
लाखाच्या मुद्देमालाची चोरी
दोघेजण ताब्यात

आजरा:प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग कामातील शटरिंग प्लेटांसह अँगल, कप लॉक यासारखे एक लाख रुपयांचे साहित्य चोरून नेणाऱ्या सांगली येथील दोघा चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून वाहतुकीसाठी वापरलेल्या छोटा हत्ती वाहनासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद यशवर्धन सुरेंद्रसिंह बिजारणीया ( सध्या रा. शिक्षक कॉलनी, आजरा मूळ पत्ता- झुनझुन, जिल्हा झुनझुन, राजस्थान) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बापू रामा गोसावी व विशाल विजय जाधव (दोघेही राहणार खणभाग, गोसावी गल्ली, सांगली, जि. सांगली) हे सध्या हट्टीबसवान गडहिंग्लज येथे राहत असून गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांनी मडीलगे ते गडहिंग्लज जाणाऱ्या रस्त्यावरील मडिलगे गावच्या हद्दीत महामार्गाचे असणारे सोल्जर अँगल कप लॉक असे सुमारे एक लाख रुपयाचे बांधकाम साहित्य छोटा हत्ती वाहनातून चोरून नेले असल्याची फिर्याद बिजारणीया यांनी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने तपास करून जाधव व गोसावी यांच्या कडून संबंधित साहित्य वाहतूक केलेल्या छोटा हत्ती वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांविरोधात विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.
आबाजी गेले…
सहकार व राजकारणातील दीपस्तंभ विझला…

आजरा:प्रतिनिधी
पेरणोली ता. आजरा येथील श्रीपती बचाराम देसाई उर्फ आबाजी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यातील सहकार राजकारण व समाजकारणातील एक साक्षीदार हरपला आहे.
गेले आठ दिवस देसाई हे आजारी होते. त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
त्यांची काल गुरुवारी राहत्या घरी पेरणोली येथे प्राणज्योत मालवली.
पेरणोलीचे माजी सरपंच, आजरा येथील जनता बँकेचे माजी चेअरमन, बळीराजा संस्था समूहाचे प्रमुख म्हणून देसाई यांची सहकार व राजकारणात ओळख होती. तालुक्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड होती.
स्व. राजारामबापू देसाई व स्व.बळीरामदादा देसाई यांच्या साथीने त्यांनी सहकारात आपले वेगळे वलय निर्माण केले होते. पेरणोली येथे अनेक सहकारी संस्था उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता.
त्याच्या पश्चात ,२ मुले,२ मुली, जावई, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
देसाई परिवाराला पंधरवड्यात दुसरा धक्का…
श्रीपतराव देसाई यांचे धाकटे बंधू मारुती देसाई यांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दरम्यान २९ फेब्रुवारी रोजी देसाई यांचे निधन झाले. पंधरवडाभरात दोन सख्ख्या भावांचे निधन झाल्याने देसाई कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा शालेय नाटयछटा स्पर्धा

आजरा: प्रतिनिधी
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे मराठी भाषा दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी भाषा दिनानिमित्त कै. शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मरणार्थ शालेय नाट्यछटा स्पर्धा व ग्रंथालयातील नविन पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ग्रंथालयाच्या संचालिका डॉ. अंजनी देशपांडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
शालेय नाट्यछटा स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कु. अंतरा कृष्णा पाटील – विद्यामंदिर होणेवाडी हिने मिळवीला व्दितीय क्रमांक कु. जान्हवी विश्वास कांबळे – विद्यामंदिर वाटंगी तर तृतीय क्रमांक कु. अन्वी राहुल नेवरेकर रोझरी हायस्कुल आजरा यांना मिळाला. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. आर्या संदिप वाटवे, आजरा हायस्कूल हिने मिळवीला. व्दितीय क्रमांक कु. ओवी विशाल रेळेकर, रोझरी हायस्कूल आजरा तर तृतीय क्रमांक कु. वेदिका विजय पोतदार,आजरा हायस्कुल आजरा यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना डॉ. अंजनी देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. आजरा तालुक्यातील विविध शाळातील ४५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री अनिल कांबळे व सौ. वृषाली वाळके यांनी काम पाहिले. यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ. गीता पोतदार, संचालक बंडोपंत चव्हाण, रविंद हुक्केरी, विजय राजोपाध्ये, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विद्या हरेर, प्रभाकर नेवरेकर, राजश्री पाटील, श्रध्दा वाटवे, सुनील कांबळे, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, निखिल कळेकर, शिवाजी नाईक, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

आजरा-आंबोली मार्गावर नागरिकांचे हाल…
धुळीचे साम्राज्य

आजरा : प्रतिनिधी
आजरा -आंबोली महामार्गावरील धुळीच्या साम्राजामूळे मार्गावरील दुकानदार,व्यापारी , प्रवाशांचे व नागरिकांचे हाल होत आहेत.धुळ मोठ्याप्रमाणात साचल्यामूळे सर्दी,ताप,खोकला या आजारांना आमंत्रण असल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे.
संकेश्वर ते बांदा महामार्गाचे जलद काम सुरू आहे.आजरा शहरातून आंबोली मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे.परंतु हे काम ठिकठिकाणी सुरू असल्याने कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे थर साचल्याने त्या परिसरातील नागरीक,दुकानदार,प्रवाशांना त्रास होत आहे.
हाळोली तिठ्ठयाजवळ पशुखाद्य व राईस शॉपी,किराणा दुकान,हाँटेल व्यवसायीकांना धुळीचा त्रास होत आहे. रस्ता बांधकाम करताना त्या रस्त्यावरील अगोदर पुलांचे व मो-यांचे बांधकाम पूर्ण करुन नंतर पहिल्या रस्त्याची खुदाई केली जाते.मात्र हाळोली तिठ्ठयाजवळ रस्त्याची खुदाई ऑक्टोंबर २०२३ मध्येच केली असून मोऱ्या व पुलाचे बांधकाम नंतर सुरु केले आहे. हा दुजाभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे.यामुळे गेल्या ऑक्टोंबर पासून लाल धुळीमूळे व मातीमुळे नागरिक व व्यावसायिकांचे आरोग्य बिघडले आहे.धुळीमुळे एकीकडे आरोग्य बिघडले असून दुसरीकडे दुकानातील खाद्यपदार्थ धुळ साचल्यामुळे विक्री करणे अडचणीचे ठरत असून बऱ्याच वेळा व्यवसाय बंद करावा लागत आहे. यामुळे आर्थिक तोटा व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.त्यामूळे आजरा शहरातील कामाप्रमाणे आंबोली मार्गावर कामाच्या ठिकाणी पाणी मारण्याची मागणी करण्यात येत आहे.
महामार्गाच्या कामात प्रथम पूलाचे काम करून नंतर पूर्वीचा रस्ता खुदाई करण्यात येतो.मात्र हाळोली तिठ्ठयाजवळ अगोदर रस्ता खुदाई करून पूलाचे काम करण्यात येत असल्याने सातत्याने धुळीचे साम्राज्य तयार होत आहे.याबाबत महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.याची दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यावसायिक डाँ.धनाजी राणे यांनी दिला आहे.

वझरे येथे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू

आजरा: प्रतिनिधी
ग्रामपंचायत मौजे वझरे (घागरवाडी,खोतवाडी, बाबरवाडी ) आणि अनंत शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था, गडहिंग्लज यांचे संयुक्त उपक्रम पंधरावा वित्त आयोग महिला व मुली याना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू झाला आहे.फॅशन डिझाईन प्रशिक्षण आणि बांबू पासुन विविध हस्तनिर्मित प्रशिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक ‘अनंत शिक्षण’चे अध्यक्ष उदय इंदुलकर यानी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप गुरव होते. स्वागत प्रास्ताविकपर भाषणात इंदुलकर यांनी समस्त महिलां व मुलींना कौशल्य विकास चांगल्याप्रकारे प्रशिक्षण घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनले पाहीजे.रोजगार व स्वयं रोजगार सुरू केले पाहिजेत असे सांगितले.
संस्था समन्व्यक वंदना काटकर यांनी प्रशिक्षण कसे घेतले जाणार याबाबत सविस्तर महिती दिली.अध्यक्षीय भाषाणामध्ये संदीप गुरव यानी महिलांनी व मुलींनी चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊन व्यवसाय वृद्धी करून दाखवावी असे आवाहन केले.प्रशिक्षिका म्हणून सौ. शुभांगी बुट्टे व सौ.आशा सांगावकर प्रशिक्षण देणार आहेत.
यावेळी ‘अनंत शिक्षण’च्या सचिव वैशाली इंदुलकर,संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी महिला बचत गट, महिला व मुली ग्रामस्थ वझरे गावातील महिला व ग्रामसेवक सुहास देसाई उपस्थित होते.
आभार प्रदर्शन महादेव काटकर यांनी केले.


