
बापरे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंबईमधील घाटकोपर येथील घटनेनंतर प्रत्येक शहरामधे होर्डिंगबाबत कारवाईला सुरवात झाली आहे. आजरा नगरपंचायतीनेही आजरा शहरातील होर्डिंगबाबत कार्यवाही सुरु केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे शहरात केवळ एकच अधिकृत होर्डिंग उभारण्यात आले आहे
शहरात १२ होर्डिंग उभारलेली असून त्यापैकी एकच होर्डिंग अधिकृत आहे. उर्वरित ११ होर्डिंग अनाधिकृत आहेत. त्यांना संबंधीत होर्डिंग काढून घेण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहीती आजरा नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले यांनी दिली.
घाटकोपरच्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रत्येक शहरात होर्डिंगबाबत कारवाईला सुरुवात झाली आहे. आजरा नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून संबंधीत होर्डिंगधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत अनाधिकृत होडिंग उतरवण्याची सूचना केली आहे. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. शहरात १२ पैकी एक होर्डिंग अधिकृत आहे. अधिकृत होर्डिंगधारकाला स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने देण्याविषयी सुचना दिली आहे. शहरात बहुतांश होर्डिंग हे इमारतीवर व रस्त्यांच्या कोपऱ्यांवर उंचीवर उभारलेली आहेत. भविष्यातील धोका ओळखून नगरपंचायतीने होर्डींग धारकांना नोटीस बजावली असल्याचे श्री. चौगले यांनी सांगीतले.

हत्तीचा बंदोबस्त करा…
शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये मसोली व परिसरात हत्तीचा वावर आहे. सध्या ट्रॅक्टर शेतातील भुईमूग, पाण्याची पाईपलाईन,ऊस इत्यादींचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी व गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी झाल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर हत्ती व गवे यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा वनविभागाच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना देण्यात आले असून निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर ,सुयश पाटील, सागर नाईक, हरिश्चंद्र व्हरकटे, उत्तम नार्वेकर, आयर्न कांबळे, अमित गुरव,प्रसाद कांबळे, सुरेश पाटील आदींच्या सह्या आहेत.

महामार्गामुळे गावची विहीर आली अडचणीत… खोराटवाडीकर संतप्त

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-गडहिंग्लज मार्गावरील खोराटवाडी येथे रस्त्याच्या कामानिमित्त करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे गावची विहीर अडचणीत आली असून पावसाळ्यामध्ये ओढ्याचे पाणी विहिरीत मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे खोराटवाडीकर ग्रामस्थ संतप्त झाले असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
याबाबत खोराटवाडी ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की महामार्गाचे काम सुरू करत असताना विहिरीला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे सांगण्यात आले होते.प्रत्यक्षात मात्र करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे विहिरीचे नुकसान झाले असून पुलाची एक बाजू बंद करण्यात आल्याने ओढ्यातील पाणी थेट विहिरीत पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने या संदर्भात योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी खोराटवाडी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र मलीग्रे येथे डेंग्यू दिन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र मलीग्रे येथे डेंग्यू दिन साजरा करण्यात आला जागतिक डेंग्यू दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र मालिग्रे अंतर्गत २८ गावे व वाड्या आठ उपकेंद्रामध्ये विस्तारले असून या आठ उपकेंद्रांतर्गत डेंग्यू विषयी जनजागृती , गप्पी मासे सोडणे,गावामध्ये डेंग्यू चिकुनमलेरिया, चिकून गुण्या, जलजन्य आजार, कीटकजन्य आजार, वायुजन्य आजार विषयी प्रत्येक गावामध्ये जनजागृती करण्यात आली.
यामध्ये ,कंटेनर सर्वे,डबके बुजवणे, अतिरिक्त पाणी साठे असतील तर ते झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, याविषयी संपूर्ण जनजागृती जनतेमध्ये केली. तसेच पावसाळ्याअगोदर घ्यावयाची खबरदारी व पावसाळ्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयी स्लोगन व म्हणी बोर्ड दाखवून जनतेमध्ये जनजागृती केली केली.
कार्यक्रमासाठी उपकेंद्र मालिग्रे,कानोली,किणे, कोळींद्रे, सुळे, हात्तीवडे मेंढोली,चितळे, येथील आरोग्य सेवक – सेविकांनी विशेष परिश्रम घेतले.


