गुरुवार दि.२० नोव्हेंबर २०२५



वाघाच्या हल्ल्यात रेड्याचा मृत्यू…?

हरपवडे पैकी धनगरवाडा (ता.आजरा) येथे वन्यप्राण्याने केलेल्या हल्यात रेडा ठार झाला आहे. सदर हल्ल्याचा प्रकार पाहता हल्ला हा पट्टेरी वाघाने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत रेडा हा येथील धनगर वसाहतीमधील भागोजी झोरे यांच्या मालकीचा आहे. काल मंगळवार (ता. १८) सायंकाळी साडेपाच वाजता जंगलात घटना घडली. हा हल्ला पट्टेरी वाघाने केल्याची शक्यता असून येथे बिबट्याचा वावरही आहे. त्यामुळे घटनास्थळाची पहाणी वनविभागाच्या पथकाने केली आहे.
भागोजी झोरे यांनी नेहमी प्रमाणे जनावरे चारण्यासाठी सोडली होती. जनावरे घराकडे परतत होती. दरम्यान जनावरांवर वन्यप्राण्याने हल्ला केला. यामध्ये रेडा ठार झाला आहे. या रेड्याचा पाठीमागील भाग वन्यप्राण्याने खाल्ला आहे. वनविभागाने घटनास्थळाची पहाणी केली आहे. या प्राण्याला कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे वनपाल शकिल मुजावर यांनी सांगीतले. यासाठी वनरक्षक अस्मिता घोरपडे व त्यांचे पथक कार्यरत आहे.
वन विभागाची पळापळ…
सध्या धनगरमोळा परिसरात हत्तीकडून नुकसान सत्र सुरू आहे. तर वझरे पेरणोली परिसरात बिबट्याचा वावर आहे. हरपवडे धनगर वाड्यावरील हल्ल्याचा प्रकार हा पट्टेरी वाघाकडून घडला असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वनविभागाची या सर्व प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करताना चांगलीच दमछाक होत आहे.
सोहाळे बाचीत तरसाचे दर्शन
सोहळे/बाची येथे भैरू कोंडुस्कर यांना तरसाने दर्शन दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

पहिल्याच दिवशी चौघांची माघार

आजरा नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेच्या माघारीच्या पहिल्याच दिवशी नगराध्यक्षपदा करिता उमेदवारी अर्ज दाखल केलेले अबूताहेर तकीलदार यांच्यासह प्रभाग १० मधील नगरसेवक पदाकरिताचे सनाउल्ला चॉंद, ताहीर रहीमबक्ष लमतुरे उबेद जमीर चॉंद यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
उद्या शुक्रवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने आज गुरुवारी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

मीटर रीडिंग घेऊनच लाईट बील द्यावे
शिवसेनेची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे उप अभियंता यांना आजरा तालुक्यातील नागरिकांना वीज वितरणकडून घरगुती कनेक्शनची वीजबीले ही मीटर रीडिंग घेण्या अगोदरच अंदाजे दुप्पट रकमेची वीज ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे जी जुनी मीटर्स आहेत. त्याची वीज बिले मीटर रीडिंग घेतल्याशिवाय देऊ नयेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
सध्या मेंटेनन्स साठी व वसुलीसाठी वेगवेगळी टीम नेमलेली आहे. त्यावेळी एखाद्या घरातील वीज बंद होते त्यावेळी आपले कर्मचारी ऑनलाईन तक्रार करा मगच आम्ही दुरुस्ती करू असे सांगतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन तक्रार करणे वेळेवर जमत नाही तर काही ग्रामीण भागातील ग्राहकांना ऑनलाईन तक्रारच करता येत नाही त्यामुळे वयोवृद्ध त्यांना रात्रभर अंधारात राहावे लागते. तसेच वसुलीचे पथक हे किरकोळ ५००/- रुपये थकीत असणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन बंद करतात त्यामुळे त्या ग्राहकाला बील भरूनही दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघावी लागते.
हे सर्व अन्यायकारक आहे. तरी वरील मागण्याचा तात्काळ होऊन यावर तोडगा काढावा अन्यथा आपल्या कार्यालयावर जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, दिनेश कांबळे (शेतकरी सेना तालुका प्रमुख),अमित गुरव (युवा सेना उप.ता.प्रमुख), प्रकाश गुडूळकर यांच्या शिवसैनिक उपस्थित होते.

आजरा साखर कारखाना ऊसाला विनकपात प्रतिटन ३ हजार ४०० रुपये देणार

गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखान्याकडे चालु गळीत हंगामात गाळपास येणा-या ऊसाला प्रति मे.टन रू.३ हजार ४०० इतका विनाकपात एकरकमी ऊस दर देणेचा निर्णय अध्यक्ष मुकुंदराव देसाई व संचालक मंडळाने घेतला आहे.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखाना हा सहकारी तत्वावर सुरु असलेला साखर कारखाना असुन आजअखेर १५ दिवसात कारखान्यात ५० हजार मे.टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कार्यरत असुन त्या यंत्रणे मार्फत आजरा तालुक्याबरोबरच गडहिंग्लज, चंदगड इत्यादी भागातुन नियमित ऊस पुरवठा सुरू आहे. गळीतासाठी येणा-या ऊसाची बिले नियमित व वेळेवर देण्याचे आर्थिक नियोजन संचालक मंडळाने कोल्हापूर जिल्हा मध्य. सहकारी बँकेच्या सहकार्याने केलेले आहे. कारखान्याकडे या हंगामासाठी शेतक-यांनी आजरा, गडहिंग्लज व चंदगड तसेच आंबोली क्षेत्रातुन मोठया प्रमाणावर ऊसाचे करार केलेले आहेत. तसेच करार न केलेल्या शेतक-यांनीही कराराची पुर्तता करून आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा साखर कारखान्यास गळीतासाठी पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, कार्यकारी संचालक एस. के. सावंत यांच्या सर्व संचालक उपस्थित होते.

उत्तूरचे ज्येष्ठ अभियंता प्रमोद रंगराव देसाई यांचे निधन
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर या आजरा येथील ज्येष्ठ अभियंता प्रमोद रंगराव देसाई (वय ६६ वर्षे ) यांचे काल बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मितभाषी, प्रामाणिक आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांची सर्वत्र ओळख होती.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
आजऱ्यात राजारामबापूंना आदरांजली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष राजारामबापू देसाई यांना १८ व्या स्मृती दिनानिमित्त आजरा येथे फोटो पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सन्मित्र संस्था समूहाचे प्रमुख अल्बर्ट डिसोझा, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अनिल फडके, विठ्ठलराव देसाई, मधुकर यल्गार, तालुका संघाचे उपाध्यक्ष डी.ए. पाटील, एम.के. देसाई, विजय देसाई, राजू मुरकुटे, उदय पवार, संभाजीराव पाटील रंगराव माडभगत, जनार्दन बामणे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.


