mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 सोमवार  दिनांक १४ ऑक्टोबर २०२४

कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात ३ कोटी ६२ लाखांची नवीन कामांना मंजुरी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून प्रचंड विकास कामे झाली असून या जि.प. मतदारसंघात नवीन ३ कोटी ६२ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण गावांचे अंतर्गत सुशोभीकरण, ख्रिश्चन वस्त्या व स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, हायमॅक्स दिव्यांची व्यवस्था यासह विविध कामांचा समावेश आहे.

       पेद्रेवाडी येथे अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपये, कोवाडे, यमेकोंड येथील अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये तर हांदेवाडी येथील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये , उचंगी, पोश्रातवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये व बोलकेवाडी येथील जोतिबा देवालय परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये तर हुडे येतील अंतर्गत सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे.

      अल्पसंख्यांक निधी अंतर्गत सरोळी, वाटंगी येथील ख्रिश्चन समाजाच्या वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण व खानापूर येथील चर्चसमोर सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

      डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सरंबळ वाडी, श्रृंगारवाडी, किणे या गावांकरता खडीकरण व डांबरीकरणासाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे.याचबरोबर ३०/५४, ५०/५४ अंतर्गत हात्तिवडे- होनेवाडी व मेंढोली पासून यमेकोंडकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी अनुक्रमे २५ व ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत. गजरगाव येथील लखमेश्वर देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासह किणे- पोश्रातवाडी रस्त्या करता प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी तर सुळे – शिरसंगी रस्त्या करता ३५ लाख शिरसिंगी – कागीनवाडी रस्त्या करता २७ लाख रुपये ,वाटंगी- शिरसिंगी रस्त्याकरता १५ लाख रुपये , कोटी लाकूडवाडी करता २० लाख रुपये निधी मंजूर झाला असून मलीग्रे, कोवाडे, वाटंगी येथे हायमॅक्स दिवे बसवण्याकरता प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

     आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्यातून सदर निधी मंजूर झाल्याने कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावांचे रूपडे पालटण्यास मदत होणार आहे.

सुरेश डोणकर यांचे निधन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील संभाजी चौकातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक सुरेश तुकाराम डोणकर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६२ वर्षे होते.

      तीन आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान काल रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

     त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, मुलगा, पत्नी, जावई असा परिवार आहे.

      आज सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मृतदेहावर शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सर्फनाला ‘ हरितक्रांती घडवेल : आमदार प्रकाश आबिटकर  सर्फनाला प्रकल्पाचे पाण्याचे पूजन उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सर्फनाला प्रकल्पात पाणीसाठा केल्यामुळे जनतेचे हे स्वप्न २५ वर्षांनी सत्यात उतरले आहे. सर्व प्रलंबित प्रश्नांची जबाबदारी घेऊनच सर्फनाला प्रकल्पातील पाण्याचे पूजन केले आहे. सर्फनाला प्रकल्पाचे पाणी पूजन होत असले तरी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यास आपण बांधिल आहोत या प्रकल्पामुळे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा तालुक्यातील पारपोली येथे ‘सर्फनाला’ प्रकल्पातील पाण्याच्या पूजन प्रसंगी बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सर्फनाला प्रकल्पातील पाण्याचे पूजन व कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले करण्यात आले.

  सुरुवातीला खेडगे गावातून डोक्यावर मंगल कलश घेऊन महिला मिरवणुकीने प्रकल्प स्थळावर आल्या. यामध्ये लेझीम पथक व वारकरी दिंडी देखील सहभागी झाली होती. जलसंपदा विभाग मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. तसेच ते म्हणाले, या प्रकल्पाची चौथी सुप्रमा प्रस्तावित आहे. गेल्या तीन वर्षात आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामुळे प्रकल्पाच्या कामकाजाला गती प्राप्त झालेली आहे. अद्यापही जी कामे अपूर्ण आहेत पुढील वर्षापर्यंत ती सर्व कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात येतील. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे संपूर्ण श्रेय आमदार प्रकाश आबिटकर यांनाच द्यावे लागेल.

      रआमदार प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले,सर्फनाला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साऱ्यांचेच योगदान महत्त्वाचे राहिले आहे. प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी हातात हात घालून प्रकल्पाच्या पाणी पूजनाला येतात हे या प्रकल्पाचे फार मोठे यश आहे. या प्रकल्पात अडवलेले पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्फनाला, धामणी, नागणवाडी हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून पाणी देण्याच्या पुण्याईची काम केले. याचे समाधान आयुष्यभरासाठी मिळणार आहे. पाणी पुजण्याच्या निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी दिवाळी निर्माण झाली आहे.

      कॉ. संपत देसाई म्हणाले, या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय यंत्रणांचे काम कौतुकास्पद आहे. आता पाणी प्रत्यक्ष शेतापर्यंत जाण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. सरकारने पुनर्वसनाचा कायदा केला आहे पण तरी देखील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अपुरेच राहताना दिसतात प्रलंबित प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी आमच्या लढ्याला सत्ताधाऱ्यांनी साथ द्यावी असेही आवाहन केले.

      रणजीत पाटील म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या प्रचंड विकास कामामुळे आजरा तालुक्यातील जनता २०२४ च्या निवडणुकीत ही त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. यावेळी प्रकाश शेटगे, सुरेश मिटके, अमर ढोकरे, संतोष पाटील, अशोक मालव, प्रकाश कविटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

      यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, माजी सभापती उदयराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, जी.एम. पाटील, राजेंद्र सावंत, साळगाव चे सरपंच धनंजय पाटील, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, पेरणोलीच्या सरपंच प्रियांका जाधव, भारती डेळेकर, प्रियांका शेटगे, डॉ. संदीप देशपांडे, विजय थोरवत, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, आनंदा कुंभार, रणजीत सरदेसाई, अश्विन डोंगरे, कृष्णा ठोकरे, जी.एम. पाटील,काका देसाई, संतोष जाधव, हिंदुराव कालेकर, आनंदा कुंभार, राजेंद्र सावंत, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गोविंद पाटील , मारुती डोंगरे आनंदा कुंभार प्रकाश कविटकर जलसंपदाच्या उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर, दीपक तोलगेकर, विश्वजीत देशमुख, कनिष्ठ अभियंता प्रकाश येसणे, सुशील पाटील, संजय यादव यांच्यासह विविध गावातील संस्थांची पदाधिकारी नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      नंदकुमार निर्मळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी आभार मानले.

त्यांच्याबद्दल दिलगिरी…

      प्रकल्प पूर्णत्वास जात असताना अनेक अधिकाऱ्यांशी आपले शाब्दिक वाद झाले प्रसंगी त्यांना धारेवरही धरले परंतु या सर्व बाबी प्रकल्प पूर्णत्वासाठीच होत्या . यामुळे आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

हाळोली येथे मारामारी प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हाळोली तालुका आजरा येथे पूर्व वैमनस्यातून व जातीचा दाखला मुद्दाम गहाळ केल्याच्या संशयातून गौरी गौतम कांबळे यांना घरात शिरून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अभिषेक अर्जुन कांबळे, अर्जुन म-याप्पा कांबळे, लता अर्जुन कांबळे व बाळकृष्ण अर्जुन कांबळे या चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आज-याचा सहकार हेवा वाटण्याजोगा – आम. प्रकाश आबिटकर

स्व.रावसाहेब देसाई सहकारी गृहतारण संस्थेचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील सहकारी संस्थांची उत्कृष्ट पद्धतीने चाललेली वाटचाल पाहता येथील संस्थांचा निश्चितच हेवा वाटतो. सहकारी संस्थांची समृद्धता कशी असावी याचे उत्तम उदाहरण आजरा तालुक्यात पहावयास मिळते. यापुढे चांगले कर्जदार मिळणे अवघड असल्याने कर्ज वाटपामध्ये योग्य ती दक्षता घेऊन शिस्तबद्ध व गतीने संस्थेची प्रगती साधावी असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आजरा येथील रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहकारण संस्था मर्यादित वेळवट्टीचे उद्घाटन आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

       उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक इंद्रजीत देसाई यांनी केले केवळ गृहतारणच नाही तर त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन संस्थेमार्फत कॅश क्रेडिट, जामीन, आकस्मिक कर्ज इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

        जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले, आजरा तालुका हा सहकारातील दीपस्तंभ आहे. चांगल्या पद्धतीने तालुक्यात संस्था सुरू आहेत. नवीन संस्थांच्या उभारणीसाठी आपण निश्चितच सहकार्य करू.यावेळी विलास नाईक यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.

        कार्यक्रम प्रसंगी डॉ. अनिल देशपांडे, जयवंतराव शिंपी, सुरेश गड्डी, सुधीर कुंभार, विजयकुमार पाटील, जी.एम. पाटील, बसवराज महाळंक, सौ. शुभदा जोशी, विजय थोरवत, शिवाजी गोरे, संतोष भाटले, रणजीत सरदेसाई, जितेंद्र शेलार, सुभाष विभुते, दयानंद पाटील, जीवन पाटील, महादेव कबीर, भिकाजी देसाई,संजयभाऊ सावंत, जयवंत प्रभू, गंगाराम कुंभार, अर्जुन कुंभार, मारुती पोवार, अमित निकम,आनंदा गावडे यांच्यासह संस्थेचे संचालक व मान्यवर उपस्थित होते.

धनगर वाड्यावर आज गजोनृत्य

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      विजयादशमी निमित्त आवंडी धनगरवाडा येथे आज सोमवारी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत गजोनृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम व त्यानंतर भंडारा जेवण/प्रसाद होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.


                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

चाफवडे हायस्कूल स्थलांतरास विरोध कायम…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!