मंगळवार दिनांक २० मे २०२५


लोका सांगे ब्रह्मज्ञान…
महाराज तुम्ही सुद्धा…?
…ज्योतिप्रसाद सावंत
एकेकाळचा पोलीस मित्र, गावचा उपसरपंच, कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक कार्यकर्ता, आचारी अशी विविध रूपे धारण करून समाजात मिरवणाऱ्या मडीलगे येथील श्री.सुशांत गुरव उर्फ ह. भ. सुशांत महाराज याची चक्क थंड डोक्याने पत्नीचा खून करण्यापर्यंत गेलेली मजल त्याच्या संपर्कातील सर्वांचे डोके सुन्न करणारी ठरली आहे.
सुशांतचे कुटुंब तसे कोणाच्याही अध्यामध्यात नसणारे, धार्मिक प्रवृत्तीचे कुटुंब. आई-वडिलांचा जेवण बनवण्यात हातखंडा. आयटीआय झाल्यानंतर नोकरीत न रमलेल्या सुशांतने आई-वडिलांचे बोट धरून कॅटरिंग व्यवसायात बस्थान बसवले. वडिलांच्या पश्चात पत्नी पूजा व आईची असणारी साथ या व्यवसायात त्याला पुढे नेण्यात मदतीला आली. उत्कृष्ट आचारी म्हणून काम करत असताना तो नकळतपणे वारकरी संप्रदायाकडे वळला. थोडासा वादग्रस्त असणारा सुशांत ग्रामस्थांच्या दृष्टीने भक्ती मार्गाला लागला.
दरम्यान लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झालेल्या सोपान व मुक्ता या दोन जुळ्या भावंडांनी गुरव यांच्या घरचे वातावरण बदलून टाकले. एकाच वेळी दोन मुलांच्या आगमनाने गुरव कुटुंबीय सुखावले. दणक्यात बारशाचा कार्यक्रम पार पडला. सर्वत्र आनंदी आनंद असताना अचानकपणे सुशांतच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. वडिलांचा आधार गेल्यानंतर आईला झालेला कर्करोग व तिच्या उपचाराकरता येणारा खर्च, सोरायसिसने त्रस्त असणाऱ्या सुशांतचा स्वभाव बदलण्यास कारणीभूत ठरू लागला. थोडासा चैनीखोर स्वभाव व कुटुंबातील आजारपणामुळे वाढलेला खर्च यामुळे हळूहळू सुशांत कर्जबाजारी होत गेला. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न बसल्याने पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. कर्जबाजारीपणा व वाढत्या खर्चामुळे त्याने पत्नीकडे तिच्या अंगावरील दागिन्यांची मागणी सुरू केली. पुन्हा या मुद्द्यावरून वादाचा भडका उडत गेला. धार्मिक प्रवृत्तीच्या सुशांतने टोकाचा निर्णय घेऊन पत्नीला संपवण्याचा घाट घातला. अतिशय थंड डोक्याने तिचा खून करून घरावर दरोडा पडला. सोने चोरीला गेले व त्यातच पत्नीलाही दरोडेखोराने ठार केले असा कांगावा केला.

घटना घडल्यापासून पोलीस यंत्रणा सुशांत वर लक्ष केंद्रित करून होती. त्याचे विसंगत बोलणे, सुशांतने दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने पत्नीला मारल्याचे सांगणे व प्रत्यक्षात रॉडऐवजी इतर धारदार हत्याराचे आढळलेले वार, घडलेली घटना, न आढळणारे पुरावे, चोरीला न गेलेले सोने, घटनास्थळी संशयास्पद रीतीत आढळलेल्या काही गोष्टी याला जबाबदार होत्या. ग्रामस्थांकडूनही सुशांतबद्दल संशय व्यक्त केला जात होता. अखेर पोलीस चौकशीत केल्या कृत्याच्या पश्चातापाने सुशांतमधील दोन मुलांचा बाप, एका संसारी बायकोचा पती व कोणताही दोष नसणाऱ्या एका सज्जन स्वरूपाच्या आईचा मुलगा जागा झाला. झाल्या कृत्याची कबूली दिली. पण वेळ निघून गेल्यानंतर ही कबूली स्वतःचे कुटुंब स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करणाऱ्या एका ‘वाल्या’ ची कबुली ठरली. वेळ निघून गेली.’ महाराज तुम्ही सुद्धा…” असे म्हणण्याची वेळ आता तालुकावासियांवर आली आहे.
सुशांतरुपी वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे हा गावक-यांचा भ्रम शेवटी भ्रमच ठरला…
अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास संकेश्वर बांदा महामार्ग वरील वेळवट्टी फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गवा ठार झाल्याची घटना घडली आहे.
रस्ता ओलांडताना गव्याला अवजड अज्ञात वाहनाची धडक बसली असल्याचा अंदाज आहे.

देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून आरोग्य प्रकल्प शिबीर….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आशियाई विकास बैंक अर्थसहाय्य योजनेतुन – अंतर्गत ईपीसी ५३ गारगोटी ते आजरा रस्ते सुधारणा प्रकल्प कार्यालय सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग कोल्हापूर व देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट्स (रं) प्रा. लि. पुणे या कंपनीच्या वत्तीने पेरणोली येथे नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आहे. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक श्रीशैल मलकुड, गणेश पवार, कार्यकारी अभियंता बी. एल हजारे, शाखा अभियंता इंगवले, आश्विन कचरे, कनिष्ठ अभियंता सागर कुंभार, संतोष पाटील, रेसिडर आभियंता रेड्डी, वैदयकिय अधिकारी अमोल कांबळे, जान्हवी चव्हाण, वृशाली केळकर व त्यांची टीम व देसाई इन्फ्रा कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पेरणोलीच्या सरपंच प्रियांकाताई संतोष जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच अमर पवार, कृष्णा वरेकर, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प व्यवस्थापक श्रीशैल मलकूड, गणेश पवार, दत्ता लोंढे यांनी केले कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी घेतलेल्या नेत्र तपासणी, शुगर तपासणी, रक्तदान व सामान्य तपासणीला सर्व कर्मचारी व पेरणोली परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. साधारणतः १२० लोक सहभागी झाले होते. शिवाय रक्तदान शिबिरालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी वृशाली केळकर आरोग्यविषयक माहिती दिली.

रामतीर्थ धबधबा गर्जू लागला…
पूर्ण क्षमतेने कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ठीक ठिकाणी झालेला वळीव पाऊस, बंधाऱ्यातून सोडलेले पाणी यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कालपासून रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पुन्हा एक वेळ रामतीर्थ परिसरात गर्दी होऊ लागली आहे.

उन्हाळी सुट्ट्या संपण्यापूर्वीच रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने सुट्टीसाठी बाहेरगावाहून आलेला चाकरमानी कुटुंबीयांसह रामतीर्थ परिसरात गर्दी करू लागला आहे. सर्फनाला प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्गही धबधबा प्रवाहित करण्यात कारणीभूत ठरला आहे.
येत्या वर्षभरात पूर्ण क्षमतेने सर्फनाला प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर बारमाही या धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना पहावयास मिळणार असे दिसू लागले आहे.



