


पाणीप्रश्नी नगरपंचायतीत धूमशान
नवीन पाणी योजनेबाबत दोन दिवसात बैठक

आजरा: प्रतिनिधी
प्रशासनाच्या मनमानीमुळे शहरवासीयांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. स्थानिक अन्याय निवारण समितीकडून मोर्चाचा इशारा देऊनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करत शहरवासीयांनी आज नगरपंचायत महामार्गाचे अधिकारी यांना अक्षरशः धारेवर धरले. आजरा शहरातील नवीन पाणी योजनेबाबत कोणताही ताळमेळ दिसत नाही. ही योजना नेमकी कशी आहे याबाबत नागरिकांना माहीती मिळावी. ही योजना किती कालावधीत पूर्ण होणार याची सर्वंकष माहीती मिळावी. तातडीने सदर माहिती न मिळाल्यास नगरपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आजरा अन्याय निवारण समितीमार्फत मंगळवार (ता. ३०) आजरा नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीचे शिष्टमंडळ व नगरपंचायत प्रशासन यांची आज बैठक झाली. हा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. यावेळी संकेश्वर- बांदा महामार्गाचे अधिकारीही उपस्थित होते. आजरा शहरात महामार्गाच्या बांधकामामुळे पाणीबाणीची स्थिती तयार झाली आहे. नागरीकांना दोन दिवसातून एकदा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीकांच्यात संताप व्यक्त होत आहे. सतत जलवाहीन्या फुटत असल्याने पाणी मिळणे अडचणीचे बनले आहे. याबाबत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे यांनी लक्ष वेधले. नवीन पाणी योजना कशी आहे. यावर किती खर्च होणार आहे. याची सर्वकष माहीतीही अधिकाऱ्यांनी दयावी अशी मागणी केली.
महामार्ग प्रशासनाने शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी एक टैंकर दिला होता. आता नागरीकांची अडचण लक्षात घेवून त्यामध्ये वाढ करून आठ टँकर करण्याचे ठरले. नवीन पाणी योजनेबाबत वरिष्ठ अधिकारी श्री. जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याने या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील बैठकीला मुख्याधिकारी उपस्थित न राहील्यास नगरपंचायतीला टाळे ठोकले जातील असा इशारा या वेळी देण्यात आला.

दोन दिवसात मुख्याधिकारी यांच्या उपस्थित बैठक लावण्याचे ठरले. वरिष्ठ कारकून संजय यादव, विजय थोरवत, नाथा देसाई, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर,अशोक गाईंगडे ,वाय. बी. चव्हाण,वाया.जी.इंजल,अमानुल्ला आगलावे, दीपक बल्लाळ, राजू विभूते, समीर मोरजकर, प्रकाश सावंत, जावेद पठाण,कुदरत लतीफ ,मारियान डिसोजा, इत्यादी रहिवासी उपस्थित होते.
पाणी कोणते देता…
पाणी प्रश्नी नागरिकांकडून महामार्ग अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला जात असताना गुरु गोवेकर यांनी टँकर मधून दिले जाणारे पाणी कोणते आहे? उद्या या दूषित पाण्यामुळे आजार झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला तर हे पाणी तपासून घेतले आहे का? असा प्रश्न नौशाद बुड्डेखान यांनी केला.
मुख्याधिकारी अनुपस्थित…
आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी नेहमीप्रमाणे शहरवासीयांसमोर जाण्याचे टाळल्याचे आजही स्पष्ट झाले. संजय यादव वर्धा कोणीही अधिकारी नसल्याने शहरवासीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे वाटोळे….
नगरपंचायतीच्या काही कारभाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारांकडून नवीन पाणीपुरवठा योजनेचे वाटोळे केले जात असल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य विजय थोरवत यांनी केला.



आजही दूध उत्पादक हा उपेक्षितच
अँड संतोष मळवीकर यांचे प्रतिपादन

आजरा:प्रतिनिधी
दिवसभर राबणारा दूध उत्पादक हा उपेक्षितच असून दूध संस्था व दूध संघाचे संचालक मात्र गडगंज झाल्याचा आरोप अँड.संतोष मळवीकर यांनी कोळींद्र येथील समाजसेवक नरसू शिंदे संस्थेमार्फत दूध उत्पादकांच्या सत्कार समारंभात कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वंदना सावंत होत्या.
स्वागत व प्रस्ताविक सुरेश बुगडे यांनी केले. यावेळी मळवीकर म्हणाले, शेतकऱ्यांनी फक्त राब राबून दूध संस्थांना मोठ करण्यापेक्षा दूध दही तूप खाऊन व बाया बापड्यानी अंगावर एक दोन तोळे सोने वापरून जगण्यास शिकावे असा सल्लाही यावेळी उपस्थितांना दिला. विजय तोडकर यांनी व नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी नेसरीकर यांनी वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या समाजसेवक नरसू शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले . यावेळी आजरा गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येक गावातील आदर्श दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला.
यावेळी अजित तुरटे, बाळासाहेब नवलगी, महादेव कुडव ,विनायक पाटील, केडीसीसी किणे शाखेचे शाखाधिकारी विजय कांबळे माजी जि प सदस्या संजीवनी गुरव, आनंदा सुतार, भिकाजी गोंधळी , सुधाकर घोरपडे अमर मटकर ,अक्षय फडके , शिवाजी भगुद्रे, अशोक भालेकर, सौ. सुनीता पवार, माजी उपसरपंच जयराम संकपाळ, विष्णू वाके, विशाल रेळेकर, विलास राजाराम उपस्थित होते.
हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन सुरेश सावंत यांनी आभार मानले.



मडीलगे येथे माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण…

आजरा:प्रतिनिधी
मडिलगे त्या.आजरा येथे माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गाव सभा व विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पार पडला.
सारथी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. गावातील विकास कामात सहकार्य केलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार सरपंच बापू नेउंगरे यांनी मानले. खासदार संजय मंडलिक व समरजितसिंग घाटगे यांच्या सहकार्याने दहा दहा लाख रुपये इतका रस्ते विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सुशांत गुरव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



तालुक्यातील तलाठी चावडी बाधकामे पूर्ण करा :शिवसेना

आजरा:प्रतिनिधी
लेखाशीर्ष ४०:५९ मधून अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण भागातील तलाठी चावडी बांधकाम करणेबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्फत आजरा तालुक्याला निधी मिळाला आहे .आजरा तालुक्यातील ब-याच चावडीची कामे अपूर्ण अवस्थेत असून त्या ठिकाणी लाईट फिटिंग, वीज मीटर सारखी कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
काही ठिकाणी चावडीचे बांधकाम वर्षभरापूर्वी झाले असून लाईट अभावी त्या ठिकाणी प्रत्यक्ष महसूल कार्यालयाचे कामकाज चालू झालेले नाही. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला तोंडी सूचना देवूनही या कार्यालयाने संबंधित कामकाज पूर्ण करून पेतलेली नाहीत, तेव्हा १० दिवसात संदर अपूर्ण राहिलेशी कामे पूर्ण करून प्रत्यक्ष चावडीचा ताबा द्यावा, अन्यथा लोकशाही मागनि कार्यालयावरती सदरचा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन केले जाईल. असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व कार्यकर्त्यांनी दिला आहे.



उद्योग मार्गदर्शन मेळावा…

उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर व घनसाळ राईस मिल क्लस्टर एमआयडीसी, आजरा यांच्या वतीने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजता उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.



सचिव प्रशिक्षण कार्यक्रम

कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या वतीने विकास सेवा संस्था सचिव प्रशिक्षण कार्यक्रम बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण तपस्वी डॉ. जे. पी. नाईक पतसंस्था सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सदर कार्यक्रम होणार असून या प्रशिक्षणामध्ये सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.




