मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५


अहो आश्चर्यम्…
सकाळी सातच्या आत पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मे महीन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे घाटकरवाडीसह चार गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामधे पाणी साचल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी ऊस पिक कुजलेले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने आर्थिक हानी होणार आहे. त्यामुळे या भागातील पिकांचे पंचनामे करावेत व त्याचा अहवाल तातडीने प्रशासनाला द्यावा अशी सुचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने मंत्रिमहोदयांनी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा अशी मागणी केल्याने सोमवारी सकाळी सात वाजण्यापूर्वीच मंत्रिमहोदयांचा ताफा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर हजर झाला व मंत्री आबिटकर यांनी पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महसुल, कृषीसह अन्य अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली.
तहसीलदार समीर माने, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे दौऱ्यात सहभागी झाले होते.
दीर्घकाळ पडलेल्या पावसामुळे भात, भुईमुग, ऊस, नागली या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिक कुजली आहेत. या पिकांवर तांबेरा रोग, कडा करपा पडला आहे. याची पहाणी मंत्री आबिटकर यांनी केली. याबाबत तहसीलदार श्री. माने, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांच्याशी चर्चा केली.
शेतकरी गोविंद पाटील, सुरेश पाटील, जयवंत पाटील, गंगाराम डेळेकर, तानाजी जाधव यांनी मंत्री आबिटकरांच्या समोर शेतीमधील अडचणी मांडल्या. येथील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबरोबर वीज व कर सवलत मिळावी अशी मागणी केली. आबिटकर यांनी तातडीने शेती नुकसानीचे पंचनाम करण्याची सुचना केली. सुळेरानचे सरपंच शशिकांत कांबळे, किटवडेचे सरपंच लहू वाकर, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, प्रदीप माळी, पी. जी. पाटील, स्वामीनी दातीर, मधुकर पाटील, मायकेल बार्देस्कर, शिवाजी पाटील, प्रविण मटकर, बजरंग पाटील, विजय थोरवत, राजेंद्र सावंत, रणजित सरदेसाई, इंद्रजीत देसाई, संतोष भाटले, विष्णु पाटील, रामचंद्र मटकर, संग्राम पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे…
कृषी शास्त्रज्ञांना घेवून या परिसराचा दौरा करावा. पर्यायी पिक पध्दतीबाबत त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. अशी सुचनाही या वेळी मंत्री आबिटकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना केली.
वनताराने आमच्या येथील हत्तींना घेवून जावे…
नांदणी मठात भक्तीभावाने पस्तीस वर्ष सांभाळलेल्या हतीला नेण्यापेक्षा आजरा परिसरात गेली वीसवर्ष धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तीना घेवून जावे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. अशी मागणी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. हत्तीबाबत ठोस उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी अबूताहेर तकिलदार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्था मर्यादित सावरवाडी ची निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थेच्या अध्यक्षपदी अबूताहेर तकिलदार यांची तर उपाध्यक्षपदी इब्राहिम युसुफ नसरदी यांची निवड करण्यात आली आहे. जे.एन. बंडगर हे निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी होते.
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे…
कुदरत आदम लतीफ, युसुफ सुलेमान खेडेकर, बशीर अल्लाउद्दीन तकीलदार, बाबू इब्राहिम लतीफ, बशीरअहंमद नजबुद्दीन लतीफ, इब्राहिम युसुफ नसरदी, नियाज मुनाफ तकीलदार, रजिया इस्माईल तकीलदार, ताई संजय शिंगटे, प्रकाश दादू कांबळे
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष तकीलदार यांनी सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संस्थेचे कामकाज सुरू राहील. संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्यासह सभासद वाढ करून संस्था लाभांश देण्यात इतपत प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सचिव झाकीर आगलावे, मुख्तार तकीलदार, कय्यूम बुड्डेखान ,रेहान तकिलदार उपस्थित होते.

कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा
मनसेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समिती मधील अनेक अधिकारी हे अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे अनेक शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. अनेक वेळा शासकीय निर्णयाला राजकीय रंग देऊन प्रकरणे दबावाखाली दाबली जात आहेत. अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे राजकीय लोकांशी लागेबांधे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दाद दिली जात नाही. यामुळे सामान्य नागरिकांची अवहेलना होत आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे अशा सर्वांची तातडीने बदली करावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी लेखी निवेदनही देण्यात आले असून निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, उपाध्यक्ष ॲड. सुशांत पोवार, संतोष शिवगंड यांच्या सह्या आहेत.

उत्तूर व्यापारी असोसिएशनची विशेष बैठक संपन्न.
व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

उत्तूर : मंदार हळवणकर
उत्तूर येथे व्यापारी असोसिएशनची बैठक नुकतीच हनुमान मंदिर सभागृहात संपन्न झाली. या बैठकीस १६९ व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
प्रवीण लोकरे यांनी प्रास्ताविकपर भाषणात बैठकीमागील हेतू स्पष्ट केला.
व्यापाऱ्यांसमोरील विविध समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः गावातील फूटपाथवरील गाड्यांमुळे होणारे अडथळे, पार्किंगची समस्या, बाजारपेठेतील स्वच्छता, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी स्थायी केंद्र स्थापन करणे, औद्योगिक उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा वाढविणे तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी नवे मार्ग शोधण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी शिरीष ठाकूर, पराग देशमाने अरविंद पवार, सागर गंगापुरे,सागर येसादे, बसवराज करंबळी, विठ्ठल उत्तूरकर, धोंडीराम सावंत, भास्कर भाईगडे, राजू बागवान, नारायण खटावकर, विजय काटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी व्यापाऱ्यांनी संघटीतपणे काम करून गाव विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उत्तूर व्यापारी असोसिएशन मार्फत भविष्यात व्यापाऱ्यांच्या हिता सोबतच गावाच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीचे नियोजन वैभव गुरव, विपुल आजगेकर , सौरभ वेसनेकर,विकी काटे, प्रवीण स्वामी, अभिजीत रणवरे, संग्राम घोडके,विशाल सावंत यांनी केले.
आभार सुहास पोतदार यांनी मानले.

शावेर रॉड्रिग्ज यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिजामाता कॉलनी, आजरा येथील जनता बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी शावेर फिलिप्स रॉड्रिग्ज यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे रात्री दोन वाजता निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६४ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे. आजरा येथे दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पेरणोलीत तरूणाच्या निधनाने हळहळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील मच्छिंद्र नारायण कालेकर (वय ४२ वर्षे ) या भूमिहीन तरूणाचे आकस्मिक निधन झाल्याने पेरणोलीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
केवळ म्हैशीच्या जिवावर गुजराण करणा-या कालेकर यांच्या पोटात दुखत असल्याने खासगी दवाखान्यात दाखल केले. पुढील उपचारासाठी आर्थिक विवंचनेमुळे शासकीय दवाखान्यात दाखल केले. रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे.

आदर्श पोलीस पाटील पुंडलिक फडके यांचा गौरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हांदेवाडी ता. आजरा येथील श्री. पुंडलिक बाबू फडके यांचा प्रशासकीय कामांमध्ये उल्लेखनीय काम केले बाबत महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागातर्फे उपविभागीय अधिकारी हरीश सूळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या उपस्थितीत तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी /तलाठी व सर्व पोलीस पाटील, डॉ .अशोक सादळे, योगेश पाटील उपस्थित होते.
चिखलातून न्हावून गेले बालगोपाळ
‘नव कृष्णा’ परिवाराचा उपक्रम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता. आजरा) येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये श्रावण मासानिमित्त चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. चिखल हा बालकांच्या नैसर्गिक विकासाचा महत्त्वाचा घटक असून, मुलांना मातीचा अनुभव देणे आवश्यक असल्याचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांनी सांगितले. चिखलामुळे विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूला चालना मिळते आणि सर्जनशीलतेचा विकास होतो. यामुळे गेली अनेक वर्षे शाळेत चिखल महोत्सव साजरा केला जातो.
यंदा विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपक्रमाचे आयोजन विशाल वडवळे, सुखदेव चव्हाण, प्रिया राजाराम, प्रतिभा सुतार, संध्या मोरबाळे व विद्या शिवणे यांनी केले. मुलांनी चिखलात मनसोक्त खेळत आनंद लुटला. परिसर मातीमय झाल्याने वेगळाच उत्साह पहायला मिळाला. पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.

भाविकांच्या गर्दीने फुलला रामतीर्थ परिसर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रावण सोमवारचे औचित्य साधून काल सोमवारी आजरा शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी रामतीर्थ परिसरात विक्रमी संख्येने उपस्थिती दाखवल्याने परिसर गजबजून गेला होता.
भाविकांनी राम मंदिरासह येथील महादेव मंदिराला भेट दिली. याचबरोबर दिवसभर पावसाची उघडीप असल्याने धबधब्यासह निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला.
महादेव मंदिरामध्ये प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

छाया वृत्त…

हालेवाडी फाट्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला चार चाकने जोरदार धडक दिल्याने चार चाकी वाहनाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून दोन्ही गाड्या रस्त्या शेजारील शेत जमिनीमध्ये जाऊन पडल्या. यामध्ये हालेवाडी व पंढरपूर येथील दोघेजण जखमी झाले आहेत.
निवड…

सातेवाडी ता. आजरा येथील आदिनाथ गोविंद पोतनीस याची भारतीय नौदलामध्ये निवड झाली आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


