शनिवार दि. ६ सप्टेंबर २०२५

माजी पं. स. सभापती अल्बर्ट डिसोझा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समितीचे माजी सभापती आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सन्मित्र संस्था समूहाचे संस्थापक व तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक अल्बर्ट नातवेद डिसोझा यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी नऊ वाजता सन्मित्र पतसंस्था वाटंगी येथे वाढदिवसाचा निमित्त रक्तदान शिबिर यासह शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे.
सदर कार्यक्रमास माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत.

गणेशोत्सवातील गौरी गिते नामशेष होण्याच्या मार्गावर
गौरी गीतांची मोबाईल, लाऊडस्पीकरनी घेतली जागा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्सवात येणाऱ्या गौरी पूजनानिमित्त ग्रामीण भागात गायल्या जाणारी गौरी गिते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गौरी गीतांची जागा आता मोबाईल, लाऊडस्पीकर यांनी घेतली आहे.
गणपती उत्सवातील गौरी हा महिलांचा सण म्हणून ओळखला जातो. या सणामूळे परंपरेने महिलांचे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित केले आहे. या सणानिमित्त महिला एकत्र येऊन गौरी गिते साजरी करण्याची परंपरा आहे.
परंतु अलिकडच्या काही वर्षांत ही परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात शेतीची कामे संपत असताना दरवर्षी सण येतो. गौरीच्या निमित्ताने महिलांना गीत गायनाचे व्यासपीठ उपलब्ध होते. ग्रामीण महिला गौरी गीतामधून सांस्कृतिक परंपरा जोपासत असतात.
ही परंपरा आधुनिकरणाच्या नावाखाली लोप पावत आहे. गावातील प्रत्येक गल्लीतील एका मोठ्या घरात महिला, युवती टाळ्या वाजवत ये गं गौराबाई कुंकू लेवून जाई… आदी गिते फेर धरून गात होते. मागील दहा वर्षापर्यंत ही परंपरा होती ती आता खंडीत झाली आहे. ती नव्या पिढीने सुरू करण्याची गरज आहे.
फुगडीचाही विसर
गणपती उत्सव काळात फुगडी आणि काटवटकणा युवती व महिलांच्या कडून घातला जात होता. ही जागा आता मोबाईलने घेतली आहे. फुगडी ऐवजी मोबाईल बघण्यात महिलांचा वेळ जात आहे..
होनेवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होनेवाडी : विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, होनेवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात बी.पी. व शुगर तपासणी करण्यात आली. तसेच आभा व गोल्डन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचा उत्साहाने लाभ घेतला.
या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आजरा तालुक्यात शिक्षक दिन उत्साहात
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात

व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. जे. पी.नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एम. एम. गांगुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आपले विचार मांडले.
प्राचार्य नांगुर्डेकर यांनी डॉ. जे.पी. नाईक व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. गुरूंचे प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच गुरुर्ब्रम्हा… गुरुर्विष्णु..
गुरुर्देवो… महेश्वरा असे म्हटले जाते. आई ही प्रथम गुरू त्यानंतर आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे अनेक गुरु आपणाला भेटतात असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पी. व्ही. पाटील यांनी केले तर आभार डी.आर. पाटील यांनी मानले.
आजरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न
आजरा हायस्कूल आजरामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण तज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. जे.पी. नाईक यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा सौ. एम. एस. शेलार यांनी घेतला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. विद्या हरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती एम. एस.कांबळे यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा सत्कार सण व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर होते. सौ. बी. पी. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ. विद्या हरेर यांनी आभार मानले. यावेळी उप मुख्याध्यापिका सौ. एच.एस. कामत पर्यवेक्षक श्री. ए.आर. व्हसकोटी यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
भादवण हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

भादवण हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती व महम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सहाय्यक शिक्षक पी.एस.गुरव यांनी सांगितली.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक यांच्या कार्याची माहिती शिक्षिका बी.पी.कांबळे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद,इयत्ता नववी,दहावीचे विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.फलकलेखन पी. एस. गुरव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एम.वडर व आभार व्ही.एस.कोळी यांनी मानले.

आज बाप्पांना निरोप…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले दहा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाच्या सांगता समारंभाची वेळ जवळ आली असून आज शनिवारी बाप्पांना निरोप देण्यासाठी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत.
विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सांस्कृतिक, धार्मिक व मनोरंजनांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनाप्रणित जय शिवराय तरुण मंडळाच्या वतीने नाचणारा घोडा व नाचणारा बैल हे विशेष आकर्षण मिरवणुकीमध्ये ठेवण्यात आले असल्याचे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आजरा शहरासह तालुक्यातील विविध मंडळांनी विविध कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले आहे.

आजचा वाढदिवस



गणेश दर्शन…
जय बजरंग तरुण मंडळ (वडार समाज) गजरगांव

अध्यक्ष : जगदीश पाथरवट
उपाध्यक्ष : शेखर पाथरवट
खजिनदार : दीपक पाथरवट सेक्रेटरी : नुतन पाथरवट
प्रमुख मार्गदर्शक : नेताजी पाथरवट, हणमंत पाथरवट.
निधन वार्ता
आप्पा धडाम

चाफवडे तालुका आजरा येथील आप्पा धोंडीबा धडाम ( वय – ८१वर्षे ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले,
चाफवडे चे माजी लोकनियुक्त सरपंच विलास धडाम, ॲड. विजय धडाम, आजरा अर्बन बँक बोरिवली शाखेचे व्यवस्थापक विश्वास धडाम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुलगे, पत्नी, सुना, नातवंडे व परिवार
रक्षा विसर्जन शनिवारी दिनांक ०६ रोजी सकाळी ८.३० वाजता नविन चाफवडे येथे आहे.
तानाजी देसाई

सिरसंगी या.आजरा येथील रहिवासी ह.भ.प. तानाजी भैरु देसाई ( वय ६६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे.



