बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५

कार्डिफ येथे महाराष्ट्रीयनांचे स्वागत करताहेत सिरसंगीचे साटपे दांपत्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
युनायटेड किंगडम मधील वेल्सची राजधानी असलेल्या कार्डिफ शहरात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील शिरसंगी गावातील मारुती व साधना साटपे हे दांपत्य मारुती रेस्टॉरंट अँड ग्रोसरी हा व्यवसाय सुरू करून सर्व महाराष्ट्रीय व भारतीय लोकांचे गेले कित्येक वर्षांपासून आदरतिथ्य करत आहे.
सध्या कोल्हापूर येथे सर्किट बेंचची उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश बी. आर. गवई यांचे चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असताना. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मौजे सिरसंगी येथील मारुती शंकर साटपे लंडन येथील कार्डिफ या शहरांमध्ये घातलेल्या मारुती रेस्टॉरंट अँड ग्रोसरी या भारतीय खाद्य पद्धतीच्या आस्वाद कित्येक वेळा भारताचे न्यायमूर्ती बी आर.गवई यांनी घेतला आहे .
मारुती साटपे यांच्या रेस्टॉरंट मधून आवडीने भाकरी व वांग्याची भाजी गवई यांनी खाल्ली असल्याचे मारुती साटपे यांनी सांगितले.
शिरसंगी मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेले मारुती शंकर साटपे १५ वर्षापासून साता समुद्रपार कार्डिफ या शहरात स्वतःचे असे रेस्टॉरंट सुरू केले आहे. यामध्ये महाराष्ट्रीयन जेवण पद्धती बरोबरच भारतीय खाद्यपदार्थ व वस्तू विक्रीसाठी ठेवले आहेत. यामध्ये त्यांना पत्नी साधना व मुले साहिल व माधव हे सुद्धा मदत करतात.
भारतातून आलेले विशेष करून महाराष्ट्रातील लोकांचे ते आदरतिथ्याने स्वागत करतात.महाराष्ट्रीयन सणानिमित्त विशेष करुन रक्षाबंधन सणाला राखींचे स्टॉल, गणेश चतुर्थीनिमित्त गणेश मूर्तींचे त्याचबरोबर दीपावली निमित्त स्टॉल मांडतात, साटपे यांच्या रेस्टॉरंटला आता पर्यंत सुप्रीम कोर्ट चे सरकारी वकील श्री. तुषार मेहता क्रीडा पत्रकार सुनंदन लेले , पुण्याचे राजकीय विश्लेषक पत्रकार श्री. चिंतन थोरात भाजप विधानसभा आमदार अमित साटम महाराष्ट्र युथ काँग्रेस चे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे त्याचबरोबर मराठी कलाकार सुशांत शेलार श्री सायली संजीव यांच्यासह अनेक कलाकार यांनी सुद्धा या रेस्टॉरंटमधील महाराष्ट्रीयन जेवण पद्धतीचा आस्वाद घेतला असल्याचे मारुती साटपे यांनी सांगितले.

संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे स्त्री आरोग्याची काळजी : डॉ.रश्मी गाडगीळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्वी संयुक्त कुटुंबपध्दतीमुळे स्त्रीचे आरोग्य सहजपणे जपले जात होते. पण आज विभक्त कुटुंबपध्दतीमुळे शक्य होत नाही. स्त्री – पुरुष एकमेकांना पुरकच असतात. मात्र कर्तव्य व जबाबदारीसाठीही ते पुरक असले पाहीजेत. असे प्रतिपादन डॉ. रश्मी गाडगीळ यांनी केले.
येथील आजरा महाविद्यालयात जेन्डर सेन्सिटाईझेशन व सचेतना मंडळ यांच्यावतीने महीला आरोग्य विषयक व्याख्यान झाले. या वेळी डॉ. गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. अंजनी देशपांडे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ प्रमुख उपस्थित होते.
डॉ. गाडगीळ म्हणाल्या, मुलींनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा. याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यांनी स्वतःचे आरोग्य जपावे. डॉ. देशपांडे म्हणाल्या, मानसिक व शारीरीक आरोग्यासाठी नातेसंबंधामध्ये संवादाची गरज असते. उत्तम गृहीणी सर्वोत्तम पद असून मातृत्व हा परमानंद आहे. प्राचार्य डॉ. सादळे यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. व्ही. एम. देसाई, प्रा. आर. एस. पिळणकर, प्रा. एन. एस. पेडणेकर, प्रा.एस. आर. पारकर, प्रा. पी. एस. नार्वेकर, प्रा. एस. जी. धामणेकर, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. डॉ .लता शेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. एस. देसाई यांनी सुत्रसंचालन तर प्रा. अश्विनी पाटील यांनी आभार मानले. प्रा. श्रुती ओतारी यांनी नियोजन केले.

गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गावर वाहने नकोच
‘अन्याय निवारण’ ची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील ज्या भागातून गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींची विसर्जन व आगमन मिरवणुका निघतात त्या भागांमध्ये वाहने पार्किंग करण्यास मनाई करावी अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कुंभार गल्ली येथून ठिकठिकाणी गणेश मूर्ती नेण्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. स्थानिक नागरिक गणेश मूर्ती ने- आण करत असताना वाहनांमुळे अडथळे निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर कुंभार गल्ली ते गांधीनगर, शिवाजीनगर, लिंगायत गल्ली, सीड फार्म, चाफे गल्ली या मार्गावरील वाहने हलवावीत व तेथे दोन्ही दिवशी पार्किंग करण्यास मनाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, वाय.बी. चव्हाण, बंडोपंत चव्हाण, जोतिबा आजगेकर, संतोष ढोणुक्षे, संजय जोशी, संतोष बांदिवडेकर यांच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : किरण पाटील देऊळवाडीत खरीप हंगाम शेतीशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कृषी विभागाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेवून आर्थिक उन्नती साधावी. असे आवाहन गडहिंग्लजचे उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौजे देऊळवाडी/सातेवाडी (ता. आजरा) येथे खरीप हंगाम भात पीक शेतकरी शेतीशाळा झाली. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पाटील अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, कृषी संशोधन केंद्र राधानगरीचे प्रभारी अधिकारी डा. शैलेश कुंभार, ग्रीन रिव्होल्यूशन कोल्हापूरचे प्रोजेक्ट हेड प्रतिक पाटील प्रमुख उपस्थित होते.
उपविभागीय कृषी अधिकारी श्री पाटील यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यांत्रिकीकरण, शेततळे, फळबाग लागवड या योजनांची माहिती दिली. पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. पाटील म्हणाले, योजनांचे लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. डॉ. कुंभार प्रभारी यांनी भात पीकातील विविध रोग, तसेच रोग नियंत्रण करण्याच्या विविध उपाययोजना याबाबत माहिती दिली. ग्रीन रिव्होल्यूशन कोल्हापूरचे प्रोजेक्ट हेड श्री. पाटील यांनी भात पिकावर आढळणाऱ्या किडी, त्यांचे प्रकार, त्यांच्या अवस्था, पिकाचे नुकसान याची माहीती दिली. तसेच प्रात्यक्षिक च्या माध्यमातून ट्रॅप व ल्यूर वापरुन कीड नियंत्रण करण्याची पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना ट्रॅप व ल्युर वाटप करण्यात आले. या वेळी मंगेश पोतनीस, बंडू पाटील, सुरेश पोवार, श्री. कदम, गीता पाटील, आरती पोतनीस, सविता पोतनीस आदीसह शेतकरी उपस्थित होते. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्माचे) अमित यमगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संभाजी पोतनीस यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.

अश्विन भुजंग फाउंडेशनतर्फे घरगुती गणराया सजावट स्पर्धा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सव दिनानिमित्त आणि सजावटीची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अश्विन भुजंग फाउंडेशनतर्फे घरगुती गणराया सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹५००१/- व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ₹३००१/- व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ₹२००१/- व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सहभागासाठी प्रवेश फी केवळ ₹५१ इतकी ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आपली सजावट पर्यावरणपूरक गणेशमूर्तीशी संबंधित ठेवणे आवश्यक आहे. मोबाईलवर काढलेला सजावटीचा व्हिडिओ किमान ३० सेकंदांचा असावा. स्पर्धकांनी आपले नाव व क्रमांक व्हिडिओसोबत पाठवणे बंधनकारक आहे.व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यापुरती मर्यादित असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा : 9014915706.
निधन वार्ता
जानबा पुंडपळ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरदाळ तालुका आजरा येथील जानबा लक्ष्मण पुंडपळ ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, मुलगा,सूना, जावई, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे.
श्री गोठणदेव दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

शिरसंगी येथील श्रीगोठणदेव दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन नारायण साटपे होते.
स्वागत संतोष बुडके यांनी करून प्रास्ताविकात संस्थेने कमी कालावधीत केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी संस्था स्थापनेसाठी आर्थिक सहाय्य करणारे शिरसंगी येथील उद्योजक विश्वास साटपे यांचा संस्थेमार्फत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास साटपे यांनी मार्गदर्शन करताना सर्व उत्पादकांनी दूध व्यवसाय वाढवून आपली व आपल्या कुटुंबाची समाजाची प्रगती करून घेण्याचे आवाहन करून कमी कालावधीमध्ये संस्थेने पारदर्शक रित्या केलेल्या कारभाराचे कौतुक केले.
यावेळी चेअरमन नारायण साटपे यांनी चालू आर्थिक वर्षात एक लाख ६२ हजाराचा नफा झाल्याचे सांगितले व पुढील वर्षीपासून गणेश चतुर्थी निमित्त रिबिट वाटप केले जाईल असे आश्वासन दिले. सुरुवातीला संस्थेचे संचालक कै. विष्णू गोपाळ बोडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अहवाल वाचन सचिव महेश साटपे यांनी केले. यावेळी जयसिंग थोरवत, गोठणदेव विकास सेवा संस्थेचे व्हा चेअरमन विष्णू दळवी, विजय साठपे, पांडुरंग बुडके, भिकाजी बुडके, श्रावण गाईंगडे, राजाराम सावंत, संजय देसाई, अमर कानडे, दत्तू दळवी, सुरेश वांद्रे, विठ्ठल गाईंगडे,मारुती होडगे, सुनिता बुडके सुनंदा बुडके आशाताई निवुंगरे, मनिषा बुडके,
गिता गाईंगडे उपस्थित होते. आभार हणमंत बुडके यांनी मानले.

जरांगे-पाटलांच्या धडक मोर्चात आज-यातील मराठा समाज सहभागी होणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी २९ आँगष्टपासून मुंबई येथे सुरू होणा-या धडक मोर्चात आजरा तालुक्यातील मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण व कार्याध्यक्ष संभाजी इंजल यांनी दिली.
२९ ऑगस्ट रोजी विधानसभा मुंबई येथे धडक मोर्चा आयोजित केला आहे. त्या आंदोलनात सहभागी होणेसाठी आजरा तालुका मराठा महासंघामार्फत तालूक्यातून सर्व मराठा बांधवांना आवाहन करण्यात आले आहे. मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकत्यांनी उपस्थित रहावे.आरक्षणासाठी एकजूटीची वज्रमूठ बांधून सरकारला ताकद दाखण्याची गरज असल्याचे चव्हाण व संभाजी इंजल यांनी सांगितले.

छाया वृत्त



