गुरुवार दि.९ आक्टोंबर २०२५


फुगा फुटला…
आरक्षणात अनेकांना फटका
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभाग निहाय आरक्षणामध्ये मावळत्या सभागृहातील आरक्षणाचा कोणताही विचार न झाल्याने अनेक ठिकाणी जुन्यांनाच संधी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. चक्राकार पद्धतीने आरक्षण बदलणार असे गृहीत धरून गेली पाच-सहा वर्षे प्रभागांची मशागत करणाऱ्या मंडळींच्या पदरात निराशाच आली आहे. अनेक जणांना निवडणुक मैदानाबाहेर राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातूनही काही मंडळी एखादा जवळचा प्रभाग शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत तर काहींनी थेट नगराध्यक्षपदाचीच चाचपणी सुरू केली आहे.
नगरपंचायत सभागृहात उपविभागीय अधिकारी हरीश सूळ व मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली न्यायालय व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सदर सोडत काढण्यात आली. यामध्ये जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे…
प्रभाग १… सर्वसाधारण महिला (९२० लोकसंख्या/विद्यानगर भारत नगर बळीरामजी देसाई कॉलनी)
प्रभाग २…
नागरिकांचा मागास प्रवर्ग
(१०१२ लोकसंख्या/शिवाजीनगर,नबापूर, जिजामाता कॉलनी)
प्रभाग ३…
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
(९८१ लोकसंख्या/आमराई गल्ली, मच्छी मार्केट परिसर )
प्रभाग ४…
सर्वसाधारण प्रवर्ग
(९५४ लोकसंख्या/हैदर नगर )
प्रभाग ५…
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
(९५५ लोकसंख्या/मदरसा कॉलनी)
प्रभाग ६…
सर्वसाधारण महिला प्रवर्ग
(११२६ लोकसंख्या/मुल्ला कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, एकता कॉलनी)
प्रभाग ७…
अनुसूचित जाती महिला
(१०७२ लोकसंख्या/हरिजन वाडा, दत्त कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी)
प्रभाग ८…
नागरिकांचा मागास प्रवर्ग
(१११० लोकसंख्या/नाईक गल्ली परिसर)
प्रभाग ९…
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
(९३९ लोकसंख्या/दर्गा गल्ली, सुभाष गल्ली, मेन रोड)
प्रभाग १०…
सर्वसाधारण प्रवर्ग
(११२३ लोकसंख्या/वाडा गल्ली, कुंभार गल्ली)
प्रभाग ११…
सर्वसाधारण प्रवर्ग महिला
(१०९६ लोकसंख्या/गणपत गल्ली, जोशी गल्ली, फकीरवाडा, रामदेव गल्ली)
प्रभाग १२…
सर्वसाधारण प्रवर्ग
(१०९५ लोकसंख्या/लिंगायत गल्ली, पटेल कॉलनी महाजन गल्ली)
प्रभाग १३…
सर्वसाधारण प्रवर्ग
(१०५४ लोकसंख्या/सोमवार पेठ, सुतार गल्ली, चर्चा गल्ली)
प्रभाग १४…
सर्वसाधारण प्रवर्ग
(९७१ लोकसंख्या/गोठण गल्ली,बर्डे गल्ली)
प्रभाग १५…
सर्वसाधारण प्रवर्ग
(९९० लोकसंख्या/रवळनाथ कॉलनी, आयडियल कॉलनी)
प्रभाग १६…
सर्वसाधारण महिला प्रवर्ग
(९८२ लोकसंख्या/गांधीनगर)
प्रभाग १७…
सर्वसाधारण महिला प्रवर्ग
(९२९ लोकसंख्या/चाफे गल्ली, आवंडी वसाहत, पारपोलकर कॉलनी)
जाहीर आरक्षणा नुसार विद्यमान नगरसेवक सौ. अस्मिता जाधव, संभाजी पाटील, सौ. सुमैय्या खेडेकर, आलम नाईकवाडे, सौ.यास्मिन बुड्डेखान, सौ.यासिराबी लमतुरे, सिकंदर दरवाजकर, धनाजी पारपोलकर, विलास नाईक, सौ. शकुंतला सलामवाडे सौ. सीमा पोवार सौ.शुभदा जोशी यांना पुन्हा एक वेळ संधी चालून आली आहे. तर बाळ केसरकर, किरण कांबळे,सौ. रेश्मा सोनेखान,अशोक चराटी, संजीवनी सावंत यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची झाल्यास पर्याय शोधावा लागणार आहे. यापैकी चराटी हे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार समजले जातात.
प्रभाग १ व २ शांत झाले…
प्रभाग एक व प्रभाग दोन मध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड होती. मात्र आरक्षणामुळे याचा इच्छुकांना मोठा फटका बसणल्याचे दिसत आहे. या दोन्ही प्रभागात चुरशीने निवडणूक होण्याची शक्यता असतानाच आरक्षणामुळे बरेच इच्छुक मैदानातून बाहेर झाले आहेत.
आघाड्यांच्या बांधण्या वेगावल्या…
नगराध्यक्ष पदासह प्रभाग निहाय नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आघाड्यांच्या रचना करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोर बैठका काढल्या जात आहेत.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा शिवसेनेचे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा द्यावा व त्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली.या पार्श्वभूमीवर आजरा शहरात मोर्चा काढण्यात आला व आजरा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्याकडून नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना निवेदन देण्यात आले. संभाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली तालुकाप्रमुख युवराज पोवार व संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चा निघाला. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शहरप्रमुख समीर चांद म्हणाले, विधानसभेच्या पूर्वी विद्यमान व तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते पण ते पाळले नाही. तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, राज्यातील शेतकरी अन्नदाता आहे. नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ,खतांचे वाढलेले दर, महागाई यामुळे शेतकरी घाईला आला आहे. शेतकरी बँक व सावकारांकडील कडील कर्जाने दबला आहे. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करावी. विभाग प्रमुख सुनील डोंगरे, उप तालुकाप्रमुख विश्वास किल्लेदार, संजय येसादे यांची भाषणे झाली. यावेळी दिनेश कांबळे, बिलाल लतीफ, शिवाजी इंगळे, प्रदीप पाचवडेकर, रोहन गिरी, सुरज पाटील,विष्णू रेडेकर, प्रथमेश खोत, प्रकाश ढवळे, अरुण कांबळे उपस्थित होते.

सरोळी येथील केसरकर यांचे मरणोत्तर नेत्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरोळी ता. आजरा येथील आप्पा तातोबा केसरकर (वय ७८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते सेवानिवृत्त गिरणी कामगार होते. प्राथमिक शिक्षक शांताराम केसरकर व पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.
रक्षाविसर्जन आज गुरुवार दिनांक ९ रोजी सकाळी आहे.

हत्तीचा बंदोबस्त करा अन्यथा सोमवारपासून आमरण उपोषण
घाटकरवाडी ग्रामस्थांचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घाटकरवाडी गावामध्ये जून २०२५ ते आज अखेर हत्तीचा रहिवास असून हत्तीकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. थेट गाव- वस्तीमध्ये संध्याकाळच्या दरम्यान हत्ती येत असून ऊस, भात, नाचना या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी वन विभागाला तक्रारी देऊन सुद्धा आज तागायत हत्ती हटवण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर हत्ती उचलून दुसरीकडे स्थलांतरित न केल्यास सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर पासून उपोषणासह रास्ता रोको करण्याचा इशाराही दिला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन वन अधिकाऱ्यांना देण्यात आले असून निवेदनावर जयसिंग पाटील, संग्राम पाटील, प्रवीण मटकर, भास्कर पाटील, विश्वास तांबेकर, निवृत्ती यादव, दत्तात्रय यादव, पंकज पाटील, सुमित पाटील, युवराज पाटील, योगेश पाटील, रामचंद्र पाटील, गोपाळ पाटील आदींच्या सह्या आहेत.

महावितरणच्या पुनर्रचनेने उत्तूर विभागातील कर्मचाऱ्यांवर वाढला ताण : सेवा वेळेत देणे अवघड

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा/मंदार हाळवणकर
ग्राहकांना तात्काळ सेवा मिळावी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत स्पष्टता यावी, ग्राहकसेवा सुधारावी आणि कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने महावितरणने पुनर्रचनेचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे उत्तूर विभागाला अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.सध्या या निर्णयाविरुद्ध महावितरणच्या विविध संघटनांनी जोरदार विरोध सुरू केला आहे.
उत्तूर विभागात दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून एकात पाच मोठी गावे आणि दुसऱ्यात चौदा गावे समाविष्ट आहेत. दोन्ही विभागात प्रत्येकी दहा कर्मचारी आहेत.
नवीन निर्णयानुसार वीजपुरवठा दुरुस्ती, ग्राहक तक्रारी, नवीन वीजजोडणी, देखभाल आणि सुरक्षा यासाठी सात कर्मचारी तर वसूलीसाठी तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. वसूली पथकावर उपविभागीय कार्यालयाचे नियंत्रण राहणार आहे. या भागातील बीले दर महिन्याच्या वीस तारखेनंतर येतात आणि तीस तारखेपर्यंत जवळपास ९८ ते ९९ टक्के वसूली पूर्ण केली जाते. त्यामुळे वसूली पथक केवळ वसुलीवरच लक्ष केंद्रित करणार आहे.
दरम्यान उर्वरित सात कर्मचाऱ्यांवर दुरुस्ती आणि इतर कामांचा ताण वाढणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला साप्ताहिक सुट्टी असल्याने रोजच्या कामात एक कर्मचाऱ्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होणे अवघड होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.पूर्वी सर्व कामे मिळून केली जात असल्याने कामकाज सुटसुटीत होत होते. त्यावर सहाय्यक अभियंत्यांची देखरेख होती. परंतु आता पुनर्रचनेमुळे जबाबदाऱ्या विखुरल्या गेल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
या संदर्भात आजरा येथील महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पुनर्रचनेच्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विरोध दर्शविला आहे. यावर वाटाघाटी सुरू असून लवकरच यावर तोडगा निघेल असेही ते म्हणाले.

विद्युत मीटर बदलाबाबत आजरा अन्याय निवारण समितीची अधिकाऱ्यांशी चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राहकांसोबत तहसीलदार, आजरा यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, आणि त्या बैठकीनंतरच मीटर बसविण्याची प्रक्रिया पुढे सुरू केली जाईल.
तसेच, ज्या ग्राहकांनी नवीन मीटर बसविण्यास संमती दर्शविली आहे, त्यांच्याच ठिकाणी मीटर बसविले जातील, आणि कोणावरही जबरदस्तीने मीटर बदल करण्याची सक्ती केली जाणार नाही असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, वाय.बी.चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


