शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५

घर घर तिरंगा… हर घर तिरंगा
आजऱ्यात भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्यावतीने आजरा शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेला आजरा तहसीलदार कार्यालयापासून सुरुवात झाली, या यात्रेचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये हर घर तिरंगा यासह विविध उपक्रम राबवले जात आहेत. आजरा शहरात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, तिरंगा यात्रेचे संयोजक जयवंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शालेय विद्यार्थी, युवक, महिला, माजी सैनिक, एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी सैनिक दत्तात्रय मोहिते, संभाजी सरदेसाई, सुधीर कुंभार, नाथ देसाई, समीर चांद, अनिकेत चराटी, जयवंत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, दशरथ अमृते, ज्योस्ना चराटी, सौ.संयोगिता बापट, विकास बागडी, शैलेश मुळीक, संदीप गुरव, आनंदराव कातकर, राजू दिक्षित, विजय आमृसकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संतोष चौगुले, आनंदा कांबळे, दयानंद चव्हाण, पंकज वासकर, रामजी पाटील, मनीष टोपले, अमोल पाटील, अमोल सुतार, गणपती पाटील, सचिन सटाले, गिरीश मावनूर, नदीम मुल्ला, अभिजित रांगणेकर, उमेश पारपोलकर, मंगेश तेउरवाडकर, अनिकेत देऊसकर, निखिल होडगे,सौ. शामली वाघ, सौ.माधुरी पाचवडेकर, अनिल पाटील, महेश कुरुणकर, आनंदा मोहिते, संदीप वाटवे, दीपक बल्लाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅकबॉक्स बसवण्याच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्रीय रस्ते आणि वाहतुक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी घेतलेल्या नवीन निर्णयामुळे विमानाप्रमाणे ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लंक बॉक्स बसवणे बंधनकारक केले आहे. दि. १८ जूलै २०२५ जीएसआर ४९५(ई) या मसुदेची अधिसूचना जाहिर केली. या मसुदेप्रमाणे विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक केले आहे. ब्लॅक बॉक्स हा ट्रक, चारचाकी किंवा विमानामध्ये वापरले जाते. यामध्ये (ईडीआर) इव्हेंट डेटा रेकॉर्ड असे म्हणतात. हे उपक्रम वाहनातील सर्व माहिती साठवून ठेवते. हा ब्लॅक बॉक्स नावाने जरी ब्लॅक असला तरी याचा रंग हा काळा नसून केशरी किंवा पिवळा असतो. यामध्ये मायक्रोचिप, सेन्सर, डेटा चिप असते तर काही मॉडेल मध्ये जीपीएस प्रणालीसुद्धा असते. हे उपक्रम अपघातानंतर वाहनाची हालचाल, वेग, ब्रेकिंग, इंजिनची माहिती इ. गोष्टींची नोंद करून ठेवते. विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असल्यामुळे इंजिनची स्थिती, वेग, दिशेतील बदल यासारखी माहिती मिळते. तर हे उपक्रम आता ट्रॅक्टरमध्ये बसवणे बंधनकारक केले आहे,मालवाहतुक ट्रॅक्टरमध्ये अपघात झालाच तर या ट्रॅक्टरचा वेग किती होता. ब्रेक कितीवेळ दाबला गेला. ट्रॅक्टरने दिशा अचानक का बदलली, अशा सर्व प्रश्न उत्तरे पोलिस व विमा कंपनी यांना मिळू शकणार आहेत, त्यामुळे अपघाताचे खरे कारण लक्षात येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. पण उपकरणाला बसवण्यासाठी साधारणता पन्नास हजार खर्च अपेक्षित आहे. यामध्ये ब्लॅकवॉक्स एआयएस १४० प्रमाणित जीपीएस याची किंमत ८ ते १५ हजार आहे. यामध्ये जीपीएस बसवणे १ ते २ सीमकार्डमध्ये वार्षिक रिचार्ज १२०० ते २५०० येऊ शकतो. या नंतर ब्लॅकबॉक्सची किंमत १५००० ते २५००० आहे. तो बसवण्याची मजूरी २००० ते ३००० इतकी असते. आणि ट्रॉलीसाठी कपलिंग सिस्टीम लावायची तर त्याची किंमत ५०००ते १०००० असते. या जोडणीसाठी ५०० ते १००० पर्यंत खर्च येतो. या सर्व खर्च पाहिला तर कमीतकमी ३१००० ते जास्तीत जास्त ५६००० च्या घरात जातो. सध्या शेतकऱ्यावर निर्णय लागू जरी केले नसले तरी टप्याटप्याने हे लागू केले जातील जस की जीपीएस चा निर्णय आक्टोंबर २०२७ पासून व ईडीआरचा निर्णय १ एप्रिल २०२७ पासून अमलात येईल अशी माहिती आहे. सध्या या निर्णयाचा मसूदा प्रसिद्ध केला आहे. १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती मागवल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निर्णयाच्या विरोधात असून शेतकऱ्याच्या पाठिशी ठाम उभा आहे. तरी हा निर्णय रद्द नाही केला तर शिवसेना केंद्र सरकारच्या विरोधात ट्रॅक्टर मोर्चा घेऊन याला विरोध करेल असा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, कॉ. शांताराम पाटील, सुरेश पाटील, अमित गुरव, प्रणव वंजारे, महेश पाटील, रोहित होन्याळकर, हिंदुराव कांबळे आदींच्या सह्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक – प्रा. राजा माळगी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्य चळवळ आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजा माळगी यांनी नुकतेच येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जनता एज्युकेशन सोसायटीच्या आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कै. क्रांतिसिंह नाना पाटील व्याख्यानमालेअंतर्गत साताऱ्याच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावर प्रा. माळगी बोलत होते.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अत्यंत मोलाचे योगदान असून देखील समाजाला आज त्यांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त कोठेही मोठा कार्यक्रम झालेला नाही.इंग्रजी राजसत्तेला आव्हान देताना सुमारे दीड हजार गावातील जनतेने इंग्रजी सत्तेला विरोध करून तब्बल शेहेचाळीस महिने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारला पाठिंबा दिला होता. धुळ्याचा खजिना लुटल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या लुटलेल्या खजिन्यातील पै पै चा हिशोब देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी स्वतःचे पाच हजाराचे सैन्य उभे करणारे, त्यांच्यासाठी शस्त्र प्रशिक्षण केंद्र उभे करणारे, स्वतःची स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन करणारे, सत्यशोधक समाजाच्या विचारांनी महिलांना वागवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनन्यसाधारण असे आहे. सध्याच्या स्वार्थी राजकारणाच्या प्रवाहात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असे आहे, असे प्रा. माळगी शेवटी म्हणाले.
संचालक कृष्णा येसणे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी अनेकांचे योगदान समजून घेणे आणि त्याची जाण ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रमेश चव्हाण यांनी तर विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आय. के. पाटील, प्रा. दिलीप भालेराव, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते कॉ.संपत देसाई त्याचबरोबर मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

आजऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा विशेष गौरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज येथे आज पोलिस दलातर्फे आयोजित करण्यात आलेला गणराया अवॉर्ड २०२५-२०२५ चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात अजऱ्यातील ९७ वर्ष जुने आणि शांतिप्रिय मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देते वेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाचा विविध पुरस्कारासोबत आज पर्यंत गणराया अवॉर्ड हा पुरस्कार १८ वा सन्मान प्राप्त झाला.
या वेळी कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव साहेब, आजरा, चंदगड, भुदरगड, नेसरी गडहिंग्लज या विभागातील पोलिस प्रशासन तसेच विविध गावातील पोलिस पाटील गणेश भक्त उपस्थित होते.

पंचायत समिती स्वातंत्र्य स्तंभ परिसराची स्वच्छता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंचायत समिती आजरा समोरील स्वातंत्र्य स्तंभ परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, जयवंत सुतार, संभाजीराव सरदेसाई, विकास बागडी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, संयोगिता बापट, आनंदराव कातकर, राजू दिक्षित, विजय आमृसकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संतोष चौगुले, आनंदा कांबळे, दयानंद चव्हाण, पंकज वासकर, रामजी पाटील, मनीष टोपले, अमोल पाटील, अमोल सुतार, गणपती पाटील आदी उपस्थित होते.

वेळवट्टी येथे गोकुळच्या पशुखाद्य गोदामाचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा सह. दुध संघाच्या (गोकुळ) च्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशुखाद्य गोडावून चा शुभारंभ गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक सुधिर देसाई प्रमुख उपस्थित होते. वेळवट्टी (ता. आजरा) च्या फाट्यावर हे गोडावून सुरू करण्यात आले आहे.
प्रारंभी डॉ. धनाजी राणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमात भादवणवाडी येथील महालक्ष्मी दुध संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सौ. स्वाती पाटील यांचा सत्कार गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, आजरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पशुखाद्य वेळेवर पोहोचले जात नव्हते, ब-याच संस्थांच्या तक्रारी येत होत्या. संघाकडून मोठ्या ट्रकने पशुखाद्य पुरविले जाते. छोटया छोटया वाडीवस्त्यांवर या कामाला अडथळा येतो. वेळेवर पशुखाद्य पोहोचत नाहीत त्यामुळे संस्थांची व दुध उत्पादक शेतक-यांची होणारी अडचण लक्षण घेवून छोटया गाडीने त्यांना वेळेवर पशुखाद्य पुरविण्याच्या दृष्टीने आज-यामध्ये गोडावून सुरू करण्यात आले आहे. यामुळे संस्थांना नियमित व वेळेवर पशुखाद्याचा पुरवठा होईल असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी बोलताना सुधिर देसाई म्हणाले, आज-याचा पश्चिम भाग हा डोंगराळ व दुर्गम आहे. येथे पशुखाद्य वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे येथील संस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेवून रेडेकर मॅडमनी हे केंद्र सुरू केल्याबद्दल आभार मानले.
आभार सिध्दार्थ तेजम यांनी मांडले. या कार्यक्रमाला लहु पाटील, किरण पाटील, गीता उत्तुरकर, विष्णू पाटील, अशोक पाटील, उदय झित्रे, नागोजी तानवडे, अशोक बोलके, वर्षा होडगे, उज्वला पोतनीस, प्रणिती पाटील यांच्यासह पश्चिम विभागातील विविध दुध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुळेरानचे सरपंच श्री. शशिकांत कांबळे यांच्या वतीने सरपंच मानधन रक्कमेतून शाळेतील विध्यार्थ्यांना स्वेटर वाटप कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सुळेरान येथे ध्वजवंदन झाले नंतर सरपंच श्री. शशिकांत बाळकू कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपून वि.म. सुळेरान, वि.म. धनगरमोळा व वि.म. घाटकरवाडी येथील सर्व विध्यार्थ्यांना आपल्या सरपंच मानधनाच्या रक्कमेतून ३५ स्वेटर वाटप केली. सध्या पावसाळी थंडीमुळे सदर स्वेटर घेताना विध्यार्थी व पालक, ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी सुळेरान मुख्याध्यापिका सावंत , धनगरमोळा मुख्याध्यापिका कोंडुसकर व घाटकरवाडी मुख्याध्यापक परीट गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, उपसरपंच जयश्री जयसिंग पाटील, सदस्य मायकल बारदेस्कर व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष दिपक पाटकर, वन कमिटी अध्यक्ष तानाजी जाधव, माजी सदस्य सुरेश पाटील, जयसिंग पाटील, माजी सदस्य दिलीप खरुडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष गंगाराम मेगुलकर, माजी पोलीस पाटील शिवाजी पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुर्यकांत जाधव व ग्रा.प. कर्मचारी बावतीस बारदेस्कर चंद्रकांत खरुडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच याच कार्यक्रमामध्ये वि.म. सुळेरान शाळेसाठी हेल्पिंग हँड्स युथ सर्कल या संस्थेमार्फत विध्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य सौरभ पाटील, प्रथमेश गाईगंडे व राजेश पाटील यांच्या मार्फत प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायत अधिकारी सुर्यकांत जाधव यांनी केले. या प्रसंगी ग्रामस्थ व कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केली.

निधन वार्ता
रामचंद्र पाटील

आजरा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी व्हॉईस चेअरमन, कानोली गावचे माजी पोलिस पाटील रामचंद्र बैजू पाटील (वय ८१ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,चार मुली, सून, नात असा परिवार आहे.
शासकीय ध्वजारोहण…

हस्ते:-
समीर माने, तहसिलदार,आजरा
वेळ :-
सकाळी ९.०५ वाजता
थोडक्यात पण महत्त्वाचे…
♦ आज पासून अव्यावसायिक /खाजगी कार,जीप, व्हॅन यासारख्या वाहनांकरिता टोल शुल्क बचतीच्या पार्श्वभूमीवर फास्टॅग पास सुविधा सुरू करण्यात आली असून ३ हजार रुपयांच्या पास मध्ये एक वर्षाच्या कालावधीत २०० फेऱ्या मारता येणार आहेत.
♦ वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याकरीता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


