
आजरा साखर कारखान्यासाठी ६१ टक्के मतदान
मडिलगे केंद्रावर गॉधळ

आजरा: प्रतिनिधी
आजरा सहकारी साखर कारखाना लि. गवसे या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६०.६८ टक्के मतदान झाले. मडिलगे केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या संशयावरून गोंधळ झाला. हा प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. काही केंद्रावर मतदानावरून शाब्दिक बाचाबाची झाली.
आजरा साखर कारखान्यासाठी २५ हजार १८१ इतके अ वर्ग तर ७ हजार ६०३ इतके ब वर्ग सभासद असे मिळून एकूण ३२ हजार ७८४ इतके सभासद आहेत. यापैकी १९ हजार ८६६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त इटे येथील मतदान केंद्रावर ७९.८६ इतके मतदान झाले. तर भादवण येथील केंद्र क्रमांक ६३ वर ५७. ६६ इतके मतदान झाले. गतवेळाच्या तुलनेने यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत मतदान घटले आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांची श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून रवळनाथ शेतकरी विकास आघाडी तयार केली होती. निवडणुकीच्या निमित्ताने गेले पंधरा दिवस तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.

कारखान्याच्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण २० जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. या ४७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून पंचायत समितीच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मडिलगे मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार
तिघेजण ताब्यात

आजरा: प्रतिनिधी
मडिलगे (ता. आजरा) येथील मतदान केंद्र १७ व १८ यावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार घडला . यामुळे केंद्रावर मोठे तणावाचे वातावरण तयार झाले होते. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. उमेदवारांच्याकडून केंद्राध्यक्षाना धारेवर धरण्यात आले. या प्रकरणी संबंधीतावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजप, काँग्रेस व सेनेच्या चाळोबादेव विकास आघाडीच्या प्रमुखांनी केली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर तणाव निवळला.
मडिलगे येथे मतदान केंद्र १७ व १८ यावर मतदान प्रतिनिधी संदिप पाटील यांना तिघेजण बोगस मतदानाचा प्रयत्न करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या जवळ बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्स प्रत सापडली. यावरून बराच गदारोळ झाला. संबंधीत केंद्राध्यक्ष दिलीप पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली.काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले.
याची माहीती चाळोबादेव विकास आघाडीच्या प्रमुख मंडळीना समजल्यावर त्यांनी तातडीने मडिलगे येथे भेट दिली. या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुजयकुमार येजरे, क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक निबंधक अनिता शिंदे, अनुराधा काटकर यांच्याशी चाळोबादेव आधाडीचे प्रा. सुनिल शिंत्रे, अभिषेक शिंपी, प्रकाश चव्हाण यांनी झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारला व संबंधीतावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.
यामध्ये मतदान यंत्रणा सामील झाल्याचा आरोपही केला. दरम्यान आघाडी प्रमुख अशोक चराटी याच्यासह यांनी कारवाईची मागणी केली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मावळे मतदान केंद्रावर पोहचले. त्यांनी आघाडी प्रमुखांचे म्हणने ऐकुन घेतले. तिघांच्यावर पोलीसात गुन्हा नोंद करावा अशी मागणी चाळोबा देव आघाडी प्रमुखांनी केली तिघांवर तोतया मतदार म्हणून कायदेशीर कारवाईची ग्वाही दिली व याबाबतचा तक्रार अर्ज देण्याविषयी सांगीतले. यानंतर मतदान केंद्रावरील वातावरण निवळले.
चाळोबा देव विकास आघाडी कडून निषेध..
शहानिशा होण्याची मागणी

यानंतर चाळोबा देव विकास आघाडीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, प्रा. सुनील शिंत्रे, उमेश आपटे, भिकाजी गुरव, मलीककुमार बुरुड, अभिषेक शिंपी आदींच्या उपस्थितीत पत्रकार बैठक पार पडली.
बैठकीमध्ये कारखाना निवडणुकीमध्ये बोगस मतदान करण्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असून जिल्ह्यातील बड्या नेत्याचा संबंधितांना आशीर्वाद आहे. मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत मतमोजणी करण्यात येऊ नये अशी मागणी ही त्यांनी पत्रकार बैठकीद्वारे केली आहे.
लोकशाहीला मारक असणाऱ्या अशा प्रकारांचा अवलंब निवडणुकीमध्ये करणे चुकीचे आहे असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या प्रकरणाचा राष्ट्रवादीशी संबंध नाही : दीपक देसाई
मडिलगे मधील ग्रामपंचायतीच्या एका पदाधिकाऱ्याने बोगस मतदान केल्याचे निष्पन्न झाले. वाद नको म्हणून आपण हा विषय ताणवला नाही. तर एका महिला सभासदाचे मतदान संबंधीत सभासद मतदानाला येण्यापूर्वी झाले होते हे देखील विरोधकांना चांगलेच माहित आहे.
पराभव समोर दिसू लागल्याने या प्रकाराचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जात आहे. पोलिंग एजंट यांनी मतदान होण्यापूर्वीच त्यांना अडवणे गरजेचे होते. मतदान झाल्यानंतर या सर्व प्रकारावर गदारोळ करणे म्हणजे ‘ चोरांच्या उलट्या बोंबा ‘ असा प्रकार आहे.
या प्रकरणाचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा कांही संबंध नाही अशी प्रतिक्रिया मडिलगे येथील रवळनाथ विकास आघाडीचे उमेदवार व पंचायत समिती माजी उपसभापती दीपक देसाई यांनी दिली.

गवसे येथे उद्यापासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

आजरा: प्रतिनिधी
बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथे ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे व पंचायत समिती यांच्या वतीने १९ ते २१ डिसेंबरअखेर करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे….
मंगळवार दि. १९ डिसेंबर
सकाळी १० ते १२ नांव नोंदणी व साहित्य मांडणी
सकाळी ११.१५ वा. ग्रंथ दिंडी… उद्घाटक : श्री. संजय पाटील (उद्योजक, गवसे)
* प्रदर्शन उद्घाटन *
उद्घाटक:-आमदार प्रकाशराव आबिटकरसो (आमदार आजरा, भुदरगड, राधानगरी)
कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री.अशोकअण्णा चराटी (चेअरमन, जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा.)
प्रमुख उपस्थिती:-श्री. बापूसाहेब सरदेसाई (उद्योगपती, पुणे.) श्री. समिर माने (तहसिलदार, आजरा) श्री. शरद मगर(गट विकास अधिकारी पं. स. आजरा),श्री. एकनाथ आंबोकर, श्री. गजानन उकिर्डे (शिक्षणाधिकारी, माध्य, जि. प. कोल्हापूर), (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक) श्री. बसवराज गुरव यांच्यासह मान्यवर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.


