
अल्पवयीन ,मतिमंद मुलीवर अत्याचार…
मुलीला दिवस गेल्यानंतर घटना उघड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील किणे पंचक्रोशीतील एका छोट्या गावामध्ये पंधरा ते सोळा वर्षे वयोगटातील एका शेतकरी कुटुंबातील मतिमंद मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना तब्बल १८ महिन्यांनी संबंधित मुलीला दिवस गेल्यावर उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
शेतकरी कुटुंबातील पीडित मुलगी ही मतिमंद आहे. सुमारे साडेचार ते पाच महिन्यापूर्वी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. या घटनेची मुलीच्या कुटुंबीयांना कांहीही कल्पना नव्हती. मात्र त्या मुलीला दिवस गेल्याचे समजताच कुटुंबीय हादरून गेले आहे. याप्रकरणी संबंधित कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली असून अज्ञाताविरोधात पिडीत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पालकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केल्याचे समजते.

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील :आम.आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नव्याने भरती झालेल्या शिक्षकांचा नोकरीचा काळ कमी रहातो. त्यात शिक्षण सेवकांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. त्यांच्यावर हा अन्याय असून हा कार्यकाळ रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जूनी पेन्शन योजना लागू होण्याबाबतही प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा आजरा यांचे त्रैवार्षिक अधिवेशन झाले. आमदार प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. आमदार राजेश पाटील प्रमुख पाहुणे होते. जनता बँकेचे अध्यक्ष मुकंदराव देसाई, जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी सभापती उदयराज पवार, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे, राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष – एस. पाटील, महीला अध्यक्ष श्वेता खांडेकर, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके आदी प्रमुख उपस्थित होते.
शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मायकेल फनॉडीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. वरुटे यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न व मागण्या मांडल्या. आमदार आबिटकर म्हणाले, शिक्षकांच्यामुळे समाज घडतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न व मागण्या सोडवण्यावर भर आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची एमसीआयटीची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, शिक्षकांच्यामुळे इथपर्यंत आपली वाटचाल झाली आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. अशोक चराटी म्हणाले, शिक्षकांच्यामुळे विद्यार्थी व समाजाची जडण घडण होते. त्यांच्यामुळे समाज घडतो. सुधीर देसाई म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक बदलामध्ये शिक्षक योगदान देतात. त्यांना सहकार्य केले जाईल. मुकुंदराव देसाई म्हणाले, समाजाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोठा राहीला आहे. यावेळी बी. एस. पाटील, श्रीमती खाडेकर, श्री. बोलके यांची भाषणे झाली.
कार्यक्रम प्रसंगी मारुती देसाई, मारुती वरेकर, पी. एन. आजगेकर, अर्जुन पाटील, माधुरी मोरे, सुचिता लाड, अर्चना पाटील, संजय मोहीते, रविंद्र नावलकर, यूनुस लाडजी, महादेव तेजम, संतोष शिवणे आदीसह शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते.

उद्घाटनापूर्वी देणगीदारांची नावे जाहीर करणार…
पुतळा समितीची पत्रकार बैठकीत माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छ. शिवाजी महाराज पुतळा समितीकडून आज अखेरचा जमाखर्च तपशील जाहीर करण्यात आला असून सर्व देणगीदारांची देणगी रकमेसह नांवे व जमाखर्च जाहीर करणार असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आजरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बांधकाम व्यवहारात पारदर्शकता आहे. आलेल्या रक्कमा बँकेत जमा होवून खर्च रितसर झालेला आहे. याचे आतापर्यंत ऑडिट झाले आहे. आलेल्या देणग्यांच्या रितसर पावत्या दिल्या आहेत. कोरोनामुळे अनेक अडचणी आल्यामुळेच उद्घाटन आतापर्यंत करता आलेले नाही. पूर्ण काम करूनच उद्घाटन केले जाणार आहे. अंतीम टप्प्यात काम असून लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती समितीच्या वतीने पत्रकार बैठकीत देण्यात आली. बैठकीस पुतळा समितीचे अध्यक्ष बापू टोपले, अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, मारुती मोरे, विलास नाईक,मुकुंदराव देसाई, विजयकुमार पाटील, आनंदा कुंभार, संभाजी पाटील, संभाजी इंजल, पदाधिकारी उपस्थित होते. आजरा अन्याय निवारण समितीच्या वतीने देणगीदारांची नावे देणगीसह जाहीर करावीत व जमाखर्चाचे हिशोब प्रसिद्ध करावेत अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सदर पत्रकार बैठक झाली.
ज्यांच्या रक्कमा या कामासाठी जमा आहेत त्यांना रितसर पावत्या दिल्या आहेत. ज्यांनी समितीकडे रक्कम न देता ज्यांच्याकडे रक्कम दिली आहे. त्यांच्याकडे पावतीची मागणी करावी. याचा संबंध समितीशी न जोडता निदर्शनास आणून द्यावा असेही आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. छ. शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी१ कोटी ५ लाख इतकी रक्कम जमा झाली आहे. यामध्ये आमदार फंडातून ३५ लाख येणे बाकी आहेत. आता पर्यंत पुतळा व सुशोभिकरणासाठी १ कोटी ५ लाख खर्च झाले आहेत. यामध्ये ३४ लाखांची उधारीची देणी बाकी आहेत अशी माहीती देण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जितेंद्र शेलार, संतोष शेवाळे, बंडोपंत कातकर उपस्थित होते.
त्यांनी अध्यक्षांशी संपर्क साधावा…
ज्या मंडळींनी सदर कामाकरता वर्गणी दिली आहे परंतु ती वर्गणी समितीपर्यंत पोहोचली आहे की नाही याबाबत कोणतीही शंका असल्यास संबंधितांनी थेट अध्यक्षांशी संपर्क साधून याबाबत खातरजमा करून घ्यावी असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

निधन वार्ता
गंगाराम पाटील

आरदाळ ता. आजरा येथील गंगाराम आबा पाटील ( वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी नऊ वाजता आरदाळ येथे आहे.
पाऊस पाणी

आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम असून आजरा शहरासह आजरा मंडल परिसरात गेल्या २४ तासात ९६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने (१००%) भरला असून सांडव्यावरून १५ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचबरोबर उचंगी, चित्री, आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

