mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


बोगस बिगर शेती…
बोगस डायऱ्या…

बोगस फेरफार…

वरदहस्त कोणाचा…?

                    आजरा:प्रतिनिधी

      लँडमामाफीयांना हाताशी धरून नगररचना विभागासह विविध शासकीय विभागांच्या आदेशांना कचऱ्याची पेटी दाखवत आजरा येथील महसूल विभागाच्या तत्कालीन स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बिगर शेती प्रकरणांचा घातलेला गोंधळ अद्याप सुरूच असून याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती नेमकी काय करत आहे व यातून काय निष्पन्न झाले…? या सर्व प्रकाराला वरदहस्त कोणाचा…? याचा समिती अहवाल काय…? या सर्व बाबी अद्याप उघड झाल्या नसल्याने याचा सर्वसामान्यांना त्रास होत असून नगररचना विभागाच्या आदेशाशिवाय, खरेदी विक्री व्यवहार बंद झाले असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

      गेले सहा महिने सुरू असलेल्या मुक्ती संघर्ष समितीच्या बोगस बिगर शेती  प्रकरणी आंदोलनामुळे बिगर शेती प्रकरणातील महसूल विभागाची लक्तरे वेशीवर आली आहेत. ग्रीन झोन मधील जमिनीचे बिगर शेती आदेश काढणे, ओपन स्पेस न सोडणे, नाला शेड बॅक न सोडणे, रस्ता शेड बॅक न सोडणे, ग्रामपंचायतींचे ना हरकत दाखले नसणे, बंध पत्र नसणे, मूळ रेखांकन बदलून बिगर शेतीचे आदेश करणे, संशयास्पद पद्धतीने गट नंबर मधील फेरफार घालणे, सातबारा नोंदीं, सर्वच संशयाच्या भोव-यात असून गेल्या दोन-चार वर्षात झालेल्या बिगर शेती आदेश प्रकरणांची दफ्तर तपासणी होण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मुक्ती संघर्ष समितीने हा प्रश्न उचलून धरला आहे. पण अद्यापही या प्रकरणांचा चौकशी अहवाल बाहेर न आल्याने याला नेमका वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

     बिगर शेती प्रकरणांचे बोगस आदेश देण्या बरोबरच चुकीच्या नोंदी घालणे, फेरफार नोंदी घालणे , डाय-या घालणे, पोटहिस्से करणे असे प्रकार करणाऱ्या व जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी होण्याची गरज आहे. नव्याने नियुक्ती झालेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी संबंधितांना न्याय देणार का? याकडे आता तालुकावासीयांचे जिल्हा लक्ष लागून आहे.

    या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने पुढे काय केले या प्रश्नाचे उत्तर तालुकावासीय शोधत आहेत.

आता थेट आयुक्तांना भेटणार…

    चौकशीची मागणी करून, वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आजरा तालुक्यातील बिगर शेती प्रकरणांच्या प्रत्येक आदेशानुसार त्यासाठी जोडलेल्या कागदपत्रांच्या कसून चौकशीसाठी थेट आयुक्त यांना सतिश जोशी , अँड.वनराज शिंदे ,आणि संघटनेचे प्रतिनिधी भेटणार असल्याचे मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत यांनी सांगितले.

मस्तवाल कर्मचारी… आणि हतबल प्लॉट धारक

    लाखो रुपये कमवण्याच्या नादात बोगस व चुकीच्या पद्धतीने बिगर शेती प्रकरणांचे आदेश करून नागरिकांना अडचणीत आणण्याचा जबाबदार असणारे कांही कर्मचारी आजही निर्लज्जपणे वावरताना दिसतात. यातील संबंधितांनी प्रचंड माया गोळा केली असली तरी घरांची स्वप्ने पाहणारे सर्वसामान्य प्लॉट धारक हतबल झालेले दिसतात. प्लॉटची खरेदी विक्री होत नसल्याने ॲडव्हान्स रकमा अडकून पडल्या आहेत तर बोगस बिगरशेती आदेशामुळे बांधकाम परवाना मिळवतानाही अडचणी येत आहेत.

८५ सेक्शन कलमाचा गैरवापर…

     आपण कायदे पंडित आहोत असा आव आणत ८५ सेक्शन कामाचा महसूल विभागातील कर्मचाऱ्याने गैरवापर करून कांही जमिनींची विल्हेवाट लावली असल्याचीही चर्चा आता सुरू आहे. हे सर्व करण्यात आघाडीवर असणारा हा महसूल विभागाचा कर्मचारी मात्र नामानिराळा राहू पहात आहे.

महसूल विभागाची बदनामी…

       या प्रकरणातील एका जबाबदार कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण महसूल विभागाची बदनामी होऊ लागली आहे. केवळ कांही कर्मचाऱ्यामुळे  वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. करणारे वेगळे आणि भरणारे वेगळे अशी परिस्थिती महसूल विभागाची झाली आहे. नव्याने आलेले तहसीलदार, नायब तहसीलदार यांना विशेषतः नाहक हा त्रास सहन करावा लागत आहे.


विहिरीवरील मोटरची चोरी


                  आजरा:प्रतिनिधी

       निंगुडगे ता. आजरा येथील दिनकर संतू कांबळे यांच्या शेतातील विहिरीवरील मोटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. कांबळे यांच्या म्हारकी नावाच्या शेतात सदर प्रकार घडला याबाबतची फिर्याद कांबळे यांनी आजरा पोलीसांत दिली आहे.


आजरा कारखान्याची दि.१६ ते ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा


                    आजरा : प्रतिनिधी

     वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आजरोजी दोन लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले. कारखान्याकडे दि.१६ ते ३१ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले विनाकपात ऊस पुरवठा शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली.

      कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन नवनिर्वाचीत व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेला ऊस वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी केले.

      यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, प्र.कार्यकारी संचालक व्ही.के.ज्योती व अधिकारी उपस्थित होते.





उत्तुरच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

बँक ऑफ इंडियाच्या कारभाराबाबत नाराजी…


                    उत्तुर: प्रतिनिधी

      प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तुर येथे झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमनगी होते.

      ग्रामविकास अधिकारी पी. के. पाटील यांनी मागील सभेचे इतीवृत्त वाचन केले. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, समरजीत घाटगे, एल. आय. सी., वसंतराव धूरे यांच्या अभिनंदनाचे ठराव ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी मांडले. त्याचबरोबर आयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विठ्ठल उत्तुरकर, अतिश देसाई, मंदार हळवणकर, प्रवीण लोकरे, सचिन उत्तुरकर, संतोष रावण, प्रदीप लोकरे, बाळासाहेब सावंत, प्रवीण जवाहिरे यांनी विविध विषयांवर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. पाणी पट्टी, घरफाळा थकीत ठेवणाऱ्यावर यापुढे कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.

      याप्रसंगी उप-सरपंच सौ. समिक्षा देसाई यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

‘बँक ऑफ इंडिया’ ला पर्यायी बँकेची गरज …

     ग्राम सभेत कृषी योजनेसंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी उपस्थित राहिलेले बँक ऑफ इंडिया चे अधिकारी सागर शिंदे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बँक ऑफ इंडियाच्या कामकाजाबाबत येथील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत मात्र त्यांची योग्य दखल घेतली जात नाही. बँकेचे कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नाहीत. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यामूळे तुमच्या योजना सांगण्यापेक्षा बँकेत येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक द्या असे सांगत नागरिकांनी शिंदे यांना धारेवर धरले. बँक ऑफ इंडिया ला पर्याय म्हणून दुसरी राष्ट्रीयीकृत बँक उत्तुर मध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी सरपंच किरण आमनगी यांना केली.


जलजीवन’योजनेत वाढीव पाईपसह नळ जोडण्यांना मंजुरी मिळावी

समरजितसिंह घाटगे यांना भाजपचे निवेदन

                    उत्तूर : प्रतिनिधी

       येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये वाढीव पाईपसह नळ जोडण्यांना मंजुरी मिळावी, याबाबतचे निवेदन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिले.
श्री घाटगे यांनी या वाढीव कामासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करू. अशी ग्वाही दिली.

       येथे बारा कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेमध्ये गावातील संपूर्ण पाईपलाईन नव्याने घालणे आवश्यक असताना काही भागात जुनीच पाईपलाईन वापरण्याचे नियोजन आहे. मात्र नवीन योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या पाईप ला वारंवार गळती लागून पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दहा किलोमीटर नवीन वाढीव पाईपलाईन व त्यावर जादा सहाशे नळ कनेक्शनची गरज आहे. ही वाढीव पाईपलाईन व नळ कनेक्शन मंजूर व्हावेत,यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करावा,अशी विनंती निवेदनाद्वारे श्री घाटगे यांना केली आहे.

      निवेदनावर शहर अध्यक्ष प्रदिप लोकरे, शहर उपाध्यक्ष भास्कर भाईंगडे, मंदार हळवणकर, संदेश रायकर,अतिषकुमार देसाई,विठ्ठल उत्तूरकर, धोंडीराम सावंत,प्रशांत पोतदार, बाळासाहेब सावंत, प्रवीण लोकरे, धनाजी उत्तुरकर, अमित जाधव, अभिजीत आरेकर, शरद ढोणुक्षे,दीपक अमनगी आदींच्या सह्या आहेत.


रामकृष्ण मगदूम यांच्या कादंबरीस राज्यस्तरीय ‘मनबोली ‘पुरस्कार

                    उत्तुर: प्रतिनिधी

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदीर, चिपळूण यांचे वतीने कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देणेत येणारा ‘ मनबोली’ हा उत्कृष्ट कादंबरीसाठी चा सन २०२२- २३ वर्षातील राज्यस्तरीय पुरस्कार धामणे ता. आजरा येथील लेखक रामकृष्ण मगदूम यांच्या ‘कलविण ‘या कांदबरीसाठी प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे हस्ते व कवि अरूण इंगवले यांचे उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर सभागृह चिपळूण येथे रामकृष्ण मगदूम यांना सन्मानित करणेत आले.


उत्तूर येथे राष्ट्रीय मतदार दिन संपन्न


                    उत्तूर: प्रतिनिधी

      येथील उत्तूर ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शैलेंद्र आमणगी होते.

      प्रमुख पाहुणे म्हणून उत्तूर गावचे तलाठी एकनाथ मिसाळ उपस्थित होते.यावेळी मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. प्रा. दत्तात्रय मुदाळकर यांनी बोलताना लोकशाही मजबूत करण्यासाठी या देशात जागृत मतदारांची गरज आहे’ असे मत मांडले. आर.डी. महापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनी रेवती मांडे व सुलक्षणा पावले यांनी आपले विचार भाषणातून मांडले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य शैलेंद्र आमणगी सर यांनी विद्यार्थ्यांनी आपली नावे मतदारयादीत नोंदवून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी संतोष व्हनबट्टे तसेच इयत्ता ११ वी आणि १२वी चे सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी सावरतकर यांनी केले तर निवडणूक विभागाची प्रतिज्ञा वाचन व आभार प्रा. किरण मस्कर यांनी मानले.


भोताल...

दर्शन माळ मुक्त गळा, अनं पडली मुक्त देव्हारा–

बेळगूंदी येथे झाले जटा निर्मूलन

                    आजरा: प्रतिनिधी

       सत्तर वर्षाच्या आजीबाई, रेणुका मातेच्या, असीम भक्त असून ,लहानपणापासून त्याना जट आहे .साधारण चाळीस वर्षांपूर्वी जटा काढून घेतल्या परंतु पुन्हा जटा तयार झाल्या .वाढतं वय आणी शारीरिक थकवा, यामुळे जटेची समस्या लक्षात आल्याने, गावच्या सरपंच सौ.शामल शनवक्के याच्या पुढाकारातून गाव जटा मुक्त होण्यासाठी डाॅ. सुदाम हारेर याच्या प्रबोधनातून श्रीमती शांता लक्ष्मण लोहार याच्या जटा निर्मूलन करण्यात आल्या.

       यावेळीअंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते पांडूरंग करंबळकर यानी शांता लोहार याना मार्गदर्शन केले. त्यानी जटा व गळ्यातील दर्शन माळ आणी देव्हा-या वरील पडली दान करून कर्मकांडातून मुक्त झाल्या बदल त्याचा साडी देवून सत्कार करण्यात आला .

       यावेळी काॅ. संजय घाटगे यांनी राबणा-या कष्टकरी, गरिब, मागासवर्गीय जनतेच्या घरात या श्रध्दा लपलेल्या असून उच्च वर्णीय समाजात व श्रीमंत घराण्यात स्वच्छता व सकस आहारामुळे केसाचे आजार होत नाही. यावेळी तानाजी कुरळे यानी जटामुक्त तालूका होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

       यावेळी शिवाजी भगुत्रे, निनाद बुगडे, मुलगा कृष्णा लोहार, सून जयश्री लोहार उपस्थित होते. आभार सुप्रिया लोहार यानी मानले.


छायावृत्त…
रस्ता की डर्ट ट्रॅक…?


        आजरा बस स्थानक ते एस.टी.आगार या मार्गावरील महामार्गाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था डर्ट ट्रॅक सदृश्य झाली आहे या मार्गावरून जाताना अवजड, चार चाकी व दुचाकी वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागत आहे.


निधन वार्ता
मारुती देसाई

      शिरसंगी ता.आजरा येथील रहिवासी व आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक ह.भ.प. मारुती शंकर देसाई (८२)यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवार दिनांक २ रोजी रक्षा विसर्जन होईल.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!