mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


शुक्रवार   दि. ३ जानेवारी २०२५    

बापरे…
घराशेजारील झाडावर बिबट्या…?

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वेळवट्टी ता. आजरा येथील डॉ. धनाजी राणे यांच्या हुंबराचे पाणी या गट क्रमांक २०८ शेतामधील घराशेजारील शंभर फुटावर असणाऱ्या काजूच्या झाडाच्या आडव्या फांदीवर बुधवारी संध्याकाळी सात वाजता काजूच्या झाडावरील आडव्या मोठ्या फांदीवर बिबट्या पहुडल्याचे डॉ. धनाजी राणे यांनी पाहिले.

      डॉ. राणे हे आपल्या शेतात संध्याकाळी फुल झाडांना पाणी घालत असताना त्यांच्या शेजारी असणारा कुत्रा काजूच्या झाडाकडे पाहून जोरजोरात भुंकू लागला म्हणून राणे आपल्या घरातील बॅटरी घेऊन सदर झाडाच्या दिशेने बॅटरीचा झोत पाडला असता काजूच्या मोठ्या आडव्या फांदीवर बिबट्या असल्याची खात्री झाली.

      खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. राणे यांनी आपल्या कुत्र्याला घरी बोलावून घेतले दरम्यान बिबट्या तेथून काही कालावधीने पळून गेला.जंगलात सध्या पुरेसे अन्न व पाणी नसल्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात शेतातील मानवी वस्ती जवळ वन्यप्राणी येत असल्याचे डॉ. धनाजी राणे यांनी सांगितले.

      अलीकडे पश्चिम भागामध्ये पट्टेरी वाघाने पाळीव व जंगली जनावरांवर हल्ला सत्र सुरू केले आहे . डॉ .राणे यांच्या शेतामध्ये गवे व हत्तींनी घातलेला धुमाकूळ सर्वश्रूत आहे. पश्चिम भागातील वनसंपदा समृद्ध असल्याचे हे प्रतीक असले तरी स्थानिक शेतकरी वर्गाच्या दृष्टीने वन्य प्राण्यांचा वावर तापदायक ठरू लागला आहे.

विचित्र अपघातात ट्रॅक्टर चालकाच्या मृत्यू

धामणे ते माद्याळ रस्त्यावरील घटना

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचा ट्रॅक्टर वरून खाली उतरताना गळ्यातील मफलरचा फास लागून विचित्र अपघातात मृत्यू झाला. सुरेश रवी लोखंडे (वय २७, रा. संकेश्वर ) असे  मृत चालकाचे नाव आहे.

     सुरेश ट्रॅक्टरवरून खाली उतरताना पाय घसरून पडताना गळ्यातील मफलरने फास लागून या चालकाचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात नोंद झाली असून घटनास्थळावर मात्र उलट सुलट चर्चा होती.

     सुरेश रवी लोखंडे हे ट्रॅक्टर घेऊन जात होते. चोथे खोपीच्या जवळ त्यांनी ट्रॅक्टर थांबवला. ते खाली उतरत असताना ट्रॅक्टरच्या बॅटरीसाठी असणाऱ्या लोखंडी बॉक्सवर पाय ठेवून खाली उतरताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. याच वेळी त्यांच्या गळ्यातील मफलर मडगार्डच्या पत्र्यात अडकून सुरेश यांच्या गळ्याला फास बसला व यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बस वेळेत न सोडल्याने आजरा बसस्थानकावर गोंधळ

           आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा-बेळगाव बस वेळेत न सोडल्याने आजरा बसस्थानकावर प्रवाशांनी गोंधळ घातला. यावेळी प्रवासी व आगार नियंत्रक यांच्यात बाचाबाची झाली व गोंधळाचे वातावरण तयार झाले. संतप्त प्रवाशांनी बस स्थानक व्यवस्थापकांना धारेवर धरले

    सकाळी आठ व नऊ वाजता जाणारी आजरा- बेळगाव बस वेळेत सोडण्यात आली. परंतु सकाळी दहानंतर बस सोडली नसल्याने प्रवासी संतप्त झाले. यावेळी प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन इंदलकर,गौरव देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत नियंत्रण कक्ष अधिका-यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

    दरम्यान शाळांच्या सहलीचा हंगाम सध्या सुरू असल्याने बस अपु-या पडत आहेत.त्यामुळे वेळेत बस सोडणे शक्य होत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे नियंत्रण कक्ष विभागाकडून सांगण्यात आले.

इकॉनॉमिक्स असोसिएशनचे रविवारी आजऱ्यात अधिवेशन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा महाविद्यालय, आजरा अर्थशास्त्र विभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन यांच्या वतीने ३५ वे वार्षिक अधिवेशन रविवार दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रा. डॉ.ए.एन.सादळे व डॉ .संजय चव्हाण यांनी दिली.

      कृषी प्रक्रिया उद्योगाचे अर्थशास्त्र, राज्य वित्तीय व्यवस्थापन : समस्या, उपाय आणि भवितव्य या विषयावर सदर अधिवेशन होणार असून अधिवेशनाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. परशराम पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे‌.

      या अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रा.एम.जी. पाटील, शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर हे भूषवणार असून यावेळी अर्थशास्त्र विषयातील मान्यवर व जनता शिक्षण संस्थेचे संचालक उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाच्या समारोप प्रा.एम.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योजक महादेव पोवार यांच्या उपस्थितीत होणार आहे असेही डॉ. सादळे यांनी स्पष्ट केले आहे.

व्यंकटरावचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      डिसेंबर २०१४ रोजी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व विज्ञान विषय समिती यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

      सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली आहे.
प्रज्ञापात्र गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे
हर्षवर्धन बाळकृष्ण देसाई, आदर्श अशोक गिलगिले , स्वयंम् यशवंत दोरुगडे, निशांत नामदेव दोरुगडे , सोहम सुधीर चौगुले ,गौरी हरी कोंडुसकर,शर्वरी श्रीकांत देसाई , राजवीर चेतन हरेर ,शोभिता सदानंद कातकर

       ए. वाय .चौगुले यांनी मार्गदर्शन केलेल्या या विद्यार्थ्यांना जयवंतराव शिंपी, अध्यक्ष व सर्व संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा प्राचार्य आर . जी .कुंभार पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन मिळाले.

आजरा महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा महाविद्यालय आजरा मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान विभागाचा पालक मेळावा प्राचार्य डॉ.ए.एन.सादळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

          मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्रा. जे.एम.कुंभार यांनी शिष्यवृत्ती व जात पडताळणी संदर्भात माहिती दिली. प्रा.आर. एस राजमाने यांनी MHT-CET संदर्भात पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.एस.एस. सावंत यांनी मोबाईलचा अतिवापर होत असताना कोणत्या खबरदारी घ्याव्यात यासंदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उप-प्राचार्य दिलीप संकपाळ यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी पालकांची व शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. तसेच चालू वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सर्व पालकांनी आपल्या घरातील मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहन केले.

      पालक युवराज कृष्णा येसणे व सौ. दीप्ती पराग परुळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

       प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे यांनी बारावी परीक्षेस सामोरे जाण्यासाठी अकरावीचा पाया मजबूत करणे खूप गरजेचे आहे असे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस. एन. फगरे,आभार प्रा. आर. टी. मस्कर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. आर.ए.भादणकर यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

बाहुबली कोण ?आज फैसला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी – विक्री संघ निवडणूक…

mrityunjay mahanews

रमेश राठोडला लाच घेताना रंगेहात पकडले:महसुलमध्ये खळबळ

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!