शनीवार दि.११ आक्टोंबर २०२५


शहरातल्या मतदार याद्या बोगस मतदारांनी भरल्या...
तब्बल १४०० वर बोगस मतदारांची घुसखोरी

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा शहरामध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले प्रभाग निहाय मतदार याद्यांमध्ये तब्बल १४०० च्या वर मतदार हे बोगस असल्याचे दिसत असून आजूबाजूच्या अनेक गावातील मतदारांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये घुसखोरी केली असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे याप्रकरणी पुन्हा एक वेळा वरिष्ठांकडे दाद मागण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
गत नगरपंचायत निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाल्याने अनेक नगरसेवक हे काठावरच्या मतावर निवडून आले होते. यावेळीही असा फटका बसू नये यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काळजी घेतली जात असून आजूबाजूच्या गावातील अनेक नागरिकांना आजरा शहरांमध्ये बोगस रहिवासी दाखवून त्यांची मतदारयादीत नोंदणी करण्यात आली आहे . यामध्ये विविध संस्थांचे कर्मचारी, इच्छुकांची नातेवाईक मंडळी, मित्रपरिवार यांचा प्राधान्याने समावेश आहे.
मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हे प्रकार उघडकीस येत असून ज्यांनी कुणी हे प्रकार हेतूपुरुस्सर केले आहे अशांना निवडणुकीत धडा शिकवण्याची भाषाही शहरवासीय करू लागले आहेत.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही आजऱ्यातील मतदार यादीत
आजूबाजूच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणाऱ्या मतदारांसह कांही गावातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी देखील आजरा शहरात विविध प्रभागात मतदार म्हणून नोंद झाल्याचे दिसत आहे.यामुळे हेतू पुरस्सर मतदार वाढवण्यात आले असल्याचीही चर्चा सध्या शहरात सुरू आहे. तक्रारी झाल्यास अशा पदाधिकारी मंडळांची स्थानिक ग्रामपंचायतीतील पदेही धोक्यात येण्याची शक्यता बोलली जात आहे.

गोकुळने दूध उत्पादक सभासदांच्या घरावर दरोडा टाकला : तानाजी देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोकुळ दूध संघाने दिवाळी दुध दर फरक वाटप रकमेमध्ये हातचलाकीने फसवणूक करू ऐन दिवाळीमध्ये दूध उत्पादकांच्या घरावर दरोडा टाकला आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी पेरणोली, ता. आजरा येथील दूध उत्पादकांच्या मेळाव्यामध्ये केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दूध उत्पादक बापू दळवी होते.
यावेळी बोलताना तानाजी देसाई म्हणाले, गोकुळ दूध संघाचे भाग भांडवल ७८ कोटी डिबेंचर्स ठेव १४४ कोटी व एकूण ठेवी ३९८ कोटी, गुंतवणूक केलेला निधी ५१२ कोटी आहे. संघाने आर्थिक वर्षात २५४१ कोटी रुपयांचे दूध खरेदी करून ते ३३०३ कोटी रुपयांना विक्री केले आहे. संघाला निव्वळ दूध विक्रीतून ७६२ कोटी रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.अशाप्रकारे गोकुळ दूध संस्था ही आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे. असे असताना गोकुळने दिवाळीसाठी म्हैस दुधासाठी शेकडा ६.५% दूध दर फरक जाहीर केला त्यापैकी ४.३% रोखीने तर २.२% डिबेंचर्ससाठी कपात केली आहे. तर गाय दुधासाठी ८.०६% असा दर फरक जाहीर केला. त्यापैकी ४.३४% रोख व ३.७% डिबेंचर्स साठी कपात केला आहे म्हणजेच ४० ते ४५ टक्के रक्कम कपात केली आहे. यापूर्वी डिबेंचर्स कडे ०.५% रक्कम दूध संघ कपात करत होता दूध संघाची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही अगोदरच अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेत पिकांची दाणादाण झाली आहे .शेतकरी हैराण झालेला असताना गोकुळने मदतीचा हात पुढे करण्याऐवजी ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना शिमगा करण्याची वेळ आणली आहे.संस्थापक कै. आनंदराव पाटील- चुयेकर,अरुण नरके कै. रवींद्र आपटे यांनी अपार कष्टाने उभी केलेली उत्पादकांची गोकुळची दौलत आता दलालांच्या ताब्यात गेली आहे असा आरोपही केला. सर्व दूध संस्थांच्या उत्पादकांनी गोकुळ विरोधाच्या आंदोलनामध्ये आपल्या हक्कासाठी हिरहिरीने सहभागी होण्याचे एकमताने यावेळी ठरले. यावेळी विविध दूध संस्थांचे पदाधिकारी शिवाजीराव देसाई, रामदास सावंत, उपसरपंच संकेत सावंत, शिवाजी सोले पांडुरंग वांद्रे,दत्ता देसाई, शिवाजी मस्कर, नामदेव वांद्रे, अमित सावंत, शंकर नार्वेकर, संजय लोंढे,तुषार येरुडकर,पांडुरंग पाईम, छाया गुरव, विद्या हळवनकर ,सचिन देसाई, शिवाजीराव देसाई, सुरेश पाटील, दत्ता पाटील, अरविंद नावलकर, शिवराम गुरव यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.
स्वागत सुदर्शन हळवणकर यांनी केले. तर आभार विठोबा नावलकर यांनी मांनले.

चुकीची माहिती देऊन स्मार्ट मीटर बसवल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून गावोगावी जाऊन कंपनीचे कर्मचारी नागरिकांना चुकीची माहिती देऊन स्मार्ट मीटर बसवत आहेत. यासंदर्भात नागरिकांना बिल कमी येणार आता मीटर बसून घेतले नाही तर पुन्हा पैसे भरून हे मीटर बसून घ्यावे लागणार अशी भीतीही घातली जात आहे चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून स्मार्ट मीटर बसवण्याचा हा प्रकार तातडीने न थांबल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही कंपनीला देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी पत्र उप अभियंत्यांना देण्यात आले असून पत्रावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, दिनेश कांबळे,महेश पाटील, सुयश पाटील, अमित गुरव, रवी यादव, सागर नाईक, रोहन गिरी आदींच्या सह्या आहेत.

आरसीसी रस्त्यालगत गटर्स व पाईपलाईन दुरुस्तीची मागणी

(मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा/मंदार हळवणकर)
उत्तूर : पांगिरे ते गडहिंग्लज दरम्यान एम. एस. आय. डी. सी.च्या वतीने सुरू असलेल्या आरसीसी रस्त्याच्या कामादरम्यान उत्तूर गावच्या हद्दीत नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटर्स बांधून मिळाव्यात, तसेच जलजीवन योजनेतील या रस्त्याच्या हद्दीतील आरसीसी कामाच्या दरम्यान तुटलेली पाईपलाईन तात्काळ बदलून मिळावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्यालगत योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात साचणारे पाणी व त्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांशी निगडीत या मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मकपणे लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, असे मत व्यक्त करण्यात आले.
या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेश आपटे यांनी दिले.
या प्रसंगी उत्तूर गावचे सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य संजय उत्तूरकर, मिलिंद कोळेकर, महेश करंबळी, भैरू कुंभार, राजू खोराटे उपस्थित होते.
या निवेदनामध्ये एकूण आठ किलोमीटर गटर्स बांधण्याची मागणी करण्यात आली असून, तुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्ती व नुकसान भरपाईसाठी एक कोटी रुपयांपर्यंतचे बजेट मंजूर करावे, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य पदाकरीता सोमवारी आरक्षण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदारसंघानुसार आरक्षण जाहीर करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १३ रोजी विशेष बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद आरक्षणाकरिता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथ सकाळी १० वाजता तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती निर्णायक गणासाठी स्थानिक पंचायत समिती सभागृह येथे दुपारी दोन वाजता बैठका होणार आहेत..

प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांची राज्यस्तरीय विशेष तज्ञ म्हणून निवड...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन कार्यशाळेसाठी राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून आजरा महाविद्यालय आजरा येथील प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांची निवड करण्यात आली असून ते आपल्या या क्षेत्रातील अनुभव याकामी देणार आहेत.
सध्याच्या काळात व्यसन हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. विदयार्थी आणि युवकांतील या वाढत्या व्यसनाच्या सवयीमुळे आरोग्य, कुटुंब, समाज पर्यायाने राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. शाळा, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्यसन आणि व्यसनांचे दुष्परिणाम यांचा समावेश करण्याबाबत सूचित केलेले आहे. तद्नुषंगाने विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्ती या विषयाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधनात प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन निर्मिती करण्यात येणार आहे.

निधन वार्ता
संजय पाटील

गांधीनगर या.आजरा येथील संजय शंकर पाटील ( वय ६० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून,मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते सुरज पाटील यांचे ते वडील होत.
आज तालुक्यात…
कानोली विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांच्याकडून उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.


