

ते साहेब कुठे गेले…
तब्बल १६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल पासून ते वरिष्ठांपर्यंतच्या तब्बल १६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने संवेदनशील तालुका अशी ओळख असणाऱ्या आजरा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अचानकपणे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह विविध विभाग सांभाळणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी अशा विविध ठिकाणचे बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी काही मंडळी बदलीच्या ठिकाणी हजर झाली आहेत तर काही मंडळी बदली रद्द करून घेण्याच्या मागे असून त्या दृष्टीने ती प्रयत्न करत आहेत.
यापैकी बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शाळांचे प्रश्न, इतर वैयक्तिक अडचणी पाहता गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या झाल्याचे बोलले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होणार असल्याचे सांगितले जाते.
मुळातच आजरा तालुक्यामध्ये असणाऱ्या गावांची संख्या व पोलीस कर्मचा-यांची संख्या याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. अनुभवी व तालुक्याची नाडी ओळखणारे अनेक कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील होते. यामुळे त्यांच्या शब्दाला तालुकावासीय किंमत देत होते व त्यांच्या शब्दापुढे जात नसल्याचेही दिसत होते. यामुळे निश्चितच तालुक्यातील वातावरण सलोख्याचे राहण्यास मदत होत होती.
अचानकपणे तब्बल १६ कर्मचारी पोलीस ठाण्यातून दुसरीकडे गेल्याने व नवीन कर्मचारी हजर झाल्याने नेहमी पोलीस ठाण्यात वर्दळ असणाऱ्या मंडळींकडून ‘ ते साहेब गेले कुठे ?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टोलप्रश्नी पुन्हा तालुकावासीय आक्रमक…
ग्रामपंचायतींनीही केले ठराव…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा तालुक्यातील मसोली येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याला विरोध दर्शवण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा होऊन पंधरा दिवसाचा कालावधी होत आला असून या प्रश्नाचे नेमके पुढे काय झाले याबाबत संभ्रमावस्था आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने पुन्हा एक वेळ तालुकावासीय आक्रमक होऊ लागले असून विविध ग्रामपंचायतींनी टोलला विरोध दर्शवणारे ठराव करण्यास सुरुवात केली आहे.
आम्ही टोल देणार नाही…अशी भूमिका घेत पंधरा दिवसापूर्वी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला प्रशासन अथवा महामार्ग विभागाचे कोणीही वरिष्ठ सामोरे गेले नाहीत. यामुळे या टोल संदर्भात पुढचा निर्णय काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भरीस भर म्हणून गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या धुवांधार पावसाने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. कांही ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या मो-या व पुलांच्या ठिकाणचे भराव खचले आहेत तर कांही वाहून गेले आहेत. रस्त्यांनाही ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. धनगरमोळा परिसरामध्ये अनेक घरात पाणी घुसल्याने पुन्हा एक वेळ रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रश्नांना महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदारांना नव्याने सामोरे जावे लागणार आहे.पुन्हा एक वेळ आंदोलनाच्या पवित्र्यात तालुकावासीय दिसू लागले आहेत.
सोमवारी बैठक…
टोल प्रश्नी पुढची भूमिका स्पष्ट करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आजरा येथे टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने व्यापक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

व्यंकटराव हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) व्यंकटराव प्रशालेने घवघवीत यश संपादन केले
सुयश संपादन केलेले शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
इयत्ता पाचवी…
काव्या विनायक गावडे (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १२० वी),
आयुष राजू नवार (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १७४)
मयुरेश महेश आरदाळकर
( शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत
१९६ वा),गौरी हरी कोंडुसकर (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत २०९ वी)
आदर्श अशोक गिलबिले ( शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत २२० वा)
या विद्यार्थ्यांना सौ.आर.व्ही.जावळे व
श्री. ए. वाय.चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता आठवी…
प्रेम भगवान पाटील (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत द्वितीय),
जुवेरिया समीर शेख (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दहावी),माधवी जीवन आजगेकर (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ६९ वी),सृष्टी संजीव नाईक (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ८७ वी),रिया अरविंद देशमुख (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ८७ वी),संभाजी पांडुरंग पाटील ( शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १७१वा),वेदिका शांताराम पाटील ( गुण २०७ )
या विद्यार्थ्यांना सौ.ए.डी.पाटील,श्री.व्ही.ए.चौगुले,श्री.व्ही.एच.गवारी,श्री.पी. एस.गुरव यांनी मार्गदर्शन केले.तर संस्था अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी,व सर्व संचालक, प्राचार्य श्री.आर.जी. कुंभार , पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन मिळाले.

पाऊस – पाणी

दि. ५ जुलै २०२४ सकाळी ७-०० वाजल्यापासून ते दि.६ जुलै २०२४ सकाळी ७-०० वाजेपर्यंतच्या २४ तासात आजरा मंडल परिसरात ६२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
काल शुक्रवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी होते, मात्र रात्री पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली.




