शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५


सुलगाव येथे तरुणाचा आकस्मिक मृत्यू
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुलगाव ता. आजरा येथील शिवप्रसाद सदाशिव खवरे या ३० वर्षीय अविवाहित तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. आजरा आगाराचे सेवानिवृत्त चालक सदाशिव खवरे यांचा तो मुलगा होता.
शिवप्रसाद याच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधात आजऱ्यात मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमचा विकासाला विरोध नाही पण सरकारने गरज नसताना भावनिकतेची झालर देऊन शक्तिपीठ मार्ग करण्याचा घाट घातला आहे. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि १२ रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.
सुरुवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की १२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक ही आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आहे. लढ्याचे नियोजन करण्यासाठी आहे.
शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर म्हणाले की हा रस्ता जरी देवाचे नाव घेऊन होत असला तरी तो केवळ अदानीसाठी होत आहे. अदानीची खनिजे गडचिरोलीहुन गोवा मार्गे परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना बळी दिले जात आहे. त्यामुळं आमचा या महामार्गाला विरोध आहे.
बळीराजा संघटनेचे नितीन पाटील म्हणाले की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे ते आपण सगळे मिळून करू. त्यासाठी गाववार बैठकांचे आयोजन करावे लागेल.
शिवसेनेचे युवराज पोवार म्हणाले की लोकांना सत्ताधारी आमदार निधी मिळणार नाही अशी धमकी देत आहे, लोकांना आपण शक्तीपीठचा धोका समजावून सांगितला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात मुकुंददादा देसाई म्हणाले की आजरा तालुक्यात अनेक प्रकल्प झाले त्यातील विस्थापितांचे अजून पुनर्वसन झालेले नाही, असे असताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या डोक्यावर का मारला जात आहे. या महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करूया.
यावेळी तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले, बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सुरवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील, संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटील यांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवर हजेरी लावणार…
दि १८ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चाला आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि मा. आ. राजेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

विविध प्रश्नांच्या संदर्भाने मंत्रिमंडळ उप समिती नेमण्याची मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अधिनियम २०२४ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्याबाबत उच्च न्यायालयाला निर्देश दिलेले आहे. ही सुनावणी १८ जुलैपासून सुरू झालेली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या शनिवारी पूर्ण दिवस अशी सुनावणी होणार आहे. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण हे विरोधी याचिकाकर्त्यांनी आव्हानित केलेले असून सन २०२४ चा अधिनियमास आव्हानित केलेले आहे. याबाबत शासन स्तरावरून सदर याचीकेची सुनावणी बाबत समन्वय ठेवण्यासाठी व याबाबत ज्या काही अडचणी, आढावा, समस्या, डाटा संकलन माहिती आवश्यक असते त्यासाठी शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ उपसमिती नेमली नसल्याने आता सदर केसकडे कोणाचेही गांभीर्याने लक्ष नाही. सामान्य प्रशासन विभागातील एक अधिकारी फक्त उच्च न्यायालयात हजर राहत आहे. शैक्षणिक प्रवेशासह अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. विविध खात्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हे सर्व विषय हाताळणारी मंत्रिमंडळ उप समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर मारुती मोरे, प्रकाश देसाई, शंकराव शिंदे, बंडोपंत चव्हाण, चंद्रकांत देसाई,सौ. मीनल इंजल,सौ. भैरवी सावंत,अशोक बाचुळकर,रवींद्र आजगेकर,एकनाथ कासार,दत्तात्रय मोहिते, शिवाजीराव पाटील आदींच्या सह्या आहेत.

आजरा आगाराच्या कारभाराबाबत बैठक लावा
मनसेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व तालुका वासियांना तालुक्यात येण्यासाठी प्रसंगी चालत प्रवास करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा बस ठीक- ठिकाणच्या थांब्यावर थांबवल्या जात नाहीत. यासह आगाराबाबत असणाऱ्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आगारप्रमुखांसह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले तालुकाध्यक्ष आनंद घंटे जिल्हा उपाध्यक्ष सरिता सावंत आदींच्या सह्या आहेत.

जनता शिक्षण संस्था सेवक पतसंस्था अध्यक्षपदी मनोजकुमार पाटील, उपाध्यक्षपदी सौ. वैजयंता अडकूरकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील जनता शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री मनोज कुमार सदाशिव पाटील तर उपाध्यक्षपदी सौ वैजयंता हंबीरराव अडकुरकर यांची प्रमोद फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संजय सावंत, दिलीप संकपाळ, विजय पोतदार, तानाजी पाटील यांच्या सर्व संचालक व व्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.

नरसिंह दुध संस्था पोश्रातवाडीत दुंरगी लढत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोश्रातवाडी ता. आजरा येथील नरसिंह दुध संस्थेची सन २०२५-३० ची निवडणूकीकरीति रविवार दि.३ आँगष्ट रोजी मतदान होत असून सत्ताधारी श्री रवळनाथ नरसिंह स्वाभिमानी आघाडी च्या वतीने सर्व साधारण गटात उमेदवार म्हणून गोविंद नारळकर, संभाजी दत्तू नारळकर, अरूण पाटील, सुरेश पाटिल, संभाजी राजाराम हे असून सहावा उमेदवार ही आघाडी देऊ शकली नाही. तसेच महिला राखीव मध्ये कल्पना कनुकले, शशिकला शिंदे भटक्या विमुक्त जाती मधून नामदेव पाटील असे उमेदवार असून याचे नेतृत्व तालुका संघाचे संचालक जयराम संकपाळ व तानाजी राजाराम करीत आहेत.
तर विरोधात रवळनाथ नरसिंह परिवर्तन विकास आघाडी सर्व साधारण उमेदवार नानासो चौरे, मनोहर नाईक, संभाजी संतू नारळकर, मारूती पाटील, विष्णू राजाराम, शिवाजी शिंदे हे सहा उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. महिला राखीव मध्ये रेणूका पाटील, शंकूतला शिंदे भटक्या विमुक्त जाती मधून मनोहर पाटील हे उमेदवार आहेत. या आघाडीचे नेतृत्व नागोजी पाटील व विजय अमृस्कर करीत आहेत.

महामानवांना अभिवादन
महापुरुषांच्या कार्यांचे स्मरण करणे काळाची गरज – प्रा. आनंद बल्लाळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महापुरुषांच्या कार्यांचे स्मरण करणे आज काळाची गरज आहे, असे मत प्रा. आनंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रा. बल्लाळ बोलत होते.
यावेळी प्रा. बल्लाळ पुढे म्हणाले की, सध्या जात, धर्म, पंथ याच्या नावावर महापुरुषांची विभागणी करणे, त्यांच्या विचारांचे विद्रुपीकरण करणे मोठ्या प्रमाणात सुरू़ आहे. अशा वेळी महापुरुषांचे कार्य समजून घेऊन त्यांचे विचार आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळकांचे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णा भाऊ साठे यांचे योगदान समजून घेणे खूप गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन, प्रा. रत्नदीप पवार आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे व स्वामी प्रभुधर यांना रोझरी शाळेत अभिवादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”.अशी क्रांतिकारी घोषणा देऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड करून आपल्या जहालवादी विचारांनी क्रांती जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ कु.साईराज वाळके याने एकपात्री प्रयोगाने जीवनपट उलगडला,कुमारी आदिती सुतार हिने विद्यार्थी मनोगत तर सौ. निशांत चांद यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा आणि स्वातंत्र प्राप्तीतील योगदान स्पष्ट केले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील व सामाजिक कार्याचा आढावा विविध दाखल्या सहित श्री. विजय केसरकर यांनी विविध संदर्भ साहित्याचा परिचय करून देऊन लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील प्रेरक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगून महात्म्याना अभिवादन केले.
कर्मवीर स्वामी प्रभुधर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक ,धार्मिक तसेच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासास झपाटून घेऊन कसे कार्य केले याचे कार्याचा गौरव व संघर्ष याचा परिचय श्री. मनवेल बार्देस्कर व फादर अँथोनी डिसोझा यांनी त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा आदर्श प्रत्येकानी स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक श्री. डॉमिनिक डिसोझा आदी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन उत्सव समिती सदस्य सौ.शैलजा कांबळे व श्री.आशिष फर्नांडिस यांनी केले .
व्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
रिया अरविंद देशमुख ,शिमरन भिकाजी पाटील व अदिती अशोक नरके यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. एस. वाय. भोये यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदानाची माहिती दिली.श्री. व्ही. टी. कांबळे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचेविषयी माहिती दिली. लेखनातील अतुलनीय कामगिरीतून रशियामध्ये त्यांचा पुतळाही उभारला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी असणारे अण्णाभाऊ हे लावणीकार, छक्कडकार, शाहीर, लेखक, कथा- कादंबरीकार, नाट्यकार, अभिनेते, वादक, संगीतकार म्हणून संपूर्ण देशभर सुप्रसिद्ध आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव भगवान पाटील व शलाका ओंकार गिरी यांनी केले. व आभार प्रेम रमेश येसणे यांनी मानले.


