शुक्रवार दि.२८ मार्च २०२५


फ्रान्समध्ये होणार आजऱ्याच्या रावीच्या ‘गुंचा’चा वर्ल्ड प्रीमियर…
‘टूलूस इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये झाली अधिकृत निवड…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोंकणीसह मल्याळम, तेलुगू, मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री रावी किशोरच्या ‘गुंचा’ या हिंदी लघुपटाची फ्रान्समधील प्रतिष्ठित टूलूस इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी अधिकृत निवड झाली आहे. २३ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सिनेमहोत्सवात ‘गुंचा’चा जागतिक प्रीमियर होणार आहे. हिमांशू सिंहने या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले असून, या लघुपटात मुंबईतील वेगवेगळ्या आर्थिक पार्श्वभूमीतील दोन महिलांची भूमिका रावी किशोर आणि गौरी कडू यांनी साकारली आहे.
गुंचा हा महानगरातील एका सर्वसामान्य, स्वतःची वेगळी ओळख नसलेल्या कामगारांची गोष्ट आहे.कुपांचो दर्यो, अर्धो दीस, घरटं या इफ्फिसह जगभरातील विविध सिनेमहोत्सवात गाजलेल्या कोंकणी लघुपटांमध्ये रावी किशोर आणि हिमांशू सिंह यांनी कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून सातत्याने एकत्र काम केले आहे. या जोडीचा ‘गुंचा’ हा पहिलाच हिंदी लघुपट असून विशेष गांधी यांनी मुंबईतील पावसात याचे चित्रीकरण केले असून, गोपाल सुधाकरने संकलन, तर पंकज कटवारेने कला दिग्दर्शन केले आहे.
‘टुलूस’ साठी ‘गुंचा’ची निवड होणे ही आम्हा सगळ्यांच्या मेहनतीची पोचपावती आहे, असे मी मानते.
– रावी किशोर,अभिनेत्री.
बहुभाषिक रावीचा पहिला मराठी सिनेमा लवकरच…
आजरा येथील पेरणोलीतील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली रावी (पूर्वाश्रमीची स्वाती देसाई) हि गेल्या काही वर्षांपासून केरळ मध्ये स्थायिक आहे. मल्याळम, तेलुगू, कोंकणी, तमिळ, हिंदी भाषेतील सिनेमा, वेबसिरीज आणि नाटकांत रावीने आजवर मुख्य भूमिका साकारल्या आहेत. भारतातील इफ्फीसह, न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलिया, युरोप येथे आयोजित होणाऱ्या महत्वाच्या सिनेमहोत्सवात तिच्या विविध भाषेतील लघुपट आणि सिनेमांची वेळोवेळी निवड झाली आहे. आणि तिच्या अभिनयाचे विविध पारितोषिकांसह विशेष कौतुक देखील झाले आहे.दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन रोकडे दिग्दर्शित ‘हुक्की’ हा रावीचा प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर असून, मराठीतील महत्वाच्या कलाकारांसमवेत रावी यात एका धमाल भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तरुणी बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे ता. आजरा येथून तेवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणी २३ मार्चपासून बेपत्ता असणल्याची वर्दी संबंधित तरुणीच्या पालकांनी आजरा पोलिसात दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

‘रवळनाथ’ मध्ये ३१ मार्चपुर्वी ५०० कोटी ठेवींचा टप्पा पार
संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांची माहिती
बँकेत रुपांतर करण्याचा मानस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स (मल्टी-स्टेट) या संस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी ५०० कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा संकल्प केला होता. तो ३१ मार्चपुर्वी गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या पुर्वसंध्येला पुर्णत्वास जाऊन ५०० कोटी ठेवींची संकल्पपुर्ती झाली. त्यामुळे संस्थेचे बँकेत रुपांतर करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती ‘रवळनाथ’ चे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी दिली.
श्री. एम. एल. चौगुले म्हणाले, पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि सभासद, ग्राहकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच संस्थेने अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे. संस्थेच्या अनेक ठेवीदारांनी गुंतवणूक करून हा विश्वास अधिक दृढ केला आहे. संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सुविधा केंद्र गडहिंग्लज, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी या १५ शाखांमधून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या आहेत. यामध्ये गडहिंग्लज शाखेने १५१ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. ५०० कोटी ठेवींसाठी अन्य पतसंस्थांनी देखील आपल्या ठेवी ठेऊन सहकार्य केले आहे.
गेल्या अडीच दशकांपासून सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी चिकाटीने प्रयत्न करुन संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. नवनवीन योजना आणि अधिकाधिक उत्तम ग्राहक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळेच संस्थेने सन २०२४-२५ सालाकरीता असलेले ५०० कोटी ठेवींचे लक्ष्य पूर्ण केले आहे. आगामी काळात देखील संस्थेकडून सभासदांना, ग्राहकांना अत्याधुनिक सेवासुविधा देण्यावर अधिक भर दिला जाईल.
याकामी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, सर्व संचालक, सर्व शाखांचे शाखा चेअरमन, सल्लागार, संस्थेचे सीईओ श्री. डी. के. मायदेव, सर्व अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

आजरा साखर कारखान्याचे वतीने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास नुकतेच राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून राज्य सरकारच्या हमीवर रू. १२२.६८ कोटी कर्ज मंजूर झाले आहे. सदर कर्ज मंजूरी कामी ना. अजितदादा पवार यांनी त्याचप्रमाणें ना. हसन मुश्रीफ यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, नांगरतास ऊस संशोधन केंद्र येथे कारखान्याचे संचालक मंडळाने त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे मा.अध्यक्ष श्री. वसंतराव धुरे, व्हा.चेअरमन श्री. सुभाष देसाई, के. डी. सी. सी. बॅंकेचे संचालक तथा बॅंक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, जेष्ठ संचालक श्री. विष्णूपंत केसरकर, श्री. उदयदादा पोवार, श्री.मुकुंददादा देसाई, श्री. अनिल फडके, मा.संचालक श्री. संभाजी रामचंद्र पाटील, श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरूकटे, श्री. राजेश जोशिलकर, श्री. गोविंद पाटील श्री. रशिद पठाण, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजाराम होलम व अधिकारी उपस्थित होते.

शाश्वत विकास साधण्याचे मिशन सह्याद्रीचे उद्दीष्ट : नरेंद्र खोत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वणवा, वृक्षतोड रोखण्याबरोबर भविष्यातील कृषीच्या समस्यांच्यावर संघटन, संवर्धन आणि मूल्यवर्धन या त्रिसूत्री कार्यक्रमाद्वारे शाश्वत विकास साधण्याचे उद्दीष्ट मिशन सह्याद्रीने समोर ठेवले आहे. त्यादृष्टीने भविष्यात काम करावे लागेल. असे प्रतिपादन मिशन सहयाद्रीचे तज्ञ नरेंद्र खोत यांनी केले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मिशन सह्यादी जनजागृती मोहीम राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा झात्री तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, तालुका कृषी अधिकारी धनराज जगताप प्रमुख उपस्थित होते.
श्री. खोत म्हणाले, कोल्हापुर आणि सातारा जिल्हयातील तेरा तालुक्यामध्ये शाश्वत विकासाचा कार्यक्रम सहयादी मिशनद्वारे राबविला जाणार आहे. या प्रकल्पामधून गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून बांबू लागवड, रेशीम उदयोग, मधमाशी पालन, कृषी पर्यटन अशा विविध कृषी विकासाच्या संकल्पना राबविल्या जाणार आहे. कृषी आधारीत उद्योगातून ग्रामिण भागातील स्थलांतर रोखणे, स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे यासह विविध बाबीचा समावेश आहे.
या कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, महीला बचत गट व शेतकरी गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निधन वार्ता
आनंदी पाटील

देवर्डे ता. आजरा येथील आनंदी केशव पाटील (वय ७४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
माजी सरपंच व आजरा महाल शिक्षण मंडळाचे माजी संचालक कै. केशव लक्ष्मण पाटील यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
नामदेव कांबळे

येथील आजरा महाल शिक्षण मंडळातील शिक्षकेतर कर्मचारी नामदेव संतू कांबळे (सोहाळे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५३ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
आज आजऱ्यात…
आज रात्री साडेनऊ वाजता बांदेश्वर नाट्य मंडळाच्या वतीने ‘तुमच्या घरात राहायला येऊ’ या नाटकाचा नाट्य प्रयोग सुभाष चौक, आजरा येथे आयोजित करण्यात आला आहे.


