
आजरा साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देणार :प्रा. सुनिल शिंत्रे
श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न कायम ठेवले होते. दुर्देवाने निवडणूक होत आहे. काही मंडळींना माझी उमेदवारी नको होती. मला निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. उमेदवारी नको असती तर केली नसती. कारखान्याच्या हिताचा कारभार केला असून या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मैदानात आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले.
येथे भाजप, काँग्रेस व सेनेच्या श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचाराला प्रारंभ झाला. आजऱ्याचे ग्रामदैवत श्री. रवळनाथ व गवसे (ता. आजरा) येथील श्री. चाळोबा देवाला नारळ ठेवून आशिर्वाद घेण्यात आला.
यावेळी प्रा. शिंत्रे म्हणाले, कारखाना बंद असतांना तो सुरु व्हावा यासाठी कष्ट घेतले. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, जिल्ह्यातील व राज्यातील नेत्यांचे सहकार्य लाभले. तीच भूमिका कायम ठेवण्याची गरज असल्याने कारखाना बिनविरोधासाठी प्रयत्न केले. कामगार, शेतकऱ्यांचे दायित्व स्विकारूया.
अभिषेक शिंपी म्हणाले, राक्षसी महत्वकांक्षेपोटी विरोधकांनी निवडणूक लावली आहे. बिनविरोधासाठीचा प्रस्ताव असून देखील सत्तेसाठी विरोधक सभासद, शेतकरी व कामगाराना वेठीस धरत आहेत. कारखाना टिकवण्यासाठी आमची आघाडी मैदानात आहे. विरोधक सध्या बुध्दीभेद करीत आहेत. त्याला बळी पडू नका.
माजी अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विनय कोरे यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. डिस्टिलरी प्रकल्पासाठी मंत्री चंद्रकांतदादांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली आहे. कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी उमेश आपटे, बिनविरोध निवडून आलेले संचालक संभाजी पाटील, युवराज पोवार यांची भाषणे झाली.
यावेळी ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, नारायण सावंत, जनार्दन टोपले, विलास नाईक, मलिककुमार बुरुड, कृष्णा येसणे, पांडुरंग लोंढे, सर्जेराव देसाई, तानाजी देसाई, सुधीर कुंभार, समीर पारदे, राजू पारदे, संदिप पाटील, गोविंद गुरव, विलास पाटील, आनंदराव कुलकर्णी, रमेश रेडेकर, डॉ. इंद्रजीत देसाई, कृष्णा येसणे, नौशाद बुड्डेखान, तानाजी देसाई, पांडुरंग लोंढे, विजयकुमार पाटील, योगेश पाटील,कृष्णा पाटील, विश्वास जाधव, विक्रम पटेकर,अशोक पोवार, अमित खेडेकर सुधीर कुंभार, अरुण देसाई, सुनील शिंदे, सुनील पाटील, दिलीप माने, सुरेश गड्डी यांच्यासह उमेदवार, भाजप, सेना, काँग्रेस, स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मी कुणाचाही नाही : संभाजी पाटील
शिवसेना हा माझा पक्ष आहे. मी कोणाचाही नाही.मी शिवसेनेचा आहे. मी कोणालाही सोडून गेलेला नाही. आम्ही आहे तिथेच आहोत मात्र काही मंडळींनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन आम्हाला सोडून गेली आहेत. सध्या झालेल्या आघाडीशी आपण बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते दोन संचालक कोण ?
कारखान्याच्या कर्जाच्या प्रस्तावावर केवळ दोन संचालकांनी सहया केल्या नसल्याचा उल्लेख अशोक चराटी यांनी भाषणात केला. अकारण अडकाठी केली जात असल्याचा आरोप अशोक चराटी यांनी केला. संबंधीत संचालकांची नावे जाहीर करावीत अशी मागणी संदिप पाटील, समीर पारदे यांनी केली.

रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ

आजरा : प्रतिनिधी
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उत्तूरचे ग्रामदैवत श्री जोमकाई देवी मंदिर येथे तालुक्यातील विकास आघाडीच्या प्रमुखांसह उमेदवारांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेऊन प्रचार शुभारंभ करणेत आला.
आघाडीचे नेते सुधीर देसाई, वसंतराव धुरे, तालुका अध्यक्ष मुकुंददादा देसाई, मारुतीराव घोरपडे ,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, एम.के. देसाई , उदराज पवार, काशिनाथअण्णा तेली, दिपकराव देसाई, अनिल फडके, सुभाष देसाई, शिरीष देसाई, विजय केसरकर, रणजीत देसाई, विजय वांगणेकर, गणपतराव सांगले, राजु होलम यांसह रवींद्र आपटे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.

मित्राच्या निराधार आईचे मित्रच बनले आधार

आजरा: प्रतिनिधी
कानोली (ता.आजरा) येथील ऐन दसऱ्याच्या सणात आपगे कुटुंबातील कर्ता आणि शरीराने अपंग असणारा कै. रोहिदास उर्फ देवदास सखाराम आपगे याचे अल्पशा आजाराने निधन झाले,रोहिदासच्या वडिलांचे निधन त्याच्या लहान वयातच झाले .त्यामुळे शरीराने अपंग असूनही घरची परिस्थिती गरिबीची .घर खर्च चालविणेसाठी रोहिदासने वयाच्या १८व्या वर्षी गावं सोडले आणि हॉटेलमध्ये कामास सुरुवत केली.
या अनुभवातून त्याने कुक म्हणूनही हॉटेल मध्ये काम केले,मात्र हा संघर्ष चालू असताना देवदासच्या दोन्ही किडन्या रिकामी झाल्या.आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला खंडेनवमी दिवशी रोहिदासचे निधन झाले.घराचा कर्ता पुरुष परिस्थिती गरिबीची असणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशातच त्याच्या वर्गमित्रांना त्याच्या कुटुंबाची परवड समजली आणि सण २००८ सालचे १० वीतील वर्गमित्रांनी सोशल मीडियावर आवाहन करून रु. १८०००/-ची आर्थिक मदत जमा केली आणि त्यांची आई श्रीमती तानुबाई आपगे यांचेकडे सरपंच सौ.सुषमा सुभाष पाटील यांचे हस्ते त्यांना सुपूर्द केली.रक्कम स्वीकारताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाल्याने सारे वर्गमित्रही हळहळले.
यावेळी नाना गोरे, आप्पा पाटील,नेताजी रेडेकर, प्रवीण पाटील सचिन सुतार सचिन नलवडे,युवराज देसाई तबारक बागवान,प्रवीण आगलावे,प्रवीण पाटील,सुरज देसाई,संदीप सालगुडे,संतोष रेडेकर,साईनाथ परब शरद कांबळे,वैभव मुरुकटे शुभांगी रेडेकर यांच्यासह वर्गातील अनेक मित्र मैत्रिणी यांनी आर्थिक मदत केली.

पांडुरंग तोरगले यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

आजरा:प्रतिनिधी
सरपंच आणि विकसनशील गाव यासाठी कार्यरत असणाऱ्या सरपंच परिषद मुंबई, यांच्या कडून देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते आदर्श सरपंच म्हणून पांडुरंग शंकर तोरगले, मासेवाडी यांना देण्यात आला.यावेळी राजू पोतनीस उपस्थित होते.
महत्वाचे…
आजचा दिवस मोर्चांचा
१.आजरा नगरपंचायतीकडून केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ महामोर्चा व आजरा बंद.
२.पाणीपट्टी वाढ व मीटर सक्तीच्या धोरणा विरोधात आजरा तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा.



