mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार दि.६ जून २०२५       

कोशिश करने वालों की हार नही होती…
अखेर ‘ती ‘ झाडे जगवलीच

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा परिसरात बेसुमार झालेली वृक्षतोड व पर्यावरणाची हानी न सोसवून गेल्या वर्षी आजरा वृक्षप्रेमी गटाने एकूण ३३० झाडे लावली. यामध्ये सयाजी शिंदे यांच्या देवराईकडून ८० दुर्मिळ प्रजातीचे रोपं उपलब्ध झाली. ३३० मध्ये जवळपास १०० वटवृक्ष आहेत. या वृक्षांचे रोपण करून वर्षभर त्यांची देखभाल करून वाढवली, जगवली.

       एप्रिल महिन्याच्या अखेरीस कुण्या
समाजकंटकाने आग लावून सदर परिसर बेचिराख केला. यात वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण वृक्षप्रेमी समूह निराश न होता परत नव्यानं उभारी घेऊन कामाला लागला. वेळेवर पाणी व खते देवून जवळपास ९०% झाडं जगवली आहेत.

      याच परिसरात या वर्षी नागकेशर, त्रिफळा, कोकम, चिंच, नरक्या, आवळा, सप्तरंगी, दालचिनी, बिजा, मोहा, कडुनिंब, शिकेकाई, बिब्बा, उंबर, वड आदि रोपांची लागवड केली आहे. त्याचबरोबर दुर्मिळ प्रजातातील म्हाळुंगीचं रोप उपलब्ध करून त्याचेही रोपण केले आहे. श्री व सौ बटकडली दाम्पत्यानं हे रोप उपलब्ध करुन दिले.

      सदरचे वृक्षारोपणाचे काम वृक्षप्रेमी समूहाने करून खऱ्या अर्थानं पर्यावरण दिन साजरा केला.

      या कामासाठी सी. आर देसाई, सुभाष विभुते, डाॅ. गौरी भोसले, पुष्पलता घोळसे, सारिका बटकडली, सुचेता गड्डी, दशरथ सोनुले, विलास पोवार, अनिल नाईक, दिनेश कुरूणकर, संजय माने, महानंदा कोडक, जयश्री देसाई, सौ. व श्री. शेखर बटकडली याचबरोबर वनाधिकारी तानाजी लटके उपस्थित होते. त्याचबरोबर बंडा कुंभार-हात्तिवडे यांनी मशिनद्वारे मोफत खड्डे खणून दिले.

     बी-बियाणे व खते प्रमाणित असलेबाबतची खात्री करण्याची आजरा तालुका शिवसेनेची मागणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका प्रशासनाने खरीप हंगामातील बी-बियाणे व खते प्रमाणित असलेबाबतची खात्री करून आजरा तालुक्यातील कृषी सेवा दुकानदारांना विक्री करणेस परवानगी देण्याची मागणी आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.

      दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम चालू झाला असून, आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग बी-बियाणे व औषधे खरेदी करणेसाठी कृषी सेवा केंद्रावरती जात आहेत. बऱ्याच ठिकाणी यापूर्वी शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी करतेवेळी फसवणूक झाली आहे. त्याच बरोबर खते खरेदी करतेवेळी पण फसवणूक झाली आहे. काही दुकानदार शेतकऱ्यांना खतावरती लिंकिंग खते, अप्रमाणित असलेले बी-बियाणे मोठ्या प्रमाणात वारेमाप पैसे घेऊन मुक्त विक्री करत असलेबाबत शेतकरी वर्गातून आमच्या कार्यालयाकडे माहिती आलेली आहे. सदर बाब गंभीर असून आजरा तालुका प्रशासनाने कृषी विभाग आजरा व कृषी विभाग पंचायत समिती यांचे सोबत संयुक्तरित्या बैठक घेऊन तपासणी कामी भरारी पथक तयार करून शेतक-यांना प्रमाणित असलेली बि-बियाणे व खते योग्य दरात उपलब्ध करून देणेबाबत सूचित करावे. व जे कोणी भेसळ बि-बियाणे करतील व खतांवर लिंकिंग करतील त्यांच्या वरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

      निवेदनावर आजरा तालुका प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, साळगावचे सरपंच धनंजय पाटील, इंद्रजित देसाई, रणजित सरदेसाई, विजय कोंडूसकर, मंदार बिरजे, सुनील दिवेकर, युवराज पाटील, श्रीकांत कळेकर, सुशांत बुरुड यांच्या सह्या आहेत.

आजरा तालुका पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी राजाराम पोतनीस

उपाध्यक्षपदी राजश्री खोराटे

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी राजाराम पोतनीस यांची तर उपाध्यक्षपदी राजश्री वसंतराव खोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने पदाधिकारी निवडही बिनविरोध करण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे. एन. बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या फेडरेशनच्या नवनिवार्चित संचालक समेत या निवडी करण्यात आल्या

      अध्यक्षपदासाठी पोतनीस यांचे नाव आनंदा कुंभार यांनी सुचविले त्यास सुनील पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदी खोराटे यांचे नाव अल्बर्ट डिसोझा यांनी सुचविले त्यास अशोक तांबेकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी आजरा कारखान्याचे माजी चेअरमन डिसोझा यांनी फेडरेशनच्या वाटचालीचा आढावा घेतला. मावळते चेअरमन आनंदा कुंभार यांनी पतसंस्था फेडरेशन समोरील अडचणी व उपाय याबाबत मार्गदर्शन केले.

      यावेळी संचालक भिवा जाधव, पांडूरंग ढवळे, रमेश कांबळे, माजी वसुली अधिकारी निवृत्ती कोलते आदि उपस्थित होते. सचिव दिनकर शिंदे यांनी आभार मानले.

पाऊस मे मध्येच येऊन गेला…
फणसांचा हंगाम लांबला

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सलग आठ दिवस मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच जोरदार हजेरी लावल्याने यावर्षी आंबा, काजू, करवंदे असा रानमेवा खाण्यावर मर्यादा आल्या होत्या. परंतु पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा हंगाम सुरू झाला असून विशेषता फणसाचा हंगाम नव्याने सुरू झाला आहे.

       जोरदार पावसामुळे आंबा, फणस झाडांवर निसरटीमुळे फळे उतरून घेणे अडचणी झाले होते. गेले चार दिवस पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने आंबा व फणस उतरवण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी बाजारपेठेत व संकेश्वर- बांदा मार्गावर शहरालगत ठीक ठिकाणी फणस विक्रेते दिसू लागले आहेत.

     कोकणातील चाकरमानी पुन्हा कोल्हापूर मुंबईच्या दिशेने परतताना मित्र परिवारास गावाकडची भेट म्हणून देण्यासाठी प्राधान्याने फणस खरेदी करताना दिसत आहे.

निधन वार्ता

गुंडू खोराटे

           जरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      खोराटवाडी ता.आजरा येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गुंडू तयाप्पा खोराटे ( वय ९४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुले, एक मुलगी, सूना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

        व्यंकटराव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश खोराटे यांचे ते वडील होत.

निधन वार्ता 
गणपती भिंऊगडे

          उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      मुमेवाडी ता आजरा येथील माजी केंद्र प्रमुख गणपती सिद्धू भिंऊगडे ( वय ७५ वर्षे ) यांचे  निधन झाले .

     त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे .

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींचा सविस्तर निकाल

mrityunjay mahanews
error: Content is protected !!