

नदी प्रदूषण रोखा.. शिवसेनेचे आजरा नगरपंचायतला निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा परिसरात उत्तम पर्जन्यमान असून धरणामध्ये पाण्याचा पुरेसा साठा नियमित आहे, तरी उन्हाळ्यात सर्व नद्या प्रदूषित झालेल्या दिसून येत आहेत. या नदींचे प्रदूषण रोखावे, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायत प्रशासकांना दिले. मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. घनकचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, यातून तयार झालेले लीचेट थेट नदी, नाल्यात मिसळून प्रदूषणाची तीव्रता वाढते. याबाबत कार्यवाही न केल्यास न्यायालयीन प्रक्रिया व जनआंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारला जाईल.
निवेदनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, महिला जिल्हासंघटक शांताबाई जाधव, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, युवराज पोवार, शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, दयानंद भोपळे,राजू बंडगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आजरा तालुकावासीय जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महामार्गाच्या निमित्ताने बेसुमार झालेली वृक्षतोड, सिमेंटचे तयार करण्यात येत असलेले रस्ते यामुळे वाढलेले तापमान आजरेकरांना असह्य होऊ लागली असून शहरवासीयांसह तालुकावासिय आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शहरामध्ये ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे.स्थानिक नळ पाणीपुरवठा योजनेसह महामार्गाच्या कामानिमित्त केलेल्या खुदाईमुळे शहर व आजूबाजूच्या गावामध्ये सर्वत्र धुळच धुळ दिसत आहे.
उन्हाची तीव्रता वाढेल तसतशा पाणीटंचाईच्या झळा बसू लागण्यास सुरूवात झाली असून जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत. शेती पिकांनाही पावसाची गरज निर्माण झाली आहे.
एकंदर आजरा शहरासह तालुकावासिय जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

आज रमजान ईद…
आजरा शहरामध्ये उलाढाल वाढली

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले महिनाभर सुरू असलेल्या रमजान महिन्या ची धामधूम अंतिम टप्प्यात आली असून आज रमजान ईद मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.
आजरा शहरांमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. ईदच्या पूर्वसंध्येला सौंदर्यप्रसाधने, तयार कपडे, किराणा मालाची दुकाने, मिठाई व सुक्या मेव्याची दुकाने गर्दीने भरून गेली होती. बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. बुधवार हा आठवडा बाजाराचा बंदचा दिवस असूनही बहुतांशी व्यापाऱ्यांनी ईदमुळे दुकाने उघडी ठेवली होती.
आज सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात येणार आहे.त्यानंतर अनेकांनी मेजवानीचे बेत आखले आहेत.
दुधाची टंचाई…
रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकडून शीरकुर्मा/खीर करण्यास प्राधान्य दिले जाते. खीर हे या सणाचे प्रमुख आकर्षण आहे. खीर तयार करण्यासाठी या कालावधीत दुधाची मागणी प्रचंड वाढते. याच कारणास्तव मुस्लिम बांधवांनी बुधवारी दूध खरेदीस मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिल्याने सायंकाळनंतर दुधाची मोठी टंचाई निर्माण झाली. अनेकांनी आजूबाजूच्या गावातून दूध संस्थांमधून दूध खरेदी केले.

मुनगंटीवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा…
इंडिया आघाडीच्या आजरा येथील कार्यकर्त्यांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा
जालना येथे झालेल्या प्रचार सभेत भाजपाचे नेते आणि राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत टीका केली. त्यातून त्यांची हीन मनोवृत्ती दिसून येत असून त्यांच्यावर कलम २९४ अंतर्गत कडक कारवाई करावी अन्यथा निवडणुकीनंतर त्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आजरा येथील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला असून याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र ही स्त्रियांचा आदर करणारी त्यांना सन्मान देणा-या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची व संतांची भूमी आहे. इथे कधीही विरोधी विचाराच्या किंवा पक्षांच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर अशा गलिच्छ आणि लाजेने मान खाली जाईल अशा भाषेत टीका झाली नाही. अशावेळी मुनगंटीवार यांनी केलेली टीका ही महामानवांच्या विचारांना काळीमा फासणारी आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर मुकुंददादा देसाई, संभाजी पाटील, अंजनाताई रेडेकर, कॉ. संपत देसाई, रवींद्र भाटले, युवराज पोवार, रशीद पठाण, दयानंद भोपळे, ओमकार माद्याळकर,अजित देसाई, विक्रम देसाई आदींच्या सह्या आहेत.

एसटीच्या नवीन फेऱ्या सुरू करा…
प्रवासी संघटनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा
आजरा आगाराकडून आजरा ते कोल्हापूर विना वाहक विना थांबा दिवसातून दोन बस फेऱ्यांसह आजरा ते पणजी मार्गावर बस फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात यासह आजारातील रेवदंडा ही शुक्रवारची बस फेरी सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने एस.टी.प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन इंदुलकर यांनी केली आहे.
आजरा कोल्हापूर मार्गावर विना थांबा, विना वाहक बस फेऱ्या नसल्याने सुमारे पावणेतीन तास या प्रवासाकरता घालवावे लागतात. विना थांबा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर गोव्यामध्ये व्यापार व पर्यटनाकरता जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. परंतु इथून थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने आजरा पणजी मार्गावर बस सेवा सुरू करावी. त्याचबरोबर शुक्रवारी आजरा ते रेवदंडा ही बस फेरी सुरू करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन आगार प्रमुखांना इंदुलकर यांनी दिले आहे.

‘जनता गृहतारण’ मध्ये गुढीपाडव्याला कोटींवर ठेवी : मोरे
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील जनता गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी ७ लाख ६१ हजार ७०० रुपयांच्या ठेवींचे संकलन झाले. आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली, पाटणे फाटा, चंदगड या सात शाखांमध्ये ठेवी जमा झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले.
याकामी संचालक, सर्व शाखांचे संचालक मंडळ, मुख्य कार्यालय अधिकारी, शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, असेही मोरे म्हणाले.




