मंगळवार दि. १४ जानेवारी २०२५


हालचाली वाढल्या… आंदोलन थंडावले…
टोल नाका काम वेगाने सुरू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वरमध्ये- बांदा महामार्गावरील मसोली येथे उभारण्यात येणाऱ्या टोल नाक्याचे काम पुन्हा एकदा गतीने सुरू झाले असून सुरुवातीला होणाऱ्या विरोधाची धार आता थोडी कमी झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे टोलचे भूत तालुकावासीयांच्या मानगुटीवर बसणार की कायमस्वरूपी हद्दपार होणार ? याबाबत संभ्रमावस्था आहे.
टोलमुक्ती संघर्ष समितीने आम्ही टोल देणार नाही अशी भूमिका घेत सर्वपक्षीयांना सोबत घेऊन प्रचंड मोर्चा काढला. वारंवार बैठका घेऊन तालुका वासीयांना टोल मधून सूट मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, स्थानिक अधिकारी व पदाधिकारी यांच्या चर्चेतून टोलबाबत तात्पुरत्या स्थगीतीचा निर्णय झाला. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाक्याच्या वीस किलोमीटर परिसरातील वाहनांना टोल आकारणी होणार नाही असा निर्णय घेतल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाल्या.

एकीकडे हे सर्व घडत असताना दुसरीकडे टोल नाका उभारणीचे काम नेटाने झाले असून टोल वसुलीच्या प्रतीक्षेत टोल नाका आहे. टोल वसुली सुरू न झाल्याने शहरांमध्ये ठीक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून बसवण्यात आलेले पथदिवेही अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. ‘राष्ट्रीय महामार्गा’ची टोल वसुली सुरु न झाल्याने हे पथदिवे बंद असल्याचे सांगितले जाते.
सध्याच्या हालचाली पाहता पुन्हा एक वेळ राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून टोल बाबत नेमकी भूमिका स्पष्ट होण्याची गरज आहे.

१९ जानेवारीला आजरा येथे बैलगाडी शर्यती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बकासुर प्रेमी आयोजित आजरा येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी आजरा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रविंद्र पारपोलकर यांनी दिली.
शासनाच्या नियमास अधीन राहून या स्पर्धा रविवार दिनांक १९ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होतील. स्पर्धेकरीता प्रवेश फी एक हजार रुपये इतकी आहे.विजयी पहिल्या सात क्रमांकाना बैलगाडी मालकास अनुक्रमे १५ हजार रुपये, १२ हजार रुपये, १० हजार रुपये,८ हजार रुपये, ६ हजार रुपये, ४ हजार रुपये व २ हजार रुपये रोख व शील्ड देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गाडी मालकांनी रवींद्र पारपोलकर, ७३५०९०६५३०, सुमित पारपोलकर, ९६०७८०९९७३, राहुल दोरूगडे, ७४९८१८३७३६, ऋषिकेश मांडेकर, ९५६१३०६७८२ या क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आजरा साखर कारखान्याची १५ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामात आजअखेर १ लाख ७८ हजार ८८० मे.टन ऊसाचे गाळप झाले असुन कारखान्याकडे दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन ३१०० रुपये प्रमाणे १५ कोटी २३ लाख रुपये विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ३० नोव्हेबर २०२४ अखेरची ऊस तोडणी वाहतुक बिलाची २ कोटी ७५ लाख रुपये इतकी रक्कम संबंधीत कंत्राटदारांचे खातेवर जमा करणेत आली असून संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी वाहतुक कंत्राटदार यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.


व्यंकटराव चे चित्रकला परीक्षेत यश

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल, आजरा मधील शासकीय चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट २०२४ मध्ये उज्वल यश मिळवले.”अ” श्रेणी प्राप्त-७”ब”श्रेणी प्राप्त – २१”क”श्रेणी प्राप्त -७५
परीक्षेस एकूण १०४ बसले होते त्यापैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.९९.०३% इतका निकाल लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, प्राचार्य आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार, कलाशिक्षक कृष्णा दावणे यांनी विशेष कौतुक केले.


राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव आजचा प्रयोग…
‘गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे…’
लेखक : विक्रम बल्लाळ
सादरकर्ते : जागृती कलामंच कुसवडे ( सातारा )
वेळ : सायंकाळी ७.०० वाजता



