठिकाणी आजरा- आंबोली मार्गावर आम्ही राहतो तेथे ना धड पाणी, ना रस्ते, ना वीज ना, आरोग्याच्या सोयी, ना कचरा व्यवस्थापन अशा विचित्र परिस्थितीत गेली अकरा वर्षे आम्ही काढतो आहोत. माझ्यासारखी अनेक कुटुंबे आजही पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. दोन नद्यांच्या संगमावर असणाऱ्या या शहराची ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असा प्रकार या भागामध्ये सुरू आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार तर चिखल व दलदलीमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न या भागाला सतावत आहेत. इतरांप्रमाणे आम्हीही नगरपंचायतीला जे कांही शासकीय कर आहेत ते नियमितपणे भरत असतानाही आम्हाला अशा नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. कुठे नेऊन ठेवलात आजरा शहर ? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. वारंवार विनंती करूनही लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर आता आम्हालाच सभागृहात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
प्रभाग क्रमांक सहा मधून मी माझी अपक्ष म्हणून उमेदवारी ठेवली आहे या मागचे कारण हेच आहे. निश्चितच माझ्या वेदना या अनेकांच्या वेदना आहेत. हा परिसर टँकर मुक्त करणे हे माझे प्रथम ध्येय असेल. प्रभागातील सर्वसामान्यांची निगडित प्रश्नांची जाण मला आहे. यामुळे माझ्यासारख्या सुशिक्षित व लढाऊ उमेदवाराला प्रभागातून पाठबळ मिळेल अशी आशा आहे …”




