


हाजगोळी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

आजरा : प्रतिनिधी
हाजगोळी (ता. आजरा) येथील मारुती राऊ उंडगे (वय ५२ वर्षे ) या शेतकऱ्याने तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवार (दि. १७) रोजी सकाळी त्यांनी राहते घरी तणनाशक प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही,
उंडगे यांच्या पश्चात पत्नी,आई, तीन मुली असा परिवार आहे.


आज ‘ आजरा ‘ चे रौप्य महोत्सवी बॉयलर अग्निप्रदीपन

आजरा : प्रतिनिधी
आजरा शेत सह. साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या २५ व्या गळीत हंगामाचा “बॉयलर अग्नि प्रदीपन होमहवन विधी” समारंभ आज मंगळवार दिनांक दि.२४ इ. रोजी सकाळी ७.३० वा. कारखान्याचे संचालक मधुकर कृष्णराव देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगल मधुकर देसाई यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
सकाळी ९.३० वाजता चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचा ‘बॉयलर अग्नि प्रदीपन’ गा.प.पू. बसवकिरण स्वामीजी, जडयसिध्देश्वर बिलवाश्रम, गडहिंग्लज यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाचे हस्ते आयोजित करणेत आला आहे.


शनिवारचा लाँग मार्च यशस्वी करण्याचा निर्धार

आजरा : प्रतिनिधी
राज्य सरकारने २० पटाखालील शाळा बंद करण्याचे धोरण घेतल्याने राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद होणार आहेत. तसेच दत्तक शाळा देऊन शिक्षणाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. या धोरणा विरोधात शनिवार (ता. २८) शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या घरावर व्यापक स्वरूपात लॉग मार्च यशस्वी करण्याचा निर्धार पालक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांच्या बैठकीत निर्धार करण्यात आला.
कॉ. संपत देसाई, कॉ संजय तर्डेकर, माजी सभापती निवृत्ती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला.
कॉ संपत देसाई म्हणाले, राज्य सरकारने शाळा बंद करण्याचे धोरण घेऊन वाड्यावस्त्यांवरील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्य समूहासह बहुजन समाजातील कष्टकरी जातवर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून कायमचे हदपार करण्याचे ठरविले आहे. शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेत त्याच्या आडून आपला छुपा अजेंडा हे सरकार राबवू पाहत आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरणाऐवजी खाजगीकरण करू पाहत आहे: कॉ संजय तर्हेकर म्हणाले, शाळा बंद करून आम्हाला सरकार देशोधडीला लावत आहे. याविरोधात सर्वजण एकत्र येऊन नेटाने लढा उभा करुया, दत्तक शाळा घेण्याऐवजी तो पैसा शासनाकडे जमा करून शिक्षणासाठी खर्च करण्यात यावा..
यावेळी मायकेल फर्नांडिस, सुरेश देशमुख, प्रकाश तिबिले, गोविंद नारळकर, प्रकाश पाटील, रविना सुतार, संतोष चौगुले, दिपक कासार, विनोद सावंत, युवराज देसाई आदी उपस्थित होते.
जि. प. शाळांमधून घडले नामवंत
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावला आहे असे शिक्षण मंत्री केसरकर सांगत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या शाळातून शिक्षण घेऊनच शिक्षण, राजकारण, विज्ञान,साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये नामवंत तयार झाले आहेत याचा विसर त्यांना पडलेला दिसतो असे यावेळी काँ. तर्डेकर यांनी सांगितले.


आज-यात तीन अर्ज अपात्र

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यात आज दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंचपदासाठी मॅढोली येथील १ तर इटे व बुरुडे येथील सदस्यपदासाठी प्रत्येकी असे तीन अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सरपंचपदासाठी ४३ तर सदस्यपदाच्या ७२ जागांसाठी २२४ अर्ज शिल्लक राहीले आहेत.
आज येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात छाननीची प्रक्रिया पार पडली. या वेळी ग्रामपंचायत लागलेल्या पेरणोली, हरपवडे, देऊळवाडी, इटे, सुलगाव, चांदेवाडी, वेळवट्टी, मसोली, मेढोली, बुरडे येथील इच्छुक उमेदवार नेते मंडळी या प्रक्रियेसाठी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता छाननी प्रक्रिया सुरु झाली. बहुतांश गावात विशेषतः कोणीही हरकती घेतल्या नाहीत. त्यामुळे छाननी प्रक्रिया गतीने झाली. हरपवडे येथे एका अपक्ष उमेदवारावर हरकत नोंदवण्यात आली होती. छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली.


आजऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

आजरा : प्रतिनिधी
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केले. व्यंकटराव हायस्कूलपासून संचलनाला सुरवात झाली. संभाजी चौक, मुख्य बाजारपेठ, सोमवार पेठ, सुतार गल्ली, लिंगायतगल्ली, महाजन गल्ली असे संचलन झाले.
महाजन गल्ली येथील चैतन्य सभागृहात श्रीपाद कुलकर्णी, वामन आपटे, सुधीर कुंभार, रमेश दळवी, विनायक चिटणीस, मंदार बापट, प्रकाश पाटील, अभिनंदन परळेकर, योगेश भाईंगडे, श्रीपती यादव, संतोष बेलवाडे, गौरव देशपांडे यांच्यासह आजरा व उत्तूर परिसरातील संघ स्वयंसेवक उपस्थित होते.


सौंदत्ती येथील यल्लमा देवी परिसर स्वच्छ करा… भाविकांची कर्नाटक मंत्र्यांकडे मागणी

आजरा : प्रतिनिधी
गडहिंग्लज तालुक्यासह नेसरी परिसर व सीमा भागातील भाविक मोठ्या संख्येने सौंदत्ती येथील यल्लामा देवी मंदिर परिसराला भेट देत असतात. परंतु या मंदिर परिसरामध्ये सध्या दुर्गंधीचे साम्राज्य असून दर्शनासाठी रांगेत उभारताना सुद्धा अडचणी निर्माण होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री सौ. लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे मंदिर परिसर स्वच्छतेची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नेसरीच्या सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, सागर नांदवडेकर, रामचंद्र परीट आदींच्या सह्या आहेत.


संक्षिप्त…

आजरा पंचायत समितीचे माजी उपसभापती व मडिलगे येथील माजी सरपंच दीपक देसाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मडीलगेचे विद्यमान सरपंच बापू नेऊंगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
छाया वृत्त :

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली होती. गेल्या चार दिवसापासून आजरा शहर व परिसरात थंडीचे आगमन झाले असून सकाळी सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरू लागले आहे.


