mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार दि.१९ सप्टेंबर २०२६

‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांना आजऱ्यात अभिवादन

 

Oplus_131072

आजरा : प्रतिनिधी

आजऱ्याचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांना २४ व्या स्मृतिदिनानिमित्त आजरा शहर व परिसरात अभिवादन करण्यात आले.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अण्णाभाऊ सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संभाजी इंजल यांनी ‘मृत्युंजय’कारांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी चंद्रशेखर बटकडली, आप्पासाहेब पावले, विनायक आमणगी, सौ. विद्या हरेर, सौ. सुचिता गड्डी, बंडोपंत चव्हाण, विलास जोशीलकर, जी. एम. पाटील, रवींद्र हुक्केरी, जितेंद्र शेलार, महम्मदअली मुजावर, चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मृत्युंजयकार शिवाजीराव स्मृती दालनामध्ये शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी युवराज पोवार यांनी मृत्युंजयकारांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला.

यावेळी ज्योतिप्रसाद सावंत, सुनील पाटील, बापू पारपोलकर, महेश पाटील, रंगराव माडभगत, प्रथमेश खोत, रोहन गिरी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्येही मृत्युंजयकारांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

‘व्यंकटराव ‘ शिक्षण संकुल

येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात प्रशालेचे माजी विद्यार्थी ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक श्री. सुधीर जाधव यांचे शुभ हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष श्री कृष्णा पटेकर, सचिव श्री अभिषेक शिंपी,संचालक सचिन शिंपी, प्राचार्य श्री एस एन पाटील, श्री महेश शिंपी, प्राध्यापक श्री विकास सुतार, शिक्षकेतर कर्मचारी श्री हवेश देसाई आदी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सुधीर जाधव यांनी सांगितले की शिवाजीराव सावंत हे शिवाजीनगर येथील आपल्या निवासस्थानाजवळ लागूनच राहत असल्याने त्यांच्या जडणघडणीतील काही गोष्टी चर्चेच्या रूपातून सांगितल्या. उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांनीही शिवाजीराव सावंत आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी असताना त्यांच्यातील अपार उत्साह, नाटकातील सहभाग, कबड्डी मधील विशेष कौशल्य, तसेच लेखनातील उत्तरोत्तर होणारी प्रगती या शाळेने पाहिल्याचे सांगितले.. त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण मृत्युंजय कादंबरी ही अनेक भाषांमध्ये भाषांतरित होऊन जगभर पसरली.. आणि आपला व्यंकटराव हायस्कूलचे नाव साता समुद्रापार पोहोचवले.

आजरा हायस्कूल

आजरा हायस्कूलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच संस्थेचे संस्थापक माधवराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी , पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे  व शिक्षकांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. पी. पाटील यांनी केले.

यावेळी माधवराव देशपांडे यांच्या कार्यकर्तृत्वावर सौ. व्ही. पी. हरेर यांनी, तर ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या साहित्यिक योगदानावर सौ. शेलार यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी बी. पी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

महिलांना संधी मिळाल्यास गावात विकासगंगा अवतरेल – सुनील कोंडुसकर

एरंडोळ : प्रतिनिधी

महिलांकडे प्रचंड कष्ट करण्याची क्षमता असून त्यांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करू शकतात. महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्यास गावा-गावात विकासरूपी गंगा अवतरेल, असे प्रतिपादन सुनील कोंडुसकर यांनी केले.

एरंडोळ येथे डॉन बॉस्को, गोवा आणि सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या WeLead या कार्यक्रमांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच भीमराव माधव होते, तर कॉ. संपत देसाई प्रमुख उपस्थितीत होते.

सुरुवातीला प्रकाश मोरुसकर यांनी स्वागत व प्रस्तावना करून WeLead कार्यक्रमाची भूमिका विशद केली. WeLead हा पंचायत राज सक्षमीकरण, बळकटीकरण व नेतृत्व घडविणारा कार्यक्रम असून महिला नेतृत्व घडविण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना कोंडुसकर म्हणाले, स्त्रियांना कायमच दुय्यम स्थान दिले जाते. मात्र आता त्या हे दुय्यमत्व झुगारून पुढे येत आहेत. अशा कार्यक्रमातून त्यांना प्रोत्साहन मिळते. महिलांनी कोकण विकास सोसायटी, पणजी मार्फत दिले जाणारे पंचायत राज विषयक परिपूर्ण प्रशिक्षण घेऊन नेतृत्वगुण विकसित करावेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत नेतृत्व करून पर्यावरणाचा समतोल राखणारा शाश्वत विकास साधावा.

गावातील महिलांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभागी होऊन शाळा, आरोग्य, विकास कामांवर चर्चा करून प्रश्न सोडवून घ्यावेत. ग्रामसभा ही सर्वोच्च असून तेथे बहुमताने मंजूर झालेल्या विषयांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, स्त्रियांच्या अंगी व्यवस्थापन कौशल्य असते, पण समाजकारण आणि राजकारणात संधी मिळत नसल्याने त्या कर्तृत्व दाखवू शकत नाहीत. कुटुंबाचे व्यवस्थापन करणारी स्त्री गावचाही कारभार उत्तम करू शकते.

अध्यक्षीय भाषणात भीमराव माधव यांनी स्त्रियांना राजकारणात संधी मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.

या मेळाव्यास गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवानिमित्त उत्तूरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

उत्तूर : प्रतिनिधी

गणेशोत्सव २०२६ निमित्त उत्तूरमधील विविध सार्वजनिक मंडळांनी क्रीडा, सांस्कृतिक व महिलासाठी स्पर्धांचे आयोजन केले आहे. बाजारपेठ मित्र मंडळातर्फे २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता १४ वर्षांपर्यंत, १४ ते १७ वर्षे व खुल्या गटासाठी २, ३ व ५ कि.मी. अंतराची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.

अवधूत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, इंदिरानगर-उत्तूर यांच्यातर्फे त्याच दिवशी सकाळी ९ वाजता खुली बुद्धिबळ स्पर्धा होणार प्रत्येक वयोगटासाठी रोख रक्कम व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
हनुमान तरुण मंडळातर्फे २० व २१ सप्टेंबरला कॅरम स्पर्धा, तर २३ सप्टेंबरला कराओके गीतगायन स्पर्धा होणार आहे.समता तरुण मंडळातर्फे २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान रस्सीखेच, झिम्मा-फुगडी, होम मिनिस्टर व रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

आदर्श युवा ग्रुप, पागार गल्ली येथे २० सप्टेंबरला होम मिनिस्टर, २२ सप्टेंबरला ओवाळणी व बाबा जोरात काढली वरात हे सजीव देखावे, तर २१ सप्टेंबरला महाप्रसाद होणार आहे. मराठा गणेश उत्सव मंडळातर्फे २० सप्टेंबरला हिप्नोटिझम कार्यक्रम आणि २४ सप्टेंबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंडळांच्या या कार्यक्रमांमुळे गणेशोत्सव काळात उत्तूरमध्ये क्रीडा, कला व मनोरंजनाला व्यासपीठ मिळणार असून नागरिकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळांतर्फे करण्यात आले आहे.

अखेर उत्तुर बस स्थानकाचे बांधकाम सुरू होणार

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम सुरू करणार असल्याचे पत्र आंदोलनकर्ते कॉ. शिवाजी गुरव (अध्यक्ष प्रवासी संघटना)  व आंदोलनाचा इशारा देणारे ग्रामपंचायत उत्तूरचे सदस्य संभाजी कुराडे यांना लेखी पत्र दिले आहे.

उत्तुरच्या ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी लावलेला रेटा, उत्तूर गावसभेतून बांधकाम सुरू करण्याबाबतचा ठराव,  वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक त्या बैठकीत झालेली सकारात्मक चर्चा व निर्णय, महामंडळाची सध्याची योग्य भूमिका, ग्रा.पं.ने दिलेला योग्य प्रतिसाद या सर्व गोष्टीचा विचार झाला व बांधकाम प्रत्यक्ष चालू होत आहे असे गुरव यांनी सांगितले.

​आजरा येथील २५ सप्टेंबरचा आठवडी बाजार दुपारी २ वाजेपर्यंतच भरणार

​आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरातील आगामी शुक्रवारी (दिनांक २५ सप्टेंबर २०२६) होणारा आठवडी बाजार दुपारी २:०० वाजेपर्यंतच भरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘आजरा शहर एकसंघ व्यापारी असोसिएशन’, नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त चर्चेत घेण्यात आला आहे.

​नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. परेश पोतदार, आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सरवदे साहेब आणि ‘आजरा शहर एकसंघ व्यापारी असोसिएशन’ चे प्रमुख पदाधिकारी यांच्यात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय निश्चित करण्यात आला.

​या निर्णयानुसार, सर्व व्यापारी बांधवांनी २५ सप्टेंबर रोजी आपला बाजार दुपारी २:०० वाजेपर्यंतच पूर्ण करून प्रशासनाला व असोसिएशनला सहकार्य करायचे आहे. स्थानिक नागरिक, ग्राहक आणि सर्व व्यापारी वर्गाने या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन ‘आजरा शहर एकसंघ व्यापारी असोसिएशन’ च्या वतीने करण्यात आले आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १९ सप्टेंबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (दुपारी ०१.०० पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (रात्री १०.४४ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : आयुष्मान योग (दुपारी ०१.३४ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : भाव करण (दुपारी ०१.०० पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३० ते सकाळी ११.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०८ ते दुपारी १२.५६
सूर्योदय : सकाळी ०६.२८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८४ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता

लक्ष्मीबाई  पुंडपळ

आरदाळ तालुका आजरा येथील लक्ष्मीबाई जानबा पुंडपळ ( वय ९७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे यासह मोठा परिवार आहे.

ॲनू डिसोझा

वाटंगी तालुका आजरा येथील ॲनु पास्कू डिसोजा (वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या डॉक्टर रोजारिओ  डिसोजा यांच्या आई व डॉक्टर अनिता डिसोजा यांच्या सासू होत. त्यांच्या पक्षात मोठा परिवार आहे. अंत्यविधी आज शनिवारी सकाळी ११ वाजता वाटंगी घेते करण्यात येणार आहेत.

गणेश दर्शन…

भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ,आजरा

अध्यक्ष : श्री आनंदा वासुदेव फडके
उपाध्यक्ष : उमेश मनोहर पारपोलकर
सचिव : रमेश बाळकू बुरुड
खजिनदार : रामचंद्र मधुकर पाचवडेकर

मराठा गणेशोत्सव मंडळ, उत्तूर

अध्यक्ष : सुनील आपके

उपाध्यक्ष : श्री बाळासाहेब शिंदे
खजिनदार : श्री संतोष कुराडे
सचिव : श्री सतीश सुतार
मिडिया प्रमुख : हणमंत शिवाजी भादवणकर .

श्री हनुमान तरुण मंडळ, उत्तूर

अध्यक्ष : श्री.महेश करंबळी.
उपाध्यक्ष : श्री.दीपक रावण.
सचिव : श्री.पुंडलिक पाटील
खजिनदार : श्री.संतोष आमणगी.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेद्रेवाडीत हत्ती…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!