कारखाना सुरू ठेवणे हेच संचालक मंडळाचे ध्येय..
संचालक मंडळाचा खुलासा

कारखान्याची बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पात्रता तयार करणे, कारखाना बंद कालावधीतील देणी कमी करणे या उद्देशाने अकाउंटिंग स्टॅंडर्ड प्रमाणे व्यवहार्य पद्धतीने कारखान्याची आर्थिक पत्रके तयार केली असून त्यास वैधानिक लेखापरीक्षकांनीही प्रमाणित केले आहे. या सर्व प्रकारामागे कारखाना चालू ठेवणे हा एकमेव उद्देश असल्याची माहिती संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.
कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये आर्थिक पत्रकांबाबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
सन २०१९-२० आणि २०२०-२१ या कालावधीमध्ये आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने बंद ठेवावा लागत होता. बंद कालावधी मध्ये पुर्वीची कर्जे व देणी आणि बंद कालावधीमध्ये नव्याने निर्माण झालेली देणी यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिीती आणखीनच बिघडली. सन २०१९-२० आणि २०२०-२१ या कालावधीमध्ये उत्पन्न शुन्य रुपये आणि कर्जावरील व्याज, कर्मचारी पगार, भविष्य निर्वाह निधी, शासकीय देणी इत्यादीची देयता मात्र निर्माण झाली.
तसेच २०१८-१९ मध्ये उत्पादित झालेली साखर देखील एम.एस.पी.पेक्षाही दर कमी आलेने साखरेची उशीरा विक्री झालेने व्याजाचा बोजा वाढला. परिणामी कारखान्याची बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पात्रता राहिली नाही. तथापी आजरा साखर कारखान्याचा सभासद शेतकरी व कर्मचा-यांच्या हिताकरीता कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी शासकीय दरबारी अथक प्रयत्न केले त्याला यश येवून कारखाना सुरू करण्याचे ठरले. याकरीता कोल्हापूर जिल्हा मध्य. सहकारी साखर कारखान्यास कर्ज देण्यास संमती दिली.
यावेळी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने सन २०२१-२२ मध्ये आर्थिक तज्ञांचा सल्ला घेवून कारखान्याची सर्व देणी कायम ठेवून अकौटींग स्टैंडर्ड प्रमाणे कारखान्याची सन २०२०-२१ ची ताळेबंद व नफा तोटा पत्रके व्यवहार्य पध्दतीने तयार केली. सदर पत्रके ही बँकेसही मान्य झाल्याने बँकेने कारखान्यास कर्ज पुरवठाही केला. सन २०२१-२२ चा गळीत हंगाम घेणेपूर्वी कारखान्याने शेतक-यांची मागणी विचारात घेवून गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये देय असलेली एफ.आर.पी. ची थकीत रक्कम गळीत हंगाम २०२१-२२ सुरू होणेपूर्वी देणे गरजेचे होते.
थकीत रक्कम रू. १५ कोटी ४७ लाख तसेच तोडणी वाहतुकीची बिले कमिशनसह रू.५ कोटी ४१ लाख त्याचप्रमाणे २०१८-१९ नंतर २०२०-२१ आखेर बँकेचे कर्जावरील व्याज जवळपास ४९ कोटी तसेच कामगार थकीत पगारापैकी कारखाना सुरू झालेनंतर कामगारांच्या आर्थिक अडचण लक्षात घेवून थकीत पगारापैकी दोन पगार तसेच थकीत प्रा. फडातील काही रक्कम, ग्रॅच्युईटीचे हप्ते, बैंक ऑफ इंडियाकडे थकीत कर्जाचे ओ.टी.एस. करणेकरीता उभी करावी लागलेली रक्कम इ.रक्कमा कारखान्याने कर्ज स्वरूपात निधी उभा करून दिला आहे.
याचा परिणाम म्हणून कारखान्याकडील कर्जामध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे ताळेबंदामध्ये कर्जाच्या रक्कमा वाढलेने तसेच उत्पन्न कमी झालेने नेटवर्थवर परिणाम होवू नये याकरीता अकौटींग स्टैंडर्ड प्रमाणे व्यवहार्य पध्दतीला धरून आर्थिक पत्रके तयार केलेली आहेत. त्यास वैधानिक लेखापरीक्षकांनीही प्रमाणीत केले आहे.
तसेच आजरा शेतकरी साखर कारखान्यास सध्या के.डी.सी.सी. बँकेकडून कर्ज पुरवठा सुरू आहे. त्या बँकेस मान्य असेल अशा पध्दतींची बँक अकौटींग स्टॅन्डर्ड प्रमाणे ताळेबंद व नफातोटा पत्रके ही संचालक मंडळाने सर्वानुमते तयार केलेली आहेत. आजरा साखर कारखाना सभासद शेतकरी व कर्मचारी यांच्या हिताचाच विचार कारखान्याच्या संचालक मंडळाचा आहे. व्यवहार्य भुमिका घेवूनच कारखाना कसा सुरू राहिल हेच संचालक मंडळाचे ध्येय आहे असेही संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी संचालक मंडळाच्या वतीने स्पष्ट केले आहे.

मेलेल्या कोंबड्या… भटकी कुत्री.. आणि दुर्गंधी

आजरा तालुक्यामध्ये पोल्ट्री व्यावसायिकांकडून व कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या मंडळींकडून कोंबड्या ठिकठिकाणी उघड्यावर टाकल्या जात आहेत. कांही ठिकाणी कोंबड्या एखाद्या ओढ्यामध्ये अथवा रस्त्याच्या कडेला फेकल्या जात असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसून येते. मेलेल्या कोंबड्या खाण्याकरता संबंधित ठिकाणी मोठ्या संख्येने असणारी कुत्र्यांची संख्या व दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.
व्यवसायिक बिनधास्तपणे मेलेल्या कोंबड्या जागा मिळेल तिथे टाकताना दिसतात. विशेषत: नद्यांना मिसळणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामध्ये या कोंबड्या टाकल्या जात असल्याने कोंबड्या कुजून त्याचे अवशेष पाण्यातून पुढे नदीमध्ये सरकताना दिसतात. चित्र व हिरण्यकेशी नदीच्या पाण्यावर अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. अनेक ठिकाणचे नाल्यांचे दूषित पाणी नद्यांमध्ये मिसळले जात असतानाच आता कुजक्या कोंबड्या देखील या पाण्यामध्ये आढळत असल्याने आरोग्य विभागाची याकडे लक्ष आहे की नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
संबंधित पोल्ट्री चालक व वाहतूकदारांच्यावर कारवाई करून हे प्रकार त्वरित थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

म्हाडाच्या कार्यालयावर गिरणी कामगार मोर्चा काढणार…
आजरा येथील मेळाव्यात कामगारांचा निर्धार

भांडवलदारांचे कर्ज माफ करता आणि गिरणी कामगारांचा प्रश्न इतकी वर्षे भिजत ठेवता.अशा सरकारची सत्ता मतदानाच्या माध्यमातून घालवू असा इशारा देत हक्काची मोफत घरे मिळवण्यासाठी मुंबई येथे म्हाडाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार आजरा येथील किसान भवन येथील मेळाव्यात गिरणी कामगारांनी केला.
यावेळी मोफत घरे मिळाली पाहिजे,घरे आमच्या हक्काची अशा घोषणा देण्यात आल्या.
कामगार नेते काँ.शांताराम पाटील म्हणाले, सामान्य माणूस म्हाडाच्या अधिका-यापर्यंत पोहचू शकत नाही. म्हाडाकडून गिरणी कामगारांना त्रास सुरू आहे. म्हाडाच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत. गिरणी कामगाराला मोफत घर द्यायची व्यवस्था करा.मिलच्या जागा ब्रिटिश सरकारने एक रूपयाच्या लीगवर दिल्या आहेत. त्यामुळे मालकाला कर लावा आणि गिरणी कामगारांना मोफत घर द्या.म्हाडाने आँनलाईनसाठी १० निकष लावले आहेत त्यामुळे म्हाडावर मोर्चा काढणार. मोर्चा काढल्याशिवाय निकष शिथिल करणार नाहीत.
नारायण भडांगे म्हणाले,जोपर्यंत घरे देण्याचे जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामगारांचा सरकारवर विश्वास ठेवायचा नाही. जिल्हा सचिव धोंडिबा कुंभार म्हणाले,लढा,आंदोलन करून आजपर्यंत १५ हजार गिरणी कामगारांना घरे मिळाली आहेत. जर सरकार गिरणी कामगारांच्या घरांचा आराखडा निवडणुकी अगोदर जाहीर नाही केला तर गिरणी कामगारांचे मते गृहीत धरू नका. प्रॉव्हि. फंडाच्या व्याजातून ६ हजार पेन्शन मिळू शकते. हक्काची लढाई सोडलेली नाही. माहितीच्या अधिकारात फंडाच्या माध्यमातून मिलची माहिती, म्हाडाची पावती मिळणार आहे.
यावेळी शांताराम हारेर, मनप्पा बोलके, विठोबा बोलके, नंदा वाकर, सुरेखा बागवे, अनिता बागवे, सोनाली तेजम, गोपाळ कातकर ,मारूती इंगळे, निवृत्ती पाटील, तुकाराम कवीटकर, लक्ष्मण पंडित याच्यासह पेन्शनर उपस्थित होते .आभार बंडू कांबळे यांनी मांडले.
शाळा गाव व सरकारच्या मालकिचा ठराव
शासन जो ५० लाख रुपये देईल त्या उद्योजकाचे नाव शाळेला देणार आहे. शाळा खासगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. शाळा सरकारी व गावच्या मालकीची राहण्यासाठीचा ठराव सुनिल शिंदे यांनी मांडला.

आजऱ्यातील वक्तृत्व स्पर्धेत प्रतिक्षा कांबळे तर निबंध स्पर्धेत सृष्टी आजगेकर प्रथम

आजरा महाविद्यालयात घेतलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रतिक्षा प्रल्हाद कांबळे ( एरंडोळ हायस्कूल ) व निबंध स्पर्धेत सृष्टी हिंदूराव आजगेकर ( माध्यमिक विद्यालय आर्दाळ ) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेचा निकाल…
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम – प्रतिक्षा प्रल्हाद कांबळे ( एरंडोळ हायस्कूल एरंडोळ), द्वितीय – सिमरण भिकाजी पाटील ( व्यंकटराव हायस्कूल आजरा ), तृतीय – ऋतुजा अरविंद सातुसे ( मडिलगे हायस्कूल मडिलगे)
उत्तेजनार्थ – विजया संभाजी राणे ( पंडीत दीनदयाळ विद्यालय आजरा), सानिका राजेंद्र माने ( आजरा हायस्कूल आजरा )
निबंध स्पर्धा – प्रथम – सृष्टी हिंदूराव आजगेकर ( माध्यमिक विद्यालय आर्दाळ), द्वितीय – राखी राजू नवार ( व्यंकटराव हायस्कूल आजरा ), तृतीय – आहाना फिरोद मुराद ( अण्णा भाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल आजरा )
उत्तेजनार्थ -. समता सुधाकर जोशीलकर ( गवसे हायस्कूल गवसे ), कुणाल नामदेव चाळके ( चाफवडे हायस्कूल चाफवडे).
पारितोषिक वितरणचे सुत्रसंचलन ज्योती कुंभार यांनी केले.आभार नेहा पेडणेकर यांनी मानले.
संक्षिप्त…

आजरा येथे विद्युत खांबावरील विजेचा धक्का लागून जखमी अवस्थेत पडलेल्या वानरास येथील सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल व्यावसायिक रवींद्र हुक्केरी यांनी मदत करून जीवदान दिले…
आज शहरात…
♦अण्णाभाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त आजरा महाविद्यालय येथे सकाळी ८ ते १ या वेळेत रक्तदान शिबिर…
♦मुख्य वनसंरक्षक आणि उपवन संरक्षक यांच्या उपस्थितीत आज दि. ४ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता वनविभागाच्या सुलगाव (म्हसोबा) येथील कार्यालयात बैठक…


