सोमवार
१७ ऑगस्ट २०२६

बालविवाह…
पाच जणांविरोधात गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीशी विवाह करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी बहिरेवाडी तालुका आजरा येथील पाच जणांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक ग्राम पंचायत अधिकारी अंजली रोहिदास चौगुले यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…
बहिरेवाडी येथील एका तरुणांशी कागल तालुक्यातील बेरडवाडी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर तिला दिवस गेल्याचे व सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी चौगुले यांनी आजरा पोलिसात याबाबत राकेश सुरेश नाईक, सुरेश बाळू नाईक, जनाबाई सुरेश नाईक, तिघे रा. बहिरेवाडी ता. आजरा,प्रकाश मारुती नाईक व महादेवी प्रकाश नाईक दोघे राहणार बेरडवाडी ता. कागल या पाच जणांविरोधात आग्रा पोलिसात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध व बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जनता सहकारी बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत … सभासदांना १०% लाभांश जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुरदुंडेश्वर कार्यालय वाणी गल्ली आजरा येथे खेळीमेळीत पार पडली. सभेची सुरूवात चेअरमन व संचालकांनी दिप प्रज्वलनाने केली. यानंतर सभासदांना व ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घेणेबाबत सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग घेवून वेगवेगळे उपाय व सुचना सांगण्यात आल्या. सभासदांचे स्वागत करून श्रध्दांजलीचा ठराव बँकेचे संचालक विक्रम देसाई यांनी मांडला.
यानंतर बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई यांनी प्रास्ताविकपर बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन सभासद, ठेवीदार, कर्मचारी, हितचिंतक यांनी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. गत आर्थिक वर्षांमध्ये दहा टक्के लाभांश देण्याचे त्यांनी जाहीर केले.
बँकेच्या सभासदांचे पाल्यांमधून १० वी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा संचालक मंडळाने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या. त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी.पाटील यांनी अहवाल वाचन केले.
अहवाल वाचनावेळी सभासद श्री. बाबासाहेब देवकर श्री. तानाजी देसाई व श्री. आनंदा पाटील यांनी बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीबाबत चेअरमन, संचालक व सर्व स्टाफचे अभिनंदन करून अभिनंदनाचा ठराव मांडला. अनेक वर्षे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची बढतीबाबत विशेष दखल घेणेबाबत त्याचबरोबर पगार स्केल ठरविणेबाबत व ताळेबंदाबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले, त्यास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. बी. पाटील यांनी समर्पक उत्तर देवून शंकांचे निरसन केले. इतर सर्व विषयांना हजर सभासदांनी सर्वानुमते मंजूरी दिली. सदर सभा खेळीमेळीत पार पडली. आभार श्री. संतोष पाटील यांनी मांडले.
सदर सभेस जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, जि. प. सदस्य शिरीष देसाई, आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष अनिल फडके, तालुका संघाचे अध्यक्ष महादेव हेब्बाळकर, उपाध्यक्ष संभाजी तांबेकर, ॲड. देवदास आजगेकर, वसंतराव धुरे, गोविंद पाटील, विजय देसाई, विश्वास जाधव, दिगंबर देसाई, बाबासाहेब देवकर,शामराव देसाई, अल्बर्ट डिसोजा, उदयराज पोवार, डी.ए.पाटील, शिवाजी नांदवडेकर, महादेव पोवार, देविदास बोलके, बँकेचे संचालक चेअरमन व्हा. चेअरमन अमित सामंत,महादेव टोपले, जयवंत शिंपी, रणजित देसाई, बाबाजी नाईक, जयवंत कोडक, शशिकांत नार्वेकर, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई, सौ. रेखा देसाई, सौ. नंदा केसरकर, महेश कांबळे, पांडुरंग तोरगले, संतोष पाटील व बँकेचे तज्ञ संचालक एस. एस. निकम यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.

आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार म्हाळासाकांत देसाई, विकास कोलते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आजरा पंचायत समितीच्या आवारात प्रभारी सभापती यशोदा पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, सर्व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आजरा साखर कारखाना कार्यस्थळी व जनता सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते, श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा येथे ज्येष्ठ सभासद संगम गुंजाटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी, व्हाईस चेअरमन समीर गुंजाटी, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची संस्थेची परंपरा यावेळीही कायम ठेवण्यात आली. व्यंकटराव हायस्कूल येथे संस्थेचे चेअरमन जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पंडित दीनदयाळ विद्यालयात अध्यक्ष प्रा. डॉ .सुधीर मुंज यांच्या हस्ते, आजरा विकास सेवा संस्थेत संचालक अभिषेक शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बीरेश्वर पतसंस्थेच्या आजरा शाखेत शाखा संचालक सुरेश मिटके यांच्या हस्ते, आजरा वन विभागामध्ये परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
आजरा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. आजरा सुतगिरणीमध्येही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आजरा आगारात आगारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आगारातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.
तालुक्यातील साळगाव ग्रामपंचायतीमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोहाळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच भारती डेळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वाटंगी येथे सन्मित्र संस्था समूहात अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांच्या हस्ते, आजरा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुका खरेदी विक्री संघामध्ये अध्यक्ष महादेव हेब्बाळकर यांच्या हस्ते तर जिल्हा बँकेच्या आजरा शाखेमध्ये संभाजी तांबेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान, तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या.

व्यंकटराव संकुलाच्या वतीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे संस्था अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी यांचे हस्ते कोल्हापूरचे शिक्षण महर्षी, पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा संस्थेचे सचिव श्री. अभिषेक शिंपी यांनी घेतला..या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ उपाध्यक्ष श्री. कृष्णा पटेकर, खजिनदार श्री. सुनील पाटील,संचालक श्री. पांडुरंग जाधव ,श्री. सचिन शिंपी, श्री.सुधीर जाधव, श्री. अशोक पोवार , आजरा नगरपंचायत नगरसेवक विक्रम पटेकर, मुसासरफराज पटेल, आसिफ सोनेखान, किरण कांबळे माजी नगरसेवक, परशुराम बामणे,श्री रवळनाथ पतसंस्था संचालक सुधीर नार्वेकर समीर गुंजाटी, मज्जिद मुराद, युसुफ गौसेकर, रवी देसाई, विलास कांबळे माजी उपसरपंच आजरा, शिवाजी गुडुळकर माजी सरपंच आजरा, मोतेस बारदेस्कर माजी ग्रामविकास अधिकारी, कारखाना संचालक सदाशिव डेळेकर, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, आजरा शहर शिंदे शिवसेना प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम इंचनाळकर, अल्ताफ दरवाजकर, हुसेनसाब दरवाजकर, मिनीन डिसोजा, खानसाब बेपारी, हसनसाब मुराद, इरफान सय्यद, डॉ गौतम नाईक ,आनंदराव कोरगावकर, जेमी डिसूजा, साळगाव सेवा संस्था चेअरमन आनंदा कुंभार, सरपंच धनंजय पाटील, शारदाबाई शिक्षण संस्था सदस्य प्रकाश पाटील, शेतकरी संघ सदस्य डी.ए.पाटील, सोहाळे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पवार, उद्योजक पराग परुळेकर, कल्लाप्पाण्णा पाटील आवंडी माजी सरपंच, पांडुरंग तेरसे, धनंजय देसाई, संभाजी इंजल, आजरा नगरीतील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते ,विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.पी.होरटे यांनी केले.

चिमणे- बेलेवाडी रस्त्याच्या दुरवस्थेची अधिकाऱ्यांकडून पाहणी,दुरुस्तीचे आश्वासन

उत्तूर : मंदार हाळवणकर
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या चिमणे-बेलेवाडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे डेप्युटी इंजिनीअर अविनाश वायसळ व ज्युनियर इंजिनीअर प्रशांत पारकर यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ, नागरिक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्यावर पडलेले खड्डे, उंच-सखल भाग, कामातील त्रुटी तसेच वाहतुकीस निर्माण होणारा त्रास ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. पाहणीदरम्यान रस्ता काही ठिकाणी असमतल असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधित अभियंत्यांना आवश्यक त्या दुरुस्त्या करून रस्ता समतल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या रस्त्याच्या प्रश्नासाठी संभाजी पाटील, दिग्विजय पोवार, अतुल चव्हाण व अभिजीत मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच भूषण नादवडेकर व प्रमोद तारळेकर यांनी पाहणीवेळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.रस्त्यावरील त्रुटी दूर करून आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात येईल व रस्ता वाहतुकीस योग्य करून देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत निधी मंजूर असतानाही कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर दुरुस्तीच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

उत्तूरमध्ये विविध ठिकाणी ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूरमध्ये विविध ठिकाणी ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने उत्तरेश्वर किल्ल्यावर सरपंच किरण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, माजी सैनिक, विविध शाळांतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी ‘नशामुक्त भारत’ची शपथ घेतली.
महसूल कार्यालयात मंडल अधिकारी गीता कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी तलाठी, कोतवाल व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. नेहरू चौकात सुनील लोखंडे यांच्या हस्ते, तर पोलिस चौकीत सुदर्शन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस चौकीतील कार्यक्रमास होमगार्ड तसेच श्री पार्वती शंकर विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सौरभ कसबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘टीबीमुक्त भारत’ व तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. निखिल यांच्या हस्ते, तर श्री पार्वती शंकर पतसंस्थेत संचालक निखिल करंबळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

आजचे पंचांग
दिनांक : १७ ऑगस्ट २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी तिथी (सायंकाळी ०५.०० पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (१८ ऑगस्ट पहाटे ०४.५८ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : शुभ योग (१८ ऑगस्ट पहाटे ०३.२८ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : बलवा करण (सायंकाळी ०५.०० पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कन्या राशी (सायंकाळी ०४.१९ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
सूर्य राशी : कर्क राशी (सकाळी ०७.५७ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५६ ते सकाळी ०९.३२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.२१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
रत्नाबाई सरदेसाई

कासार कांडगाव या.आजरा येथील श्रीमती रत्नाबाई बाळासाहेब सरदेसाई (वय १०४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या आप्पासाहेब बाळासाहेब सरदेसाई व अण्णासाहेब बाळासाहेब सरदेसाई यांच्या आई होत .
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.


