
‘आजऱ्या ‘ची धाव सव्वातीन लाख टनापर्यंतच…?
पुढच्या वर्षीच्या गळीत हंगामाबंत अनेक प्रश्नचिन्हे

सलग दोन वर्षे बंद असणारा आजरा साखर कारखाना अनेक राजकीय मंडळींचे उंबरे झीजवल्यानंतर व त्यांनी केलेल्या मदतीवर पुन्हा एकदा सुरू झाला. गतवर्षीचा हंगाम कसाबसा पार पडला.यावर्षी कारखाना सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत चार लाख मे. टन गाळपाचा टप्पा ओलांडणार असे अध्यक्ष व संचालक मंडळाकडून वारंवार प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले जात होते. प्रत्यक्षात मात्र सद्यस्थिती पाहता कारखान्याचा गळीत हंगाम ३ लाख २५ हजार मेट्रिक टन गाळपानंतर संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनांकडून केले जाणारे सर्व दावे फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन वर्षानंतर कारखाना सुरू होऊनही कारखाना संचालकात असणारे मतभेद थोडे बाजूला ठेवणे आवश्यक होते पण याचे भान संचालक मंडळाला दिसले नाही. आंबेओहोळ, उचंगी हे दोन्हीही महत्त्वकांक्षी पाणी प्रकल्प सुरू झाल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रात उसाची वाढ होत आहे. याचा फायदाही कारखाना व्यवस्थापन उचलू शकले नाही. नेहमीप्रमाणे यावेळीही तोडणी यंत्रणांनी कारखान्याला फारसे सहकार्य केल्याचे दिसत नाही.
एकीकडे आजूबाजूच्या कारखान्यांकडून आजरा तालुक्यातील उसाच्या उचलीला प्राधान्य दिले जात असताना संचालक मंडळाने केवळ बघ्याची भूमिका घेत कार्यक्षेत्राबाहेरील उसाची उचल करण्यास प्राधान्य दिले.याचा परिणाम स्थानिक ऊस बाहेरच्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर गेला आहे. एका बाजूला ‘आजरा ‘ ची अपुरी यंत्रणा व दुस-या बाजूला कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणण्यासाठी केली जाणारी धडपड याचा नकारात्मक परिणाम स्थानिक उचलीवर झाल्याचे प्रकर्षाने पुढे येत आहे.
साखर कारखान्यावर सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. चार लाख मे.टन गाळप झाले असते तर हा बोजा थोडाफार कमी झाला असता. परंतु अपेक्षित लक्ष्य साध्य न झाल्याने पुन्हा यावर्षी वीस ते पंचवीस कोटी रुपये कर्जाचा अतिरिक्त बोजा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऊस विकासासारखा कार्यक्रम कारखान्या मार्फत राबवला जाणार असल्याचे सांगितले जात होते प्रत्यक्षात मात्र या ऊस विकासाचे काय झाले ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असणारी सध्याची कारखान्याची स्थिती पाहता अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात उशिरा उचल होणाऱ्या उसाची बिले न मिळण्याची शक्यता गृहीत धरून कारखाना तोडणी यंत्रणेस शेतातून परत पाठवून इतर कारखान्यांना ऊस पाठवण्यासारखे प्रकार घडू लागले आहेत. कारखान्याच्या दृष्टीने ही बाब निश्चितच लाजिरवाणी आहे.
एकंदर परिस्थिती पाहता चार लाख मे. टन गाळपाचे ढोल संचालक मंडळाने कितीही बडवले असले तरी कारखान्याचा गळीत हंगाम ३ लाख २५ हजार मे. टनापर्यंतच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सत्ताधाऱ्यांसमोर अनेक अडचणी…
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. अशातच कारखाना साडेतीन लाखापर्यंतही गाळप करू शकेलं असे दिसत नाही. त्यामुळे तोडणी यंत्रणेला द्यावी लागलेली खुशाली, वेळेत उसाची न झालेली उचल व बाहेरून ऊस आणण्यास दिले गेलेले प्राधान्य यासह संचालकातील अंतर्गत मतभेद यामुळे सभासद वर्गाकडून संचालकांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.
ना सवलतीची साखर…ना उसाची वेळेत उचल
कारखाना उभारणीसाठी योगदान दिलेल्या सभासदांना गेली चार वर्ष सवलतीच्या दरात साखर मिळाली नाही अथवा त्यांचा वेळेत ऊसही गेलेला नाही मग आम्ही सभासदत्व ठेवायचे कशाला? असा प्रश्नही आता सभासदांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

वनौषधी पार्क आगीच्या भक्ष्यस्थानी
दुर्मिळ वनस्पती नष्ट

आजऱ्याचे वैभव ठरलेल्या आणि वनौषधी, सुगंधी वनस्पती व जैवविविधता पार्क साकारलेली नारायण बाग कोणा अज्ञाताने लावलेल्या आगीत जळून खाक झाली. सुमारे ४५ एकरावरील या बागेत लावलेले अनेक दुर्मिळ वृक्ष आणि वनस्पती या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. लाखोंचा शासकीय निधी गुंतवून मंत्रीगणांच्या उपस्थितीत झगमगाटात उदघाटन झालेल्या या पार्कसह उर्वरित बागेचे झालेले नुकसान कोणाही पर्यावरण आणि निसर्गप्रेमीना हळहळायला लावणारे आहे.
आजरा-आंबोली मार्गाकडेलाच वसलेल्या या बागेस दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये कोणी अज्ञात माथेफिरुकडून आग लागल्याचा संशय व्यक्तx होत आहे. बागेच्या पश्चिम-उत्तरेकडून ही आग लागली. वाऱ्याचा जोर आणि बागेतील न कापलेले वाळलेले गवत यामुळे ही आग सर्वत्र पसरली. या बागेच्या ४५ एकर जागेपैकी १८ एकरावर वनौषधी पार्क उभा होता. गेल्या काही वर्षातील दुर्लक्षामुळे त्याची दुरवस्था झाली असली तरी काही बहुमूल्य वृक्ष आणि वनसंपदा अद्याप टिकून होती. अंदाजे नव्वदच्या दशकातही या बागेत मसाला वनस्पतींचा प्रयोग साकारण्यात आला होता, पण तो असफल ठरला. तेव्हापासून पडीक असलेल्या या जमिनीवर काही व्यक्ती, संस्थांसह विविध सरकारी विभागाचीही नजर होती. कृषी विभागाच्या अखत्यारीतील या जमिनीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील यांनी प्रयत्न केले. पार्कमध्ये सामूहिक शेततळी, रोप लागवड, नक्षत्र वन, चाफ्याचे वन, वनौषधी संग्रहालय, सुगंधी गवत लागवड, तेलताड लागवड, गुरे प्रतिबंधक चर, काजूच्या बागांचे क्षेत्र, नैसर्गिक वायूनिर्मिती केंद्र आदींचे नियोजन होते. पण ते स्वप्न दुर्लक्ष आणि अशा प्रकारच्या आगीमध्ये भस्मसात झाले आहे. तसेच उर्वरित बागेचेही मोठे नुकसान झाले.
या परिसराच्या नजीक वस्ती करून असलेल्या आणि आग त्यांच्याकडे येण्याची शक्यता गृहीत धरून संबंधीत शेतकरी आणि वनविभागाचा एकमेव कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्नशील होते. या पार्कमध्ये ८० लाख लिटर क्षमतेचे एक पाण्याचे तळेही आहे. पण पाणी नेण्यासाठी व्यवस्था नाही. अशातच बागेत बेसुमार वाढलेले गवत, काटेरी झाडेझुडपे आणि वाटांची कमतरता असल्याने पुढे जाऊन आग विझवणे अशक्यप्राय असल्याचे संबंधितांनी सांगितले. एकूणच दुरवस्थेच्या जाळ्यात अडकलेला हा बहुउद्देशीय पार्क आणि त्याच्यासह उरलेली बाग मात्र या आगीत जळून खाक झाली.
आग लागली की लावली…?
वनौषधी पार्कच्या मोक्याच्या जागेवर अनेक सार्वजनिक संस्थांसह सामाजिक संस्थांचाही डोळा आहे. सदर जागा पदरात पाडून घेण्याकरिता शासन दरबारी अनेकांचे खेटे सुरू आहेत. त्यामुळे वनौषधी वनस्पतींचा हा पार्क या मंडळींच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असल्याने सदर आग ही जाणीवपूर्वक लावल्याची चर्चाही शहरात सुरू आहे.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जनार्दन टोपले….
दयानंद भुसारी उपाध्यक्ष

स्वामी विवेकानंद नागरी सह. पतसंस्था मर्या.,आजराच्या नूतन पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद ओतारी, निवडणुक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जनार्दन विठ्ठल टोपले यांची अध्यक्षपदी तर दयानंद सिद्धाप्पा भुसारी यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार श्री. मिलिंद ओतारी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.
त्यानंतर जेष्ठ नेते श्री. बापु टोपले, संचालक श्री. रणजित ईश्वर पाटील, संचालक श्री. सुधीर बाबुराव कुंभार, संचालिका सौ. सुनिता सुरेश कुंभार यांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना नुतन चेअरमन श्री. जनार्दन टोपले व व्हा. चेअरमन श्री. दयानंद भुसारी यांनी यावेळी संस्थेला प्रगतीपथावर नेणेची हमी दिली.
त्यानंतर श्री. मिलिंद ओतारी, निवडणुक निर्णय अधिकारी, यांनी मार्गदर्शन केले.
स्वागत सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांनी केले तर आभार संचालक श्री. महेश दत्तात्रय नार्वेकर यांनी मानले.सभेला सर्व नुतन संचालक उपस्थीत होते.
…………………….,……………………………..
निधन वार्ता
सौ. स्वाती डोणकर

आजरा येथील सौ. स्वाती प्रकाश डोणकर (वय ५८वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व मुलगी असा परिवार आहे. आंतरराष्ट्रीय महिला डी.जे. श्रेया डोणकर यांच्या त्या मातोश्री होत.


