mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२५

८५ वर्षाच्या आजीने चोरट्यांना लावले पळवून…

बारा लाखांचे सोने वाचवण्यात यश

.         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      काल रात्री मसोली येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना ८५ वर्षीय यशोदा चंद्रु पोवार या वृद्धेने चोरट्यांना पळवून लावत आपल्या लेकाचे तब्बल १५ तोळे सोने चोरट्यांपासून वाचवण्यात यश मिळवले. काल दिवसभर यशोदा आजीचे कौतुक मसोली पंचक्रोशीसह पोलीस वर्तुळात होत होते.

      रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तानाजी पोवार यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश केला. वनविभागात नोकरीला असणारा संभाजी व तानाजी हे दोघेही घरामध्ये नव्हते. आई यशोदा ही एकटीच घरी होती. चोरट्यांकडून तानाजी यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंचा शोध सुरू असताना याच घरातून संभाजी पोवार यांच्या घरी जाण्याकरता असणारा मधला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजाला टेकून ठेवलेली लाकडी फळी खाली पडली. फळी पडल्याने जमीन हादरली. या हादऱ्याने मुळात कमी ऐकू येणाऱ्या यशोदा आजीला जाग आली. तिला आपल्या घरी चोरी होत आहे याची कल्पना आली. यशोदाआज्जी जागी झाले याची कल्पना चोरट्यांना येताच चोरट्यांनी लांबूनच तिला चाकूचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. आजीने चोरट्यांना न जुमानता थेट मुख्य दरवाज्याच्या दिशेने धाव घेत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आजीचा हा गोंधळ ऐकून शेजापाजारी जागे झाले. तातडीने त्यांनी पोवार कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेतली. चोरट्यांना यांचा सुगावा लागताच त्यांनी पळ काढला. हातात आलेली दीड किलो चांदी घेऊन चोरटे पळून गेले. सुदैवाने या गोंधळामुळे घरातील तब्बल १५ तोळे सोने नेण्यात मात्र त्यांना अपयश आले.

    यशोदाआजीने प्रसंगावधान दाखवून केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मसोलीत चोरट्यांचा धुमाकूळ

६ तोळे सोने,दिड किलो चांदीसह रोख ५१ हजार लंपास

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मसोली(ता.आजरा) येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये
संभाजी गुंडू गुरव व तानाजी चंद्रकांत पोवार यांच्या घरातील सहा तोळे सोन्याचे दागिने दीड किलो चांदी व रोख रुपये ५१ हजार असा ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या चोरीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

     संभाजी गुंडू गुरव व तानाजी चंद्रकांत पोवार हे बाहेर गावी गेले होते.बंद असलेल्या घराचा फायदा घेऊन काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्हीही घरांचा कडी, कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.यामध्ये संभाजी गुंडू गुरव यांच्या घरातील सहा तोळे सोने, रोख रक्कम ४५ व चांदीचे दागिने तानाजी चंद्रकांत पोवार यांच्या घरातील दीड किलो चांदीचे दागिने व ६ हजार रोख रक्कम लंपास केली आहे. दोन घरातील ४ लाख ४० हजारांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे.

      शिवाजी आप्पा गुरव यांच्याही घरात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तारेचे कुंपण कटरच्या साहाय्याने तोडून त्यांच्या घराचे कुलूप फोडले . मात्र चोरट्यांच्या हाताला येथे कांही लागले नाही.

      सकाळी सदर वृत्त स्थानिक ग्रामस्थांना समजतात एकच खळबळ उडाली. ठसे तज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

      पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एन.पाटील करत आहेत.

सातच्या बातमी ‘ ने ग्रामस्थांना चोरीची कल्पना…

      मसोलीतील  अनेकांना रात्री चोरी झालेल्या घटनेची कल्पना नव्हती. ‘मृत्युंजय महान्यूज’ची बातमी सकाळी वाचताच‌ अनेक स्थानिक ग्रामस्थांनी चोरी झालेल्या ठिकाणी धाव घेऊन चोरीची माहिती घेतली.

शहरात काविळीचे रुग्ण वाढले…
पाणी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       शहरात काविळच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून वाढती रुग्णसंख्या विचारात घेता शहरातील पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

       शहरातील ठीक- ठिकाणच्या वस्त्यांमध्ये काविळीचे रूग्ण आढळू लागले आहेत. रुग्णांच्या वाढत्या आलेखास दूषित पाणीपुरवठाच जबाबदार असल्याचे प्राथमिक कारण पुढे येत आहे. शहरातील नळ पाणीपुरवठा योजनेला अनेक ठिकाणी गळत्या लागल्या आहेत. ड्रेनेजचे पाणी यामध्ये मिसळले जात असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

       गेल्या आठवड्याभरात काविळीचे रुग्ण आढळून येत असून दोन दिवसात तर या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणच्या उपनगरांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी हाच पिण्याचा पाण्याचा स्रोत आहे. त्यामुळे काविळीचे रुग्ण वाढण्यास हातभार लागत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर…

    शहरातील विषमज्वर व काविळीच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर गेला असून पाण्याचे नमुने तपासणीसह पाणी उकळून पिण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत.

 दत्ता पाटील यांच्या काव्यसंग्रहास  पुरस्कार 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      घाटकरवाडी ता. आजरा येथील कवी दत्तात्रय पाटील, यांच्या “मन फुलपाखरू” या कविता संग्रहास, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, यांचा २०२४ सालचा उत्कृष्ट काव्यसंग्रह प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

     यापूर्वी या काव्यसंग्रहास कदंब महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या “कदंब” पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आलेले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

विद्या मंदिर होनेवाडी समुहनृत्य स्पर्धेत कनिष्ठ विभागातून जिल्ह्यात तृतीय

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२०२५ समूह नृत्य स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे स्पर्धक सहभागी झाले होते.कनिष्ठ विभाग समुह नृत्यात विद्यामंदिर होनेवाडी ता.आजरा या शाळेने पंढरीची वारी या गीतावर नृत्य सादर केले. या उत्कृष्ट सादरीकरणाला “तृतीय क्रमांक” मिळाला.

        स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अशोक मुळीक, शिक्षिका राजश्री पाटील,शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील,उपाध्यक्ष राधिका पाटील यांचेसह सर्व सदस्य व ग्रा.पं.होनेवाडी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

आज शहरात …

      काॅ. अतूल दिघे यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता किसान भवन, आजरा येथे गिरणी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लातूरच्या ट्रक ड्रायव्हरचे पंधरा हजार रुपये व मोबाईल अज्ञाताकडून लंपास…

mrityunjay mahanews

वाटंगी येथील अल्पवयीन मुलीचे आजऱ्यातून अपहरण… देशी दारू विक्री करताना मडिलगे येथे एकास ताब्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews
error: Content is protected !!