शुक्रवार दि.१७ आक्टोंबर २०२५

निंगुडगे येथे मारामारी
एक जखमी… एकावर गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निंगुडगे ता. आजरा येथे शेतातील वाटेच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत व शिवीगाळ करण्यात झाले. यामध्ये दयानंद माधवराव सरदेसाई यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दिलीप विलास देसाई यांच्या विरोधात दयानंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती आजरा पोलिसांनी दिली.
पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.

सुकून सहकारी गृह तारण संस्थेचे उद्या उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे नव्यानेच सुरू होत असलेल्या सुकून सहकारी गृहतारण संस्थेचे उद्घाटन शनिवार दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ उद्योजक सुरेश होडगे व सौ.वनिता सुरेश होडगे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भिकाजी पाटील यांनी दिली.
सदर कार्यक्रमास डॉ. श्रद्धानंद ठाकूर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, भाजपा उपजिल्हाप्रमुख सुधीर कुंभार, अभिषेक शिंपी डॉ.दीपक सातोसकर, दयानंद भुसारी, संजयभाऊ सावंत, विलास नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही अध्यक्ष भिकाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

आजरा साखर कारखान्याकडे येणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कारखाना गळीताच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कारखाना प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे लेखी पत्रही देण्यात आले आहे.
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम २४ ऑक्टोंबर २०२५ रोजी सुरू होत आहे. आजरा शहरा पासुन ते साखर कारखान्यापर्यंत येणारा रस्ता नविन आहे. परंतु तालुक्याच्या इतर गांवा पासुन आजरा शहरा पर्यंत महागांव- हात्तीवडे-आजरा, नेसरी- किणे-आजरा, चंदगड-आडकुर-वाटंगी-आजरा, लाटगांव- खानापुर-आजरा, सरोळी-कोवाडे-हाजगोळी आजरा इत्यादी रस्ते अति पावसामुळे नादुरूस्त होवून रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. कारखान्याच्या गळीत हंगाम कालावधीत सदर रस्त्यावरून आजरा मार्गे कारखान्याकडे दररोज ४०० ट्रक / ट्रॅक्टर इ. वाहनांने उस वाहतुक २४ तास सुरू असते. त्याचप्रमाणे कारखान्याकडे दररोज कर्मचारी व सभासद, शेतकरी कंत्राटदार ये-जा करत असतात. सदरचा रस्ता खराब असले कारणाने रहदारी मुळे अपघात होवून मोठया प्रमाणावर वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या नेसरी-आजरा रस्त्यावरील संपुर्ण खड्डे तात्काळ बुजवुन रस्ता गाळप हंगाम सुरू होणेपुर्वी दुरूस्त करावा व संभाव्य अपघात टाळुन जिवीत व वित्तहानी होणार नाही यासाठी लक्ष घालावे असे याबाबतच्या पत्रात म्हटले आहे.

‘ अन्याय निवारण ‘च्या मागणीनुसार वनविभागाकडून रामतीर्थ परिसरात आवश्यक त्या सोयी सुरु

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अन्याय निवारण समितीच्या वतीने वनविभागाकडे स्वच्छतागृहांना मुबलक पाण्यासह पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. वनविभागाने या मागणी नुसार स्वच्छतागृहाला मुबलक पाणी देण्यासाठी हिरण्यकेशी नदी पात्रात मोटर बसवून स्वच्छतागृहांपर्यंत पाईपलाईनद्वारे बारमाही पाणी पुरवठा करण्यात या दृष्टीने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे.
लवकरच पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल असे यावेळी वन विभागाकडून सांगण्यात आले. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे,पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर आदींनी रामतीर्थस्थळी जाऊन या कामाचा आढावा घेतला व आवश्यकता सूचना केल्या.

दुध उत्पादक संघर्ष कृती समितीचा आज गडहिंग्लजला मोर्चा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोकुळ दूध संघाने दिवाळी दुध दर फरक वाटप रकमेतील ४० ते ४५ % रक्कम संघ डिबेंचर्स कडे वर्ग केली आहे संघ आर्थिक दृष्टीने भक्कम असताना ऊत्पादकांचे पैसे परस्पर कपात करणे अन्यायकारक आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे काम गोकुळच्या कारभारी मंडळीनी केले आहे.याबाबत निवेदन देऊन जाब विचारण्यासाठी आज शुक्रवार दि.१७ रोजी दु १२ वाजता दुध शितकरण केंद्र , गडहिंग्लज येथे मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी देसाई यांनी दिली.
मोर्चासाठी आजरा गडहिंग्लज मधील सर्व दुध उत्पादकांनी हजर रहावे असे आवाहन
दुध उत्पादक संघर्ष कृती समिती आजरा गडहिंग्लज यांच्या वतीने त्यांनी केले आहे.

निधन वार्ता
गजानन देसाई

गजरगाव ता.आजरा येथील गजानन धोंडीबा देसाई (वय ६० वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई,मुलगा, पत्नी असा परिवार आहे.
आदित्य चव्हाण

गजरगाव ता. आजरा येथील आदित्य चंद्रकांत चव्हाण (वय २७ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई,वडील असा परिवार आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरल डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांचे हस्ते करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे व यावर्षीच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन उपाध्यक्षा विद्या हरेर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष वामन सामंत व ज्येष्ठ संचालक संभाजीराव इंजल यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले .
वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने वाचनालयांचे व्यासंगी अभ्यासक आणि भूमिपुत्र साहित्यिक पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. श्रीकांत नाईक गडहिंग्लज यांनी आपल्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहातील १०० पुस्तके वाचनालयास भेट दिली. या पुस्तकांचे प्रदर्शनही वाचनालयात लावण्यात आले .
यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, बंडोपंत चव्हाण, महंमदअली मुजावर, डॉ अंजनी देशपांडे, सौ. गिता पोतदार, सौ. सुचेता गडडी, ग्रंथपाल चंदकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार, आर्या गुप्ता, सोनाली तामनगोंडे, संचिता राणे, श्रेया लटके, सानिका पन्हाळकर, यासिन चाँद, वैभवी तेजम, तनुजा वाझे, जागृती सुतार व विद्यार्थी उपस्थीत होते.
व्यंकटराव येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन व्यंकटराव शिक्षण संकुलात संपन्न झाला.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे सचिव श्री.अभिषेक शिंपी, प्राचार्य श्री. एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार प्राथमिक मुख्याध्यापक श्री.आर.व्ही. देसाई, यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
ग्रंथपाल श्री.टी.एम. गुरव यांनी पुस्तकांचे प्रदर्शन मांडले व वाचनाचे महत्त्व श्री.पी. व्ही.पाटील यांनी सांगितले. प्राचार्य श्री.नागुर्डेकर यांनी मिसाईल मॅन ,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याबद्दल व त्यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. श्री .एम. एस.पाटील , सौ. व्ही.ए. वडवळेकर व श्री.आर.टी.देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने हात धुवा दिनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व हात धुण्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आजरा हायस्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रतिमापूजन मुख्याध्यापक ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापिका एच. एस. कामत व पर्यवेक्षक ए. आर. व्हसकोटी यांच्या हस्ते पार पडले.
बी. पी. पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली तर विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखितांचे प्रदर्शन हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे ग्रंथपाल एम. एस. पाटील यांनी केले.या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पं. दीनदयाळ विद्यालयात वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन, हादगा बोळवण उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयात वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन तसेच हादगा बोळवण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विमल भुसारी होत्या.
माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. सुनीता कुंभार यांनी प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, हादगा बोळवण सारखे कार्यक्रम का घेतले जातात? शाळेतील उपक्रम यासंदर्भात माहिती सांगितली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयामध्ये ग्रंथप्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच पाककला दालनाचे उद्घाटन सौ. निशा सोहनी यांच्या हस्ते करण्यात आले.वाचन प्रेरणा दिनाची माहिती ग्रंथपाल दिलीप पाटील यांनी विध्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिक्षकांनीही वाचन प्रेरणा दिनानिमित्त वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन केले. कु.सर्वस्वी पाटील तसेच दर्श परळकर या विद्यार्थ्यांनी गांधीजींचे जीवन व कार्य या पुस्तकातील काही प्रसंगांचे प्रकट वाचन केले.
यानंतर निशा सोहनी यांनी आपले सण, विद्यार्थी व संस्कार या संदर्भात मार्गदर्शन केले. हादगा करण्यामागचा उद्देश काय? हादग्याच्या गाण्यातून होणारे संस्कार, अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यामागची भूमिका सांगितली. आपल्यावर गर्भातूनच होणारे संस्कार,छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,साने गुरुजी अशा महान व्यक्तींच्या आदर्शांचा उल्लेख त्यांनी केला. या सर्वांचे आदर्श समोर ठेवून आपण आपले व्यक्तिमत्व घडवले पाहिजे असे स्पष्ट केले.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आरती हरणे, द्वितीय क्रमांक अंकिता नार्वेकर आणि तृतीय क्रमांक सीमा माणगावकर यांनी पटकावला. कार्यक्रमास माता-पालक उपस्थित होत्या. जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून शालन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यक्रमासाठी गदगेश्वरी बुरुड, अर्चना बुरुड, सारिका देसाई, डॉ. स्मिता कुंभार, वेदश्री शिंदे, क्षमा परळकर, माता पालक, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी निर्मळे यांनी केले आभार शालन कांबळे यांनी मानले.
आज शहरात…
भाजपा आजरा तालुका कमिटी पदाधिकारी नियुक्तीसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत आजरा हायस्कूल येथे सकाळी ११.३० वाजता विशेष बैठक.


