mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या…


बस स्थानक आवारात प्रवाशाचा मृत्यू…
महिनाभरात बाप-लेकांचा मृत्यू

.        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा बस स्थानकाच्या स्वच्छतागृहामध्ये अचानकपणे बेशुद्ध पडलेल्या चंद्रकांत मारुती वास्कर रा. मेढेवाडी ता. आजरा या ५० वर्षीय प्रवाशाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बस स्थानक परिसरात आजरा एस.टी. आगारावर बेजबाबदारपणाचा आरोप करत कांही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण तंग बनले होते. कार्यकर्ते, वास्कर यांचे कुटुंबीय,आगाराचे अधिकारी व  सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तणाव निवळला. नातेवाईकांनी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

    वास्कर हे गारगोटी तालुक्यातील कडगाव येथे उपचारासाठी जाण्याकरिता आजरा बस स्थानक येथे आले असता सदर प्रकार घडला.

     याबाबतची वर्दी संगीता वास्कर यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

महिनाभरातच वडिलांचा मृत्यू…

जुलै महिन्यामध्ये वास्कर यांचा एकुलता एक मुलगा आकाश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वास्कर कुटुंबीयांवर हा मोठा आघात होता. केवळ महिनाभरातच वडील चंद्रकांत वास्कर यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे  गवसे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.


नारायण गिरी महाराजांवर गुन्हा नोंद करा…
संविधान सन्मान परिषदेची मागणी

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट सराला, ता. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी समतेचे पुरस्कार्ते, इस्लाम धर्माचे प्रेषित व आदर्श महंमद पैगंबर साहेब यांच्या बद्दल पुरावा नसताना वादग्रस्त व चरित्र हनन करणारे विधान करून तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मुस्लिम समाजाच्या भार धार्मिक भावना दुखवाव्यात या हेतूने केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संविधान सन्मान परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक आजरा यांना देण्यात आले.

     भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य दिले आहे मात्र श्रद्धा व उपासना करताना सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य आणि सामाजिक आरोग्य बिघडू नये यासाठी प्रत्येक भारतीयाने कटिबद्ध असले पाहिजे. मात्र संत व संत परंपरा महानायक, महानायिका यांच्या बाबतीत बोलताना संविधानिक व पुराव्याशिवाय बोलणे हे कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे.

     कोणताही सबळ पुरावा न देता एखादे विधान करणे हे सवैधानिक दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संघटक संग्राम सावंत, प्रमोद पाटील, समीर खेडेकर, आबूसईद माणगावकर, मजीद मुल्ला, मौजूद माणगावकर समीर चांद, अब्दुल करीम माणगांवकर, बबलू शेख, ताहीर माणगांवकर आदींच्या सह्या आहेत.

जनता बँकेच्या पेठ वडगांव शाखेचे उद्घाटन

           आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जनता सहकारी बँकेच्या २० व्या पेठ वडगांव शाखेचा उद्घाटन समारंभ बँकेचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. बँकेच्या एकूण ठेवी रु ३७० कोटीच्या व कर्ज रु २६२ कोटी असून नेट एन पी ए ० टक्के आहे. बँकेचा आलेख दिवसेंदिवस चढता असून रिझर्व बँकेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन हा निकष सतत पुर्ण करणारी बँक म्हणुन बँकेची ओळख निर्माण झालेली आहे.

     पेठवडगांव परिसर हा शेतकरी व औद्योगिक व्यवसाय करणार असून त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जाची मदत करुन या परिसरातील शेतकरी व उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढीला सहकार्य करणेसाठी जनता बँक सतत अग्रेसर राहिल. तसेच बँकेकडे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा असलेने ग्राहकाला केव्हाही आणि कोठूनही व्यवहार करता येतील यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाचला जाईल असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई यांनी सांगितले.

     यावेळी बँकेचे व्हा चेअरमन श्री महादेव टोपले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी. पाटील यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.

निधन वार्ता…
लक्ष्मीबाई पाटील


साळगाव ता आजरा येथील लक्ष्मीबाई जानबा पाटील ( वय ७९ ) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली असा परिवार आहे.कारखाना कर्मचारी बाळकृष्ण पाटील यांच्या आई तर सेवा संस्थेचे माजी सचिव जानबा पाटील यांच्या पत्नी होत.आज रविवारी सकाळी रक्षाविसर्जन आहे.

VIRAL NEWS…

 

लाडक्या बहिणीचा निधी भावाच्या बँक खात्यात जमा ! अर्ज न करताही मिळाले पैसे !!


♦️यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आज शनिवारी या योजनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत सुरुवात होणार आहे. प्रशासन स्तरावर या योजनेतील भोंगळ कारभारही आता बाहेर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका पुरुषाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

      मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत राज्य सरकार प्रत्येक महिन्याला महिलांना एक हजार पाचशे रुपये देणार आहे. १५ ऑगस्टला दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. पण जिल्ह्यातील आर्णी येथे ही रक्कम चक्क एका भावाच्या खात्यात जमा झाली आहे विशेष म्हणजे, या भावाने त्याच्या बहिणीसाठी, पत्नीसाठी ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली होती. तरीही, त्याला योजनेचा लाभ मिळाल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी बाहेर आल्या आहेत.

    आर्णी येथील जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. जाफर हे आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहेत. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता आणि नियमानुसार त्यांना भरणे शक्यही नव्हते. तरीही त्यांच्या बँक ऑफ बडोदामधील खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे.

     जाफर यांना मोबाईलवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा संदेशही प्राप्त झाला. त्यानुसार जाफर यांनी तत्काळ बँकेत जाऊन आपले खाते तपासले असता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे, बँक स्टेटमेंटमधून स्पष्ट झाले. या प्रकाराने खुद्द जाफरही चक्रावून गेले आहे. आपण अर्ज न करता आपल्या खात्यात ही रक्कम कशी जमा झाली, याची चौकशी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया जाफर शेख यांनी दिली आहे.

     मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात चार लाख ६८ हजार अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र चार लाख ६० हजार अर्ज महिलांच्या खात्यात निधी वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले होते. यापैकी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. मात्र पुरुषांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांची अशा घोषणा केली जात आहे. मुळात ही योजनाच फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

(Online News)


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चार लाख मे.टन गाळपाचा टप्पा यावर्षी ओलांडणार : प्रा.शिंत्रे आजरा साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!