म्हाळसाकांत देसाई यांना पितृशोक

आजरा येथील नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई यांचे वडील श्री. विश्वासराव नानासाहेब देसाई यांचे मंगळवार दि.३ रोजी पहाटे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.उत्साळी या त्यांच्या मूळ गावी मंगळवारी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माणूस मारला गव्याने …
बैल मारला वाघाने…
मस्तवाल लोकप्रतिनिधी आणि सुस्त वनविभाग

(ज्योतिप्रसाद सावंत)
गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये गव्याच्या हल्ल्यात आजरा तालुक्यातील उस्मान कानडीकर या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर शुक्रवारी आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन येथे वाघाच्या हल्ल्यामध्ये सोनू बाबू कोकरे यांचा बैल ठार झाला. दोन्हीही घटना त्या त्या पातळीवर गंभीर असूनही मस्तवाल लोकप्रतिनिधी व सुस्त वनविभागामुळे अशा घटनांना पुन्हा पुन्हा सामोरे जावे लागत आहे हे वास्तव मात्र नाकारता येत नाही.
तालुक्यामध्ये गेली अकरा वर्षे हत्तीने धुमाकूळ घातला आहे. उभ्या पिकांची खुलेआम नासाडी करत आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही हे हत्तीकडून पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवले जात आहे. हत्तीकडून अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नाही हेच तालुका वासीयांचे सुदैव. हत्ती व गड्यांकडून होणारे पिकांचे नुकसान हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर कसे पडते याचा अनुभव यापूर्वी एका वनरक्षक महिलेने तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यात घातलेल्या गोंधळामुळे जगजाहीर झाले आहे. खरोखरच नुकसान झालेला शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत तर ज्यांचे नुकसान झाले नाही अशा शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई असा विचित्र अनुभवही तालुकावासीयांना येत आहे.
एकीकडे हत्ती पुराण सुरू असतानाच दुसरीकडे गव्यांचे हल्ले रोखण्याचे आव्हान शेतकरी वर्गासमोर आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवांमुळे जंगलाशेजारील अनेक जमिनी पड ठेवण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे. एकीकडे शेत जमिनीतून उत्पन्न नाही तर दुसरीकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही अशा विचित्र अवस्थेत तालुक्यातील डोंगरकपारीत राहणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याची वेळ आली आहे. पीक नुकसानी सह जीवितहानी साठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईचे निकष व अटी पाहता खरोखरच ही नुकसान भरपाई मिळते का ? हा देखील संशोधनाचा विषय आहे.
तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आता विविध निवडणुकांचे वेध लागले आहेत. आता त्यांना अशा बाबींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. भरीस भर म्हणून पट्टेरी वाघाचे अस्तित्व देखील स्पष्ट झाले आहे. हत्ती, गवे, वाघ, बिबटे,रानडुकरे,मोर यासारखे वन्य पशुपक्षी सोबत घेऊन जगताना तालुकावासियांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.
नुकसानीचे पंचनामे करताना वनविभाग व शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. वनविभागाच्या अटी व शर्तीनुसार वनविभागाचे काम तर कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा आग्रह असा प्रकार वारंवार घडत आहे.
या सर्व प्रकारात लोकप्रतिनिधींची असणारी बघ्याची भूमिका वनविभागाला सुस्त बनवण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे अप्रत्यक्षरीत्या सर्व सामान्य शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे.
वन्य प्राण्यांचे तालुक्यात असणारे अस्तित्व हे समृद्ध जंगलांचे द्योतक असले तरी एकंदर बाबी विचारात घेतल्यास शेतकरी वर्गाच्या दृष्टीने चिंताजनक आहे हे निश्चित…
बैठका म्हणजे एरंडाचे गुऱ्हाळ…
लोकप्रतिनिधी व वनविभागाने यापूर्वी वन्य प्राण्यांकडून होणा-या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठका म्हणजे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले आहे. गेल्या दहा वर्षात यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. शेतकरी वर्गाचा रेटा वाढला की बैठकांचा फार्स सुरू होतो हा अनुभवही नवा नाही.

मोरजकर महाराज सप्ताहाची सांगता…

आजरा येथील ह.भ.प.पू. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या सप्ताहाची सांगता महाप्रसाद व तांदळाच्या प्रसादाने पार पडली.
सोमवारी झालेल्या महाप्रसाद कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती तर रात्री महाराजांची पोथी घरामध्ये समारंभपूर्वक नेण्यात आली.यावेळी तांदळाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गेले आठ दिवस सुरू असलेल्या या सप्ताह सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटकसह गोवा राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली .

पं. दीनदयाळ विद्यालयात म. गांधी व शास्त्री जयंती उत्साहात

पंडित दीनदयाळ विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सुनील मटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई व मान्यवरांच्या हस्ते दोन्हीही महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील ते बॅरिष्टर झाल्यानंतर त्याने काम पाहिलेल्या पहिल्या केस बद्दलची माहिती त्याचबरोबर अहिंसा तत्व त्यांनी आयुष्यभर कसे जपले आणि लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर भारतीय स्वातंत्र्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन भारताला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून देईपर्यंतच्या सर्व प्रसंगांची माहिती दिली.
याचबरोबर ‘ जय जवान… जय किसान ‘ असा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दलची माहिती, त्यांनी केलेल्या कार्याची ओळख मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजोपाध्ये यांनी केले. सौ.सुनीता कुंभार यांनी आभार मानले. त्यानंतर शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

…निवड…
सौ. धनश्री देसाई

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षपदी आजरा येथील उद्योजिका सौ. धनश्री मानसिंग देसाई यांची आजरा गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड तालुक्याकरिता कक्ष प्रमुख पदी निवड झाली आहे.
खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र समारंभपूर्वक सौ.देसाई यांना देण्यात आले.
पाऊस-पाणी
गेल्या २४ तासात आजरा व शहर परिसरात पाऊस झालेला नाही.


