

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या…
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

आजरा भुदरगड राधानगरीचे आमदार प्रकाश आबीटकर यांना ५६७ कोटी रुपयांचा निधी दिला परंतु आमदार असे का वागले की जेणेकरून त्यांना शिवसेना सोडावीशी वाटली ? असा प्रश्न उपस्थित करत गद्दार हे गद्दारच असतात… असा घणाघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. बंडखोर आमदारांवरही त्यांनी चौफेर टीका केली. आजरा येथे त्यांच्या भेटी दरम्यान शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. जरादेखील लाज असेल तर राजीनामा द्या व पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आवाहनही त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना केले.
गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये गद्दारांनी शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासारख्या चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे गद्दारांचे दोन गट पडले आहेत. केवळ स्वत च्या महत्त्वाकांक्षेपोटी काहींनी गद्दारी केली तर दुसरीकडे काहींना फसवून गद्दारी करण्यास भाग पाडले गेले. ज्या उद्धव साहेबांनी सर्वकाही दिले व कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही अशांनी गद्दारी केली. गरजेपेक्षा व लायकी पेक्षा त्यांना जास्त दिले हीच आमची सर्वात मोठी चूक झाली असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

घटनाबाह्य पद्धतीने तयार झालेले हे सरकार केवळ एक ते दोन दीड महिन्याकरताच अस्तित्वात राहील. ज्यांनी गद्दारी केली परंतु अद्यापही ज्यांना शिवसेनेत परतावेसे वाटते त्यांना मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे .बंडखोरांमध्ये जराशी लाज व हिम्मत असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा एकवेळ निवडून यावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आदेश बांदेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील,प्रभाकर खांडेकर, तालुकाप्रमुख राजू सावंत युवराज पोवार,दयानंद भोपळे,ओंकार माद्याळकर, दिनेश कांबळे,अनपाल तकिलदार,समीर चांद, रियाजभाई शमनजी,भास्कर निकम,संजूभाई सावंत,महेश पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



अण्णा भाऊ संस्थासमूहाचे खंदे शिलेदार डॉ. अनिल देशपांडे यांचा आज (दि. 2 )रोजी एकसष्ठावा वाढदिवस

दि आजरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान अध्यक्ष, अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूत गिरणीचे उपाध्यक्ष व जनता शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांचा आज एकसष्ठावा वाढदिवस …
स्व. काशिनाथ अण्णा चराटी व स्व. माधवरावजी देशपांडे यांच्या पश्चात अण्णाभाऊ संस्था समूहाची धुरा संस्थेचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व डॉ. अनिल देशपांडे यांनी समर्थपणे पेलली आहे. स्व. काशिनाथ अण्णा व माधवराव देशपांडे (भाऊ) यांच्या आकस्मिक निधनानंतर संस्था समुहाची जबाबदारी अचानकपणे अशोकअण्णा चराटी व डॉ. देशपांडे यांच्यावर येऊन पडली. प्रचंड व्याप असणा-या या संस्था समूहातील अनेक संस्था सक्षमपणे हाताळताना त्यांना बरीच तारेवरची कसरत सुरुवातीच्या काळात करावी लागली. परंतु अनुभव जसजसा मिळत गेला तसतसा या संस्था आपल्या सहकारी मंडळींच्या मदतीने नव्या जोमाने नावारुपास आणल्या. धडाडीचे नेतृत्व अशी ओळख असणारे अशोकअण्णा व सर्वांना सांभाळून घेऊन पुढे जाणारे डॉ देशपांडे या जोडगोळीने आजरा अर्बन बँक, जनता एज्युकेशन सोसायटी ,अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी यासह या समूहातील अनेक छोटय़ा मोठय़ा संस्था स्वतः काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रगतिपथावर आणल्या आहेत.
एकीकडे शिक्षण,आरोग्य व सहकारात काम करत असताना नवनाटय़ मंडळासह आजरा तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या डॉ.देशपांडे यांनी खेडे आपल्या मूळ गावीही विकासकामे करण्यामध्ये हातभार लावला आहे.अशा सहकार, शिक्षण संस्कृती व राजकीयदृष्ट्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…




