mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

संताजी घोरपडे कारखान्याची ऊस वाहतूक रोखली…

१५ जणांविरोधात गुन्हा नोंद

                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         संताजी घोरपडे  साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून गाड्यांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन एकूण पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

         ऊस दर आंदोलन हळूहळू वाढत चालले असून ग्रामीण भागातील या प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत उत्तूर मार्गे घोरपडे साखर कारखान्याला वाहतूक करण्यात येणाऱ्या उसाच्या गाड्या स्वाभिमानी संघटनेच्या शेतकऱ्यांनी अडवल्या. तर कांही गाड्यांच्या चाकामधील हवा सोडली. तातडीने आजरा पोलिसांनी घटनास्थळी  भेट देऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

         रात्री उशिरा  राजेंद्र शामराव गड्ड्यानवर रा. मुत्नाळ ता. गडहिंग्लज, तानाजी श्रीपती देसाई रा. पेरणोली, धनाजी पंडित पाटील रा. इंचनाळ, सदानंद विनायक व्हनबट्टे रा. उत्तुर व बसवराज सिद्धाप्पा मुत्नाळे रा. भडगाव यांच्यासह अज्ञात पंधरा जणांविरोधात गुन्हा नोंद करून वरील पाच जणांना  अटक केली आहे.


आज अशोकअण्णा चराटी यांचा वाढदिवस

                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख जिल्हा बँकेचे माजी संचालक व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा आज दिनांक १४ रोजी वाढदिवस साजरा होत आहे.

        वाढदिवसानिमित्त अण्णा-भाऊ संस्था समूहातर्फे दुपारी तीन वाजता अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृह येथे आमदार प्रकाश आबिटकर, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


ती ‘ चोरी तब्बल तीन लाख ३५ हजारांची

                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         खोराटवाडी ता. आजरा येथील किराणा दुकानांमध्ये झालेल्या चोरीमध्ये सोन्याच्या चार तोळे दागिन्यांसह रोख ९० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले असून एकूण तीन लाख ३५ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी पोलिसात अभिजीत येजरे यांनी फिर्याद दिली आहे.

         लक्ष्मीपूजनानिमित्त पुजलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर चोरट्यांनी रविवारी रात्री डल्ला मारला. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.


 जरांगे-पाटलांच्या कोल्हापूरातील  मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : मारुती मोरे.

                ◼️आ‌जरा : प्रतिनिधी.◼️

          मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या कोल्हापूरातील मराठा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने रहावे असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हा समन्वय मारुती मोरे यांनी आजरा येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

         कोल्हापूर येथील जरांगे पाटील यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे पत्रकार बैठक पार पडली.यावेळी श्री. मोरे म्हणाले, मनोज जंरागे पाटील १५ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या भेटी घेण्यासाठी दौरा करणार असून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला २४ जानेवारी पंर्यत डेडलाइन दिली आहे.

         या पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबर रोजी दु. २ वा.छ. शाहु महाराजांच्या समाधीला भेट देऊन  सकल  मार्गदर्शन करणार आहेत. शासनाने आरक्षणाबाबत विचार न केल्यास भविष्यात मराठा समाज आक्रमक होऊन काही अनुचित घडल्यास यास  शासन जबाबदार असेल. यासाठी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी शांततेत कोल्हापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन ता. अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी केले.

     या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत देसाई, प्रकाश देसाई, सरचिटणीस शिवाजी पाटील, शंकरराव शिंदे उपाध्यक्ष, सूर्यकांत आजगेकर, शिवाजीराव इंजल यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी  उपस्थित होते.  


पारेवाडी फाट्यावर वाहतूक धोकादायक

                   ◼️आ‌‌जरा:प्रतिनिधी◼️

       पारेवाडी (ता. आजरा) फाट्यावर वाहतूक धोकादायक झाली आहे. अर्धवट तोडलेली झाडे व वळणामुळे येथे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

       संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम सुरू असल्याने येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. या फाट्यावर उभे असलेले झाड धोकादायक स्थितीत असून यामुळे अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आजऱ्याजवळील मिनर्वा हॉटेलपासून काही अंतरावर पारेवाडी फाटा लागतो. या फाट्यावरून पारेवाडी, पेठेवाडी, वेळवट्टी असा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून वेळवट्टी, पारेवाडी व पेठेवाडीकडे जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर स्थानिक रहिवाशीसह शेताच्या कामासाठी शेतकरी जात असतात.

         या मार्गाच्या फाट्यावर खुदाईने झाडे मोकळी झाली आहेत. ही झाडे धोकादायक स्थितीत आहेत. समोरून येणारी वाहने या झाडांमुळे दिसत नाहीत. महामार्ग प्रशासनाने लक्ष देत वाहतूक सुरक्षिततेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पारेवाडी व पेठेवाडीतील नागरिकांतून होत आहे.


अभिजित चव्हाण ने संगीत दिलेल्या पिरॅमिड लघुपटाला पुरस्कार जाहीर जगभरातील १२०० शॉर्ट फिल्ममधून निवड

                     ◼️आजरा:प्रतिनिधी◼️

       आजरा तालुक्यातील पेरणोली गावाचे सुपुत्र गायक व संगीतकार अभिजित यशवंत चव्हाण उर्फ अभिराग याने ‘पिरॅमिड’ या लघु चित्रपटाला संगीत दिले आहे. कलकत्ता येथे झालेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये या लघुपटाला ‘बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म’ हा प्रथम क्रमांकाचा तसेच संगीत दिग्दर्शन आदि प्रथम क्रमांकाचे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

         या लघुपटाला संगीत दिलेल्या अभिजित उर्फ अभिराग याने या लघुपटात छोटीशी भूमिकाही साकारली आहे. 

        फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेल्या पिरॅमिड या लघुपटासाठी संगीत देताना त्याने खूप मेहनत घेतली आहे. या मेहनतीला या पुरस्काराच्या रूपाने यश आले असून यापुढेही अशीच चांगली कामं आपल्याकडून व्हावीत अशी इच्छा त्याने व्यक्त केली. त्याने संगीत दिलेल्या या लघुपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे फिल्म क्षेत्रातून कौतुक होत आहे.


 राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता … हवामान विभागाचा अंदाज

         राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. देशासह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

         अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

         गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

         रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

थंडी पुन्हा परतणार

दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे या काळात थंडीमध्ये वाढ होईल.

News Source :-

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!