mrityunjaymahanews
अन्य

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला..

आजरा तालुक्यातील हाजगोळी येथे असणाऱ्या हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यात सडलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. या घटनेमुळे हाजगोळी  पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

आज सकाळी  हाजगोळी येथील स्थानिक नागरिकांना बंधाऱ्याच्या शेजारी असणाऱ्या झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत अडकलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. आठवडाभरापूर्वी हात्तीवडे येथून  हिरण्यकेशी नदी पात्रात एक महिला बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सदर मृतदेह त्याच महिलेचा आहे का याबाबत शहानिशा करून घेतली जात आहे.

आजरा पोलिसात याबाबतची वर्दी देण्यात आली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप

गणेश विसर्जन मिरवणूकांनी मात्र केला भ्रमनिरास…

आजरा शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकातील कार्यक्रम मात्र शहरवासीयांचा भ्रमनिरास करणारे ठरले. कोणताही नवीन कार्यक्रम अथवा सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम नसल्याने बहुतांशी शहरवासीयांनी या मिरवणुकांकडे पाठ फिरवल्याने काही मंडळांच्या गणेश मुर्त्यासमोर मोजकीच उपस्थिती दिसत होती.

मुळातच गणेश विसर्जन मिरवणुकांना वेळाने सुरुवात झाली. पावसाचा कोणताही अडथळा नसतानाही या मिरवणुकांमध्ये जल्लोष दिसत नव्हता. शिवसेनेच्या आर्केस्ट्रासह मिरवणुकीची गर्दी वगळता अन्य मंडळांकडे मात्र गर्दीचा अभाव जाणवत होता.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शहरातील चार प्रमुख सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मुर्त्यांचे ‘ बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या.. ‘ च्या गजरात विसर्जन करण्यात आले. प्रथम मूर्ती विसर्जनाचा मान सालाबादप्रमाणे येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मिळवला.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये पोलीस, गृह रक्षक दल व राखीव पोलीस दलाच्या तुकड्यात तैनात करण्यात आल्या होत्या. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नेमके पाहायचे तरी काय…?

मोठ्या हौसेने कुटुंबीयांना घेऊन विसर्जन मिरवणुका पहाण्याकरता आलेली मंडळी मिरवणुकीमधील कार्यक्रम पाहून अखेर या मिरवणुकांमध्ये नेमके पहायचे तरी काय…? असा सवाल उपस्थित करताना दिसत होती.

जागेच्या वादातून शिवीगाळ व विनयभंग प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

जागेच्या वादावरून उत्तूर ( ता. आजरा) येथे झालेल्या वादातून शिवीगाळ,मारहाण व विनयभंगाचा प्रकार केल्याच्या आरोपावरून
आनंदा आरेकर , मारूती आरेकर, सुभाष आरेकर, लता गोपाळ आरेकर, अभिजीत आरेकर, प्रणव आरेकर (सर्व रा. उत्तूर, ता. आजरा ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बुधवार दिनांक दि.२७ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे घरासमोर सदर प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले  असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आजरा शहरात पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा…
नद्यांना पाणी असूनही एक दिवसाआड पाणी

आजरा शहरामध्ये नळपाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले असून ऐन पावसाळ्यातही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळालेले नाही. सध्या सणासुदीचे कार्यक्रम असूनही एक दिवस आड व अनियमित,अपू-या स्वरूपात होणारा पाणीपुरवठा हा महिला वर्गाच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय बनला आहे.

गेले वर्षभर पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केले जाणारे पाणी हे अनियमित स्वरूपाचे आहे. वारंवार नळ पाणीपुरवठा योजनेला लागणाऱ्या गळत्या, तांत्रिक बिघाड,खंडित वीज पुरवठा या सर्वाचा परिणाम म्हणून शहरवासीयांना हिरण्यकेशी व चित्री नदीपात्रात पुरेसे पाणी असूनही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मुळातच नळ पाणीपुरवठा योजनेचे वेळापत्रक बिघडले आहे. एका विशिष्ट व ठराविक वेळी पाणी येत नसल्याने दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करताना महिला वर्गाची तारांबळ उडत आहे. नगरपंचायतीचे कारभारी जर केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर याचे परिणाम आगामी नगरपंचायत निवडणुकीत निश्चितच भोगावे लागणार असेही दिसू लागले आहे.

पाणीपुरवठा जर नियमित व वेळेवर होत नसेल तर पाणीपट्टी भरायची कशाला ? असा संतप्त सवालही आता शहरवासीय उपस्थित करू लागले आहेत.

शहरवासीयांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वीच नगरपंचायतीने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा अशी मागणी आता केली जात आहे.

पाणीपुरवठा विभाग नॉट रिचेबल…

शहरामध्ये पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ही मंडळी नॉट रिचेबल असल्याचे दिसून येते.

कुत्री भटकी.. पण आहेत नेटकी

आजरा शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून शहरवासीयांचे जगणे हैराण करून सोडले आहे. नगरपंचायत प्रशासनाने या भटक्या परंतु नेटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा  अशी मागणी शहरवासीय करत आहेत.

शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.शाळकरी विद्यार्थी व महिलांच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. बाजारपेठेसह शहरातील उपनगरे व गल्ल्यांमध्ये कळपाने या कुत्र्यांचा वावर दिसतो. नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना चावणे,दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या पाठीमागून पळत जाणे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. यामुळे दुचाकी स्वारांचे लहान- मोठे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.

नगरपंचायतीने ही बाब गांभीर्याने घेऊन कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

संबंधित पोस्ट

अभियंता अक्षयचा आकस्मिक मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे  प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले.

mrityunjay mahanews

बेलेवाडीत दर्शन…? लिंगवाडीत हल्ल्यात बैलाचा मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!