बुधवार दि.१ आक्टोंबर २०२५

नगरपंचायतीसह जि.प. प्रभाग रचना याचिका फेटाळल्या..
नगरपंचायतीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेसह तालुक्यातील जिल्हा परिषद प्रभाग रचनेबाबत दाखल करण्यात आलेल्या उच्च न्यायालयातील याचिका अखेर कोल्हापूर सर्किट बेंचने निकाली काढल्या असून यामुळे निवडणुका घेण्यातील अडथळा दूर झाला आहे.
जिल्हा परिषदेचा एक मतदार संघ कमी झाल्यावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे तर नगरपंचायतीची जाहीर प्रभाग रचनाच कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाद मागण्यात आली होती. एकीकडे याचिका फेटाळण्यात आल्या तर दुसरीकडे नगरपंचायतीचा प्रभाग निहाय मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर १३ ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करून घेण्यात येईल अंतिम प्रभागणी हा याद्या २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होतील तर मी मतदान केंद्रांची यादी सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे जिल्हा परिषदेसह आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कथा टग्यांच्या…
व्यथा बांधकाम कामगारांच्या..

बांधकाम कामगार उपचाराविना…
‘बोगस’वाल्यांना मात्र उपचार घेतल्याशिवाय रहावेना
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बांधकाम कामगारांकरीता शासनाने विविध सेवा जाहीर केल्यानंतर कामगार संघटनांच्या मागणीनुसार वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निर्णय शासनाने घेतला. थंडी तापापासून ते गंभीर आजारापर्यंत बांधकाम कामगारांवर मोफत उपचार करण्याचे शासनाने धोरण अवलंबले. विशिष्ट रुग्णालयांमधून या सेवा पुरवल्या जात असताना ज्यांनी या सेवा पुरवण्याचे कंत्राट घेतले त्यांनी आपलीआणि वरची टक्केवारी ठरवून घेतली. त्यामुळे अगदी २० टक्कयांपासून ते ३५ टक्के पर्यंत बिले वाढवून जाऊ लागली.
योजनेतील त्रुटी नविन स्थापन झालेल्या . सरकारच्या लक्षात आल्यानंतर संबंधीत दवाखान्यांची देयके काही दिवसासाठी थांबवण्यात आली. त्यानंतर किरकोळ आजारावर उपचारही थांबवण्यात आले. मोठ्या व गंभीर आजारांवरच उपचार करण्याचे आदेश .शासनाकडून आले . त्यानंतर प्रशासनातील चाणक्यांनी पुन्हा . हातचलाखी करून . पुनश्च योजनेत पुर्वी प्रमाणे उपचार सुरू केले . हे पाहिल्यानंतर अशा नोंदणीकृत बोगस बांधकाम कामगारांच्या नातेवाईकांची गर्दी उपचारासाठी होताना दिसत आहे.
खरे पहाता बांधकाम कामगार एवढा सशक्त आहे की किरकोळ आजार पण कधीतरीच त्याच्या वाट्याला येतो. पण बांधकाम कामगारांव्यतिरीक्त इतरांसाठी शासनाकडून आरोग्य सेवा-सुविधांची खैरात केली जात असताना बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या या वैद्यकीय योजनांकडे अशा मंडळींचा उपचारासाठी कल का ? हा संशोधनाचा विषय आहे.
वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठीही मध्यस्थांची साखळी तयार होऊ लागली. विशिष्ट रुग्णालयातच ही गर्दी का होऊ लागली ? हाही पुढे संशोधनाचा विषय आहे. करोडोंचा निधी वैद्यकीय सेवांवर खर्च होऊ लागला आहे. पण खरोखरच इतर सेवां प्रमाणे हा निधी योग्य त्या बांधकाम कामगारांवर खर्च होत आहे का ? याची शहानिशा होणे गरजेचे आहे.

आजरा शहरात नमो उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर – नाम.प्रकाश आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्य शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात “नमो उद्यान” उभारण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील रहिवाशांना आधुनिक व आकर्षक उद्यानाचा लाभ मिळणार असून हरित परिसर आणि दर्जेदार विरंगुळ्याच्या सोयी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना उत्कृष्ट दर्जाचे उद्यान विकसित करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे. त्याअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यात यावे, यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या नमो उद्यानाला मंजुरी मिळाली आहे. या नमो उद्यानात मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, तसेच आकर्षक बागा व फवारे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे आजरा शहरातील नागरिकांना दर्जेदार उद्यान, हरित परिसर आणि विश्रांतीसाठी तसेच फिरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत. आजरा शहरातील नागरिकांसाठी हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प नक्कीच महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जागर आरतीचा थरार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील रवळनाथ मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत डोक्यावरच्या आरतीचा(जागर आरती) कार्यक्रम पार पडला. या आरतीच्या थरार पाहण्यासाठी अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती.
मंदिराचे पुजारी रोहन गुरव यांना या आरतीचा मान मिळाला. आरती प्रसंगी मंदिराची पुजारी, मानकरी यांच्यासह स्थानिक शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरती कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने प्रमाणात मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता .

नेत्यांवर निष्ठा आणि विचाराचा पाईक असणारा कार्यकर्ता म्हणजे एस.पी.
आजरा येथे एस.पी. कांबळे यांना श्रद्धांजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सद्यस्थितीत राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथी होत असून निष्ठावान कार्यकर्ते लाभणे हे दुरापास्त होत चालले आहे. आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व ‘आजरा महाल’चे उपाध्यक्ष शिवाजी पांडुरंग उर्फ एस.पी.कांबळे यांनी नेत्यांवर निष्ठा जोपासली त्याचबरोबर शेवटपर्यंत आपल्या विचारांशी ठाम राहिले. असे कार्यकर्ते यापुढे घडणे केवळ असंभव आहे अशा शब्दात मान्यवरांनी एस.पी. कांबळे यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.
व्यंकटराव हायस्कूल येथे ‘आजरा महाल’ चे अध्यक्ष माजी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी,अभिषेक शिंपी, निवृत्ती कांबळे, गोविंद गुरव, सुधीर जाधव, सुनील पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभा पार पडली.
जयवंतराव शिंपी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सुनील शिंदे,शशिकांत सावंत, निवृत्ती कांबळे यांच्यासह आजरा महालच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माणसा माणसांमध्ये फरक आहे अशी माणसे मिळणे केवळ अशक्य आहे. अनेक प्रलोभने व अमिषे असतानाही त्यांनी आपली संगत कदापिही सोडली नाही. त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे यावेळी जयवंतराव शिंपी यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी किरण कांबळे, बाबाजी नाईक, पांडुरंग लोंढे, विलास पाटील, आनंदराव कुंभार, यांच्यासह मान्यवर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

धोकादायक टॉवर थांबवा : ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
(मंदार हळवणकर )
उत्तूर (ता. आजरा) येथील सदाफुली पतसंस्थेच्या परिसरात मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू असून याला स्थानिक ग्रामस्थांकडून जोरदार विरोध दर्शविण्यात आला आहे. मोबाईल टॉवरचे किरणोत्सर्ग मानवी जीवनासाठी धोकादायक ठरून आरोग्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे काम तातडीने थांबवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या टॉवर विरोधात ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन सादर केले असून तहसीलदार, प्रांताधिकारी आजरा–भुदरगड तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनाही सह्यांचे निवेदन पाठवले आहे. याशिवाय टॉवरला विद्युत पुरवठा होऊ नये, यासाठी उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी उत्तूर शाखा एक व दोन यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने अशा धोकादायक टॉवरला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी श्री.गणपतराव यमगेकर, दादासो पाटील, परशराम कांबळे, सुधीर सावेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
बहिरेवाडीत एसटी बसेस का थांबत नाहीत? ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल : आंदोलनाचा इशारा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याच्या वेशीवरील बहिरेवाडी गावात एसटी बसेस थांबत नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली आहे. तालुक्यातील शेवटचे गाव असूनही बस थांब्याची सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय असली तरी महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उत्तूर, गडहिंग्लज, आजरा किंवा कोल्हापूरला जावे लागते. मात्र बहुतांश वेळा बस थांबत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण रुग्ण आणि इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो.उत्तूर येथील योग व निसर्गोपचार महाविद्यालय बहिरेवाडीत सुरू असून, येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तरी देखील सकाळची ९.३० ची बस वेळेत येत नाही आणि आल्यानंतर थांबेल याची खात्रीही नसते.
त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अक्षरशः बेभरवशाचा झाला आहे.या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करून बसेस थांबाव्यात आणि वेळेवर धावाव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसहित ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा बहिरेवाडीच्या सरपंच सौ. रत्नजा सावंत यांनी दिला आहे.

निधन वार्ता
नवीद फकीर

कोट गल्ली, आजरा येथील नवीद इकबाल फकीर ( वय ३४ वर्षे) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, असा परिवार आहे.
मारुती पोवार

मडीलगे ता. आजरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती सखोबा पोवार ( वय ८७ वर्षे )
यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
माळकरी व वारकरी संप्रदायातील जेष्ठ व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. गावामध्ये ते ‘आमदार ‘ या नावाने परिचित होते.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मूले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दुर्गा माता दर्शन
भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ

उपाध्यक्ष – रोहित नार्वेकर
खजिनदार – विशाल केसरकर, संभाजी नेवरेकर, किशोर यादव
मूर्ती देणगीदार – कै. जानकी नारायण पांगम यांचे स्मरणार्थ पिंटू पांगम यांचे कडून.
मराठा तरुण मंडळ गजरगाव

अध्यक्ष : लक्ष्मण पांडुरंग लांडे. उपाध्यक्ष : शंकर इंदर पाटील. सचिव : विवेक आनंदा पाटील. खजिनदार : गौतम गणपती भिऊंगडे

आज तालुक्यात…
वाघाचा चौक शारदीय नवरात्र उत्सव यांच्या वतीने पेरणोली ता. आजरा येथे भव्य खुल्या लेझीम स्पर्धा..
वेळ : सायंकाळी सहा वाजता.
आज शहरात…
छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजीनगर येथे युवा कीर्तनकार महाराज सोपान दादा कनेरकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

मातोश्री दूध संस्था व मा.बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील मातोश्री सहकारी दूध संस्था व मा.बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
यावेळी दूध संस्थेस दीड लाखांचा तर विकास सेवा संस्थेस पाच लाखांचा नफा झाल्याचे संस्थापक संभाजी पाटील यांनी सांगितले. सभेमध्ये दूध संस्थेचे अध्यक्ष रामजी लिचम, उपाध्यक्ष संजय कांबळे व विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील आणि उपाध्यक्ष शंकर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दूध संस्थेचे सचिव हणमंत पाटील व सेवा संस्थेचे सचिव जयसिंग पाटील यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले.
सभेस आनंदा कोरगावकर, बापू पारपोलकर, मुन्ना खेडेकर,इब्राहिम लाडजी, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, नारायण कांबळे, तातूअण्णा बटकडली यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेश पाटील यांनी आभार मानले.



